Site icon InMarathi

तिरंगा “उरी” कवटाळलेला, साऱ्या भारतवासीयांना अंतर्मुख करणारा क्षण

Major Rane Wife InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका : प्रचिती कुलकर्णी 

===

आपल्या काळजाच्या तुकड्याचे शेवटचे क्षणही नशिबात असू नयेत हे किती दुर्दैव ना? नजरेआड असलेल्या लेकराची किंवा नवऱ्याची खुशाली फक्त त्याने सांगितल्यावरच कळते. त्यातच समाधान मानून हे लोक जगत असतात.

कोणाला आवडतं हो महिनोन्महिने आपल्या जिवलग माणसापासून दूर राहायला?

पण आमची वेडी माणसंच अशी की यांचे हट्टच आगळे आहेत. काय तर म्हणे देशासाठी आयुष्य पणाला लावायचं.

अरे वेड्या आम्ही पण आहोत आयुष्यात…! काही भान असावं ना…! पण नाही…!

लहानपणापासून खूळ डोक्यात घेऊन तयारी करतात. मस्करी नाही हो. खूपच तयारी असावी लागते, विशेषतः मनाची… फक्त त्यांच्याच नाही तर आई-बहिणीच्या देखील.

काय देतो हो देश तुम्हाला? आज एखाद्या खुशालचेंडूला विचारलं तर सांगतील काय दिलं नाही ते.. मग विचारा तुम्ही काय दिलं देशाला ? उत्तर असेल फक्त “शांतता..”

 

 

पण तेच यांच्या माउलींना विचारा तुम्ही देशाला काय दिलंत उत्तर असेल “मुलगा/नवरा/भाऊ” आणि मग विचारा त्या बदल्यात देशाने काय दिलं तुम्हाला उत्तर असेल “सन्मान”.

एक पोटचा गोळा, काळजाचा तुकडा त्याचाच हट्टापायी आणि एका सन्मानाच्या बदल्यात द्यायचं म्हणजे कर्णाचं दातृत्व असावं लागतं. त्याने नाही का तत्वांसाठी कवचकुंडले दान केली. माहित होतं, आपला नाश आता अटळ आहे, पण धर्म महत्वाचा.

काहींसाठी तो स्वार्थात आहे, काहींसाठी धर्म पाळण्यात, तर काहींसाठी तो ‘देशसेवेत’.

भौतिक सुख सर्वांचाच अधिकार आहे.. सन्यास घेणे वेगैरे सगळ्यांना काही जमत नाही बरं!

 

 

पण या सगळ्यावर आपल्याच हाताने आचमन सोडून पुन्हा टोपी डोक्यावर नीट बसवून तिरक्या नजरेने आरशातून आपल्या बायकोकडे पाहणारा खट्याळ पण एकनिष्ठ नवरा आणि जीव डोळ्यात आणून नजरेनेच काजळाची तीट लावणारी प्रेमळ बायको.

वर्दीवर थरथरत हात फिरवणारी आई आणि नजर उतरवून बोटे मोडणारी बहीण! माहित नाही किती मणांचा डोंगर काळजावर ठेवत असतील.

एकांतात बायकोला किती वचने दिली असतील त्यांनी पण एक मात्र निक्षून सांगितलं असेल की तुझ्याशी लग्न करण्याआधी भारतमातेला प्राणांचे वचन देऊन आलोय मी ‘आधी ती मग तू’…

तिचं मन मोडलं असेल का हो?

 

 

२ दिवस न बोलणं-रुसवा धरणं तिच्या हिशोबातदेखील नसतं कारण कधी नवरा जायला निघेल माहित नाही, पुन्हा भेटणार केव्हा.. तिच्या हातचं रुचकर जेवणार केव्हा.. लेकराचं कौतुक करणार केव्हा.. त्या २ महिन्यांच्या सुट्टीत १२ महिन्याचं सुख उपभोगून घेत असतील हे.

या वाघांची वाघीण सुद्धा मग पुन्हा कामाला लागते…एकटीने संसार रेटण्याचं काम!

असं म्हणतात की यांची बंदूक म्हणजे बायकोची सवत असते पण इतक्या कडू सवतीवर पण अखंड प्रेम करणारी बायको, नवरा सुखरूप राहावा म्हणून वडाला ११ फेऱ्या जास्ती मारत असावी.

एखादी कडक उपवास केलेल्या करवाचौथला रडून उपाशीच झोपत असावी. पण राग नाही धरणार बरं…!

कारण तिला माहित असतं आमचे ‘हे’ स्पेशल आहेत. त्या वीराची मी वीरांगना आहे हेच शब्द यांचं दुःख हलके करत असणार.

 

 

“माझ्या लाडूला बेसनाचे लाडू खूप आवडतात हो, आज खायला असता तर..”

“अगं, येतोय  ४ की महिन्यांनी…”

“ही मोरपंखी साडी त्यांना फार आवडते, कतरीना झक मारते म्हणतात माझ्यापुढे, आले की नसेन आता”

“बाबा आले की मला मोठ्ठ विमान घेऊन देणार आहेत बोलले, माझा डान्स पहायला आले नव्हते ना”

असे संवाद घरी नक्कीच रंगत असतील नाही का…?

पण यांना काय माहिती हो बाबाच्याच कौतुक सोहळ्याला जावं लागेल आता. तेही राष्ट्रपती समोर.

 

hindustantimes.com

 

आम्ही सगळे स्वार्थासाठी कायदा हातात घेत असताना, तरुण लोक पावसाची मजा लुटत असताना, बाया बापड्या सण-वारांची तयारी करत असताना, ऐन श्रावण फुलत असताना यांच्या आयुष्यात मात्र ग्रीष्म ऋतू ठाण मांडतोय.

पण नाही हो, मानसिकताच वेगळी असते यांची. माहित नाही असं दगडाचं काळीज मागायला कोणत्या देवाकडे जात असावेत?

बाकीची सुखी कुटुंब पाहून यांना हेवा वाटत असावा…आणि आजची आमची हुशार पण वाया गेलेली कार्टी पाहून मन तुटत असावं.

 

दारू पिऊन दंगा घालणारे, रस्त्यावर वेगात गाड्या पिटाळणारे, मुलींची छेड काढणारे कुठे आणि ऐन विशीत NDA पास करणारे, सगळीकडे अव्वल असणारे, देशसेवेचे व्रत घेणारे, अखंड देशसेवा करणारे प्रसंगी उरावर गोळ्या झेलून हुतात्मा होणारे ते वीर कुठे.

छाती अभिमानाने फुलात असेल ना.

देशसेवा शिकवता येत नाही. ती तर रक्तातच असावी लागते, आर्मीत ती शिकवतही नाहीत. आर्मी यांना शिस्त लावते. देशासाठी जगायचं कसं हे शिकवते.

बाकीच्या टोळक्यांनी या शाहिद वीरांपासून प्रेरणा किती घेतली असेल माहित नाही. पण ६ वर्षाच्या करिअरमध्ये देशाला कौतुक करण्यास भाग पाडणारा, सर्व भारतीयांना अभिमान वाटावे असे वागणारा आणि भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता गोळ्या झेलणारा हाच तो खरा “भारतीय” इतके ध्यानात असू द्यावे.

 

 

 

आम्हाला कुठे सांगता अहो, आम्ही पण केलंच की योगदान. स्वच्छ भारत अभियानात घरापुढचा रस्ता स्वच्छ केलाय आम्ही. जिथे मती स्वच्छ राहत नाही तिथे यापेक्षा जास्ती अपेक्षा ती काय ठेवणार.

असाच एक दिवस येतो ध्यानी मनी नसताना. आणि ती दुर्दैवी बातमी येते. आपला माणूस शाहिद झाल्याची. आतडी पिळवटली जात असतील न. कोणाला जबाबदार धरायचं यासाठी? शत्रूला? देशाला? काळाला? की त्याच्या त्या देशसेवेच्या हट्टाला?

दिलेली सगळी वचने झूठ ठरवून त्या एका शपथेसाठी तो काळाच्या रथावर आरूढ होऊन मानाने निघालेला असतो..

किती निशब्द प्रश्न, काय विचार केला असेल, काय सांगायचं असेल, माझी आठवण आली असेल का? बाळाच्या विचाराने पाणी आलं असेल का डोळ्यात? कोणी जवळ असेल का तेव्हा?

काय मिळत असेल नवऱ्याकडून शेवटची भेट? तेही तो हेच देतो जे त्याला जगात सगळ्यात प्यारं असेल..”तिरंगा”

 

indiatimes.com

 

तिरंग्याला हृदयाशी कवटाळले तेव्हा तिला त्याला पाहण्याचे धैर्य मिळाले असावे. याच तिरंग्याचा मान राखण्यासाठी युद्धभूमी वर पराक्रम गाजवला.

ज्याला हृदयाशी कवटाळून मूक टाहो फोडत असेल न ती. आसवं जागेवरच गोठली असतील, गेलाय म्हणून रडू की शाहिद झाल्याचा अभिमान उराशी बाळगू यांच्यातच मन हिंदोळे घेत असेल. शेवटचं पाहणंही दुरूनच..

“अब तुम्हारे हवाले वतन साथीयो” असं म्हणत तो वेडा आताही तिरंगा तिच्या हातात देऊन गेला..

“माझ्यासाठी आसवे गाळू नकोस, माझ्या पिल्लाला सुद्धा हेच व्रत दे.. माझी सेवा अखंड चालू राहूदे.. मी भेटेनच तुला. फडकावलेल्या झेंड्यातुन पडणाऱ्या फुलात..”

आता त्या अंतयात्रेत उधळली जाणारी फुले आमच्या या ‘डिजिटल’ पिढीच्या डोक्यावर पडली तर समजेल का हो त्यांच्या बलिदानाचे महत्व? त्या फुलाच्या सुगंधातून भिनेल का देशसेवा अंगात?

आमची चुकलेली पिढी, लोकांची बोलणी, अर्ध्यावरती डाव मोडलेला संसार या सगळ्यांना पाठीशी घालून ती वीरांगना सज्ज होते अजून एक सुपुत्र देशसेवेला वाहण्यासाठी.. काळजाचा आणखी एक तुकडा पणाला लावण्यासाठी…

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version