“इस्लामबाह्य” म्हणून उध्वस्त केलेल्या बामियान बौद्ध मूर्ती – हे क्रौर्य कशामुळे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
अफगानिस्तानची राजधानी काबुल इथुन १३० किमी अंतरावर ‘बामियान’ म्हणुन एक ऐतिहासिक स्थान आहे.
बामियान प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे येथील दोन भव्य अशा भगवान बुद्धांच्या मूर्ती. यातील मोठ्या मूर्तीची उंची जवळपास ५८ मीटर व लहान मूर्तीची उंची ३७ मीटर होती.
या मुर्तींचा भुतकाळात उल्लेख करण्याचे कारण म्हणजे २००१ मधील एक घटना. इस्लामिक संघटना तालिबान द्वारे या मूर्ती नष्ट करण्यात आल्या. याबद्दल आज अधिक माहिती आम्ही सांगणार आहोत.,
बामियान मुर्तींचा इतिहास :
या मुर्ती पाचव्या व सहाव्या शतकाच्या मधील काळात कुशाणांनी बनविल्या असे मानले जाते.बामियान मधील एक पर्वत कोरुन त्यामध्ये या मुर्ती तयार केलेल्या होत्या. या मूर्तींच्या निर्मितीच्या कालावधीबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही.
काही जणांच्या मते यातील लहान मूर्ती इसवीसन ५०७ मध्ये तर दुसरी इसवीसन ५५४ मध्ये निर्माण करण्यात आली. तर दुसर्या एका मतानुसार लहान मुर्ती इसवीसन ५४४ ते ५९५ च्या दरम्यान व मोठी मुर्ती इसवीसन ५९१ ते ६४४ च्या दरम्यान निर्माण केली गेली.
भगवान बुद्धांच्या उभ्या मूर्तींमधील या सर्वात मोठ्या मुर्ती होत्या. यातील मोठ्या मुर्तीत बुद्ध वैरोकना मुद्रेत तर लहान मुर्तीत साक्यमुनी मुद्रेत उभे होते.
१. आधी म्हणाले आम्ही संरक्षण करू परंतु नंतर इस्लामविरुद्ध आहे म्हणुन नष्ट केल्या :
१९९९ मध्ये अफगानिस्तानमध्ये तालिबानचे सरकार होते. या सरकारचे प्रमुख मुल्ला मुहम्मद ओमार हे होते. सुरुवातीला या मुर्तींबद्दल ओमार यांचे मत सकारात्मक होते.
या मुर्ती बघायला येणाऱ्या पर्यटकांमुळे अफगानिस्तानला बराच फायदा होत होता. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करुन आम्ही या मुर्तींना संरक्षण देऊ असे प्रमुखांचे म्हणणे होते.
काही काळाने तेथील मुस्लिम धर्मगुरुंनी या मुर्ती इस्लाम विरोधी आहेत असे मत मांडले. त्यामुळे ओमार यांच्या तालिबानी सरकारने या मुर्ती नष्ट करण्याचा आदेश दिला.
२.भारताने केले होते संवर्धनासाठी प्रयत्न :
ज्यावेळी या मुर्ती नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला तेव्हा भारत सरकारने तालिबान ला एक प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाप्रमाणे भारत सरकार आपल्या खर्चाने या मूर्तींना भारतात आणु इच्छित होते.
या मुर्ती भारतात आणुन त्या संरक्षित करण्याचा भारत सरकारचा विचार होता. परंतु तालिबानने हा प्रस्ताव धुडकावुन लावला होता.
३. कशाप्रकारे नष्ट केल्या मुर्ती? :
२ मार्च २००१ ला तालिबानने या मुर्तींना नष्ट करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रॉकेट लाँचरने या मुर्ती पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मुर्तींची बांधणी एवढी मजबुत होती की त्यांना काहीच झाले नाही.
नंतर मुर्तींमध्ये सुरुंग लावण्यात आले. हे सुरूंग लावायला जवळपास तीन दिवस लागले.
सुरुंग लावण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर जवळील मस्जिदीत ‘अल्लाह हु अकबर’ चा नारा देण्यात आला व सुरुंगांचा स्फोट करण्यात आला. या स्फोटात बुद्धांची लहान मुर्ती संपुर्ण नष्ट झाली परंतु मोठ्या मुर्तीचे फक्त पाय तुटले.
मोठी मुर्ती संपुर्ण नष्ट करण्यासाठी तिच्या वेगवेगळ्या भागांत सुरुंग लाऊन अनेक स्फोट करण्यात आले.
जवळपास पंचवीस दिवसांनी संपुर्ण मुर्ती नष्ट करण्यात तालिबान्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नऊ गायींचा बळी दिला.
४. यापुर्वीही झाला होता मुर्तींवर हल्ला :
तालिबानपुर्वीही अनेक कट्टर मुस्लिम राजांनी या मुर्ती नष्ट करण्याचे प्रयत्न केले. इसवीसन १२२१ मध्ये चंगेजखान यानेसुद्धा असा अयशस्वी प्रयत्न केला. औरंगजेबाने सुद्धा त्याच्या उत्कृष्ट तोफखान्याच्या मदतीने मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
पण तो संपुर्ण मूर्ती नष्ट करू शकला नाही.
त्यानंतर अठराव्या शतकात नादिर शाह आणि अहमद शाः अब्दालीने सुद्धा असाच प्रयत्न करून मुर्तींचे बरेच नुकसान केले होते. असे असले तरीही या सर्वांना फक्त खालील भागालाच नष्ट करता आले. मुर्तींच्या वरील भागापर्यंत यापैकी कुणालाच पोहोचता आले नव्हते.
५. इस्लाममध्ये ‘बुत’ हा शब्द ‘बुद्ध’ या शब्दाचा अपभ्रंश :
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांनी आपल्या ‘ संस्कृती के चार अध्याय, या पुस्तकात सांगितले आहे की इस्लाममध्ये ‘बुतपरस्ती’ म्हणजेच बुद्धांच्या मुर्तीपुजेस विरोध केला गेला आहे.
त्यातील बुत हा शब्द बुद्ध चा अपभ्रंश आहे. इस्लामच्या जन्माच्या खुप पूर्वी बौद्ध धर्म अरबी देशांत पोहोचलेला होता व ठिकठीकाणी बुद्ध्मुर्तींची पुजाही केली जात.
एवढेच नव्हे तर हिंदु देवतांचीही तेथे पुजा होत असत. परंतु इस्लामच्या मतानुसार हे हराम आहे. त्यामुळे जेव्हा मुस्लिमांनी भारतावर हल्ला केला तेव्हा सर्वात प्रथम त्यांनी बौद्ध मठ, बौध शिक्षण केंद्रे व हिंदु मंदिरांवर हल्ला केला.
६. बामियान बुद्ध मुर्तींची पुन:निर्मिती :
जर्मनीतील म्युनिख विद्यापीठाचे प्राध्यापक एरविन इमर्लिंग या मुर्ती पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आजवर दोन्ही मुर्तींच्या जवळपास ५०० तुकड्यांची ओळख पटवलेली आहे.
ते नवीन दगड न वापरता मुर्तींच्या अवशेषांतुनच पुन:निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कार्यात युनेस्को त्यांना मदत करत आहे.
७. एका दिवसासाठी 3D बुद्धमुर्ती :
ज्या जागेवरील मुर्ती नष्ट करण्यात आल्या त्याच जागांवर 3D तंत्रज्ञानाच्या आधारे बुद्ध मुर्ती उभारण्यात आल्या होत्या. चीनी दांपत्य झेयांग शिन्यु आणि लियांग हॉग यांना या कामाचे श्रेय जाते.
हे दांपत्य मुर्ती पाडल्या गेल्याने अतिशय दु:खी झाले होते. त्यामुळे त्यांनी ही संकल्पना सर्वांसमोर आणली.
प्रोजेक्टर च्या मदतीने ७ जुन २०१५ ला प्रचंड होलोग्राफिक मुर्ती तयार करण्यात आल्या होत्या. या मुर्ती फक्त एक दिवस होत्या. त्यासाठी तब्बल ७४ लाख रुपये खर्च आला होता.
अशाप्रकारे तालिबानच्या धर्मांधतेमुळे संपुर्ण जगाला एका महान कलाकृतीला मुकावे लागले.
धर्माच्या अंधप्रेमापोटी त्यांनी डोळे झाकुन ही कलाकृती नष्ट केली. परंतु या मुर्ती पुन्हा निर्माण करण्यात यश येऊन आपण त्या बघु शकु अशी आशा नक्कीच करू शकतो..
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.