Site icon InMarathi

२०१९ चा लढा मोदी वि गांधी बरोबरच “अमित शहा वि. अहमद पटेल” असणार आहे!

ahmed patel and amit shah-inmarathi

indianexpress.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

२०१९ चा सामना ‘नमो व्हर्सेस रागा’ असा असेल पण आणखी एका आघाडीवरही हा सामना तितक्याच चुरशीचा ठरेल ! आणि ती आघाडी असेल ‘अमित शहा व्हर्सेस अहमद पटेल’ !
———–

काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीये. विशेष म्हणजे अहमद पटेल यांच्या वाढदिवशीच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. वर वर पाहता ही गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षांतर्गत खांदेपालट इतकीच सीमित ठेवणं हास्यास्पद ठरेल.

काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा कोषाध्यक्ष किंवा खजिनदार होणं आणि तेही २०१९ लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे किती महत्त्वाचं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

अहमद पटेल यानिमित्तानं पुन्हा स्पॉटलाईटमध्ये आलेत. अहमद पटेलांनी राजकीय पटलावर एक मोठा काळ गाजवलाय अन् तो काँग्रेससाठी सुवर्णकाळ होता. जितका काँग्रेससाठी सुवर्णकाळ तितकाच भाजपसाठी कर्दनकाळही.

२००१ पासून अहमद पटेल हे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आहेत पण त्याहूनही अहमद पटेल प्रसिद्ध आहेत अमित शहांचे हाडवैरी म्हणून. वैरही राजकीय नाही तर व्यक्तिगत अन् हे व्यक्तिगत शत्रुत्व अमित शहा आणि अहमद पटेल दोघेही केवळ खासगीतच मान्य करतील.

२०१० मध्ये जेव्हा यूपीए-२ सत्तेत होतं आणि ऐन भरात होतं तेव्हा अमित शहा CBI च्या जाळ्यात अडकत चालले होते. जुलै २०१० मध्ये अमित शहांना सोहराबुद्दीन शेख फेक एनकाऊंटरच्या आरोपांखाली सीबीआयनं अटक केली होती.

सोहराबुद्दीन शेख फेक एनकाऊंटरच्यामागे अमित शहांचा ब्रेन असल्याचा आरोप सीबीआयनं ठेवला होता. गुजरातचे कधीकाळी गृहमंत्री राहिलेले अमित शाह ३ महिने अहमदाबादच्या साबरमती जेलमध्ये होते.

 

swarajyamag.com

त्यानंतर अमित शहांना गुजरातमधून तडीपार करण्यात आलं होतं. सप्टेंबर २०१२ मध्ये अमित शहांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यांच्यावरची तडीपारी उठली. डिसेंबर २०१२ मध्ये भाजप गुजरातमध्ये पुन्हा सत्तेत आली अन् मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.

पण तरीही अमित शहा मंत्रिमंडळात कमबॅक करु शकले नाहीत. नरेंद्र मोदींनंतर तत्कालीन गुजरात भाजपमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती असूनही अमित शहांना कोणतंच संविधानिक पद घेता येणार नव्हतं.

सोहराबुद्दीन केसमध्ये कोर्टासमोर स्वत:चा बचाव करण्यात अमित शहा गुंतले होते. २०१४ पर्यंत अमित शहांच्या मानगुटीवर सोहराबुद्दीनचं भूत कायम होतं. मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं अन् डिसेंबरमध्ये अमित शहांविरोधातली केस सीबीआय न्यायालयानंच रद्दबातल केली. सीबीआयनं उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागितली नाही. सोहराबुद्दीन प्रकरण शांत झालं.

पण २०१० ते २०१४ हा काळ अमित शहांच्या आयुष्यातील सर्वात मनस्ताप देणारा काळ होता हे नक्की. अमित शहांच्या या मनस्तापामागे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेलच होते याचं कवित्व आजही गुजरातमध्ये रंगतं.

अमित शहांसारखा महत्त्वाकांक्षी व्यक्ती ४ वर्ष सातत्यानं भोगावे लागणारे मनस्तापाचे दिवस सहजासहजी विसरेल? ४ वर्ष पदरी पडलेला मनस्ताप, व्यक्तिगत अपमान अवहेलना आणि त्यातही एका मुस्लिम नेत्याचं आपल्यावर भारी पडणं एक हिंदुत्ववादी मन स्वीकारेल का?

अर्थात अडचणीच्या काळात अमित शहांनी प्रतिक्रिया न देणंच पसंत केलं.

 

livemint.com

काँग्रेसमुक्त भारताचं जे स्वप्न घेऊन शहा फिरतात त्यात त्यांच्या या भूतकाळाचा मोठा वाटा आहे. काँग्रेस, गांधी घराणं यांच्याशी हिशेब चुकते करण्याची एकही संधी अमित शहा सोडत नाहीत. वचपा काढायची अशीच एक संधी अमित शहांना २०१७ मध्ये मिळाली पण त्याही संधीचं सोनं शहा करु शकले नाहीत.

गुजरातमधून राज्यसभेवर पाठवायच्या जागेसाठी खुद्द अहमद पटेल निवडणूक लढवत होते. आता राज्यसभा असोत वा लोकसभा रंगणारा घोडेबाजार देशाला नवीन नाही.

२०१७ मध्ये ऐन फॉर्मात असलेल्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्याच भाषेत सांगायचं तर साम-दाम-दंड-भेद रणनीतीत माहिर असलेल्या, तेही शहा-मोदींचं होमपीच असलेल्या गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागेसाठी आणि तीही अहमद पटेल ती जागा लढवत आहेत अशा साऱ्या गरम माहोलमध्ये भाजपला घोडेबाजारात रोखणं किती अशक्य आहे याची कल्पना तुम्ही करु शकता.

भाजप अध्यक्ष अमित शहांनी पटेल लढवत असलेल्या जागेवर पटेलांविरोधात सगळी ताकद केंद्रीत केली. अगदी माजी काँग्रेस नेते बलवंत सिंह राजपूत यांना फोडलं आणि अहमद पटेलांविरोधात उमेदवारी दिली.

पण पटेल यांना पहिल्या पसंतीची ४४ मतं मिळाली आणि ४४ विरुद्ध ३८ असा हा सामनाही त्यांनी जिंकला.

पुन्हा पटेलांना चीतपट करायची संधी अमित शहांच्या हातून निसटली. हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या या गुजराती मुस्लिमानं अमित शहांना धोबीपछाड दिलं. अमित शहा-अहमद पटेल यांच्यातलं शत्रुत्व हे राजकीय नाही, ते व्यक्तिगत आहे असं म्हणायला वाव आहे.

 

ndtv.com

यूपीए काळात यूपीएतील आणि देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असलेल्या सोनिया गांधींचे अहमद पटेल २००१ पासून राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार आहेत हीच खरी तर ओळख पटेलांसाठी पुरेशी आहे. दिल्लीच्या वर्तुळात पटेलांचं वजन काय आहे हे तर दिल्लीनिवासी पत्रकारांनाही माहिती आहेच.

अशा या अहमद पटेलांना आता आणखी एक नवी जबाबदारी मिळालीय. काँग्रेसच्या खजिनदारपदाची. सध्या स्पॉटलाईटमध्ये नसलेलं हे नाव पण राजकारणाच्या अनुभवी डार्क हॉर्सेसपैकी एक.

पटेलांची खजिनदारपदावर नियुक्ती ही काँग्रेस पक्षांतर्गातली एक सामान्य खांदेपालट नक्कीच नाही.

२०१९ चा सामना नमो व्हर्सेस रागा असा असेल पण आणखी एका आघाडीवरही हा सामना तितक्याच चुरशीचा ठरेल ! आणि ती आघाडी असेल अमित शहा व्हर्सेस अहमद पटेल !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version