२० वर्षाच्या करीयरमध्ये एकही सुट्टी न घेणारा पोलिस अधिकारी आहे तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
“सद्रक्षणाय खल निग्रहणाय”… महाराष्ट्र पोलिस आयुक्तालयाच्या बाहेरचा लोगो अनेकांनी पहिला असेल, पासपोर्टच्या कामासाठी अनेकवेळा जाणे होते तेंव्हा हा लोगो निश्चितच पहिला जातो. काही कामासाठी पोलिसठाण्यात गेल्यावरही हा लोगो सहज दिसावा असाच लावलेला असतो.
सत्त्याचे रक्षण आणि खलांचे निग्रहण, किती योग्य असे हे शब्द. वाचल्यावरच खलांना धडकी भरावी असे हे शब्द, पोलिस खात्याला साजेसेच.
पोलिसांचं काम म्हणजे २४ तास ऑन ड्युटी, कधी कोणत्या प्रकारचा गुन्हा घडेल ह्याचा काही नेम नसतो, खबर मिळताच ताबडतोब हजर राहावे लागते त्या गुन्ह्याच्या ठिकाणी, आता गुन्हे किती प्रकारचे घडतात हे आपण रोज वर्तमानपत्रात वाचतोच.
अपघात, भांडणे, मारामाऱ्या, चोऱ्या, जाळपोळ, मोर्चे या शिवाय बंदोबस्ताचे अनेक प्रकार, मंत्र्यासाठी बंदोबस्त, उदघाटनासाठी बंदोबस्त, तर कुठे नेत्यांच्या भाषणासाठीचा बंदोबस्त, गणपती आले जा बंदोबस्ताला, ईद आली ठेवा बंदोबस्त, मिरवणूक निघाली, मिरवणुकीबरोबर ह्यांची ही मिरवणूक..
अनधिकृत घरे पडायची या बंदोबस्ताला, निवडणुकीच्या मतदानासाठी पोलीस तर हवेच, आग लागली पळा पळा, रास्ता बंद? वळवा ट्रॅफिक, एक ना अनेक, म्हणून पोलिस असतात २४ तास ऑन ड्युटी.
घरात मुलाचा वाढदिवस आहे पण पोलिस ड्युटीवर, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट झेंडावंदनाला पोलिस हजर हवेत, कोणाची जयंती तर कोणाची पुण्यतिथी पोलिस बंदोबस्त असायलाच पाहिजे, कोणाचा खून झाला सत्यं शोधून काढा.
दंगल झाली, कोणी केली पकडून आणा, चोरी झाली तपास करा, अशी अनेक जबाबदारीची कामे पोलिस रोज अथक परिश्रम घेऊन करत असतात.
अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी डोळ्यात तेल घालून संरक्षण द्यावे लागते, जरा दुर्लक्ष झालं तर निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जावे लागते. कधी कधी जीव धोक्यात घालून संकटांशी सामना करावा लागतो तर कधी जीव गमवावा लागतो.
मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये अनेक पोलिस अधिकारी, पोलिस शिपायांना आपला जीव गमवावा लागला.
असे पोलिस आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असतात.
अशाच एका निष्ठावान पोलीस निरीक्षकाची ही कहाणी. दिल्ली पोलिस कार्यालयात कार्यरत पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहणारे बलजीतसिंग राणा.
वय वर्ष ६६. आजही सेवा निवृत्त झाल्या नंतरही काम करतायत दिल्ली पार्लमेंट पोलिस स्टेशनमध्ये..!
बलजीतसिंग एक निष्ठावान पोलिस निरीक्षक, हरियाणा मधल्या कुंडली गावचे रहिवासी. १९७२ मध्ये पोलिसखात्यात भरती झाले. भरती झाल्यावर त्यांच्या वडिलांनी एक गोष्ट त्यांना बजावून सांगितली ती म्हणजे,
“तू कोळशाच्या खाणीत काम करणार आहेस आपल्या युनिफॉर्मवर एक सुद्धा डाग लागू देऊ नकोस..!”
९ महिन्यांच्या ट्रेनिंग नंतर त्याची पहिली नियुक्ती राष्ट्रपती भवनाच्या बाहेर झाली. नियुक्ती नंतर त्यांनी शपथ घेतली की मी माझे काम इमानाने, सेवाभवाने आणि निष्ठेने करीन आणि केली सुरुवात कामाला..!
रोज १२तास काम करणे, ही सवय लावून घेतली. सकाळी साडेपाचला उठून व्यायाम, चहापाणी न्याहारी करून वेळे पूर्वीच ड्युटीवर हजर. राष्ट्रपती भवनात काम करणे म्हणजे जबाबदारीचे काम. अति महत्वाच्या भारतीय तसेच परदेशी व्यक्तींची सतत ये जा. त्यामुळे सतत सावध राहणे आणि सगळीकडे लक्ष ठेवणे हे कामही अति महत्वाचे.
ते करताना तहान भूक ह्या गोष्टी दुय्यम असायच्या, जबाबदारी फार मोठी होती त्यामुळे घरची कामें सुद्धा वेळ मिळेल तेव्हाच.
बलजीतसिंगच्या घरच्या लोकांचे पण पूर्ण सहकार्य मिळाले, कधीही कुठली तक्रार, वाद होऊ दिला नाही.
त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार. त्यातल्या मोठया मुलीचे लग्न ठरले. मुलीच्या लग्नाला ते पूर्ण दिवसभर ड्युटी करून रात्री थेट लग्नाच्या हॉलवर पोहोचले. लग्न लावून परत दुसऱ्या दिवशी आपल्या ड्युटीवर हजर झाले.
विशेष म्हणजे १९९८ नंतर वीस वर्षांत बळजीतसिंग यांनी एकही सिक लिव्ह, किंवा कॅज्युअल लिव्ह सुद्धा घेतली नाही.
“ड्युटी वीस वर्षे पण एकही रजा नाही..!”
ही आपल्या कामावरची निष्ठा, देश सेवाच ही. कामात कुठेही कसूर नाही. जी शपथ घेतली सुरुवातीला ती तंतोतंत पाळली. अनेक सहकाऱ्यांनी काम नसतानाही रजा घेतल्या, पण ह्या निष्ठावान पोलीस अधिकाऱ्याने कधीच रजा घेतली नाही. कर्तृत्ववान अधिकारी, असे अधीकारी सगळ्याच क्षेत्रात कार्यरत राहिले तर देशाची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही.
बालजीतसिंग यांनी इमाने इतबारे आपली नोकरी केली आणि ते २०१२मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने आपली देशसेवा पुढेही चालू ठेवण्याची विनंती केली.
सरकारी नियमाप्रमाणे त्यांना तशी परवानगी मिळाली पण पूर्वीप्रमाणे वेतन मिळणार नव्हतं.
एक वर्ष तीच सेवा केल्यानंतर सरकारने त्यांना १०५७०/- इतके मानधन दिले. पहिले मानधन त्यांनी स्वीकारले आणि नंतर त्यांनी मानधन न घेता सेवा म्हणून नोकरी तशीच चालू ठेवली.
आजही बलजीतसिंग राणा तीच नोकरी करतायत तेही मानधन न घेता..!
ते आज आहेत दिल्ली पार्लमेंट पोलिस स्टेशन मध्ये आणि काम करतायत ‘कन्सल्टंट डेवलपमेंट ऑफिसर’ म्हणून. एकही रुपया मानधन न घेता.
त्यांनी वरष्ठांपुढे विनंती केली की, ‘मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही माझी नोकरी करत राहीन.’
हे आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे वाक्य आहे.
मुंबईमध्येही अतिरेकी हल्ला झाला त्यावेळीही कर्तव्य बजावताना अनेक पोलिस अधिकाऱ्यांना आपला मौल्यवान जीव गमवावा लागला. पण कर्तव्यात कुठेही कसूर केला नाही. असे ही असतात भारतमातेचे निष्ठावान आणि शूर सुपुत्र. त्यांना, त्यांच्या कर्तव्य निष्ठेला प्रणाम.. बलजीतसिंग जी सारख्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याला आपला सलाम..!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.