आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक : नचिकेत शिरुडे
===
आज सकाळी महाराष्ट्र ATS च्या पथकाने नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीकडून ८ देशी बॉम्ब आणि अजून काही विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्या व्यक्तीचं नाव वैभव राऊत असून तो सनातन संस्थेचा साधक असल्याची पुष्टी झाली आहे. ही बातमी वाचल्यावर भूतकाळात घडलेल्या अनेक घटना डोळ्यासमोरून गेल्या आहेत.
२० ऑगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॉक ला निघालेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची पुण्यातील प्रभात पुलावर दोन दुचाकीस्वारांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नरेंद्र दाभोळकर हे त्यावेळी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध
नाव होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन समाजातल्या अंधश्रद्धा रूढी परंपरांवर परखड टीका केली होती. तेथे लोकांचा विरोध पत्करून अघोरी प्रकार थांबवले होते.
लोकांना बुवा बाजी आणि गंडातंत्राचा मागे कुठला चमत्कार नसून त्याचा मागे विज्ञान आहे, हे लोकांपर्यंत पोहचवत होते.
हिंदु धर्मात सुधारणावादी भुमिका घेणारे विवेकी विचारांचे प्रणेते डॉ नरेंद्र दाभोळकर होते. या कामात डॉ नरेंद्र दाभोळकरांना कडवा विरोध करणाऱ्या काही प्रमुख संघटनापैकी एक संघटना होती “सनातन संस्था”. पुढे दाभोळकरांच्या हत्येचा तपास हाती घेण्यात आला आणि सनातन संस्थेशी संबंधित अनेकांची धरपकड ह्या प्रकरणात करण्यात आली.
सनातन संस्थेने मात्र त्यांची जबाबदारी कधीच घेतली नाही आणि पुराव्या अभावी पोलिसांना पुढील तपास करणं शक्य झालं नाही.
सनातन संस्थेची स्थापना १९९९ साली जयंत आठवले यांनी केली. हिंदुराष्ट्राची स्थापना करणं हे ध्येय सनातन संस्थेचं आहे. हिंदू धर्मासाठी जगायला आणि मरायला तयार असणाऱ्या तरुणांची फौज सनातन संस्थेने उभी केली आहे.
आज सनातनचे महाराष्ट्रातील विविध भागात तसेच गोव्यात आश्रम आहे. तिथे या तरुणांना प्रशिक्षण दिले जाते.
या तरुणांना “साधक” म्हटले जाते. हे साधक कट्टर धर्माभिमानी असतात व हिंदू राष्ट्र स्थापनेच्या विचाराने इतके भावलेले असतात की त्यांना चांगल्या वाईटाचा फरक कळत नाही.
सनातन संस्थेचे आद्य गुरु जयंत आठवले यांनी काही पुस्तकं लिहली आहेत ज्यात त्यांनी उघडपणे चातुवर्णाचे समर्थन केले आहे. इतकंच नाही त्यांनी त्या पुस्तकात हिंदू राष्ट्र निर्माण झाल्यावर देशाचा कारभार ब्राम्हण बघेल, क्षत्रिय हिंदुराष्ट्रच रक्षण करेल , वैश्य व्यवसाय आणि धंदा करतील व शूद्र सेवा करतील. मनुस्मृतीच पुनरुज्जीवन करण्यात यावं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
===
हे पण वाचा :
इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १
कट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग २
===
हिंदु धर्मासाठी लढायला प्रत्येक हिंदूने पुढे यावं आणि सर्व शत्रूंचा नायनाट करून धर्माची पुनर्स्थापना करत अखंड हिंदुराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी व मनुस्मृतीचं राज्य आणावं अशी मागणी देखील सनातन संस्थेकडून करण्यात आली आहे.
यासाठी लोकांमध्ये जनजागृतीच काम सनातन संस्थेचे साधक करत असतात.
सनातन संस्थे प्रमाणे आज देशात अनेक हिंदुत्ववादी संघटना कार्यरत आहेत, ज्या हिंदू धर्म जनजागृतीचे कार्य करत आहेत पण सनातन आणि त्यांच्यात एक फरक प्रकर्षाने जाणवतो तो फरक म्हणजे कार्यपद्धतीचा व विखारतेचा, सनातन संस्थेच्या तुलनेत इतर संघटना बऱ्याच अंशी मवाळ आहे.
सण २००७ साली ठाणे , पनवेल आणि वाशी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात आणि २००९ साली गोवा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात देखील सनातनचा साधकांना अटक करण्यात आली आहे. तसेच दाभोळकर, पानसरे आणि कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी यांचा हत्येमागे देखील सनातनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
परंतु सबळ पुराव्या अभावी अजूनही कुठल्याच प्रकरणात सनातन संस्थेवर आरोप निश्चिती होऊ शकलेली नाही.
नेहमी प्रमाणे कुठलंही प्रकरण उघडकीस आल्यावर सनातन या प्रकरणात व पकडल्या गेलेल्या व्यक्तीशी आमचा काहीच संबंध नाही अशी बतावणी करत हात झटकले आहेत. पण साधकांच्या घरी मिळालेल्या पुस्तकातून आणि इतर सामग्रीतुन सनातन संस्थेशी त्या व्यक्तीचा संबंध असावा असे स्पष्ट होत असते.
सनातन संस्थेचे साधक सोशल मीडियाचा वापर देखील हिंदू धर्म जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर करत असतात. विद्वेष पसरवणाऱ्या पोस्ट करणे, सामाजिक स्थिती खराब करणे, नको त्या गोष्टीला धर्माचा अँगल देऊन विरोध करणे, पुरोगामी चळवळीला विरोध करणे अशे प्रकार सनातन वर्षानुवर्षे करत आली आहे.
ज्या अखंड हिंदू राष्ट्राची स्थापना सनातन ला करायची आहे त्या “हिंदू राष्ट्र” संकल्पनेचे आद्य प्रवर्तक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या अगदी टोकाच्या विरोधातील भूमिका सनातन संस्था मांडत आली आहे.
सावरकरांनी सांगितलेल्या विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाच्या विपरीत असं कर्मठ विचारांचं हिंदुत्व सनातन ने मांडलं आहे. त्या हिंदुत्वाच्या नावाखाली सामान्य जनतेच्या भोळेपणाचा फायदा सनातन संस्था उचलत आली आहे.
प्रत्येक विवेकवादी विचार हा हिंदू धर्मविरोधात आहे असं सनातन जाहीर पणे लोकांना सांगत असते. तरुणांनी सर्व सोडून हिंदू राष्ट्र स्थापनेच कार्य हाती घ्यावं व त्या कार्यात आडव्या येणाऱ्या प्रत्येकाचा काटा काढावा अशी विखारी विचारसरणी सनातन संस्था तरुणांच्या मनात पेरत आहेत. आपल्या साईट वरून अनेक या अंधश्रद्धा, कर्मकांड , बुवाबाजीला सनातन समर्थन देत असते.
महत्वाचं म्हणजे या अनिष्ट प्रथांच्या मागचं अतर्क्य विज्ञान देखील मांडत असते. अनेक सुशिक्षित तरुण देखील मूर्ख प्रचाराला बळी पडून सनातनच्या नादाला लागतात.
लोकांना त्यांचा समस्यांवर शास्त्रीय उपाय सांगण्याचा नावाखाली भुताटकी, मंत्रविज्ञान, कर्मकांड, होमहवन सारख्या गोष्टींना प्रोत्साहन सनातन संस्था देत असते. त्याचा विरोधात लिहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धर्म द्रोही घोषित करत असते. त्यांचा विरोधात पत्रकं वाटत असते.
लोकांनी पूजेला ब्राम्हणालाच बोलवावे, ग्रहणाच्या वेळी अमुक करावे, अमावस्येला तमुक करू नये, इत्यादी अंधश्रद्धा समाजात पेरण्याचे उद्योग सनातन करत असते.
आजच्या काळात जर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सनातन संस्थेने हिंदुत्वाच्या नावाखाली मांडलेला बाजार बघितला असता तर त्यांनी स्वतः हिंदुत्व विरोधी लिखाण केलं असतं.
इतका पराकोटीचा फरक त्यात आहे. धर्म चिकित्सा नाकारणारी, पुरोगामी विचार नाकारणारी, सुधारणा नाकारणारी, धर्माचा आडोसा घेऊन विखार पसरवणाऱ्या सनातन संस्थेची तुलना एखाद्या जहाल कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी करण्याजोगी आहे. बॉम्बस्फोट घडवणे, विचारवंतांच्या हत्या करणे हे हिंदू धर्माचे संस्कार नाहीत.
प्राचीन काळापासून हजारो आक्रमणं हिंदू धर्म झेलत आला आहे. तरीही आज टिकून आहे कारण वेळोवेळी हिंदू धर्माची चिकित्सा झाली आहे. बौद्ध, जैन, चार्वाक, वारकरी, महानुभाव, वीरशैव यांच्यासारख्या सुधारणा चळवळीमुळे हिंदू धर्म टिकून आहे.
काळानुरूप बदल हे हिंदू धर्माचं मूलतत्त्व आहे. ज्याचा सनातनच्या मूलतत्वाशी काहीही संबंध नाही.
===
हे पण वाचा :
शिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)
शिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )
“जय भीम” हा नारा इस्लाम विरोधी आहे : इस्लामची अधिकृत भूमिका
===
आज ह्या संघटनेने प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष पणे हिंदू धर्माच्या नावाखाली जो धंदा चालवला आहे, जे विष पेरण चालवलं आहे, जो कट्टरपंथी विचार पसरवणं चालवलं आहे, त्याला कडाडून विरोध करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. इतर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील सनातनला विरोध केला पाहिजे.
जर सनातन कडे असंच दुर्लक्ष करत राहाल तर उद्या सनातन हिंदुत्वाला जिहादच्या पारड्यात नेऊन बसवेल. त्यामुळे सामायिक प्रयत्नांनी आपण हा विखार नष्ट केला पाहिजे.
व्या शतकात आपल्याला विज्ञाननिष्ठ , बुद्धिप्रामण्यवादी, सांस्कृतिक दृष्ट्या एकसंध , प्रगतिशील हिंदू समाजाचे चित्र जगासमोर उभे करायचे आहे की हिंदु धर्माला देखील इस्लामिक जिहाद्यांचा पंगतीत बसवून जगभर आपल्याप्रति नकारात्मक भाव निर्माण करून घ्यायचा आहे?
हिंदू धर्म हा जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य बाळगतो पण त्यासाठी आधी जगाबरोबर चालणे गरजेचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.