Site icon InMarathi

बघा, भारतीय स्वातंत्र्य दिनादिवशीचे जगातील विविध वर्तमानपत्रांचे पहिले पान!

newspapers-during-indian-freedom-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय इतिहासात अश्या काही घटना घडल्या ज्यांनी पुढील भविष्याला वेगळीच कलाटणी दिली. अश्या घटनांची संपूर्ण विस्तारित माहिती कुठे येत असेल तर ती म्हणजे वर्तमानपत्रं. टीव्हीसारखं तंत्रज्ञान नसलेल्या त्या काळात वर्तमानपत्र हे लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम होतं. या वर्तमानपत्रांनी अनेक महत्त्वाच्या बातम्या दिल्या.

२०व्या शतकाचा मध्यकाळात जागतिक स्तरावर खूप मोठ्या घडामोडी झाल्या. याच काळात दुसऱ्या महायुद्धाने पश्चिमी शक्तींच्या मनावरील पकड मजबूत केली होती.

वसाहतींचे स्वराज्य ही संकल्पना उदयास येत होती.

भारतात १९०८ पासूनच भारताला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू झाली होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही टप्प्याटप्प्याने हा दर्जा देण्याचे तत्त्वतः मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र १९०८ पासून १९३५ पर्यंतच्या विविध सुधारणांद्वारे मर्यादित स्वयंशासनच देण्यात आले.

१९२९ मध्ये कॉंग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी पूर्ण स्वराज्य हे आपले उद्दिष्ट म्हणून स्वीकारले.

 

scroll.in

 

आणि अखेर वसाहतवादाच्या काळात आणखी एका बातमीने वृत्तपत्रांमध्ये आपली जागा बनविली. ब्रिटिश साम्राज्याच्या शिरपेचातील एक रत्न गळून पडले होते. त्याने जगाच्या नकाशात स्वतःची जागा निर्माण केली होती. वसाहतींचे नव्हे तर पूर्ण स्वातंत्र्य मिळवून ते स्वतः शासक झाले होते.

हे अस्तित्त्व निर्माण करत असताना त्याला काही किंमत निश्चितच मोजायला लागली होती. कारण यात एकाऐवजी दोन राष्ट्रांचा जन्म झाला होता. हे राष्ट्र होते भारत. हिंदुस्थान…

१५ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांची फाळणीतून निर्मिती झाली. यात रक्तपात झाला, दोन्ही देशांतील माणसांच्या मनावर न भरून येणाऱ्या जखमा देखील झाल्या. पण पारतंत्र्य झुगारून एका नव्या शक्तीचा उदय होत होता.

स्वतंत्र भारताचा सूर्योदय होत होता. भारतीय स्वातंत्र्य हा संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. ब्रिटिश साम्राज्यातील सर्वांत मोठी वसाहत स्वतंत्र होऊन आणखी दैदिप्यमान स्वप्नाकडे वाटचाल करत होती. शिवाय भारतीय स्वातंत्र्याची पाळेमुळे ही गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वात होती.

अहिंसेच्या या तत्त्वाने जगभरातील अनेक मोठमोठी नेतृत्वं प्रभावित झाली होती. त्यामुळे जगभरातील सर्वच महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी या स्वातंत्र्याची दखल घेणे स्वाभाविकच होते.

जगभरातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी त्यांच्या मुखपृष्ठातील बरीचशी जागा ही भारताचे स्वातंत्र्य, त्यातील क्रांतिकारकांचे योगदान, देशभरात स्वातंत्र्याचे जल्लोषात केले गेलेले स्वागत, दोन देशांचा जन्म, स्वातंत्र्यकाळात देशभरात पेटलेले वातावरण, पाकिस्तानच्या निर्मितीत झालेली जीवितहानी या गोष्टींचे वर्णन करण्यात खर्ची घातली होती.

पुढे काही वर्तमानपत्रांनी भारतीय स्वातंत्र्याचे वर्णन कोणत्या शब्दांत केले होते ते नमुन्यादाखल देत आहोत.

 

द न्यूयॉर्क टाइम्स :

भारतीय उपखंडाचा १५ ऑगस्ट रोजी असलेला मोठा नकाशा अमेरिकन डेली च्या मुखपृष्ठावर छापून न्यूयॉर्क टाइम्सने एका बाजूला भारतीय स्वातंत्र्याच्या समारंभाचे वर्णन केले तर दुसऱ्या बाजूला फाळणीबद्दलची आपली खंत व्यक्त केली होती.

 

twitter.com

 

त्यापुढे जाऊन त्यांनी ज्या संस्थानांनी कोणत्या देशात विलीन व्हायचे हे ठरवले नव्हते त्या संस्थानांबद्दलही लिहिले होते. त्यामुळे या नकाशात काश्मीर आणि हैद्राबाद अशी काही राज्ये समाविष्ट केलेली नव्हती.

 

द वॉशिंग्टन पोस्ट :

वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर भारतीय स्वातंत्र्याचा सर्वत्र साजरा केला गेलेला जल्लोष मांडण्यात आला होता. पौर्वात्य देशातील थाटामाटाचे वर्णन त्यांनी केले होते. या वर्तमानपत्राने म्हटले होते की,

“ एकातून स्वतंत्र झालेल्या दोन देशांनी थाटात आपापला स्वतंत्र कारभार चालू केला. पण असे करत असताना रक्त सांडले, देशात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.”

 

indianexpress.com

 

नेहरूंचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण, लाल किल्ल्यावर असलेले समारंभाचे वातावरण, पंजाब प्रश्न असे विविध विषय त्यांनी हाताळले. त्यांनी “भारताने सार्वभौमत्व मिळवले, सर्वत्र अत्यानंदाचे वातावरण” अशा शीर्षकाखाली त्यांनी या बातमीला प्रसिद्धी दिली.

 

द शिकागो ट्रिब्यून :

अमेरिकन न्युज डेली, द शिकागो ट्रिब्यूट या वर्तमानपत्राने लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली ही बातमी ठळकपणे दिली. पंजाबमध्ये होत असणारे मृत्यू अधोरेखित करून महात्मा गांधीजींची यातील भूमिका ठळकपणे लिहिली.

 

indianexpress.com

 

द शिकागो ट्रिब्यूट या वर्तमानपत्राने नव्याने उदयास आलेल्या देशांना हिंदुभूमी भारत आणि मुस्लिम पाकिस्तान असे संबोधले. या वर्तमानपत्राच्या दुसऱ्या पानावरील एक विशेष विभाग पाकिस्तानच्या निर्मितीवर खर्च केला होता. या विशेष सदराचा मथळा होता

” जिना यांनी त्यांचे स्वप्न असलेले मुस्लिम राष्ट्र मिळवले. “

 

द आयरिश टाईम्स :

ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या, स्वतंत्र झालेल्या पहिल्या काही वसाहतींपैकी एक म्हणजे आयर्लंड. त्यामुळे त्यांना भारताबद्दल असलेला बंधुभाव देखील तितकाच सच्चा. त्यामुळे आयरिश वर्तमानपत्राने भारताचे लढून मिळवलेले स्वातंत्र्य साजरे केले.

 

indianexpress.com

 

“मध्यरात्रीचा शेवटचा प्रहार संपत असताना दिल्लीची संसदेची इमारत ही एक अविस्मरणीय, अत्यंत आनंदी असा उत्सव साजरा करत आहे.”

अशा आशयाचे गौरवोद्गार त्यांनी “भारताने ब्रिटिशांकडून आपली सत्ता काबीज केली” या शीर्षकाच्या मुखपृष्ठावरील बातमीतून काढले.

 

द डेली टेलिग्राफ :

या सुप्रसिद्ध ब्रिटिश दैनिकाच्या पहिल्या पानाचा मोठा भाग हा भारतीय स्वातंत्र्याच्या बातम्यांनी व्यापला होता. त्यांच्या वर्तमानपत्रात भारतीय राजकीय नेते आणि ब्रिटिश राजकारणी यांच्यात झालेल्या संवादाचा सुद्धा संक्षिप्त आढावा घेतला गेला होता.

लखनौमधील निवासस्थानी असलेल्या union jack चा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला होता.

 

indianexpress.com

 

१८५७ च्या विजयानंतर हा union jack कधीही खाली उतरविण्यात आला नव्हता. तो पहिला आणि शेवटचा खाली उतरविण्यात आला तो शेवटच्या मध्यरात्री. या कृतीतून भारतातील सत्तांतरणाचा संदेश देण्यात आला. भारताचा ताबा ब्रिटिशांकडून भारताकडे आला. हिंदुस्तान स्वतंत्र झाला.

 

द टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाईम्स :

आपल्या देशातील वर्तमानपत्रांमध्ये आपल्या स्वातंत्र्याबद्दल अभिमान व्यक्त केला गेला. प्रत्येक वर्तमानपत्राचे पाहिले पान हे आपल्या देशाच्या गौरवोद्गाराने भरलेले होते. पाकिस्तानच्या निर्मितीला सुद्धा भारतीय वर्तमानपत्रांमध्ये पुरेसे महत्त्व देण्यात आले होते.

द टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरील मुख्य बातमीचे शीर्षक होते,

“भारताच्या स्वातंत्र्याचा जन्म”.

 

desidime.com

 

हिंदुस्तान या वर्तमानपत्राच्या मुख्य बातमीचे शीर्षक होते,

“शतकांच्या गुलामगिरीनंतर भारतात स्वातंत्र्याची मंगल पहाट”

नेहरूंच्या ‘tryst with destiny’ या १४ ऑगस्टच्या रात्रीच्या भाषणाचे वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. नेहरूंच्या शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या होत्या.

नेहरू म्हणाले होते-

“पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी पूर्ण. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल.”

“जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे उचित ठरेल.

इतिहासाच्या उषःकालात भारताने स्वतःच्या शोधास अनंतात प्रारंभ केला. या काळातील अनेक शतके या देशाचे कर्तृत्व, त्याचे यशापयश यांनी भरलेली आहेत. भलेबुरे दिवस येत जात राहिले. पण या देशाने आपले स्वत्व शोधण्याचे ध्येय डोळ्यांपुढून हलू दिले नाही.

 

outhkiawaaz.com

ही शक्ती देणारे आदर्शही तो विसरला नाही. आज आम्ही दुर्भाग्याच्या एका कालखंडावर पडदा पाडतो आहोत. भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे.

आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी किर्ती आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे.

स्वातंत्र्य व शक्तीच्या बरोबरच जबाबदारीही वाढते. भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्‍या या सभेवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या जन्मापूर्वी आपण सर्व प्रसववेदना सहन केल्या. त्याच्या स्मृती हृदयात जतन करून ठेवल्या आहेत. यातील काही वेदनांची ठसठस आजही होते आहे, पण तरीही भूतकाळ संपून भविष्याचे आव्हान आपल्यासमोर आहे हेही विसरता कामा नये. ”

 

 

आज या भाषणाला, नियतीशी केल्या गेलेल्या कराराला ७१ वर्षें पूर्ण झाली. भारत स्वातंत्र्योत्तर ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशा प्रसंगी तिरंग्यासमोर नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करावीशी वाटते,

शान न इसकी जाने पाए,
चाहे जान भले ही जाए,
विश्‍व विजय कर के दिखलाएं,
तब होए प्रण पूर्ण हमारा,
झण्डा ऊँचा रहे हमारा ..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version