Site icon InMarathi

नेहरूंनी त्यांचं “Tryst with destiny” भाषण इंग्रजीतून करायला नको होतं असं वाटत असेल तर हे वाचा

PM-Nehru-Red-Fort-address-1947

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारतदेशाला स्वातंत्र्य मिळाले . याचदिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी संपूर्ण जग व भारतवासियांना उद्देशून एक भाषण केले. ह्या भाषणाला “Tryst with destiny” असे म्हणतात.

हे भाषण जगातील सर्वोत्तम भाषणांपैकी एक समजले जाते.

परंतु पंडित नेहरू ह्यांनी हे भाषण हिंदीतून न करता इंग्रजीतून केले. आजही अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, भारताची भाषा हिंदी असताना पंडितजींनी भाषणासाठी इंग्रजी भाषा निवडायला नको होती.

 

onmanorama.com

पहिल्या स्वातंत्र्यदिनाला पंडितजींनी हिंदी भाषेत भाषण का केले नाही ह्यावर अनेक तर्क केले जातात. हाच प्रश्न एका व्यक्तीने सोशल मिडीयाच्या मंचावर उपस्थित केला होता. त्यावर अनेकांनी आपले तर्क मांडले.

बालाजी विश्वनाथन ह्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हटले कि ,

पंडितजींनी जे भाषण केले ते रेडीयोवरून प्रसारीत झाले. १९४७ साली फक्त श्रीमंत व उच्चशिक्षित लोकांकडे रेडियो होता. ह्या लोकांना हिंदीपेक्षा इंग्रजी भाषा जास्त चांगली अवगत होती. त्या काळी भारतात सर्रास सर्वांना हिंदी भाषा अवगत नव्हती.

दक्षिणेत किंवा ईशान्य भारतात हिंदी समजणाऱ्या लोकांचे प्रमाण फार कमी होते. आतासारखा संपूर्ण भारतात हिंदी भाषेचा प्रसार झाला नव्हता.

हिंदीभाषिकांना कदाचित हे आवडणार नाही परंतु, १९४७ साली हिंदी ही सामान्य भारतीय जनतेची भाषा नव्हती.

नंतर बॉलीवूड , रेडियो व दूरदर्शन , केंद्रित सरकारी नोकऱ्या आणि विद्यापीठे ह्यांच्यामुळे उत्तर भारतात व देशात हिंदीचा झपाट्याने प्रसार झाला. त्या आधी लोक ब्रजभाषा, अवधी,मैथिली ,भोजपुरी आणि अशा प्रादेशिक भाषा बोलत असत.

“शुद्ध हिंदी” प्रसिद्ध झाल्यानंतर लोक ह्या प्रादेशिक भाषा विसरून गेले आणि जे ह्या भाषा बोलत असत त्यांना गावंढळ ठरवले गेले. इतकेच काय तर महाराष्ट्रात सुद्धा मराठीचीच चलती होती. देवनागरी मराठी आधी मोडीलिपीचा उपयोग होत असे.

थोडक्यात सांगायचे तर देवनागरी आणि हिंदी १९४७ साली कॉमन नव्हत्या. म्हणून पंडितजींनी हिंदी ऐवजी इंग्रजीत भाषण केले कारण उच्चशिक्षित लोकांना इंग्रजीचे ज्ञान होते.

 

thehindu.com

तसेच हे भाषण भारतातील व भारताबाहेरील सुशिक्षित लोकांना उद्देशून केले होते. पंडितजींना हे अपेक्षित होते की जे सुशिक्षित लोक त्यांचे भाषण ऐकतील, त्यांनी त्यातील संदेश आपल्या आसपासच्या सर्वसामान्य लोकांना त्यांना समजेल अश्या भाषेत सांगावा.

बिझनेसमन, नेते, शिक्षक, सरकारी अधिकारी ह्यांनी हे भाषण ऐकून लोकांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत भाषणातील संदेश सांगावा असा कदाचित पंडितजींचा उद्देश असावा. तसेच सर्व भाषातील वर्तमानपत्रांनी सुद्धा हे भाषण छापल्यावर व विद्यार्थ्यांनी ते वाचल्यावर त्या भाषणातील संदेश विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचेल.

जरी पंडितजींनी हे भाषण हिंदीतून केले असते तरीही इतर सर्वसामान्य जनतेसाठी त्याचे भाषांतर करावेच लागलेच असते.

कारण त्या काळात शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि त्या भाषणात काही अश्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या त्या काळच्या सर्वसामान्य अशिक्षित जनतेला समजणे कठीण होते.

तर प्रदीप्तो मुखर्जी ह्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की,

स्वातंत्र्य मिळाले असले तरीही इतकी वर्ष ब्रिटीशांच्या राज्याची सवय झालेल्या आपल्या देशातील श्रीमंत व बड्या लोकांना इंग्रजी भाषेचीच सवय होती.

पंडित नेहरू स्वत: अँग्लो संस्कृतीत वाढले होते. त्यांचे अनेक जवळचे मित्र ब्रिटीश होते. अर्थातच म्हणूनच त्यांचे हिंदी सोडून इंग्रजी भाषेत भाषण करणे नैसर्गिक होते.

 

abhisays.com

पंडितजी ज्यांच्यासमोर हे भाषण करीत होते ते हिंदी राज्यांव्यातिरिक्त उडीसा, आसाम, मुंबई, मद्रास, कोचीन , त्रावणकोर , बंगाल इत्यादी ठिकाणांचे प्रतिनिधी होते. ह्या सर्व राज्यांत हिंदी नव्हे तर प्रादेशिक भाषा प्रचलित असल्याने ह्या सर्वांसाठी सर्वांना कळेल अशी एक कॉमन भारतीय भाषा शोधून काढणे कठीण होते.

इंग्रजी भाषा ही त्यातल्या त्यात कॉमन होती.भाषण ऐकणारी जवळपास सगळीच माणसे ही उच्चशिक्षित असल्याने त्यांना इंग्रजी भाषा येणे अभिप्रेत होते. तसेच त्यांचे भाषण हे भारताबाहेरचे सुद्धा अनेक लोक ऐकणार असल्याने त्यांनी भाषणासाठी इंग्रजी भाषा निवडली असावी.

तर सपना उलाल ह्या लिहितात की ,

ह्या प्रश्नाचे वस्तूनिष्ठपणे उत्तर द्यायचे झाल्यास आपल्याला १९४७ सालच्या भारतातील लोकसंख्येचा अभ्यास करावा लागेल. १९५१ सालचे लोकसंख्येचे आकडे बघितल्यास असे लक्षात येते कि तेव्हा ४२ टक्के जनता हिंदी , पंजाबी किंवा उर्दू भाषिक होती. फक्त हिंदीभाषिक लोकसंख्येचा आकडा मिळू शकलेला नाही.

या आकड्यावरून आपण असे म्हणू शकतो की, हिंदी बोलू व समजू शकणाऱ्यांचे प्रमाण इतर भाषिक लोकांपेक्षा तुलनेने जास्त आहे. १९५१ साली शिक्षित लोकांची संख्या फक्त १८ टक्के इतकीच होती. ह्या लोकांना अर्थातच इंग्रजीचे ज्ञान होते.

नेहरूंनी हिंदीत भाषण केले असते तरी चालले असते. कारण इतर भाषिकांसाठी ते तसेही भाषांतरीत करावेच लागणार होते कारण त्यांना हिंदी व इंग्रजी दोन्हीही येत नव्हते.

आजही देशातील अनेक लोकांना इंग्रजी येत नाही. समजत नाही. मग तेव्हा तर इंग्रजी येणारी , समजणारी माणसे आणखीनच कमी असतील.

मग असे असले तरीही नेहरूंनी भाषणासाठी इंग्रजी का निवडली असेल?

१. नेते जेव्हा भाषण करतात तेव्हा ते ज्या भाषेत सर्वात कम्फर्टेबल असतील तीच भाषा भाषणासाठी निवडतात. मोदींसाठी ती भाषा हिंदी आहे तर अँग्लो संस्कृतीत वाढलेल्या नेहरूंसाठी इंग्रजी भाषा जास्त कम्फर्टेबल होती. आपण ज्या भाषेत बोलायला कम्फर्टेबल असतो त्याच भाषेतून आपण आपले बोलणे जगापुढे जास्त प्रभावीपणे मांडू शकतो.

२. नेहरूंनी कुठल्याही भाषेत भाषण केले असते तरीही सर्वसामान्य जनतेसाठी ते भाषांतरित करावेच लागले असते कारण हिंदीशिवाय भारतात इतर प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा जास्त आहे.

३. पंडित नेहरूंचे हे भाषण इतर राष्ट्रांसाठी सुद्धा होते. त्यांना जगाला हा संदेश द्यायचा होता कि आता भारत हा एक स्वतंत्र देश आहे.

 

ह्याच प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ दोशी म्हणतात की ,

ते भाषण सर्वसामान्य जनतेसाठी नव्हतेच. ते फक्त परदेशातील लोकांसाठी व भारतात असलेल्या फक्त १८ टक्के शिक्षित लोकांसाठी होते जे ह्या भाषणाचा अर्थ समजून घेऊ शकतील. हे शिक्षित लोक संपूर्ण भारताचे प्रतिनिधी होते.

इतर ८२ टक्के जनता ही एकतर अज्ञानी होती किंवा नेते सांगतील त्या मार्गावर आंधळेपणाने चालणारी होती. ह्या जनतेत भारतीय राजकारणावर परिणाम करू शकण्याची ताकद नव्हती. ही राजकारण बदलू शकण्याची ताकद त्या श्रीमंत व उच्चशिक्षित लोकांकडेच होती. म्हणूनच त्यांच्यासाठीच हे भाषण महत्वाचे होते.

ह्याबाबतीत लोकांचे अनेक तर्क वितर्क असले तरीही एक मात्र खरं कि ह्या भाषणातून पंडितजींना संपूर्ण जगाला संदेश द्यायचा होता की, “भारत स्वतंत्र देश आहे” . म्हणूनच त्यांनी इंग्रजीत भाषण केले असावे.

‘ Tryst with destiny’ हे जगातील अनेक उत्तम भाषणांपैकी एक आहे व सर्वांनी ते एकदा तरी ऐकायला हवे ह्यावर दुमत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version