Site icon InMarathi

“खोटारडे लोक” ओळखण्याच्या सोप्या युक्त्या समजून घ्या; आणि स्वतःची फसवणूक टाळा!

Detect a Lie InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपल्याला लहानपणापासून आई वडील, घरातील मोठी माणसं तसेच शाळेत आपले शिक्षक “खोटे बोलू नका” असे शिकवत असतात. खोटे बोलणे, खोटे बोलून समोरच्याला फसवणे ही अत्यंत चुकीची सवय आहे ही गोष्ट सतत आपल्या मनावर बिंबवलेली असते,

त्यामुळेच तुमच्या माझ्या सारखे सर्वसाधारण लोक खोटं बोलण्याआधी दहा वेळा विचार करतात.

एक खोटं बोलल्यावर ते लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं.

हे करताना आपलंच मन आतल्या आत कुठेतरी आपल्याला चुकीची जाणीव करून देत असतं किंवा आपण समोरच्याला फसवतो आहोत आणि पकडले गेलो तर आपलं काही खरं नाही… ह्या भीतीने आपण खोटं बोलताना अधिक सावधगिरी बाळगतो.

हे सगळं करताना सामान्य माणसाचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज बदलते.

जो अट्टल खोटारडा असतो, त्याला पकडणे अत्यंत कठीण असते पण जाणकार त्याचेही खोटे अगदी बरोबर पकडतात. अट्टल गुन्हेगार खरं बोलतोय की खोटं हे समजणं अतिशय कठीण असतं आणि म्हणूनच अशा वेळी गुन्हेगारांची लाय डिटेक्टर चाचणी करतात.

 

jkconsultancy.in

लाय डिटेक्शन हे एक विज्ञान आहे. ही मानसशास्त्राच्या अभ्यासाची एक शाखा आहे. खोटे बोलणे ही सुद्धा एक कलाच आहे. अनेक अट्टल खोटारडे पॉलीग्राफ टेस्टमध्ये सुद्धा फसवतात. तरीही निरीक्षण व अभ्यास ह्याद्वारे खोटे ओळखता येणे शक्य आहे. सामान्य सरळ साध्या लोकांना खोटे बोलून फसवणे हा अनेक लोकांच्या डाव्या हाताचा मळ असतो.

परंतु काही माणसे दुसऱ्याला नुसत्या चेहेऱ्यावरील हावभावांवरून किंवा आवाजाच्या चढउतारावरून, हातवाऱ्यावरून सहज ओळखतात की समोरचा खरे बोलतोय की खोटे!

हल्लीच्या जगात पटकन कुणावर भरवसा ठेवणे कठीण झाले आहे. आता आपण तर काय उठसुठ ह्याची त्याची लाय डिटेक्टर चाचणी करु शकत नाही.

परंतु नीट निरीक्षण केले आणि मानवी वर्तणुकीचा व मानसशास्त्राचा थोडा अभ्यास केला तर आपणही खरे खोटे नक्की ओळखू शकतो. तर वाचकहो, पुढे दिलेली लक्षणे बघा, समोरच्याचे बोलणे, वागणे ह्यांचे नीट निरीक्षण करा आणि फसवणूक टाळा.

१. हावभाव व बॉडी लँग्वेज ओळखा :

समोरचा माणूस खोटे बोलतोय हे ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे हे बघणे की तो माणूस बोलताना निवांत आहे की अस्वस्थ आहे! सामान्यत: माणूस जेव्हा खरे बोलत असतो तेव्हा तो मनातून शांत असतो, रिलॅक्स्ड असतो.

ह्याउलट जेव्हा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा तो अस्वस्थ असतो, त्याच्या मनावर एक दडपण असते.

जेव्हा आपण दडपणाखाली असतो, तेव्हा अजाणतेपणी आपण आपला ताण काही कृती करून उघड करीत असतो. आपला मेंदू, आपले शरीर ताण कमी करण्याचा प्रयत्न करीत असते.

ह्या कृतींना पेसिफायर्स असे म्हणतात.

 

wikihow.com

हे पेसिफायर्स म्हणजे चेहऱ्यावरून हात फिरवणे, मानेच्या मागच्या बाजूला हात लावणे, ओठ मुडपून घेणे, केसांतून हात फिरवणे, अंगठी किंवा हातातले कडे, बांगडी, गळ्यातील चेन ह्यांच्याशी चाळा करणे, डोळे बंद करणे किंवा डोळ्यांवर हात ठेवणे, मानेवर हात ठेवणे (ही सवय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणत आढळते).

हातांचे तळवे पायाच्या कुठल्याही भागावर चोळणे, हातावर हात घासणे हे होतं. खोटे बोलणारी व्यक्ती ताण कमी करण्यासाठी ह्यापैकी काहीतरी करते.

कुठली व्यक्ती कुठली कृती पेसिफायर म्हणून करते हे व्यक्तीनिरीक्षणातून तुम्ही जाणून घेऊ शकता.

काही वेळेला असेही असते की एखाद्याला हातावर हात घासण्याची किंवा केसातून हात फिरवण्याची किंवा वरील पैकी काही करण्याची सवय असते. त्याचा खोटं बोलण्याशी काहीही संबंध नाही. ओळखीच्या व्यक्तींची सवय आपल्याला माहिती असू शकते परंतु एखाद्या अनोळखी व्यक्ती मध्ये ही लक्षणे आढळली तरी ती व्यक्ती खोटे बोलतेय असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही.

काही वेळा चिंताग्रस्त किंवा तणावाखाली असलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा वरील लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे केवळ ह्या लक्षणांवरून कुठलाही निष्कर्ष काढू नये.

२. समोरच्या माणसाला रिलॅक्स करा :

तुमच्या निरीक्षणातून तुम्हाला समोरच्याचे पेसिफायिंग जेश्चर्स (हावभाव) कळले की तुम्ही एखादा हलकाफुलका विषय काढून किंवा त्या व्यक्तीच्या आवडीचा एखादा विषय काढून त्यावर चर्चा सुरु करा. ह्याने ती व्यक्ती रिलॅक्स होईल.

तिच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला कळेल की ती व्यक्ती आता रिलॅक्स झाली आहे. बोलत असताना ती व्यक्ती तुमच्यातले अंतर थोडे कमी करेल, त्यांच्या सूटची बटणे काढेल, हातांची घडी घालणार नाही, आणि पायांची हालचाल करणार नाही.

 

 

जेव्हा तुम्हाला कळेल, की ही व्यक्ती आता रिलॅक्स झाली आहे, तेव्हा तुम्ही तुमचा वादग्रस्त विषय काढून त्यावर बोलणे सुरु करा. जर ती व्यक्ती परत दडपणाखाली येऊन पेसिफायिंग जेश्चर्स दाखवत असेल तर ती व्यक्ती खोटे बोलते आहे ही शक्यता आहे. परंतु थांबा! अजूनही आपण ठामपणे ती व्यक्ती खोटे बोलतेय हे सांगू शकत नाही.

तुम्हाला जर पडताळून बघायचे असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीला त्या विषयासंदर्भात काही मोघम व काही विशिष्ट प्रश्नं विचारावे लागतील.

परंतु हे प्रश्न विचारताना तुमचा आवाज व विचारण्याची पद्धत अतिशय शांत व संयमी असायला हवी. त्या व्यक्तीला तुमचा संशय येता कामा नये. पोलिसांसारखी उलटतपासणी घेऊ नका.

३. फसवणूक किंवा लबाडी ओळखा :

कुठल्याही खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या वागण्यात व बोलण्यात ताळमेळ असतो. मनातलं चेहेऱ्यावर न दिसू देण्याची कला फक्त कसलेल्या अभिनेत्यांनाच जमते. त्यामुळे सामान्य व्यक्तीचा जसा मूड असतो तेच त्याच्या बोलण्यातून, हावभावांतून दिसून येते.

जर ह्यात दोन्हीत ताळमेळ नसला तर ती व्यक्ती खोटं बोलत असण्याची दाट शक्यता असते.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे जर खरंच चोरी झाली, तर ती व्यक्ती घाबरलेली, चिडलेली, दु:खी किंवा हताश असेल आणि तिच्या हावभावांतून सुद्धा ते आपल्याला जाणवेल. परंतु जर एखादी व्यक्ती तोंडाने सांगतेय की चोरी झाली, परंतु तिचे वागणे अगदी शांत आणि अलिप्त असेल तर मात्र संशयाला जागा नक्कीच आहे.

 

bbc.com

आपण टीव्हीवर अनेकदा बघतो की जर वाघ आसपास असेल तर इतर प्राणी अगदी जागच्या जागी स्थिर उभे राहतात. अजिबात हालचाल करत नाहीत. मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते माणसाचेही अगदी असेच आहे.

जेव्हा माणूस तणावाखाली असतो किंवा खोटे बोलत असतो तेव्हा तो शरीराची फार हालचाल करत नाही. पकडले जाऊ ह्या भीतीने माणूस अजाणतेपणी असे करत असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

४. शब्दावर भर देणे :

सामान्यपणे आपण जेव्हा बोलत असतो, तेव्हा हातवारे किंवा आवाजाचा टोन ह्यातून आपण आपल्या बोलण्यावर भर देत असतो. बोलण्याप्रमाणेच आपण हात हलवणे, मान डोलावणे ह्या कृती आपल्या बोलण्यावर भर देण्यासाठी नकळत करतो.

 

bornrealist.com

परंतु एखादी व्यक्ती जर खोटे बोलत असेल तर त्या व्यक्तीचा सुप्त मेंदू ह्या हालचाली करण्यासाठी शरीराला सिग्नल देत नाही. त्यामुळे हे “एम्फसाइझिन्ग जेश्चर्स” खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या कृतीमधून दिसणार नाहीत कारण त्याचा सुप्त मेंदू व त्याचं बोलणं ह्यांचं सिंक्रोनाइजेशन होत नाही.

५. हातांच्या तळव्यांची दिशा :

मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते खोटं बोलताना आपल्या हाताचे तळवे वरच्या बाजूला असतात. असे आपण नकळत करतो कारण समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे पटवून द्यायचे असते. हे विनंती सदृश हावभाव असतात.

ह्याउलट आपण खरे बोलत असताना आपल्याला समोरच्याला काही पटवून देण्याची गरज भासत नाही म्हणूनच आपल्या हाताचे तळवे जमिनीच्या दिशेला असतात.

 

wikihow.com

तुम्ही ह्या काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर हळूहळू निरीक्षण व सरावाने तुम्ही समोरच्या व्यक्तीचे खोटे नक्की पकडू शकाल. हल्ली तर लाय डिटेक्शन शिकण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आहेत.

थोडा मानसशास्त्राचा अभ्यास व मानवी वर्तणूकीचे निरीक्षण ह्यांच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीला नीट ओळखून स्वतःची फसवणूक टाळू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version