आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – हर्षद बर्वे
===
पुण्यात मी १९९९ पासून येतो आहे. अभियंता म्हणून काम करायचो तेव्हा तर पुण्यातल्या एमआयडीसीत पडीक असायचो आम्ही. औरंगाबादला पण धंदा होता पण त्यात जालना किंवा पुण्यासारखा मजा नव्हती.
पुण्यात मी असंख्य किस्से ऐकले, बघितले आहेत. पण चहा घेऊन आलोच किंवा जेवून आला असालच असले किस्से मात्र कधीच ऐकले, अनूभवले नाही.
उलट माझे भले करतांना सेन्स ऑफ प्रपोशन ठेवा असेच मला इथल्या मित्रांना सांगावे लागले.
तशी प्रस्तावना बरीच लांबली आहे पण आज जे काही लिहिले आहे त्याला याची गरज होती.
हे ही वाचा –
===
झाले असे की, मी त्यादिवशी नेहमीप्रमाणे सहकार नगरला जात होतो. भूक लागली होती. सहकार नगरमध्ये एक ब्रेड पॅटिस विकणारा माणूस आहे. नेहमीच त्याच्याकडे तोबा गर्दी असते. तेव्हा सुद्धा तीच परिस्थिती होती. मी गेलो आणि लाईनमध्ये नंबर लावला.
आपले हे काका मस्तपैकी सिगारेट शिलगवून पॅटिस तळत होते. यांच्याशी डोके लावून उपयोग नाही, याची जाणीव त्यांनी मला आधीच कधीतरी करून दिली होती.
एक माणूस, बहुदा ज्यांना हे पात्र काय आहे हे माहीत नाही तो घाई करायला लागला. या बावाजीने शांतपणे झारे उलटे केले आणि गॅस बंद करून टाकला. तिथल्या गर्दीने मग त्या काकांची समजूत घातली आणि या शहाण्याला धो धो शाब्दिक धुतला.
डोक्यावर नेऊ का तुझे पैसे असे सांगून मग त्या काकांनी त्या माणसाला चार वडे दिले.
मित्राने सांगितलेला किस्सा; तो आणि त्याची पत्नी, कोणीतरी आठवले म्हणून आहेत त्यांच्याकडे खव्याची ऑर्डर नोंदवायला गेले होते. सर्व गोष्टी नियमानुसार झाल्यावर मित्र त्यांना म्हणाला, कार्यक्रम सकाळी आहे, खवा लवकर हवा आहे, डेअरी कधी उघडते. उत्तर आले,
तुम्ही उठायच्या आत नक्की उघडते.
इनस्विंगिंग यॉर्करवर मित्र क्लीन बोल्ड. इतके झाल्यावर त्याने अजून एक प्रश्न टाकला, रतीब घालता का, उत्तर, तुम्हाला परवडेल का? चितळेंपेक्षा एक रुपया महाग आहे. मित्राने दिलेल्या फ्रीहिटवर आठवलेंनी षटकार ठोकला होता.
कोथरूडला आम्ही काही ‘पेशल अकोलावाले’ मित्र पाणीपुरी खायला गेलो होतो. आम्हाला बटाटा, चणे आणि वरतून कांदा असे घातलेली पाणीपुरी आवडते, वरण घातलेली अजिबात नाही.
काका अडून बसले, वरतून कांदा देणार नाही. अहो एक्स्ट्रा पैसे घ्या, उत्तर आले ठेवून घ्या तुमचे पैसे तुमच्याकडे, जमणार नाही.
असे म्हणत आमच्या हातातून प्लेट हिसकावून घेत त्यांनी माठावर झाकण टाकले देखील.
असाच अजून एक किस्सा मित्रानेच सांगितलेला. कुठल्याश्या बेकरीचे ब्रेड फेमस होते. किस्सा बराच जुना आहे. ब्रेड साठ पैशाला.
सुट्टे नसले की तो माणूस हातातला ब्रेड काढून घेऊन पुढील माणसाशी बोलायला लागायचा देखील.
कुरियर सारखी सर्व्हिस देणारे लोक केवळ पुण्यातच १ ते ४ दुकान बंद ठेवू शकतात याची प्रचिती मी याची डोळा याची देहा घेतली आहे.
अनारसे संपले, परत येणार नाहीत ही पाटी ऐन दिवाळीत मी पुण्यातच बघितली आहे. बिबवेवाडीत एका ठिकाणी तेरा रुपये सुट्टे असतील तरच वडापाव देणारा माणूस आहे.
अनेकांना हा माज वाटू शकतो, हा माज नसून त्यांची जगण्याची पद्धत आहे.
माझ्यासारख्या अनेकांना जे बाहेरून आलेत त्यांनी त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. पटत नसेल तर दुसरे दुकान बघा इतके सिम्पल तत्व आहे या सगळ्या लोकांचे.
पण एकदा का तुम्ही त्यांच्या तत्वांशी अॅडजस्ट झाला की मग यांच्यासारखी माणसे आणि पुण्यासारखे शहर नाही. पदोपदी जगण्याचे एक वेगळेच तत्वज्ञान हे लोक तुम्हाला शिकवून जातात.
सचिन, लता, मोदी यांच्यावरच टीका होणार कारण ते त्यांच्या ठिकाणी उत्तुंग शिखरावर आहेत, डोडा गणेश किंवा सदगोपन रमेशवर थोडीच टीका होईल. इथे पण तसेच आहे.
उगाच नाही #माझ्या_पुण्याची राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून निवड झाली.
हे ही वाचा –
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.