Site icon InMarathi

केरळच्या संकटकाळात सुद्धा “बीफ” वरून शेरेबाजी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

केरळला “गॉड्स ओन कंट्री” म्हणतात. सध्या केरळमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला आहे. जूनपासून पडत असलेल्या पावसामुळे तिथे महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो लोकांनी ह्यात प्राण गमावले आहे, तर लाखो लोक बेघर झालेत. केरळमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

अश्यावेळी संपूर्ण देशच आपल्या केरळातील बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.

संपूर्ण देशातून मदतीचा ओघ केरळमध्ये जातो आहे. आपले सेनेतील जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून अडचणीत सापडलेल्यांना मदत करत आहेत. संपूर्ण देश केरळवासियांसाठी प्रार्थना करीत आहे.

अशा वेळी काही विघ्नसंतोषी लोक मात्र ह्या घटनेचा संबंध धर्माशी व देवाच्या प्रकोपाशी जोडून संकटात सापडलेल्यांच्या दु:खावर डागण्या देण्याचे नीच काम करत आहेत.

आपण आपल्या बहुरंगी बहुढंगी संस्कृतीचा अभिमान बाळगतो. आमच्या देशात विविधतेत एकता आहे छातीठोकपणे सांगतो. परंतु आपल्यातलेच काही लोक मात्र दोन माणसांत किंवा दोन जातीत, धर्मात भांडणे कशी होतील ह्याचीच संधी शोधत असतात. हे समाजकंटक सतत धार्मिक तेढ पसरवायचा प्रयत्न करत असतात.

 

theresistancenews.com

आता तर सोशल मीडिया ह्या लोकांच्या हातात आल्यापासून “माकडाच्या हाती कोलीत” आल्यासारखी परिस्थिती आली आहे. हे लोक घरी बसून फुकटात क्षणात जगापुढे आपला नासका मेंदू उघडा करून दाखवत असतात. आंदोलन असो की दंगल, उत्सव असो निसर्गाचा प्रकोप, हे लोक विचित्र बोलून समाजाची शांतता भंग करण्याची एक संधी सोडत नाहीत.

आताही केरळमध्ये इतकी भयावह परिस्थिती असताना काही लोक सोशल मिडीयाचा उपयोग करून त्यांच्या मनातील गरळ ओकत आहेत.

ह्या लोकांच्या कमेंट्स वाचल्या तर असे वाटते की, लोकांच्या मनात कट्टरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही लोकांच्या मते हा केरळात जो महापूर आला आहे, ती देवाने केरळी लोकांना बीफ खाल्ल्याबद्दल शिक्षा केली आहे.

ह्या लोकांनी बीफचा संबध पुराशी जोडून टाकला आहे. तेथे झालेली हानी ही त्या लोकांना बीफ खाण्याबद्दल मिळालेली शिक्षा आहे व ती योग्यच आहे असा ह्या लोकांचा युक्तिवाद आहे.

 

darpan.com

केरळमध्ये अजूनही बीफ बॅन केलेले नाही म्हणूनच तेथे देवाचा प्रकोप झाला आहे असे ह्या लोकांचे म्हणणे आहे. ट्विटरवर ह्या लोकांनी आपली मुक्ताफळे उधळली आहेत.

क्रिश सुब्रामानियन नावाच्या व्यक्तीने केरळमधला एक फोटो ट्वीट केला आहे व त्या खाली असे लिहिले आहे की, केरळमधल्या हिंदूंनी बीफ खाणे तत्काळ बंद केले पाहिजे. तुम्ही बीफ खात असाल तर स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ नका. ह्यासाठी निसर्ग तुमचा नक्कीच बदला घेईल.

ह्यापेक्षा वाईट लिहिणारे व विचार करणारेही लोक अस्तित्वात आहेत. ते त्यांच्या ह्या कट्टर मतांवर ठाम आहेत . “ह्या बीफ खाणाऱ्यांना मदत का करायची?” असा त्यांना प्रश्न पडला आहे.

 

Cleansing in Progress

River returned the garbage back to us

Pic from Malayattoor – Kodanadu Bridge#KeralaFloods pic.twitter.com/Rcrh2YUx1n

विभूती नावाच्या एका महिलेने तर असे ट्वीट केले आहे की,

“ह्या लोकांना कसली मदत करायची? केरळ मधील अनेक लोक केरळच्या बाहेर गल्फ कंट्रीजमध्ये आहेत. इस्लामी संस्था व चर्च ह्या कम्युनिस्टांना चांगलीच मदत करत आहेत. तुम्ही त्यांना जगण्यासाठी जेवण द्याल आणि ते तुम्हाला बीफ करी मागतील.”

ह्यापुढे जाऊन जेएन कौशिक ही व्यक्ती असे लिहिते की,

“हे खरे आहे की अयप्पा स्वामी केरळ सरकारवर कोपले आहेत. ह्या कोपाचे कारण संपूर्ण देशाला माहित आहे की, बीफ बॅनला विरोध करण्यासाठी कम्युनिस्ट व काँग्रेसी लोकांनी जाहीरपणे निष्पाप वासरांना मारून रस्त्यावर त्यांचे मांस शिजवून खाल्ले. देव ह्यांना कधीही क्षमा करणार नाही.”

तर रूप दरक ह्या व्यक्तीने ट्वीटरवर एक प्रश्न विचारला आहे की,

“तर प्रश्न हा आहे की, आपण ज्या गाईंची पूजा करतो त्याच गाईंना मारून ‘बीफ’ खाणाऱ्या केरळातील लोकांची आपण मदत करायला हवी का?”

ह्यावर ७३ टक्के लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे. व २७ टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. म्हणजेच अनेक लोकांना केरळातील लोकांवर आलेल्या संकटाशी काहीही देणे घेणे वाटत नाही.”

हे असे विचार खरं तर आपल्या हिंदू धर्मात मान्य नाहीत. संकटात असलेल्याला मदत करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, अशी आपल्या धर्माची शिकवण आहे. हिंदू धर्म इतकी कट्टरता व दुसऱ्याच्या दु:खात समाधान शोधण्याची शिकवण मुळीच देत नाही. उलट आपला धर्म तर असे शिकवतो की,

अयं निजः परो वेति गणना लघु चेतसाम् | उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||

म्हणजेच हा आपला तो परका असा विचार संकुचित विचारांची माणसे करतात मात्र उदार मनाची माणसे संपूर्ण पृथ्वीच माझे कुटुंब आहे असा विचार करतात. आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. मग आपल्या मनात आपल्याच देशबांधवांविषयी थोडी सहानुभूती असू नये? धर्माचा अभिमान जरूर असावा! धर्मरक्षणासाठी जरूर जीवाची बाजी लावावी.

 


आपला इतिहास सांगतो की, धर्माच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्रत्यक्ष परमेश्वराने पृथ्वीवर अवतार घेतला आहे. अनेकांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचा त्याग केला आहे. ह्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपले पूज्य छत्रपती संभाजी महाराज! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य भगव्यासाठी वाहिले तर संभाजी महाराजांनी भगव्यासाठी प्राणांची सुद्धा पर्वा केली नाही.

मान्य आहे की, केरळमध्ये आपल्याला चीड येईल अश्या घटना घडल्या. हिंदू धर्मातील पूजनीय गोष्टींचा फक्त राजकीय स्वार्थासाठी अपमान करण्यात आला. त्यावेळी प्रतिकार करण्यात काहीच चूक नाही.

आज हिंदू धर्मात कट्टरता वाढण्याची सुद्धा अनेक सबळ व वैध कारणे आहेत. परंतु ही वेळ कट्टरता दाखवण्याची नाही.

प्रतीकाराचीही एक वेळ असते. केरळवर इतके मोठे संकट आले असताना इतका संकुचित विचार करण्याची ही वेळ नाही. धर्मांध लोकांना तर तेढ पसरवण्यासाठी फक्त कारणच हवी असतात. ते असल्या संधींच्याच शोधात असतात.

पण सामान्य माणसाने आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून वागणे व विचार करणे आजच्या घडीला आवश्यक आहे.

आज आपलेच देशबांधव संकटात असताना आपण मनात कटुता व कट्टरता ठेवणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. इतक्या संकुचित मनाची माझ्या देशाची जनता नक्की नाही.

जे लोक ह्या कठीण प्रसंगी केरळच्या पाठीशी न उभे राहता “बरेच झाले! त्यांना शिक्षा मिळाली! कशाला मदत करायची? आता भोगू देत आपल्या कर्मांची फळं!” असा विचार करत आहेत आणि तो स्वतःपुरता मर्यादित न ठेवता सार्वजनिक मंचावर उघडपणे कसलीही पर्वा न करता मांडून दाखवत आहेत, अश्या लोकांना स्वतःच्या घाणेरड्या व दुष्ट विचारांची खरंच लाज वाटली पाहिजे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version