आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
“साल्हेर” मराठ्यांनी मोठा पराक्रम गाजवलेला उत्तुंग किल्ला. मोकळ्या मैदानात समोरासमोर मुघल साम्राज्याविरुद्ध लढलेली पहिली लढाई. लढाई नव्हे तर युद्ध. महान पराक्रम, तुंबळ युद्ध, पराक्रमाची शिकस्त, अशी सगळी विशेषणे लावता येतील असे हे युध्द.
मराठ्यांनी ज्या लढाया केल्या त्या लढाया गनिमिकाव्याने केलेल्या लढाया होत्या. कारण त्या मुघल सैन्याबरोबर होत्या. मुघलांचा फौजफाटा प्रचंड, शस्त्रास्त्रे भरपूर, हत्ती,घोडे,उंट, पायदळ प्रचंड. अशा मुघलांशी लढायचं म्हणजे युक्तीनेच.
गनिमीकावा हे प्रबळ अस्त्र वापरून छत्रपती शिवरायांनी औरंगजेबासारख्या महाप्रचंड सम्राटाच्याही छातीत धडकी भरवणारे पराक्रम केले. त्यातला एक म्हणजे साल्हेरचे समोरासमोर युध्द.
सुरतेची लूट करून परत येताना १६७० साली गुजरात आणि महाराष्ट्रच्या सीमेवर उभा ठाकलेला हा साल्हेरचा उत्तुंग किल्ला ताब्यात घेतला.
सह्याद्रीचा कळसुबाई शिखराखालोखाल उत्तुंग असलेला हा एकमेव किल्ला.
नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण जवळचा हा किल्ला शिवरायांनी हेरून आपल्या ताब्यात घेतला.
ही बातमी औरंगजेबाला कळली, तो फार दु:खी झाला आणि सवयीप्रमाणे संतापला. त्याला ही बातमी स्वस्थ बसू देईना. त्याने ताबडतोब महाबतखानाला दक्षिण स्वारीवर पाठवला आणि इखलास खानाला साल्हेर किल्ल्याला वेढा द्यायच्या सूचना दिल्या. इखलास खानाने साल्हेरला वेढा दिला.
शिवाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पोहोचली. आणि त्यांनी प्रतापराव गुजर यांच्यावर साल्हेरची रक्षणाची जबाबदारी सोपवली.
तोपर्यंत महाबत खान परनेर जवळ पोचला. पण ऐशारामाची सवय लागलेल्या महाबत खानाने पारनेरलाच आपला मुक्काम ठेवला आणि श्रीमंत जमीनदारांना धमक्या देऊन रोज खान-पान, नाच-गाणी ह्या गोष्टींमध्ये मश्गुल राहिला.
ही बातमी कोणीतरी औरंगजेबापर्यंत जरा तिखटमीठ लावून पोहोचवली आणि वर सांगितले की, महाबत खान मराठ्यांचा दोस्त झाला. औरंगजेबाने संतापून महाबत खानाला परत बोलावून घेतले आणि त्याच्या जागी बहादूर कोकलताशला पाठवण्यासाठी आदेश दिले.
त्याला बहादूर कोका असे संबोधले जायचे. बहादूर कोका ने ताबडतोब ‘हुकमकी तामील’ करत औरंगजेबाला लिहून पाठवले की,
‘आपण काळजी करू नये. मी मराठी सैन्याकडून आपल्या राज्यावर चढाई होऊ देणार नाही.’
इकडे मराठी सैन्य इखलास खानावर तुटून पडले. त्याच्या नाकी नऊ आणले. इखलास खान पण पुरता जेरीस आला होता. वरध घाटा कडून प्रतापराव गुजर आपल्या सैन्यानिशी साल्हेरला पोहोचले आणि कोकणातून मोरोपांत पिंगळे देखील आपला फौज फाटा घेऊन साल्हेरला दाखल झाले.
खानाचा अफाट फौज फाटा होता पण किल्ल्यातल्या सैनिकांनीच त्याला जेरीस आणला होता.
कारण मराठ्यांच्या युद्धनीतीची त्याला जाण नसावी. प्रतापराव आणि मोरोपंतांना आता समोर समोर लढणे भाग होते.
पण त्यांनी दोघांनी दोन बाजूने सैन्याची रचना केली आणि दोन बाजूंनी खानाच्या सैन्यावर मारा सुरू केला. अचानक आलेली मराठ्यांची कुमक आणि दोन बाजूंनी होणारा हल्ला ह्या गोष्टीमुळे खान गडबडला आणि सैन्यावरचा त्याचा ताबा सुटला.
मराठी सरदारामध्ये एक मातब्बर शिलेदार होता त्याचं नाव सूर्याजी काकडे. याने तर मुघल सैनिकांची दाणादाण उडवली. ह्या शिलेदाराला पाहून बाकी मराठे पेटून उठले आणि प्रचंड युद्धाला सुरुवात झाली. मराठा सैन्याचा एवढा मोठा दबाव होता की शत्रू सैन्याची पळापळ झाली.
आसमंतात प्रचंड धूळ उडून आसमंत पूर्ण धुळीच्या लोटाने भरून गेला. सगळीकडे धूळ च धूळ आणि हे महायुद्ध चालूच राहिले..
अशा धुराळ्यात काहीही दिसत नसतानाही शत्रूला कापून काढण्यात मावळे पटाईत होते. शत्रूला मात्र जवळ कोण आहे ते पण ओळखू येत नव्हते.
तुंबळ युद्ध झालं. चार पाच तास चालू होतं हे अफाट वादळ. शत्रूची पुरती दाणादाण उडवली होती मावळ्यांनी.
पण ह्यात दोन्ही कडचे असंख्य सैनिक मारले गेले. रक्ताचे पाट वाहायला लागले. हाडामसाचा खच पडला , घोडे, हत्ती भयभीत झाले आणि अडखळायला लागले. जनावरे तर किती मारली गेली ह्याची गणतीच नव्हती. शत्रू सैन्य सैरावैरा वाट फुटेल तिकडे पळून गेलं.
खानाचं सैन्य एक लाखाच्या वर होते आणि मराठी सैन्य त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी.
खान झाला जबर जखमी, आणि कसाबसा पळाला, शत्रू सैन्यातला अमरसिंग आणि त्याचे अनेक सहकारी मारले गेले, मुहकमसिंग जखमी झाला. पण नि:शस्त्र शत्रूवर सुद्धा हत्यार उचलायचे नाही हा महाराजांचा शिरस्ता, म्हणून वाचला. सगळं शत्रू सैन्य रिकाम्या हाताने जीव वाचवत लंगडत खुरडत पळून गेलं. दुप्पट असलेल्या सैन्यावर दहशत बसली.
हत्ती,घोडे, उंट, तसेच राहिले मराठ्यांच्या दिमतीला, सुमारे सव्वाशे हत्ती मराठी सैन्याला मिळाले, घोडे सहा हजार, उंटही तेवढेच आणि हे सगळे तिथेच सोडून पळाले शत्रू सैन्य. सोने, चांदी, कापडचोपड तर मोज माप करू शकणार नाही एवढं सगळं शत्रूने मागे सोडून दिले.
मराठ्यांनी ” जिंकली ” ही लढाई. कित्येक शिलेदार, भालदार, चोपदार आणि मावळे वीरगतीला प्राप्त झाले. पांगारे गावचा मातब्बर शिलेदार ‘सूर्याजी काकडे’ ही धारातीर्थी पडला.
शिवाजी महाराजांना ही बातमी कळली. आपल्या साथीदारांच्या विरहाने अपार दुःख झाले महाराजांना.
इकडे मोरोपंत आणि प्रतापराव आपल्या मातब्बर सारदारांबरोबर कोकणात उतरले.
शौर्याची पराकाष्ठा झाली. “लढाई जिंकली”. बहादूर कोकलताश तिकडून साल्हेर जवळ पोचताच त्याला ही बातमी कळली. त्याने प्रतापरावांच्या सैन्याचा पाठलाग केला. पण त्यात तो अपयशी ठरला. महाराजांना माहिती होतं बहादूरची मजल कुठपर्यंत? त्यामुळे काळजीचं करण नव्हतं.
असे महाराजांचे निष्ठावान मावळे. सुरुवातीला गनिमी काव्याने लढाया करून मोगलांना सळो की पळो करून सोडलं, कारण मोजकेच मावळे आणि शत्रू महाप्रचंड. शस्त्रास्त्रे कमी, मग टिकाव कसा लागायचा मोगल सैन्यापुढे?
‘कोंडाजी फर्जंद’ त्याने पन्हाळा ३ तासात सर केला साठ सत्तर मावळ्यांना घेऊन. ‘तानाजी मालुसरे’ सिंहगडाचा सिंह. जीवजी, येसाजी, बाजी , नेताजी, एकापेक्षा एक.
एक ना हजार मावळ्यांचे नाव घेताच सळसळतं ते ‘रक्त’. हर हर महादेव..!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.