' एक “जाती”बाह्य कम्युनिस्ट: सोमनाथदा, तुम को ना भूल पायेंगे! – InMarathi

एक “जाती”बाह्य कम्युनिस्ट: सोमनाथदा, तुम को ना भूल पायेंगे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

माणसाने माणूस म्हणून कसं असावं याचा वस्तुपाठ मार्क्सने कधीच शिकवला नाही. परंतू हेही तितकंच खरं की मार्क्सच्या अनुयायांनी जे द्वेषाचं राजकारण केलं त्याचं बीज मार्क्सने रोवलं हा आरोप करणं हे पाप आहे. मार्क्सिस्ट महानुभावांच्या मांदियाळीत सोमनाथ निर्मळ चॅटर्जी हे पूर्णपणे वेगळे ठरतात ते या पार्श्वभूमीवर .

सोमनाथ चॅटर्जींना कधीही कोणतंही मंत्रिपद मिळालं नाही. २००४ पर्यंत सोमनाथदांना कधीच कोणी फार कर्तृत्ववान म्हणूनही ओळखलं नाही.

एक लढवय्या मार्क्सवादी संसदीय नेता या पलीकडे सोमनाथ चॅटर्जींची विशेष ओळखही निर्माण झाली नव्हती. आणि होणार तरी कशाला? तसंही संपूर्ण समर्पण या पलिकडे केडर बेस्ड पक्षांमध्ये तुम्ही काही करायचंही नसतं. सोमनाथ चॅटर्जींना मंत्रिपदाची लॉटरी कधीच लागली नाही याचं प्रमुख कारण हेच.

आणि त्यामुळेच मंत्रीपदी आल्यावर जी भव्यता राजकारण्याला आपोआपच प्राप्त होते त्याहीपासून ते अलिप्त राहीले.

 

somnath-chatarjee -inmarathi
NewIndianExpress.com

आसामात जन्म झालेले सोमनाथ चॅटर्जी अस्सल बंगाली कुटुंबातले. १९७१ साली देशभर उठलेल्या इंदिरा गांधी नामक सुनामीत सोमनाथदांना वयाच्या ४२ व्या वर्षी लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. आणि तिथेच त्यांची कारकीर्द सुरु झाली. सलग १३ वर्ष लोकसभेत काढल्यानंतर १९८४ साली काँग्रेसच्या ममता बॅनर्जी नावाच्या २९ वर्षाच्या तरुणीने त्यांचा पराभव केला.

अर्थातच राजीव गांधींच्या मागे इंदिरा हत्येनंतर उठलेली लाट याला कारणीभूत होती. पण लगेचच १९८५ साली एका पोटनिवडणुकीत ते लोकसभेत आले. आणि तिथून ते पुढे २००९ असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

त्यावेळचा कम्युनिझम हा आजच्या एवढा अहंकारी नव्हता. आजही देशभरात जर सर्वात चांगलं राजकीय आणि वैयक्तिक चारित्र्य कोणाचं लखलखीत असेल तर ते सर्वप्रथम (केवळ नाही) कम्युनिस्टांचं आहे.

भारतातल्या कम्युनिस्टांची एक पिढी १९६२ सालापासून भारतीयांपासून दुरावली. परंतु म्हणून सगळेच कम्युनिस्ट हे चायनीज डोक्याचे आणि रशियन हृदयाचे झाले नाहीत. कम्युनिस्टांनी चुका जरूर केल्या. परंतु त्यांना जाहीरपणे ‘हिमालयन ब्लण्डर’ मानण्याची हिंमतही कम्युनिस्टांनीच दाखवली हेही तितकंच खरं.

कम्युनिस्टांची एक पिढी ही प्रचंड विद्वान होती. (त्या पिढीतले आजचे शेवटचे म्हणजे सीताराम येचुरी, म्हणजे जसा ख्रिस गेल १९८० च्या दशकातल्या वेस्टइंडीजची आठवण करून देणारा शेवटचा, तसं.)

ह्या पिढीला स्वतःला कम्युनिस्ट आणि नास्तिक म्हणवून घेण्याची हौस नव्हती तर त्यांची ती पात्रता होती. नास्तिकत्वात सहजत्व आहे आणि तेच त्याचं खरं सौंदर्य आहे.

पण एखाद्या गोष्टीचं आकलन नाही म्हणून त्या गोष्टीकडे पाठ फिरवायची असा सोपा सुलभ मार्ग सोमनाथ चॅटर्जींनी निवडला नाही. (उदा. आज इंग्रजीचं अजिबात आकलन नसणारे त्या भाषेचा द्वेष करतात आणि त्याच भाषेवर जग चालल्याने जगाचाही द्वेष करतात.) कम्युनिस्टांची ही पिढी भारतीय परंपरांचा अभ्यास केलेली होती.

 

Sitaram_Yechury_inmarathi
indiatoday.com

भारतीय संस्कृती, परंपरा यांचा अभ्यास त्यांनी मोठ्या प्रमाणात केला होता. आणि त्यातून अनेक कम्युनिस्ट त्या संस्कृतीची चिकित्सा करायचे. नास्तिकत्वाचा अर्थ असतो कोणत्याही गोष्टीवर अथवा परंपरेवर केवळ सांगितलं गेलं म्हणून विश्वास ना ठेवणारा. आणि त्याच अनुषंगाने परंपरेमधले काही फोल मुद्दे काढून प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारा.

कम्युनिस्टांच्या या पिढीने हा प्रयत्न नक्की केला. आणि तो त्यांनी ते कम्युनिस्ट आहेत म्हणून केला.

त्यांना खऱ्या अर्थाने पुराणातली (र)वानगी पुराणात असं म्हणण्याचा अधिकार होता. आजच्या देव वगैरे मानत नाही म्हणून स्वतःला नास्तिक आणि त्या अनुषंगाने कम्युनिस्ट वगैरे म्हणवणाऱ्या पिढ्यांपेक्षा सोमनाथ चॅटर्जी उजवे ठरतात ते त्या मार्गाने. विधायक वाद घालण्याची त्यांची वृत्ती अफाट होती.

१९९६ साली ज्योती बसूंनी जर पंतप्रधान होण्याची संधी स्वीकारली असती तर सोमनाथ चॅटर्जी यांना नक्कीच मोठं मंत्रिपद मिळालं असतं.

पण ज्योतिदांनी ती संधी नाकारली आणि नंतर संपूर्ण कम्युनिस्ट पक्ष हळहळला. अर्थातच सर्वप्रथम एक पक्षसदस्य असणाऱ्या सॊमान चॅटर्जींना त्याबद्दल ना खंत ना खेद.

२००४ साली सोमनाथदा एकमुखाने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्याआधी ते प्रोटेम, म्हणजेच हंगामी, अध्यक्ष होते. नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिल्यावरच त्या सभागृहाचा सदस्य होता येत असतं. आणि त्यातून मग पुढे सभागृहाचा अध्यक्ष निवडला जातो. परंतु त्या सदस्यांच्या शपथविधीसाठी प्रोटेम अध्यक्षाची निवड होते. आणि परंपरेने हा मान सर्वात ज्येष्ठ सदस्याला मिळत असतो.

सोमनाथ चॅटर्जी अध्यक्ष झाले. पण सर्व सदस्यांनी त्यांना एकमताने पूर्णवेळ अध्यक्ष म्हणूनही निवडून दिलं. भारतीय संसदीय व्यवस्थेच्या इतिहासात असा मान या आधी केवळ गणेश वासुदेव मावळणकर यांना लाभला.

 

somnath-chatterji-inmarathi
indiatv.com

लोकसभा सभापती ही सोमनाथ चॅटर्जींच्या राजकीय कारकिर्दीच्या लखलखटाची सुरवात. देशात हमखास निवडून येणार असं वाटणारं वाजपेयी सरकार पडलं होतं. भाजप सदस्यांचे काळे ठिक्कर पडलेले चेहरे (न) बघण्यासारखे झाले होते. अश्या अवस्थेत त्यांनी घातलेल्या धांगडधिंग्याला सोमनाथ चॅटर्जींनी व्यवस्थित हाताळलं.

स्वतः च्या चाहपाण्याचा खर्च स्वतः च्याच खिशातून करायची प्रथा त्यांनी लोकसभा अध्यक्ष असताना सुरु केली. परदेश दौऱ्यांमध्येही आपल्या कुटुंबाचा खर्च ते स्वतः उचलत.

परंतु एक प्रसंग त्यांच्या माणूसपणाची आणि राजकीय परिपक्वतेची साक्ष पटवून देणारा होता.

एनडीएतर्फे लोकसभेत बोलायला माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस उभे राहिले. नेहमीच्या आवेशात त्यांनी बोलायला सुरवात तर केली. परंतू काहीतरी गडबड होऊ लागली. जॉर्ज फर्नांडिस मध्ये मध्ये बोलताना अडखळायला लागले. नेहमीच जोश अजिबात नव्हता. नेहमीसारखीच समोरच्या बाकावरून थट्टा मस्करी सुरु झाली. फर्नांडिस गांगरले. समोरून हुर्यो उडायला लागली.

काहीच काळाने सोमनाथ चॅटर्जींना वेगळाच संशय यायला लागला. आपला एकेकाळचा लढवय्या खंदा समाजवादी मित्र आणि विरोधक आज नेहमीच्या अवस्थेत नाही हे त्यांना कळून चुकलं.

ताबडतोब आवाज काढत जरब दाखवत सोमनाथदांनी सत्ताधाऱ्यांना शांत केलं आणि जॉर्ज यांचं भाषण ते ऐकू लागले. फर्नांडिसांना शब्द मिळत नव्हते. तेंव्हा त्यांना शब्द सुचवून त्यांच्याच भाषणातले मुद्दे पुरवून सोमंथदांनी त्यांचं भाषण अक्षरशः उरकलं. त्यानंतरच काही दिवसात जॉर्ज फर्नांडिसना ‘अल्झायमर’ झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांची राजकीय कारकीर्द त्यानंतर लगेचच संपली.

अर्थात हा जबाबदारीचा भाग झाला. पण संसदेच्या इतिहासात एका अर्थपूर्ण परंपरेचा पायंडा सोमनाथ चॅटर्जींनी घालून दिला, याचा अभ्यास व्हायलाच हवा. सोमनाथ चॅटर्जी लौकीकार्थानेच नव्हेत तर शब्दशः कम्युनिस्टांपासून  वेगळे ठरले.

 

somnath-chatarjee -inmarathi
youtube.com

२००८ साली भारताने अमेरिकेबरोबरच्या अणुकराराला मान्यता दिली म्हणून कम्युनिस्टांनी तत्कालीन मनमोहनसिंग सरकारचा पाठींबा काढून घेतला. सोमनाथदा भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. गेली पन्नास वर्षे भारतीय संसदीय पद्धतीत सत्ताधीश पक्षाचा सभागृह सदस्य अध्यक्ष होतो ही परंपरा आहे.

कम्युनिस्ट पक्ष सरकारातून बाहेर पडला. त्यामुळे ओघानेच ‘आता आपण विरोधात असल्यामुळे तुम्ही लोकसभा अध्यक्षपदी राहू नका’ असं फर्मान सोमनाथ चॅटर्जींना मिळालं.

परंतु त्याचवेळी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आणि त्यांना अध्यक्षपद न सोडण्यासाठी विनंती केली.

त्या विनंतीनंतर सोमनाथ चॅटर्जींना कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा अध्यक्षपद सोडण्यास फर्मावले. सर्व पक्षांच्या विनंतीचा मान राखत चॅटर्जींनी आपल्या पक्षाला नम्रपणे नकार कळवला. पक्षाने त्यांना निष्कासित करण्याची धमकी दिली. परंतु सोमानाथदा आपल्या म्हणण्यावर असून राहिले. चर्चेची त्यांची तयारी होती.

अश्याच वातावरणात कम्युनिस्टांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला.

सदर प्रस्तावात कम्युनिस्टांनी व्हीप जारी केला. म्हणजेच जर सरकारविरोधात कोणी पक्षाने सांगितल्याप्रमाणे मत दिलं नाही अथवा गैरहजर अथवा तटस्थ राहिले तर पक्षातर्फे कारवाई होणार हे निश्चित. सोमनाथदांसाठी अग्निपरीक्षा होती. एकीकडे होता त्यांचा जिवाभावाचा पक्ष, तर दुसरीकडे संसदीय पद्धतीची मान मर्यादा.

पदाचा लोभ, व्यक्तिगत फायदा वगैरे सर्व आरोप झेलून सोमनाथदा आपल्या म्हणण्यावर आणि पदावर ठाम राहिले.

आणि त्या अविश्वासदर्शक प्रस्तावावेळी त्यांनी तटस्थ अध्यक्षाची भूमिका बजावली म्हणजेच पर्यायाने स्वतःच्या पक्षाच्या विरोधात ते गेले. एकीकडे पक्षाकडून झालेल्या हकालपट्टीच दुःख आणि त्याचवेळी जबाबदारीला तोंड देणं, ही जीवघेणी कसरत त्यांनी केली.

===

लोकसभा टीव्हीच्या “अध्यक्ष अध्याय” या खास कार्यक्रमात प्रसारित झालेला सोमनाथ चटर्जी यांच्यावरचा एपिसोड पहा-

===

अर्थातच पुढे कसलीही चर्चा ना होता सोमनाथ चॅटर्जींसाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद झाले. आणि पुढे आता पक्षातून त्यांची हकालपट्टी झाल्यावर त्यांना अध्यक्षपदावर आणि त्याही पुढे सभागृहाचा सदस्य राहण्याचा अधिकार आहे का? याचा उहापोह अहंकारी कम्युनिस्टांनी सुरु केला.

परंतु काही महत्वाच्या प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने लोकसभा सभापतींची जबाबदारी आणि स्थान हे निव्वळ पक्षाच्या सदस्याच्या अतिशय पुढे असल्याचा निर्वाळा दिला होता. (उदा: किहोतो होलोहान वि. झाचीहुलु).

अनेक बाबींच्या अनुषंगाने लोकसभेची परंपरा, पक्षांतरबंदी कायदा, घटनेचं दहावं परिशिष्ट यांचा खल सुरु झाला. पुढे २००९ साली ती लोकसभा संपेपर्यंत सोमनाथ चॅटर्जी त्या पदावर राहिले.

अर्थातच त्यांची राजकीय कारकीर्द संपली. परंतू त्याहीनंतर त्यांनी आजीवन कम्युनिस्ट पक्षाला आपला मानला. इतर पक्षांतर्फे आलेले प्रस्ताव त्यांनी नाकारले. पुढे बंगालमध्ये २०१२ कम्युनिस्टांचा पराभव झाला. या आणि पुढच्या सर्व प्रकारच्या कम्युनिस्ट पतनाचं विश्लेषणपूर्ण भाकीत त्यांनी आधीच केलं होतं.

त्यावेळी त्रिपुरा, केरळ आणि अर्थातच बंगालमध्ये सत्तेवर असलेला आणि देशभरात दखलपात्र असलेला कम्युनिस्ट पक्ष केवळ केरळात टिकून आहे. बंगालात त्याला शहरी ब्राह्मण आणि व्यापाऱ्यांच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाने तिसऱ्या नंबरवर ढकलला आहे आणि त्रिपुरात तर पूर्ण पराभव केला आहे.

शारीरिक अवस्थेबरोबरच मानसिकदृष्ट्या खचवणारा हा घटनाक्रम पाहत एक काळाचा साक्षीदार आज निघून गेला. इनमराठी परिवारातर्फे हृदयापासून विनम्र आदरांजली.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 32 posts and counting.See all posts by sourabh

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?