Site icon InMarathi

प्रत्येक भारतीयाला खोट्या वाटतील अश्या, “सौंदर्या”च्या चित्र-विचित्र व्याख्या

different definitons of beauty across the world

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सौंदर्य हे बघणा-याच्या डोळ्यात असते’ असे म्हटले जाते. परंतु प्रत्येक समाजाचे ठराविक असे काही ठोकताळे असतात. त्या समाजातील व्यक्ती त्या ठराविक चौकटीत बसली की सुंदर ठरते.

भारतामध्ये सामान्यत: गोरा रंग, मोठे डोळे, लांब नाक, सुबक बांधा, काळेभोर लांब सडक केस, नाजुक ओठ, हे सौंदर्याचे मापदंड ठरतात. मग त्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या माध्यमांतून सतत आपल्यासमोर येत असते.

सिनेमा व त्यातील गाण्यांतुन गोरी गोरी छोरी, झील सी ऑंखे, वगैरे चौकटीतील वर्णन केले जाते. आणि मग त्या साच्यात बसण्यासाठी बरीच खटपट होते.

 

 

त्यातुनच चॉंद सा निखार आणणारे क्रीम्स, केस काळे नि लांबसडक ठेवणारी तेलं, सुडौल बांधा करणारी औषध यांच्या जाहिरातींचे काहुर माजते. जवळपास सगळाच समाज ऐपतीप्रमाणे ही उत्पादने वापरून शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात सौंदर्याच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे अगदी सहज जगण्याचा भाग असल्याप्रमाणे चालते.

परंतु जर स्त्रीच्या डोक्यावर केस नसतील, तिचे दात वाकडे तिकडे असतील आणि तरीही तिला सुंदर म्हटले जात असेल तर? किंवा सुंदर दिसण्यासाठी तुमची त्वचा काळसर करून दिली जात असेल तर?हास्यास्पद वाटते की नाही?

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गोष्टी अस्तित्त्वात आहेत. जशी आपल्या देशाची सौंदर्याची परिमाणे ठरलेली आहे तशी जगातील इतर देशांतही आहेत.

त्यातील काही खूपच वेगळी व धक्कादायक आहेत. एवढेच नाही तर भारतातीलच काही समाजातही अशी आश्चर्यकारक परिमाणे आहेत. तर अशाच काही अनोख्या सौंदर्याच्या परिमाणांबद्दल आम्ही सांगणार आहोत..

१. अव्यवस्थित दात :

 

 

जवळपास सगळीकडेच सरळ, एका आकाराचे दात असणे म्हणजे परफेक्ट स्माईल समजले जाते. सर्व दात सारखे असावेत म्हणुन महागड्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.

पण जपानमध्ये ‘Yaeba’ नावाने एक पद्धत प्रचलित आहे. ज्याचा अर्थ होतो ‘दुहेरी दात’.

या पद्धतीप्रमाणे समोरील काही दात दुहेरी आणि जरा अव्यवस्थित असणे सौंदर्यात भर टाकणारे ठरते. आश्चर्य म्हणजे जपानमध्ये समोरील दात वाकडे करून देण्याच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.

२. उंच व पितळी मान :

 

 

थायलंड मधील कायन लाहावी नावाच्या आदिवासी समाजात उंच मान असणे प्रतिष्ठा व सौंदर्याचे लक्षण मानले जाते. स्त्रियांची मान उंच व्हावी म्हणुन म्हणुन वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या गळ्यात पितळी कडे घातले जाते. वाढत्या वयाप्रमाणे या कड्यांची संख्याही वाढवली जाते.

असे करत जवळपास पंचवीस कड्या एका स्त्रीच्या गळ्यात एकावर घातल्या जातात.

या कड्यांमुळे मान उंच दिसते. पण खरंतर मान लांबली जात नसुन पितळी कड्यांच्या भाराने खांदे खाली झुकतात व मान उंच असल्याचा भास होतो. अशी उंच मान झाल्याने मान मोडुन मृत्यु होण्याच्या घटनाही या समाजात घडतात.

३.कमळाप्रमाणे पाय :

 

 

या पद्धतीत अगदी लहानपणीच मुलींच्या पायाची बोटे दुमडुन तळपायाला घट्ट बांधली जातात. यात बोटाची हाडेही मोडली जातात. जसजसे शरीराची वाढ होते तसे पाय वाढत जातात पण बोटे मात्र तळपायालगतच वाढतात. त्यामुळे पायाचा आकार अत्यंत छोटा राहतो.

असे पाय असणे प्रतिष्ठेचे समजले जाते. चीनमध्ये ही पद्धत प्रचलित होती परंतु १९४० पासून तीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यापूर्वी या प्रकारे पाय छोटे केलेल्या अनेक स्त्रिया अजूनही चीनमध्ये बघायला मिळतात.

४.जाड होण्यासाठीची शिबिरं :

 

 

तुम्ही म्हणाल आपल्याकडे झिरो फिगरचे वारे वाहत असताना हा काय प्रकार आहे. पण आफ्रिकेतील काही देशांत जाड असणे सुंदर समजले जाते. जर एखादी मुलगी बारीक असेल तर तिला जाड होण्याच्या शिबिरात पाठवले जाते.

तेथे तिला जबरदस्ती खुप आहार घ्यायला लाऊन जाड केले जाते. अशा जाड असलेल्या मुलीच लग्नायोग्य आणि सुंदर समजल्या जातात.

५. लांबलचक कानाच्या पाळ्या :

 

 

केनियामधील मसाई या आदिवासी जमातीत कानाच्या पाळीला छिद्र पाडून त्यात वस्तु ठेवली जाते. छिद्र मोठे झाले की अजुन मोठ्या आकाराची वस्तु ठेवली जाते.

जोपर्यंत कानाच्या पाळीचे छिद्र खांद्यापर्यंत लांबत नाही तोपर्यंत ते लांबवले जाते. एवढेच नाहीतर तेथील स्त्रिया डोक्यावरील संपुर्ण केस काढतात. अशी डोक्यावर केस नसणारी व लांबलचक पाळ्या असणारी स्त्री अत्यंत सुंदर समजली जाते.

६. शरीरावर नक्षी काढणे :

 

 

इथिओपियातील कारो या आदिवासी जमातीत वयात आलेल्या मुलगा आणि मुलीच्या शरीरावर चाकुने छेद नक्षी काढली जाते. या जखमा भरून नंतर शरीरावर कोरीवकाम केल्याप्रमाणे दिसतात. यात मुलीच्या शरीरावर वेगवेगळ्या नक्षी काढल्या जातात. मुलांच्या शरीरावर फक्त समांतर रेषा काढल्या जातात.

ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायक असते. परंतु या जखमा शरीरावर होत असताना जर मुलगा ओरडला वा रडला तर त्याने त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा कमी केली असे समजले जाते.

७.त्वचा काळसर करणे :

 

 

उन्हाळा सुरु झाला की त्वचा काळी पडू नये म्हणुन वेगवेगळी लोशन्स वापरतात हे तुम्हाला माहितीच असेल. परंतु भरपुर पैसे खर्च करून त्वचा काळी करून घेता येते हे माहिती आहे का? अमेरिकेत हा प्रकार सर्रास चालतो. तेथे वेगवेगळी औषधे आणि तेलं वापरून तुमचा रंग काळा करणारा फवारा त्वचेवर मारला जातो.

हा रंग कायमस्वरूपी नसला तरी काही काळ टिकतो. तेथील रंगाने गोऱ्या असणाऱ्या लोकांना अशा काळसर त्वचेचे फार आकर्षण आहे.

८.नाकावर शस्त्रक्रिया :

 

 

तुम्ही इराण मध्ये गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल की अनेक लोक बिनधास्तपणे नाकावर पट्ट्या लाऊन मिरवताना दिसतात. याचे कारण म्हणजे तेथे नाकावर शस्त्रक्रिया करून ते सुबक करून घेण्याची पद्धत आहे. शिवाय असे करणे म्हणजे श्रीमंतीचे व प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते.

त्यामुळे तिथे सरासरी प्रत्येक पाचपैकी एक स्त्री अशी शस्त्रक्रिया करून घेते. बरेचदा तर नाकावर जखम नसताना किंवा ती बरी झालेली असतानाही केवळ दिखाव्यासाठी अशी पट्टी लाऊन लोक फिरतात.

९. ओठांमध्ये मोठी चकती/ताटली बसवणे :

 

 

इथियोपियातील मुरसी जमातीत चांगला नवरा मिळावा यासाठी खालील ओठ जास्तीत जास्त मोठे असावे लागतात. त्यासाठी मुलगी वयात आली की तिच्या खालील ओठात एक चकती बसवली जाते. हळुहळू वाढत्या आकाराच्या चकत्या ठेवल्या जातात.

जी चकती सर्वात मोठी समजली जाते ती बसेपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहते. एकदा का ती शेवटची चकती बसली की मुलगी लग्नाला तय्यार. शिवाय त्या चकतीवर मुलीने स्वतः नक्षीकाम करून आपली कौशल्ये दाखवायची असतात.

१०. सुंदर दिसु नये म्हणुन नाकात घालणे :

तुम्हाला वाटेल लोक सुंदर दिसण्यासाठी धडपड करतात आणि ही सुंदर न दिसण्याची काय भानगड?

 

 

पण खरंच स्त्री सुंदर दिसु नये यासाठीची ही पद्धत आहे. विशेष म्हणजे ही पद्धत भारतातीलच अपतानी या आदिवासी समाजात आढळते. या पद्धातीमागे एक गोष्ट आहे. पूर्वी या समाजातील स्त्रिया सर्वात सुंदर समजल्या जात. त्यामुळे इतर समाजातील पुरुष या स्त्रियांना पळवून नेत.

आपली बायको कोणी पळवून नेऊ नये म्हणुन तिच्या संरक्षणार्थ ही पद्धत सुरु झाली. यात स्त्रीच्या नाकपुड्यांना बाहेरून दोन्ही बाजुंनी काळ्या रंगाच्या मोठ्या गोल नथण्या घालतात. या नथण्या काहीशा विद्रूप दिसतात व सौंदर्यात बाधा आणतात.

आश्चर्यचकीत झालात ना? या धुनिक युगात सौन्दार्यासाठीची ही मापदंडे जरा चमत्कारिकच वाटतात. पण आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी त्या त्या समाजाने या पद्धती सुरु ठेवल्या आहेत.

यातील बऱ्याच पद्धतींमध्ये स्त्रियांना वेदना सहन कराव्या लागतात. विशेष म्हणजे असे असुनही केवळ सुंदर दिसण्यासाठी आणि योग्य जोडीदार मिळावा म्हणुन त्या आयुष्यभर या वेदना सहन करतात. ही त्यांची सहनशक्ती म्हणावी की अस्तित्त्वासाठीची धडपड?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version