मुंबई-पुण्यापेक्षाही भारी असलेल्या “या” शहराबद्दलच्या काही अज्ञात गोष्टी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
नाशिक! महाराष्ट्रातील एक शांत सुंदर व आल्हाददायक वातावरण असलेले टुमदार शहर! नाशिक म्हटलं की आपल्याला आठवतात नाशिकची गोड द्राक्षं!
शिवभक्तांना आठवतं ते नाशिकपासून जवळ असलेलं त्र्यंबकेश्वर हे देवस्थान, जगदंबेच्या भक्तांची साडेतीन शक्तीपीठांची यात्रा नाशिकजवळच्या वणी येथील गडावर असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. शिवाय ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असलेले काळाराम मंदिरसुद्धा नाशकातच आहे.
तसेच मंदिरांचे शहर असलेल्या नाशकाला दक्षिणेचे हरिद्वार असेही काही लोक म्हणतात, कारण गोदावरी नदी जिला दक्षिणेतील गंगा मानले जाते ती येथे नाशिकातच आहे.
याप्रमाणे पर्वाच्या काळात भरतो तो प्रसिद्ध कुंभ मेळा नाशिकला त्र्यंबकेश्वरला दर १२ वर्षांनी भरतो.
त्रेता युगात प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण हे वनवासाच्या काळात नाशिकातल्या पंचवटी येथे काही काळ वास्तव्यास होते असे म्हणतात. आपले स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा नाशिकचेच आणि चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके सुद्धा नाशिकचेच!
मद्यप्रेमींची आवडती वाईनसुद्धा इथेच तयार होते. नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हणतात.
नाशिकबद्दल ह्या गोष्टी तर जवळजवळ सर्वांनाच ठाऊक असतील. मात्र ह्या शहरात अशाही काही गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल नाशिककर सोडले तर इतर शहरातील अनेकांना माहिती नाही. आज आपण देवळांचे शहर असलेल्या नाशिक शहराबद्दल अशाच काही अज्ञात गोष्टी जाणून घेणार आहोत.
नाशिक रामायणाच्या आधीच्या काळात ‘पंचवटी’ म्हणून ओळखले जात असे. तसेच काही काळासाठी नाशिकला ‘गुलशनाबाद’ असेही नाव होते. असे म्हणतात की,
प्रभू श्रीराम ह्यांच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखा हिचे नाक नाशकातच कापले होते.
कृतयुगात नाशिकला ‘त्रिकंटक’ असे नाव होते, तर द्वापारयुगात नाशिकचे नाव ‘जनस्थान’ असे होते. नंतर कलियुगात ह्या शहराचे नाव ‘नवशीख’ किंवा ‘नाशिक’ असे पडले. प्रसिद्ध संस्कृत कवी कुलगुरू कालिदास तसेच आदिकवी महर्षी वाल्मिकी व भवभूती ह्यांनीही ह्या शहरात वास्तव्य केले असे म्हणतात.
हे ही वाचा –
- नासिक की नाशिक? ऐतिहासिक दस्तावेज देताहेत खात्रीपूर्वक उत्तर!
- मद्याचे परीक्षण करताना डोळ्यांवर पट्टी का बांधतात? : मानसशास्त्राचे रंजक उत्तर
इसवी सन पूर्व १५० व्या शतकात नाशिकमध्ये देशातील सर्वात मोठी बाजारपेठ होती असे म्हणतात. पंधराव्या शतकात नाशिक मुघलांच्या ताब्यात गेले व त्यांनी ह्याचे नामकरण गुलशनाबाद असे केले.
बादशहा अकबरसुद्धा नाशिकमध्ये काही काळासाठी वास्तव्यास होता. त्याने नाशिकबद्दल त्याच्या इन-ए-अकबरी ह्या पुस्तकात नाशिकचे वर्णन केले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही नाशिक प्रसिद्ध होते. तेव्हा नाशिकला “शूरवीरांची भूमी” असे म्हटले जात असे. नाशिकला “नाशिक” हे नाव १८१८ मध्ये पेशव्यांनी दिले.
पेशव्यांनंतर नाशिक ब्रिटीशांच्या ताब्यात गेले आणि १८४० साली त्यांनी पहिल्या काही आधुनिक वाचनालयांपैकी एक वाचनालय नाशिक येथे सुरु केले.
प्राचीन काळी मौर्य साम्राज्यात नाशिक सुद्धा होते. ह्याचे पुरावे चंद्रपूर जवळ देवटेक येथे सापडलेल्या शिलालेखात आहेत. ह्या शिलालेखात राष्ट्रकूट साम्राज्य व भोज राजाच्या साम्राज्याविषयी लिहिले आहे.
भोज राजाच्या साम्राज्यात विदर्भ होता, तर नाशिक व त्याजवळच्या प्रदेशावर मौर्यांचे राज्य होते.
अशोक राजाच्या मृत्युनंतर ५० वर्षात पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांचे राज्य आले. सिमुका ह्या राजाने हे साम्राज्य स्थापन केले. त्याच्यानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा राजगादीवर बसला. ह्याच्याच काळात नाशिकवर सातवाहनांचे राज्य होते.
नाशिकजवळच्या एका गुहेत ह्या कृष्ण राजाने एक शिलालेख कोरला आहे. ही गुहा राजाने खास बुद्ध भिख्खूंसाठी खोदून घेतली होती. ह्या राजानंतर सातकर्णी राजाचे येथे राज्य होते .
त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य त्याच्या पत्नीने म्हणजेच नयनिका/नागनिका सातकर्णी ह्या राणीने चालवले. ह्यांना वेदिश्री व शक्तीश्री ही दोन मुले होती.
नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखाप्रमाणे वेदिश्री हा राजा अत्यंत शूर व एकमेव द्वितीय असा योद्धा होता. त्याला दक्षिणपथाचा म्हणजेच दक्खनचा देव असे म्हणत असत.
ह्या राजाच्या राजवटीनंतर काही वर्षात सातवाहन साम्राज्यापैकी माळवा, नाशिक व काठीयावाड ह्या प्रदेशावर शक क्षत्रपांचे राज्य आले.
नहपान हा शक क्षत्रप राजा होता. ह्या राजाने तेव्हा नाशिक बरोबरच कोकण, पुणे आणि महाराष्ट्रातील काही गावे व मध्य भारतातील काही प्रदेशावर राज्य केले. उत्तरेत त्याचे राज्य अजमेरपर्यंत पसरलेले होते.
ह्या नहपान राजानेच नाशिकजवळ असलेल्या पांडवलेणी उत्खनन करून शोधून काढल्या.
ह्याचा जावई रिषभदत्त हा पंडू लेण्यांच्या गुहेत चिंतन करत असे. रिषभदत्ताचा विवाह नहपानाच्या मुलीशी झाला होता. नाशिकच्या गुहेत सापडलेल्या शिलालेखांमध्ये ह्या रिषभदत्ताच्या कार्याविषयी माहिती दिलेली आहे. ह्याने उत्तर महाराष्ट्र व कोकण ह्या प्रदेशात राज्य केले.
ह्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी राजाने नहपानाचा पराभव करून त्याचे साम्राज्य मिळवले.
हे युद्ध नाशिक जवळच्याच एका गावात झाले. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर ह्या भागावर यज्ञश्री सातकर्णी ह्या राजाने राज्य केले. ह्या राजाच्या साम्राज्यात संपूर्ण महाराष्ट्र होता.
ह्या राजाच्या राज्यातील शिलालेख व नाणी बऱ्याच ठिकाणी सापडली आहेत. ह्या राजाचे साम्राज्य कोकणापासून ते आंध्रपर्यंत पसरलेले होते.
सातवाहन राज्यकर्ते उत्तम राज्यकर्ते होते. त्यांनी आपापल्या काळात प्रजेसाठी खूप चांगले कार्य केले.
ह्यांच्या काळात नाशिक अत्यंत श्रीमंत व समृद्ध शहर होते. ह्या काळात नाशिक व्यापाराचे मुख्य केंद्र होते. नाशिकचे रेशीम ह्या काळात युरोपपर्यंत प्रसिद्ध झाले होते. मार्को पोलोने हे असे रेशमाचे कापड बघदाद मध्ये बघितले. ह्या कापडाला तिकडे नॅक किंवा नॅसीच असे नाव होते.
हे मूळ नाशिकचे होते. हेच नाशिकचे रेशमी कापड चौदाव्या शतकात nac, nacquts, nachis, naciz व nasis ह्या नावांनी युरोपमध्ये प्रसिद्ध होते.
ह्यानंतर नाशिकवर अभिरांनी राज्य केले. नाशिकच्या एका शिलालेखात माधुरीपुत्र ईश्वरसेन ह्या अभिर राजाबद्दल उल्लेख आहे. हा एक अभिर राजा होता व शिवदत्त राजाचा मुलगा होता.
ज्या काळात ह्या राजाने राज्य केले त्याला छेडी किंवा कलचुरी असे म्हणतात. ह्या कालखंडात नाशिकचे नाव त्रिरश्मि असे होते.
ईश्वरसेन राजाने नाशिकमधील गुहांपैकी नवव्या गुहेत एक शिलालेख लिहिला आहे. ह्या काळात त्रिरश्मी येथील विहारांत राहणाऱ्या अनेक बुद्ध भिख्खूंना आजारावर औषधे दिल्याची नोंद शिलालेखात सापडते.
हे ही वाचा –
- जास्त काळ साठवलेली वाईन चवदार का लागते? याचं उत्तरं तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल
- दारू उतरण्यासाठी कडक कॉफी प्यावी, खरं की खोटं? मित्रांसाठी, या खास टिप्स…
ह्यानंतर ह्याठिकाणी त्रैकुटक राजांचे राज्य होते. इसवी सन ४९० मध्ये ह्यांनी हा प्रदेश जिंकला. इंद्रदत्त व व्याघ्रसेन ह्या राजांचा उल्लेख नाशिकजवळ व गुजरातमध्ये सापडलेल्या शिलालेखांत व नाण्यांवर आढळतो. हे राज्य वाकाटक राजा हरीषेणाच्या अधिपत्याखाली होते.
त्याच्या पाडावानंतर इसवी सन सहाव्या शतकात विष्णूकुंडीण राजा माधववर्मन पहिला ह्याचे राज्य आले. सर्वप्रथम विदर्भावर ह्याचे राज्य होते परंतु वाकाटक राजाच्या पाडावानंतर त्याने पश्चिम महाराष्ट्रापर्यंत राज्याचा विस्तार केला.
ह्यानंतर येथे कलचुरी राजा कृष्णराज ह्याचे राज्य होते. ह्यानंतर त्याचा मुलगा शंकरगण ह्याने राज्यकारभार सांभाळला. ह्या राजाचा ताम्रपट नाशिक येथे सापडला आहे.
कृष्णराजानंतर त्याचा मुलगा बुद्धराजा गादीवर आला असा ह्या ताम्रपटात उल्लेख आहे. ह्या राजाने माळवापासून ते औरंगाबाद व नाशिकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता अशी नोंद आहे. ह्यानंतर चालुक्य, यादव तसेच मुघलांच्याही साम्राज्यात नाशिक होते. त्यानंतर मराठ्यांनी नाशिक जिंकले.
स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा नाशिकचा मोठा सहभाग आहे.अवघे सतरा वर्षीय अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ह्याचा नाशिकच्याच विजयानंद थियेटर मध्ये वध केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी नाशिकच्याच काळाराम मंदिरात दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.
असे हे नाशिक शहर प्राचीन इतिहासापासून तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंतच्या इतिहासाची साक्ष देते.
नाशिक ह्या शहराला अगदी कृतयुगापासूनचा इतिहास आहे. ह्या शहराने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत. इतिहासाची साक्ष देत अनेक प्राचीन देवळे, लेणी अंगाखांद्यावर मिरवत आजही हे शहर दिमाखात उभे आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.