Site icon InMarathi

दिवसभर थकवा – कारण आहे झोपताना केलेल्या या ९ चुका

tired man im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असे म्हणतात की, रात्री झोपताना आपल्या डोळ्यापुढे संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम उभा राहतो. जो माणूस दिवसभरात काहीही वाईट किंवा वावगे करत नाही किंवा अप्रामाणिकपणा किंवा लबाडी करत नाही, त्यालाच रात्रीची शांत झोप लागते.

जो माणूस रात्री मनावर कोणतेही ओझे न बाळगता शांत झोपू शकतो, तोच खरा सुखी माणूस होय.

सुखी माणसाची ही व्याख्या काही वर्षांपर्यंत अगदी योग्य होती. तेव्हा लोकांच्या गरजा मर्यादित होत्या.

लोक खाऊनपिऊन सुखी होते. त्यांच्या आयुष्यात भरपूर कष्ट होते, पण ताणतणाव तुलनेने कमी होता. गळचेपी स्पर्धा नव्हती. त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जीवाच्या आकांताने सतत पुढे पळत राहण्याची गरज नव्हती. मात्र काळ बदलला आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम झाला तो लोकांच्या मानसिक स्वास्थावर! शांत झोपेवर!

हल्ली तर शाळकरी मुलांपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सर्वांनाच ताणाने चहूबाजूंनी घेरलेले आहे. ताणाचा पहिला परिणाम माणसाच्या झोपेवर होतो.

म्हणूनच रात्रीची अपुरी झोप किंवा नीट शांत झोप न लागणे तसेच झोप झाल्यानंतर सुद्धा फ्रेश न वाटणे किंवा दिवसभर थकवा जाणवणे हे त्रास अनेकांना होतात.

रात्रीची शांत झोप झाली नाही, तर त्याचा शारीरिक आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतो.

 

 

निद्रानाश व ह्या निगडीत अनेक विकार ह्यावर अनेक शास्त्रज्ञ अभ्यास करीत असतात. शास्त्रज्ञांच्या मते लोकांना रात्रीची कमीत कमी सात ते आठ तास शांत झोप मिळते ते लोक कामात चांगले लक्ष केंद्रित करू शकतात.

त्यांची स्मरणशक्ती उत्तम असते. त्यांची सदसद्विवेक बुद्धी अधिक जागृत असते. हे लोक जास्त सर्जनशील असतात व ह्यांची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा उत्तम असते.

तसेच जे विद्यार्थी तणावरहित रात्रीची पूर्ण व शांत झोप घेतात ते जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात.

जे खेळाडू पूर्ण झोप घेऊ शकत नाहीत त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. म्हणूनच सर्वांनाच चांगली, शांत व पूर्ण सात ते आठ तास झोप मिळणे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

दिवसभरात आपण अजाणतेपणी अशा अनेक गोष्टी करतो ज्यामुळे आपल्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो.


१. रात्री झोपेपर्यंत टीव्ही बघणे आहे झोपेला मारक :

 

 

टीव्हीला इडियट बॉक्स उगाच म्हटलेले नाही. रात्री झोपेपर्यंत टीव्ही बघत राहणे हे झोपेसाठी हानिकारक आहे. ह्याने आपल्या झोपेचे तास कमी होतात. द स्लीप फाउंडेशनच्या मते तर बेडरूममध्ये टीव्ही ठेवूच नये.


२. रोज झोपेची वेळ बदलणे :

 

 

आज रात्री दहाला झोपलो, उद्या काही काम करत किंवा टीव्ही बघत रात्री बारापर्यंत जागरण केलं, परवा रात्री नेटफ्लिक्स बघत किंवा घरी आलेल्या पाहुण्यांशी गप्पा मारत रात्री दोन पर्यंत जागलो असे जर तुमचे रुटीन असेल तर तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होणार ह्यात शंका नाही.

झोपण्याच्या वेळा रोज बदलल्याने शरीराचे चक्र बिघडते व ह्याचा झोपेवर परिणाम होतो.


३. दिवसा जास्त वेळ झोपणे :

 

 

दिवसा जर तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमची रात्रीची झोप कमी होऊ शकते.

दुपारी वामकुक्षीच्या नावाखाली जर दोन दोन तास ताणून दिली तर रात्री लवकर झोप येणार नाही आणि तुमचा दिनक्रम विस्कळीत होईल.

रात्री झोप झाली नाही म्हणून दिवसा झोप येणे आणि त्यामुळे परत रात्री झोप न लागणे हे एक दुष्टचक्र आहे.

 

४. झोप येत नसतानाही बिछान्यात पडून राहणे :

 

बिछान्यात पडल्यानंतर अर्धातास झाला तरी झोप येत नसेल तर चिडचिड होते. अशा वेळी नुसतेच पडून राहू नये.

बिछान्यातून उठावे आणि आपल्या आवडीचे काम करावे ज्याने तुमच्या मनावरचा ताण हलका होण्यास मदत होईल.

स्लीप एक्स्पर्ट प्रोफेसर रिचर्ड वाईसमन ह्यांचा ह्यावर असा सल्ला आहे की जिगसॉ पझल्स खेळल्याने मेंदूवरचा ताण हलका होतो तसेच मेंदूला चालना मिळाल्याने झोप येण्यास मदत होते.

 

५. झोपताना मोबाईल बघणे :

 

 

झोपताना मोबाईलवर चॅटिंग करणे, व्हिडीओज बघणे, गेम्स खेळणे ह्यापैकी एक आपण सगळेच करतो. परंतु ही सवय अत्यंत चुकीची आहे.

रात्री आपण जेव्हा दिवे बंद करतो तेव्हा अंधारात आपल्या शरीरात पिनियल ग्रंथीतून melatonin हे हॉर्मोन स्त्रवले जाते.

हे हॉर्मोन झोप लागण्यासाठी आवश्यक आहे. उजेडात ह्या हॉर्मोनचे स्त्रवणे बंद होते व आपण जागे होतो. परंतु मोबाईलच्या उजेडामुळे रात्र असली आणि झोपण्याची वेळ झालेली असली तरी melatonin स्त्रवत नाही व ह्यामुळे झोप लागत नाही.

ह्याने आपली प्रतिकारशक्तीवर तर परिणाम होतोच शिवाय लठ्ठपणा, मधुमेह व कर्करोगाचा धोका वाढतो.

 

६. रात्री उशिरा चहा, कॉफी किंवा उत्तेजक पेयांचे सेवन करणे :

 

 

अनेक लोकांना रात्री चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. कॅफिनमुळे अलर्टनेस वाढतो. म्हणूनच झोपण्याच्या आधी उत्तेजक पेयांचे सेवन करु नये.

ह्यांने मेंदू अलर्ट राहतो व झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. तसेच रात्री झोपताना मद्यसेवन करणे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे.

कॅफिन, मद्य ह्यामुळे झोपेची क्वालिटी बिघडते. गाढ झोप लागण्यात अडथळे येतात. म्हणूनच सात तास झोप झाल्यावर सुद्धा ताजेतवाने वाटत नाही. डोके दुखते व अस्वस्थ वाटते.

 

७. थकवा आला असतानाही ऑनलाईन ऍक्टिव्हिटीमध्ये वेळ घालवणे :

 

 

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटत असते तेव्हा तो तुमच्या शरीराकडून तुम्हाला देण्यात आलेला संदेश असतो की आता शरीराला आराम देणे आवश्यक आहे.

दमलेले असतानाही तुम्ही जर आराम न करता मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर वेळ घालवला तर तुमची झोप उडून मेंदू परत अलर्ट होतो आणि नंतर वेळेत झोप लागत नाही.

म्हणूनच जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला आराम करण्यास सांगत असेल तेव्हा सरळ ताणून द्या. तुमच्या आवडीच्या वेब सिरीज किंवा गेम्स तुम्ही नंतरही खेळू शकता.

 

८. झोपताना खूप जास्त विचार करणे :

 

 

तुम्ही झोपताना दुसऱ्या दिवशीच्या कामाचा किंवा एकूणच एखाद्या तणावपूर्ण विषयाचा खूप विचार करत असाल तर तुम्हाला शांत झोप लागण्यात हा मोठा अडथळा आहे.

ताण हा झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे.

झोपताना मन शांत व निश्चिन्त असायला हवे तरच शांत झोप लागते. म्हणूनच झोपताना फार विचार करू नका. स्वतःच्या मनाला सकारात्मक सूचना द्या जेणे करून तुमचा ताण निवळण्यास मदत होईल.

ह्याशिवाय तुम्ही जर रात्री उशिरा व्यायाम करत असाल तर त्याचाही झोपेवर परिणाम होतो.

९. रात्रीचा व्यायाम : 

आपल्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ डिग्री Fahrenheit असते. व्यायाम केल्याने हे तापमान वाढते. झोपेसाठी शरीराचे तापमान कमी असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या खोलीचेही तापमान कमी असणे गरजेचे आहे.

गरम ठिकाणी झोप लागत नाही. ह्याउलट खोलीचे तापमान आल्हाददायक थंड असेल तर शांत झोप लागते हे आपण सर्वानी अनुभवले असेलच.

म्हणूनच शांत झोपेसाठी रात्री व्यायाम करणे टाळावे व खोलीचे तापमान थंड असेल ह्याची काळजी घ्यावी.

 

 

वरील सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल. आणि जर तुम्हाला हे सगळे पाळून सुद्धा निद्रानाशाचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेट द्या व वेळीच योग्य उपचार घ्या.

कारण झोप नीट नसेल तर भविष्यात अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version