जेव्हा ब्रिटनची महाराणी “व्हिक्टोरिया” भारतीय नोकर “अब्दुल”च्या प्रेमात पडते…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रेम ही एक तरल भावना आहे. प्रेम कोणावरही किंवा कशावरही जडते, आपोआप…!!
प्रेम ‘कोणावर’ करावे किंवा कोणावर करू नये ह्याचे काहीही लिखित अलिखित असे नियम अथवा अटी नाहीत. तसं असतं तर ते ‘प्रेम’च नाही. कारण कोणत्याही अटी नियमांशिवायच तर प्रेम फुलत असतं आणि वृद्धिंगत होत असतं.
प्रेमी युगुलांचे दाखले द्यायचे तर खूप नावे सांगता येतील. रोमिओ ज्युलिएट, लैला मजनू, हीर रांझा ते आत्ताचे सचिन अंजली तेंडुलकर, ऐश्वर्या अभिषेक, करीना सैफ पर्यंत. ह्यांच्यात एक साम्य आहे.
ह्या युगुलांनी देश, धर्म, जात-पात, रंग-रूप, श्रीमंती-गरीबी आणि वयातील अंतर ह्या कशाचीच पर्वा केली नाहीये.
पण ह्या उप्पर पण प्रेमाची अनेक रूपे आहेत. एखादं कुटुंबातील नातं असो किंवा मैत्रीतले प्रेम असो. कधी कधी तर प्रेमाला ना नाव देता येत ना नात्याचं रूप.
अशाच प्रेमाची ऐका एक कहाणी…
भारतीय नोकर अब्दुल करीम आणि त्याच्या प्रेमात ‘व्हिक्टोरिया’ राणी..!
===
हे ही वाचा – इंग्लंडच्या राजघराण्याच्या छानछौकीचा हा अवाढव्य खर्च कोण करत असेल ?
===
भारतीयांचं आणि इंग्रजांचा नातं काय होतं हे आपल्याला माहीतच आहे. त्यातून काळ्या रंगाचे आपण भारतीय त्या इंग्लंडच्या गोऱ्यांना कायमच गुलाम वाटत होतो. तसं वागवलं ही जायचं भारतीयांना.
अशाच एका भारतीय गुलामावर जर गोऱ्यांच्या राणीचे प्रेम जडले असेल तर तिच्या पश्चात त्याचे काय झाले असेल?
अर्थातच व्हिक्टोरिया राणीच्या मुलाने आणि मुलीने तिच्या सगळ्या गोष्टी ज्या अब्दुल करीमशी निगडित होत्या त्या सगळ्या इतिहासाच्या पानांमधून पुसून टाकल्या.
किमान त्यांना तरी असं वाटलं की, आता सगळे पुरावे नष्ट केले आहेत, तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना राणीच्या आयुष्यातील १४ वर्ष चाललेल्या ह्या ‘एपिसोड’ बद्दल काहीच कळणार नाही.
पण असे झालेच नाही. अब्दुल करीमची स्वलिखित दैनंदिनी म्हणजेच ‘पर्सनल डायरी’ त्याच्या भाच्याकडे, अब्दुल रशीदकडे होती.
अब्दुल कारीमच्या मृत्यनंतरही काही पिढ्यांनी ती डायरी व्यवस्थित संभाळली. त्यामध्ये राणीच्या आणि त्याच्या नात्यातील काही प्रसंगांचा उल्लेख आहे. बऱ्याच नोंदी आहेत आणि इतिहास समोर आणायला अजून काय पाहिजे?
ह्या विषयावर एक सिनेमा निघाला आणि त्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहीण्यासाठी ‘श्रावणी बासू’ ह्यांनी ती डायरी मिळवली. त्या डायरीतल्या नोंदींवर बासूनी एक पुस्तक लिहिले. त्यात त्या म्हणतात,
अब्दुल करीम हा हाजी वझीरुद्दीन नावाच्या एका इसमाच्या सहा मुलांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा. झाशीच्या एका इस्पितळात ते कर्मचारी होते.
इस्पितळातील नोकरीमुळे घरात मुलांना शिकवायला मौलवी शिक्षक ठेवले होते. ज्यांच्याकडून अब्दुल पर्शियन आणि उर्दू उत्तम रित्या शिकला. त्यातच त्याला आणि त्याच्यासोबत, त्याच्या होणाऱ्या बायकोच्या भावांना देखील आग्रा जेलच्या कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीही मिळाली.
इथेच त्याचे नशीब चमकले. त्या जेल मध्ये सुपरिटेंडेंट असलेल्या जॉन टेलर नावाच्या इसमाने अब्दुलला राणी व्हिक्टोरियाच्या सेवेकऱ्यांच्या गटात सामील केले.
त्या सेवेकऱ्यांना राणीच्या पन्नासाव्या वाढदिवसाला इंग्लंडला जाऊन तिथे येणाऱ्या मोठमोठ्या भारतीय लोकांशी राणीचा परिचय करून देणे, भाषांतर करून संवाद साधणे ही कामे सोपवली होती.
===
हे ही वाचा – पंडित नेहरू आणि एडविना माउंटबटन : अनैतिक म्हणून हिणवलं गेलेलं मैत्रीचं हृद्य नातं
===
त्यासाठी इंग्रजी भाषेचा आणि राजमहालातील सभ्य वागणुकीचा ‘क्रॅश कोर्स’ अब्दुल कडून करवून घेण्यात आला.
राणीचा जुना नोकर आणि खानसामा मोहमद बक्षी हा आता अब्दुलचा साथीदार होता. ते दोघे राणीच्या मर्जितले खास नोकर झाले होते.
त्याच्या बद्दल राणीच्या नोंदीमध्ये , ‘एक दिसायला चांगला आणि ऊंच माणूस’ असे लिहिलेले आढळते. मोहमद बक्षी जरा जुना असल्याने जास्ती प्रशिक्षित होता. अब्दुल पेक्षा कामाला वरचढ होता.
पण एके दिवशी अब्दुलने वेगळ्या पद्धतीचे जेवण बनवून राणीला अत्यंत खूश केले आणि आपली वेगळी ओळख बनवली. त्याने केलेली चिकन करी आणि पुलाव राणीला इतका आवडला की तिने तिच्या नेहमीच्या मेनूमध्ये त्याला स्थान दिले.
असाच हळू हळू अब्दुल, राणीची मर्जी जिंकत गेला आणि त्यावर राणी त्याला खूप इनाम आणि नजराणे देऊ केले.
भारतावर राज्य करत असताना भारतीयत्व समजून घेण्यासाठी राणीने अब्दूलला हिंदुस्तानी भाषा शिकवण्यास सांगितले. त्यासाठी अब्दुल करीमने आधी स्वतः दोन महिन्यात इंग्रजीचे पूर्ण ज्ञान प्राप्त केले आणि तो राणीचा शिक्षक झाला.
हळू हळू राणीने त्याला बढती दिली. त्याला भारतीय क्लार्क बनवले, मुन्शी अब्दुल करीम अशी पदवी दिली आणि आता इतर कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्याच्याबरोबर संवाद करण्यापेक्षा ती सरळ त्यालाच सरकारी पत्र पाठवू लागली.
राजाच्या निधनानंतर व्हिक्टोरिया राणीच्या आयुष्यात असाच एक खाजगी नोकर आला होता. ‘जॉन ब्राउन’..
त्याचे आणि राणीचे संबंध इतके गहिरे होते की राजवाड्याच्या कार्यालयातील कर्मचारी राणीला पाठीमागे ‘सौ ब्राउन’ असेच संबोधायचे. १८८३ मध्ये त्याचे निधन झाल्यावर मात्र राणीच्या आयुष्यात कोणीच आले नाही. एक पोकळीत निर्माण झाली जणू..!!
पण १८८७ ला अब्दूलच्या येण्याने सगळ्यांनी पुन्हा राणी आणि जॉन ब्राउन बरोबरच्या नात्यासारखीच ह्या नात्याची तुलना करायला सुरुवात केली.
इतर लेखकांनी आणि इतिहास संशोधकांनी राणीच्यावर लिहिलेल्या काही पुस्तकात असाही उल्लेख केला आहे की, राणी म्हणायची
‘अब्दुल तिला खास आवडतो, त्याच्या बरोबर राहिल्यावर राणीला खूप बरे वाटते.’
असेही त्यांच्या पुस्तकांमध्ये नमूद केले आहे की, दोघांची जवळीक खूप जास्ती वाढली होती.
राणी आणि अब्दुल सतत दौऱ्यावर जायचे, कधी कधी फक्त दोघेच..! त्यामुळे त्यांच्यातही जॉन ब्राउन बरोबर असलेलं शारीरिक नातंही नक्कीच निर्माण झालं असणार असा त्या लेखकांचा दावा होता.
त्या विरुद्ध अब्दूलच्या दैनंदिनीत मात्र कुठल्याच प्रकारच्या रोमान्सचा उल्लेख आढळतात नाही. त्याच्या लिखाणाप्रमाणे राणी त्याला पत्रात ‘माझा प्रिय मित्र’ किंवा ‘माझा प्रिय मुलगा’, ‘तुझी प्रिय आई’ असं लिहायची.
श्रावणी म्हणतात,
‘पण काही पत्रांत मात्र राणीच्या ओठांचे ठसे देखील होते.’त्यामुळे हे नातं नक्की काय आहे ह्याचा चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता.
पण एक नोकर असून सुद्धा अब्दूलला मात्र सगळ्यांपेक्षा जास्ती फायदे मिळत असत. त्याला राजपरीवारा जवळच एक घर दिले होते राहायला. पैसा, भेटवस्तू आणि बाकीच्या जीवनावश्यक वस्तूंची ददात नसायची.
त्यातच अब्दुलने बायकोलाही सोबत ठेवण्याची परवानगी काढली आणि राणीने ती दिली देखील. वडिलांना पेन्शन, जमीन, घर, पैसा, भारतातील त्याच्या ओळखीतल्या अधिकाऱ्यांना बढती असे एक ना अनेक फायदे अब्दुलने राणीच्या आपल्यावर असलेल्या मर्जीमुळे करून घेतले.
ह्या सगळ्या गोष्टी राजपरिवार आणि मुख्यत्वे इतर कार्यालयीन गोऱ्यांच्या नजरेत टोचायला लागल्या.
एक तर रंगाने काळा, त्यात भारतीय गुलाम आणि राणीचा त्यावर असलेला वरदहस्त कोणाला पाहवेना. काहींनी तर त्याच्या मृत्यूची मनोकामना देखील केली होती. पण राणीच्या मर्जीपुढे चालतंय काय..?
राणीला देखील हे सगळे समजले होते. म्हणून तिने अब्दुल वरील प्रेमाखातर त्याची बरीच सोय करून ठेवली होती. तिने महत्वाच्या कार्यालयीन कागद पत्रांवर देखील लिहून घेतले होते की,
‘माझ्या मृत्यूनंतर अब्दुलला देखील मला श्रद्धांजली वाहण्याचा राजघराण्यातील लोकांसोबत पहिला मान मिळायला हवा.’
जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत अब्दुलवर काहीही आभाळ कोसळणार नाही ह्याची तिने काळजी घेतलेलीच होती. पण तिला एक खात्री होती की तिच्या मृत्यू पश्चात मात्र कोणीही त्याची हयगय करणार नाहीये.
===
हे ही वाचा – स्वातंत्र्यपूर्व काळातही “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहणारा बेधडक भारतीय नेता!
===
ही राणीची भीती खरी देखील ठरली. १९०१ साली तिच्या मृत्यूनंतर अब्दूलला, कागद पत्रात लिहिल्यामुळे तिला शेवटची मानवंदना देता आली. मात्र त्यानंतर लगेच त्याच्या नशिबाचे फासे फिरले.
राजकुमार आणि राजकन्यांनी अब्दूलची रवानगी अतिशय अपमानास्पदरित्या मायदेशी केली. त्याच्याकडील सगळ्या मौल्यवान वस्तू, राणीची पत्रे, घर आणि पैसे काढून घेतला.
सगळी पत्रे, दोघांच्या नोंदी असलेले कागद जाळून टाकले.
थोडक्यात त्या दोघांतील नात्याला त्यांचा विरोध असल्याने रागाच्या आणि बदल्याच्या भावनेने सगळे पुरावे थेट नष्ट करण्यात आले. पुढे भारतात येऊन कालांतराने अब्दुलचेही निधन झाले. त्याला कोणी वारसही उरला नव्हता त्याची कहाणी पुढे सांगायला..!!
सगळे पुरावे नष्ट केले असले तरी नियतीच्या पुढे कोणाचं काहीही चालत नसतं.
‘आयल ऑफ विट’च्या हॉलिडे होम मध्ये फिरताना जिथे राणी आणि अब्दुलने एकांतात क्षण घालवले होते, तिथे ‘श्रावणी बसू’ ना एक गोष्ट लक्षात आली की खूप ठिकाणी अब्दुलची तैलचित्र, अर्धाकृती पुतळे देखील आहेत.
त्यात तो नोकर न वाटून एक सुसभ्य माणूस अथवा ऑफिसर वाटत आहे.
तिने चौकशीस सुरुवात केली तर तिला कोणीतरी राणीशी निगडित काही वह्या पुस्तके आहेत ती बघा म्हणून सुचवले. त्या वह्या कोणाला समजल्या नव्हत्या बहुतेक. कारण त्यातील भाषा उर्दू होती.
त्यातून राणी आणि अब्दूलबद्दल थोडा फार उलगडा होतो ना होतो तोवर श्रावणीला अब्दुलच्या नातेवाईकाने स्वतःहून फोनवर अब्दुलच्या जपून ठेवलेल्या दैनंदिनीबद्दल सांगितले आणि अशी बाहेर पडली एक सुंदर प्रेमकथा.
ही एक अशी विस्मरणात गेलेली प्रेमकथा आहे की ह्याला कोणते नाव नाही, प्रेमाला नाते नाही. कोणी ह्या प्रेमाला नावाजले नाही. ह्या प्रेमाचा अंत देखील आनंदात झाला नाही.
पण साध्याश्या चिकन करी आणि पुलावावरून धर्म, श्रीमंती गरिबी, राजा आणि रंकाच्या पलीकडे जाऊन वाढत गेलेल्या मैत्रीचे (का प्रेमाचे?) धागे मात्र पक्के झाले ते अगदी मृत्यू पर्यंत..!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.