आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतातल्या अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांना भारत सोडायला भाग पाडलं आणि अनेक वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला आपला भारत स्वतंत्र करून घेतला. इंग्रज भारत सोडून निघून गेले आणि देश स्वतंत्र झाला.
पण इंग्रज सहज देश सोडून गेले नाहीत. त्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले. त्यांनी आपलं आयुष्य फक्त इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी खर्च केलं.
काहींनी आपले प्राण दिले. काहींनी घरदार, शेतीवाडी, संसार पणाला लावले. तर काहींनी आपल्या मुलांना सामर्थ्य देऊन ह्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केली.
ह्या क्रांतिकारकांनी ह्या लढाईमध्ये तुरुंगवासाची शिक्षा भोगली, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. अनेकांनी इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. क्रांतिकारकांना इंग्रजांच्या गाड्यांखाली चिरडले गेले, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या.
बैलांची कामे केली आणि अहिंसा मार्गाने इंग्रजांना सतत विरोध करून सळो की, पळो करून सोडले. इंग्रजांनी ह्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना अतिशय क्रूर वागणूक दिली. पण त्यांचे देश प्रेम आणि देशभक्ती यापुढे इंग्रजांना नमते घ्यावे लागले.
सतत इंग्रजांचे वर्चस्व, त्यामुळे त्रासले होते लोक, त्यात जुलूम… सहिष्णूता आणि अहिंसा तत्व, ह्यामुळे देश शांत होता पण इंग्रजांच्या जुलूमशाहीला रोजच सामोरे जायला लागायचे.
त्या काळातली जुलूमशाहीची धग आजच्या पिढीला जाणवणार नाही पण आजच्या पिढीत इतकी सहनशीलता नाही हे जाणवू शकते.
असे अनेक सहनशील नसलेले लोक पण भारतात राहात होते. त्यांनीही अनेक वेळा इंग्रजांविरुद्ध उठाव करायचा प्रयत्न केला. पण तो दाबला गेला. काहींना तुरुंगात डांबण्यात आले. जे सापडले नाहीत त्यांची नावे काळ्या यादीत टाकली गेली. त्यांच्यापाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लावला गेला. हेही काही कमी नव्हते.
देशात राहून मोठ्या नेत्यांना सहकार्य करत होते. पण उघड विरोध करण्यामुळे पकडले जात होते. ह्यात एक अतिशय तरुण आणि धाडसी कार्यकर्ता होता.
मनामध्ये सतत इंग्रजांविरुद्ध आग धगधगत होती. तळमळ होती देशाला ह्या असह्य पारतंत्र्यातून बाहेर काढायची. ही तळमळ वयाच्या सतराव्या वर्षांपासून लागली होती. कारण आपल्याच देशात परकीयांकडून होत असलेली गळचेपी, जुलूम, जोर जबरदस्ती, आम्ही का सहन करायची?
आपला देश ह्या पारतंत्र्यातून मुक्त झालाच पाहिजे, त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी होती आशा अनेक तरुणांची! पण इंग्रजांची दहशत मोठी होती. शस्त्रास्त्रांच्या जोरावर ही दहशत वाढत होती.
पण ह्या दहशतीचा सामना करण्याची धमक ह्या तरुणांमध्ये होती. म्हणून ह्या तरुणांनी आपल्या राजकीय पुढाऱ्यांचा सल्ला घेतला. लोकमान्य टिळक हे इंग्राजांच्या विरुद्ध सक्रिय होते.
अनेक क्रांतिकारकांनी ह्या लढ्यात आपले प्राण गमावले होते. पण आता तुम्ही तरुणांनी प्राण न गमावता ही चळवळ पुढे न्यावी आणि बाहेरच्या देशात जाऊन काही तयारी करावी असा सल्ला टिळकांनी ह्या तरुणांना दिला.
ह्या तरुणांमध्ये महाराष्ट्रातल्या वर्धा जल्ह्यातला एक हुशार, बुद्धिवान,आणि देशसेवा करण्याचे व्रत अंगिकारलेला तरुण होता. त्याचं नाव होतं पांडुरंग खानखोजे.
भारताला इंग्रजांच्या जोखडातून बाहेर काढायची तळमळ त्याच्यात होती.
त्याने सशस्त्र लढा देण्याची तयारी लोकमान्य टिळकांपुढे बोलून दाखवली.
टिळकांनी त्याला भारतात न राहता परदेशातून हा लढा लढावा आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यावे. इतर लोकांचा पाठिंबा मिळवावा असा सल्ला दिला. पण त्या अगोदर त्याने आपले शिक्षण पूर्ण करावे म्हणजे पुढील काम सोपे होईल; असंही टिळकांनी सांगितलं होतं.
खानखोजे यांनी तो सल्ला मान्य केला आणि जपानमध्ये आले. जपानमधल्या आपल्या काही मित्रांना एकत्र आणून ही कल्पना दिली.
त्यानंतर चीनमधील काही मित्रांना ते भेटले आणि पारतंत्र्यातून भारताला स्वतंत्र करण्याची चळवळ सुरू करायची अशी माहिती दिली. काही मित्रांनी वाटेल ती मदत करण्याची तयारी दाखवली.
काही चिनी मित्रांबरोबर खानखोजे यांनी चीनच्या पहिल्या अध्यक्षांची ही भेट घेतली. चीनचे फाउंडर असलेल्या सुन यात सेन यांनी त्यांना आर्थिक मदतीची हमी दिली आणि संपूर्ण पाठिंबा देऊ केला.
पण त्या बदल्यात त्यांनी सुन यांना इंग्रजी भाषा शिकवायची असे ठरले. हे खानखोजे यांनी आनंदाने मान्य केले.
शेतीविषयक सुधारणा ह्या देशाच्या प्रगतीसाठी महत्वाच्या असतात. त्याबद्दल माहिती मिळवणे आणि देशातील शेतकऱ्यांना ती देणं हे हिताचं असतं. त्या दृष्टीने तुम्ही काम करा असा योग्य सल्लाही दिला.
जपानमध्ये आल्यावर खानखोजे ह्यांना युद्ध शस्त्रास्त्रे आणि त्यांचा वापर कसा करायचा ह्याचा एक कोर्सचं जपानी लोकांनी खानखोजे यांना दिला. त्यानंतर शेती शास्त्र आणि संशोधन ह्यावरही एक कोर्स त्यांना पूर्ण करता आला.
मग काय जपानमधल्या मित्रांनी मिळून “भारतीय क्रांती सेना” ह्या संस्थेची स्थापना केली आणि कामाला सुरुवात झाली.
शेती आणि मिलिटरी ट्रेनिंग ह्याची मिळेल तेवढी माहिती जपान मुक्कामात मिळवली. पण शेतीविषयक उच्च शिक्षण हे अजून मिळालं नव्हतं. म्हणून धडपड चालू असताना १९०६ नंतर अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जोरदार भूकंप झाला. खूप मोठी हानी झाली.
शहर उध्वस्त झालं. त्यानंतर अमेरिकेने आजूबाजूच्या देशांकडून शहराच्या पुनर्बांधणीसाठी मदत, मनुष्यबळ, ह्यांची मागणी केली.
ही मागणी एक संधीच समजून खानखोजे यांनी त्यात आपली सेवा देऊ केली. त्यांच्या नाजूक शरीरयष्टीमुळे त्यांना प्रतीक्षा कक्षात लोकांची प्रतीक्षा करण्याची आणि डिश धुण्याचे आणि स्वछता करण्याचे काम मिळाले. बराचकाळ ही नोकरी करून खानखोजे यांना बरेच पैसे मिळाले.
त्या पैशातूनच त्यांनी शेतीच्या संपूर्ण अभ्यासासाठी आपले नाव कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत नोंदवलं आणि जिद्दीने शेतीचा अभ्यास पूर्ण केला.
त्यानंतर त्यांनी शेतीची कामे करणाऱ्या भारतीय कामगारांना हाताशी धरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी तयार केलेली योजना समजावून सांगितली.
ही गोष्ट १९१३ सालची. ही योजना सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना पटली आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी ४०० जवानांची फौज तयार झाली.
खानखोजे यांच्या कामाचं चीज झालं. ह्या फौजेला मिलिटरी ट्रेनिंग देण्याचे काम “इंडियन इंडिपेंडन्स लीग” ह्या संस्थेने सुरू केलं. आणि शेती विषयक ट्रेनिंग देण्याचे काम स्वतः खानखोजे करत होते. अशी ही फौज तयार होत होती.
४०० कार्यकर्त्यांची फौज सगळ्या साहित्यानिशी तयार झाली. १९१४ साली पहिल्या महायुद्धाची तयारी चालू असतानाच ४०० जणांची फौज निघाली भारताकडे ब्रिटिश पोलिसांना योजनाबद्ध रीतीने त्रास देण्याची ह्यांची पहिली धडक होती.
हे ही वाचा –
===
त्याचवेळी ब्रिटिश सैनिक अनेक इतर राष्ट्रांशी ही संघर्ष करण्यात गुंतले होते.
त्या दरम्यान खानखोजे यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत प्रोफेसर असलेल्या हरदयाळ ह्यांची भेट घेऊन त्यांना ह्या चळवळीची माहिती दिली. हरदयाळ यांनी स्वतःच त्यांच्या ह्या चळवळीसाठी वर्तमानपत्रातल्या छोटया लेखांमधून प्रसिद्धीला सुरुवात केली.
त्यापुढे जाऊन युरोपात जाऊन जर्मनीकडून ह्या योजनेला संपूर्ण पाठिंबा मिळवला. जर्मनीने साथ देण्याची तयारी दर्शवली.
आयर्लंड, तुर्की ह्याही देशांच्या सैन्याची मदत मिळाली आणि इंडिअन इंडिपेंडन्स लीग (I I L) जर्मनी, आयरिश आणि तुर्की अशा चार फौजा एकत्रितपणे ब्रिटिशांशी लढायला तयार झाल्या.
हे सगळे एकट्या खानखोजे यांनी केलेल्या जीवापाड मेहनतीमुळे.
आधी आय.आय.एल ही ४०० जणांची टीम पुढे गेली. पण दुर्दैव समोर येऊन ठाकले. ह्या टीमची बातमी ब्रिटिश इंटेलिजन्सला मिळाली. आणि ही संपूर्ण टीम ब्रिटिशांच्या हाती लागली. मोठी धरपकड झाली आणि ह्या क्रांतीचा कणाच मोडला.
पांडुरंग खानखोजे हे नाव पुन्हा एकदा इंग्रजांच्या काळ्या यादीत अधोरेखीत झाले.
तिकडे पहिले महायुद्ध समाप्त झाले आणि इंग्रजांनी एक मोठे लेबल खानखोजे यांच्या नावपुढं लावलं “मोस्ट डेंजरस मॅन”. ह्या माणसाला भारतामध्ये यापुढे प्रवेश नाही. खानखोजे यांना शोधण्याची मोहीम सुरू झाली.
खानखोजे कुठेही ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले नाही. ते मेक्सिकोमध्ये एका अज्ञात स्थळी काही दिवस लपून राहिले.
नंतर त्यांनी मेक्सिकोमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठे कार्य केले आणि तिथे हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिको शासनाने त्यांना मोठ्या हुद्द्याची नोकरी दिली आणि शेतीमध्ये मोठी क्रांती केली.
पुढे जीन अलेक्झांड्रिन सिंडीक ह्या बेलजीअन मुलीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली झाल्या एक सावित्री आणि दुसरी माया.
त्यांनतर भारताला काही वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले. ह्याचसाठी स्वतंत्र भारतासाठी आसुसलेले खानखोजे कुटुंबीय परत मायभूमीत स्थायिक झाले आणि नंतर वृद्धापकाळाने जानेवारी १९६७ साली देह त्यागून ह्याच मातीत मिसळून गेले.
भारतात न राहताही भारतासाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या भारतपुत्राला शतशः नमन..!
–
====
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.