Site icon InMarathi

वाढदिवसाला केक कापताना “मेणबत्ती” विझवण्यामागे आहे ही कथा…

Girl blowing candle Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

वाढदिवस सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. तो जसजसा जवळ येतो तसतसे वेध लागल्या सारखी परिस्थिती होते. वाढदिवस म्हणजे सगळ्यात जास्त मज्जा करण्याचा दिवस. शॉपिंग, पार्टी, भेटवस्तू आणि आपल्याशी एक दिवस का होईना पण गोडचं बोलणारी माणसे.

ऑफिसात घरात मित्रपरिवारात सगळीकडेच कसं गुडी गुडी वातावरण.

 

 

लहान मुलांची खास चंगळ. आज केलेल्या सगळ्या चूका माफ, खायला आवडते पदार्थ, आपल्या नावाचा सुंदर केक सगळ्यांना सोबत घेऊन खायचा, सगळे आज प्रेमानेच बोलणार,

सगळ्या मित्र परिवाराला वाढदिवस असल्याचे कळल्यावर अतिशय उत्तम वागणूक, जो तो प्रेमाने बोलणार, शुभेच्छा देणार, एकूणच आनंदाचा दिवस.

असा हा आनंदाचा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने लोक साजरा करतात..

लहानग्यांचा जन्मदिन अतिशय उत्साहाने मोठ्या हॉलमध्ये सजावट करून, दिव्यांची रोषणाई करून सगळ्या नात्यातल्या, मित्रपरिवारातल्या लोकांना आमंत्रण देऊन धूमधडाक्यात साजरा केला जातो.

 

कोणी सहलीतून वाढदिवसाची मजा अनुभवतात. जेष्ठ व्यक्तींचा वाढदिवस अन्नदान करून साजरा होतो. पुढाऱ्यांचे वाढदिवस रक्तदान शिबिर भरवून, गरीबांना कपडे वाटप करून साजरा केला जातो. मोठाले होर्डिंग्ज लावून शुभेच्छा देणाऱ्यांची जंत्री देखील असतेच.

कोणाला अंध-अपंग किंवा मूक- बधिर, अनाथ मुलांबरोबर साजरा करताना त्यांचा आनंद बघूनच वाढदिवसाचे चीझ झाल्यासारखे वाटते. आनंद देणं,आनंद घेणं ह्या हेतूने साजरा केला जातो वाढदिवस.

कशाही प्रकारे असो पण हा आनंदाचा दिवस साजरा करताना केक वर लावलेल्या मेणबत्या कधी एकदा विझवून केक कापतो ह्याची प्रत्त्येकालाच उत्सुकता असते हे वेगळ सांगायला नको.

 

 

आणि तो क्षण येतो, एका दमात सगळ्या मेणबत्या विझवून झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट… आणि “हॅपी बर्थ डे टू यू”… गाणं म्हणत आप्तेष्ट आणि मित्र शुभेच्छांचा वर्षाव करतात… अशी धमाल असतेच.

ही झाली आहे वाढदिवस साजरा करायची परंपरा, हे वाढदिवस अशापद्धतीने साजरा करण्याचे प्रमाण आता भारतामध्येपण खूप मोठे आहे. पूर्वी आपल्याकडे गोड पदार्थ बनवून आणि दिव्याने औक्षण करून वाढदिवस साजरा होत असे. केक आणि त्यावरील मेणबत्त्या ही पाश्चात्य देशांचे देणे आहे.

अशा छान आनंदोत्सवात मेणबत्या विझवायच्या का? ह्याच्या बऱ्याच गंमतीदार कथा आहेत. वाचा तर मग पुढे , काय आहे मेणबत्या विझवण्या मागच्या प्रथेचे कारण…

 

readers digest

 

वाढदिवस अशापद्धतीने साजरा करण्याची पद्धत प्राचीन काळातल्या ग्रीक लोकांची आहे.

केक वर मेणबत्त्या लावण्या पूर्वी शांतपणे आपल्या मनामध्ये जी गोष्ट हवी असेल ती प्राप्त होण्याची इच्छा मनात जागृत करायची आणि मग मेणबत्त्या लावून एकदाच फुंकून त्या सगळ्या मेणबत्त्या एक दमात विझवायच्या..

जर सगळ्याच्या सगळ्या मेणबत्त्या एकदाच फुंकून विझल्या तर मनात जागृत केलेली इच्छा येणाऱ्या वर्षात पूर्ण होईल असं समजलं जायचं.

मेणबत्त्या विझल्या नंतर जो धूर निघतो त्याबरोबर मनातल्या इच्छा पण देवापर्यंत पोचतात असा समज रूढ झाला.

अशी मनामध्ये जागृत केलेली इच्छा मेणबत्त्या विझवून ही पूर्ण होऊ शकते हे एका हॉलिवूड चित्रपटातही कथानकाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न झाला.

एका सतत खोटे बोलून काम करणाऱ्या वकिलाच्या मुलाने वाढदिवसाच्या दिवशी अशी इच्छा प्रकट केली की, ‘माझ्या वडिलांना खोटे बोलण्यापासून देवाने परावृत्त करावे..!’ आणि ती इच्छा देव मान्य करतो.

 

getty images

मुलाचे वडील वकिली करताना सतत खोट्या गोष्टी खऱ्या करून कोर्टात जिंकायचे, पण देवाने त्याच्या मुलाच्या इच्छेला होकार दिल्याने वडील कोर्टात सतत खरे बोलू लागले आणि हारत गेले.

वडिलांनी मुलाला विनंती केली की तू देवाजवळ प्रकट केलेली माझ्या खरे बोलण्याबद्दलची इच्छा परत घे. कारण मी सतत कोर्टात हारत चाललो आहे. पण पुढे तो खरे बोलून कोर्टात केस ही जिंकतो आणि मुलाला हवा तितका वेळ देऊन त्याचं मन ही जिंकतो.

अशा गमतीदार पण मनावर कोरल्या जाणाऱ्या कथांनी मानवी मनावर छाप पडल्यामुळे पुढे त्या परंपराच झाल्या.

 

wonderopolis.org

 

जर्मन लोकांची पण मेणबत्ती लावून ती फुंकून विझवायची परंपरा आहे , पण त्यामागचा उददेश वेगळाच आहे. जर्मन लोक केक च्या मधोमध मोठ्ठी मेणबत्ती लावतात आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशाप्रमाणे त्या व्यक्तीचे आयुष्य प्रकाशमान व्हावे अशी भावना असे, चंद्र देवतेचा सन्मान म्हणून मेणबत्त्या लावल्या जायच्या.

त्यातल्या काही हुशार लोकांनी ती मेणबत्ती विझवायची प्रथा पाडली. ह्या पद्धतीमध्ये निघणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या राक्षसी वृत्ती, पिशाच्च लांब पळून जातात असा समज रूढ करून तीच परंपरा चालू ठेवली…

त्यात काही जादूगारही तयार झाले, विझलेल्या मेणबत्तीच्या वाती थोडावेळ बारीक जळतच असतात त्यातून धूर सुदधा निघत असतो, त्यावर मॅग्नेशिअमचा जरा जरी संबंध आला तर मेणबत्त्या पुन्हा पेटल्या जायच्या आणि सगळे उपस्थित पाहुणे चकित होऊन जायचे.

 

 

पण मेणबत्त्या विझवून आनंद कसा मिळतो ह्याचे गूढ उलगडत नाही.

निखळ आनंद हा मेणबत्त्या विझवून मिळेल का नाही हे आपल्याला कळत नाही पण मेणबत्त्या केक वर लावून विझवल्या जातात आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. का? तर परंपरा म्हणून….!!

ह्या परंपरेला अनुसरून एका मोठ्ठया हौसिंग सोसायटी मधल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या सोसायटी च्या वॉचमनचाही वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला.

तो वॉचमन त्या आनंद सोहळ्याने भारावून गेला. केक कापून त्यानेही मेणबत्त्या विझवल्या आणि गम्मत म्हणून ‘विश’ ही मागितलं. असा वाढदिवस कधी त्याने साजरा केलाच नव्हता.. त्यालाही किती बरं वाटलं असणार.

तर अशा आहेत वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांच्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती.

तो आपण कसा साजरा करायचा हा मिळणाऱ्या निखळ आनंदावर अवलंबून आहे आणि कोणाला कशातून आनंद मिळतो हे ज्याचं त्यालाच कळणार.. तुम्हीही अशी मजा लुटा, न जाणो तुमची ‘विश’ किंवा इच्छा सुद्धा कधीतरी पूर्ण होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version