Site icon InMarathi

या कॉलेज कुमारीने चोरून चालवलेल्या रेडिओमुळे भारतीय स्वातंत्र्य साध्य करणं शक्य झालं..!

usha-mehta-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“भारतीय स्वातंत्र्यसंग्राम” म्हणजे गुलामीतून मुक्त होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याची जाण भारतीय समाजाला करून देणारा धगधगता यज्ञकुंड. या यज्ञकुंडात हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्मरणात ठेवायलाच हवेत असे हे सैनिक .

पण काही लोक असे होते ज्यांनी या समरात खारीचा वाटा उचलला आणि त्यांची योग्य दखल आपण घेतली नाही. आज आपण अशाच एका महिलेची कथा जाणून घेणार आहोत..

 

wishesh.com

 

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य सेनानी आठवले तर पटापट नावं सांगता येतील. मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाईं पासून ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लो. टिळक, सावरकर, सुभाषचंद्र बोस, चापेकर बंधू, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, खुदिराम बोस, सरोजिनी नायडू, महात्मा गांधींपर्यंत.

ह्यांना सोबत देणारेही अनेक जण होते. जसे रामसेतू बांधताना खारीने आपला वाटा उचलला होता त्याप्रमाणे स्वातंत्र्य संग्रामात खारीचा वाटा उचलणारे अनेक जण होते. काही पडद्यामागे राहिले पण तरीही त्यांचे कार्य मोलाचेच होते.

काही जणांच्या छोटया छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीने लढ्यात मदत तर झालीच पण बरेच बदलही घडून आले. त्यातीलच एक होती, शिक्षण घेता घेता सुद्धा आपण इंग्रजांविरुद्ध भारतवासीयांना कोणती मदत करू शकू? असा विचार करणारी एक कॉलेज कुमारी.

 

pinterest.com

 

तिचे नाव उषा मेहता. २५ मार्च १९२० साली गुजरातच्या सुरतेत त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच गांधीवादी विचारधारेला मानणाऱ्या उषाजी  ‘सायमन परत जा’ असे अवघ्या आठव्या वर्षीच म्हणाल्या होत्या. गांधीजींच्या शिबिरात राहून त्या बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या.

चरख्यावरून सूत कातण्या पासून ते ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ पर्यंत. त्यांचे वडील इंग्रजांच्या दफ्तरी म्हणजे कोर्टात जज होते. त्यामुळे त्यांना सरळ सरळ स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नव्हता.

१९३० साली जेव्हा त्यांचे वडील इंग्रजांच्या नोकरीतून निवृत्त झाले तेव्हा सगळे कुटुंब घेऊन ते मुंबईत स्थलांतरित झाले. तेव्हापासून मात्र उषा यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास कोणतीच आडकाठी राहिली नाही.

===

हे पण वाचा:

या पाच पत्रकारांनी आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणले होते!

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि स्वातंत्र्य सेनानींबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी!

===

त्यांनी ‘खबरी’ बनण्याच्या कामास सुरुवात केली. महत्त्वाच्या बातम्या पोहोचवणे, ब्रिटिशांनी तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांना भेटणे, निरोप पोहचवणे ही कामे त्या आनंदाने करत असत. यातून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याचे समाधान मिळत असे.

हे सगळं करत असताना त्यांनी शिक्षण चालूच ठेवलं. १९३९ च्या सुमारास पदवी शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘लॉ’ चा अभ्यासही सुरू केला.

तिथून पुढे पुढे भारतात फारच अस्वस्थता चालू झाली. एक मुख्य कारण असे की, दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांनी भारतीय सैनिकांनाही लढण्यास भरीस पाडले. ह्यामुळे सैन्यात आणि भारतीयांच्यात नाराजीचे वारे जोरातच वाहू लागले.

 

alchetron.com

 

दुसऱ्या महायुध्दाशी भारतीयांचा काहीही संबंध नसताना लढावे लागणारच असे दिसू लागल्याने त्या काळच्या काँग्रेस ने ‘संपूर्ण स्वराज्य चळवळ’ हाती घेतली. तशी इंग्रजांकडे मागणी ही केली.

ह्यासाठी ‘Quit India movement’ ची मुहूर्तमेढ ९ ऑगस्ट १९४२ रोजी रोवली गेली. त्यावेळी आपले शिक्षण मध्यात थांबवून उषा देखील १५ दिवस भूमिगत झाल्या.  त्यांचा काहीही ठावठिकाणा नव्हता. अशातच, इंग्रजांनी ही चळवळ चांगलीच दाबून टाकली. कित्येक जण तुरुंगात गेले.

पण उषाजी स्वस्थ बसल्या नाहीत.  त्यांनी गुपचूप काही साथीदारांसह एक सिक्रेट रेडिओ स्टेशन चालू केले. नानका मोटवानी, विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी, बाबूभाई ठक्कर ह्या सगळ्यांनी त्यांना स्टेशन चालू करण्यात मदत केली.

ह्यावरून महात्मा गांधींचे संदेश पोचवणे, अत्च्युत राव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, पुरुषोत्तम त्रीकमदास ह्याची भाषणे ऐकवणे आणि देशभक्तीपर गाण्यांनी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध जागे करणे असे मोलाचे काम त्यांनी सुरू केले.

त्या काळात इंग्रजांनी स्थानिक भाषेतील वृत्तपत्रे पूर्ण बंद पडली असताना हे सिक्रेट रेडिओ स्टेशन सगळ्यांसाठी एक नवीन आशेचा किरणच होते जणू..!

 

edition.cnn.com

 

व्यापारी, सुतगिरणी मालक आणि इतर श्रीमंत लोकांकडून या रेडिओ स्टेशनला देणग्या येत राहिल्या. इंग्रजांच्या हाती पडून पकडले जाऊ नये म्हणून उषा आणि त्यांच्या  साथीदारांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सतत एकाच स्थानावरून ते काहीही प्रक्षेपित करत नसत. एकच फ्रिक्वेन्सी सुद्धा वापरत नसत.

सगळी सामग्री घेऊन जवळ जवळ रोजच ते स्थलांतर करून संदेश प्रक्षेपित करत असत. जेणेकरून इंग्रजांना त्यांना पकडणे सोप्पे नसेल, पण तरीही त्यांच्यातीलच एका ‘कमजोर कडीने’ धोका दिला. एक तंत्रज्ञाने सगळी खबर इंग्रजांना पोस्त केली.

इंग्रज ह्या स्टेशनच्या शोधात होतेच. त्यांना कधीपासून ह्या सगळ्यांना पकडून शिक्षा द्यायची होतीच आणि ते शक्यही झालेच. रेडिओ स्टेशन चालवणाऱ्या उषाजी आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली.

===

हे पण वाचा:

पाकिस्तानची ऑफर धुडकावून भारतीय सैन्यात आलेले भारताचे पहिले मुस्लीम एअर चीफ मार्शल

भारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास!

===

इतक्या महत्त्वाच्या, देशहिताच्या कामात, आपल्याच एका साथीदाराने दगा केल्याने त्यांना अतोनात दुःख झाले. पण तरीही ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात जावे लागणे सुद्धा एक सुवर्ण क्षणच आहे’ असेच त्या म्हणाल्या. तुरुंगात भले त्यांची तब्येत खूपच ढासळली, पण त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान होता.

 

owlcation.com

 

४ वर्ष तुरुंगवासानंतर त्यांना १९४६ ला सोडून देण्यात आले. पण त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना १९४७ च्या स्वतंत्रता दिवसाच्या जल्लोषात सामील होता आले नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात उषाजी मेहतांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. खूप पुस्तके लिहिली. त्या शिक्षिकाही होत्या. कालांतराने निवृत्त झाल्या. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानितही केले.

११ ऑगस्ट २००० साली त्यांचे निधन झाले. पण तोपर्यंत देशाच्या ढासळत्या राजकारणावर त्यांनी टीका केली. भ्रष्टाचार आणि हिंसाचार बघून त्या व्यथित होत असत. ज्या महत्प्रयासाने स्वातंत्र्य मिळवलं गेलं ते त्यांनी पाहिलं होतं. त्यामागच्या जीवनदानाचे मोल त्या जाणत होत्या.

पण आताची भारतातील परिस्थिती पाहून त्यांना कायम वाटत राहिले की, ‘ह्याचसाठी का केला होता इतका अट्टाहास?’

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version