आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
माणूस कितीही सोशल असला तरी त्याला उठसूट कुणीही खाजगी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मात्र जगात एकच अशी व्यक्ती आहे जिच्या खाजगी प्रश्नांना सारं जग बिनबोभाट उत्तरे देतं.
ती व्यक्ती आपली माहिती सगळ्या जगासमोर उघडी करते तरीही आपण त्या व्यक्तीला आपण कोण आहोत, कुठे राहतो, काय खातो, काय वाचतो, कुठून आलो, कुठे जातोय, सिंगल आहोत कि रिलेशनशिपमध्ये, आनंदी आहोत कि दु:खी ही संपूर्ण माहिती देतो.
ही व्यक्ती म्हणजे फेसबुकचे मालक मार्कभाऊ झुकेरबर्ग! मार्कभाऊ ह्यांच्याकडे जगातल्या असंख्य लोकांविषयीची माहिती सेव्ह आहे.
मध्यंतरी फेसबुक-केम्ब्रिज ऍनॅलिटीका घोटाळा जगापुढे आला व संपूर्ण जगात सोशल मिडिया वापरणाऱ्या लोकांना धक्का बसला. ह्यात जवळजवळ ८७ मिलियन फेसबुक युजर्सचा पर्सनल डेटा लिक झाल्याचे आढळून आले.
केम्ब्रिज ऍनॅलिटीका ही कंपनी एक ब्रिटीश पॉलिटिकल कन्सल्टिंग फर्म आहे. ह्या कंपनीने २०१४ सालापासून डेटा जमवण्यास सुरुवात केली.
ह्या कंपनीने फेसबुकचा डेटा अनधिकृतरित्या मिळवला. ह्या घटनेनंतर फेसबुकने संपूर्ण युजर्सची माफी मागितली. केम्ब्रिज ऍनॅलिटीकाचे हे कृत्य अनुचित होते. म्हणूनच ह्याची चौकशी करण्यात आली.
या संदर्भात फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग ह्यांचीही चौकशी करण्यात आली. युएसच्या सिनेटने केम्ब्रिज ऍनॅलिटीका घोटाळा व द राईट टू प्रायवसी घटनेची चौकशी हाती घेतली व ह्या संदर्भात मार्क झुकेरबर्ग ह्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले.
या चौकशी दरम्यान मार्क झुकेरबर्ग ह्यांना अनेक चित्रविचित्र प्रश्नांना तोंड द्यावे लागले.
मार्क झुकेरबर्ग ह्यांचा निवडणुकांवर परिणाम होईल असे काही कृत्य करण्यात सहभाग होता का ह्यावर प्रकाश टाकण्यासाठी ही चौकशी करण्यात आली.
जवळजवळ पाच तास ही चौकशी सुरु होती. मार्क ह्यांना अनेक विचित्र प्रश्न विचारले गेले. या चौकशीबद्दल नंतर अनेक दिवस चर्चा होती. यातीलना फेसबुकचे सीईओ झुकेरबर्ग ह्यांनी अतिशय शांतपणे व संयमाने उत्तरे दिली. परंतु सिनेटचे ४४ सदस्य जे ह्या चौकशी दरम्यान उपस्थित होते, त्यांनी मात्र मार्क ह्यांच्या संयमाची जणू परीक्षाच घेतली.
काल रात्री आपण कुठे होतात?
फेसबुक युजर्सच्या प्रायवसीचा मुद्दा छेडताना सिनेटर डिक डर्बीन ह्यांनी झुकेरबर्ग ह्यांना विचारले की, “तुम्ही काल रात्री कुठल्या हॉटेलमध्ये होतात हे सांगू शकाल का?” हा प्रश्न ऐकून झुकेरबर्ग थोडे चमकले आणि नंतर एक पॉज घेऊन थोडेसे हसून म्हणाले ,
” नाही! मी हे सांगू इच्छित नाही.”
हे ऐकून डर्बीन ह्यांनी पुढचा प्रश्न विचारला की,
“ह्या आठवड्यात तुम्ही कोणाला मेसेज केले असतील तर त्यांची नावे येथे तुम्ही जाहीर कराल का?”
ह्यावर झुकेरबर्ग ह्यांनी उत्तर दिले की
“नाही सिनेटर! त्यांची नावे येथे सर्वांसमक्ष जाहीर करणे मला योग्य वाटत नाही.”
ह्यावर सिनेटर डर्बीन म्हणाले ,
“मला वाटते हे काय आहे व कशाबद्दल चालले आहे हे तुम्हाला एव्हाना कळलेच असेल. तुमचा गोपनीयतेचा अधिकार, तुमच्या गोपनीयतेच्या अधिकाराची मर्यादा आणि ह्या आधुनिक अमेरिकेत तुम्ही दुसऱ्यापुढे आपले किती खाजगी आयुष्य उघडे कराल ह्यासाठी ही धडपड आहे.”
२०१६ च्या अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फेसबुकने महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु “हेट स्पीच” ह्या मुद्द्यावर फेसबुक सपशेल अयशस्वी ठरले.
ह्या सोशल मिडिया कंपनीने निवडणुकांदरम्यान आपल्या भूमिकेचे परीक्षण करण्याचे वचन दिले होते. परंतु जेव्हा सिनेटर बेन सेस ह्यांनी झुकेरबर्ग ह्यांना हेट स्पीचची व्याख्या सांगण्यास सांगितले तेव्हा झुकेरबर्ग ह्यांनी “हा अतिशय कठीण प्रश्न आहे” असे म्हटले.
त्यांनी असे सांगितले की, आमच्या सिस्टिम्समध्ये अश्या गोष्टी ओळखू येण्यासाठी आणि विविध भाषेतील आक्षेपार्ह कंटेंट ओळखू येण्यासाठी आम्ही AI टूल्स डेव्हलप करत आहोत.
ह्यावर अनेक लोक म्हणाले की जर स्वत: मार्क झुकेरबर्ग जर हेट स्पीच ची अचूक व्याख्या सांगू शकत नाहीयेत तर त्यांचे आर्टिफिशियल इंटेलीजंस टूल्स माणसांच्या बोलण्यातून हेट स्पीच कसे ओळखू शकतील? हा विरोधाभासच नव्हे काय? ह्याशिवाय माणसांच्या बोलण्यावर AI टूल्सची नजर असणे हे ही तितकेच चिंताजनक आहे.
ह्या चौकशीदरम्यान मार्क ह्यांनी वारंवार फेसबुकच्या जन्माची कथा सांगितली. त्यांनी सांगितले की, फेसबुकची निर्मिती फक्त त्यांच्या हार्वर्ड युनिवर्सिटीतील डॉर्म रूम साठी करण्यात आली होती.
ते हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांच्या डॉर्म रूम साठी फेसबुक तयार केले. ह्यावर फरहाद मंजू ह्या सिनेटरांनी प्रश्न विचारला कि मार्क ह्यांनी फेसबुकची निर्मिती कुठल्या प्रकारच्या डॉर्म रूम साठी केली हे कुणी सांगू शकेल का?
तर ह्यासंदर्भात बोलताना सिनेटर गॅरी पीटर्स म्हणाले कि फेसबुकची सुरुवात एका डॉर्म रूम पासून म्हणजेच अगदीच छोट्या प्रमाणावर झाली आहे. तुम्ही फेसबुकच्या निर्मितीची ही जी गोष्ट सांगता त्याचे मी कौतुक करतो.
तर सिनेटर जॉन केनेडी थेट मुद्द्याला हात घालताना म्हणाले की,
“झुकेरबर्ग , इथे प्रत्येक जण तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तेच मी थेट पण सौम्य शब्दात सांगू इच्छितो कि तुमचे युजर ऍग्रिमेंट निरर्थक आहे. तुमच्या युजर ऍग्रिमेंटचा हेतू फक्त फेसबुकच्या फायद्याचा आहे.”
“त्यात युजर्ससाठी काहीही नाही. तुमच्या युजर्स ऍग्रिमेंटमध्ये युजर्सच्या अधिकारांविषयी काहीही माहिती दिलेली नाही.”
एकीकडे काही सिनेटर्स मुद्देसूद बोलत असताना, निवडणुकांमध्ये फेसबुकची भूमिका व युजर्सच्या प्रायवसीचा महत्वाचा मुद्दा चर्चिला जात असताना काही सिनेटर्स मात्र अगदीच अभ्यास न करता आले होते असे दिसले.
त्यामुळे झुकेरबर्ग ह्यांची व्यवस्थित चौकशी करणे काही सिनेटर्सना जमत नव्हते.
- या प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या
- अभिमानास्पद….! फेसबुकची पहिली महिला इंजिनियर होती ही महाराष्ट्राची कन्या..!
सिनेटर ऑरीन हॅच ह्यांनी मार्क ह्यांनाप्रश्न विचारला की, तुम्ही युजर्स कडून एकही रुपया न घेता इतका मोठा बिझनेस मॉडेल कसा चालवू शकता?
ह्यावर मार्क ह्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले की, “साहेब, आम्ही फेसबुकवर जाहिराती दाखवतो.” एका सिनेटर ने हा प्रश्न विचारावा म्हणजे आश्चर्य आहे.
तर चौकशी दरम्यान मार्क ह्यांना अश्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले. हे मात्र खरं की फेसबुकच्या युजर्स ऍग्रिमेंटमध्ये युजर्ससाठी माहिती असणे आवश्यक आहे. आणि ती माहिती आपण युजर्सनी “yes! I agree to terms and conditions” ह्यावर क्लिक करण्याआधी वाचायला हवी.
तुमच्या माझ्यासह ९९ टक्के लोक हे इतक्या बारक्या टायपातलं लांबलचक युजर्स ऍग्रिमेंट न वाचताच “yes! I agree” करून मोकळे होतात हे मात्र निर्विवाद सत्य आहे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.