देशासाठी हुतात्मा झालेले हे ६ “मराठी” जवान; छ. शिवरायांचे खरे शिलेदार आहेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आहुती प्राणांची भलेही आमुची जावो,
ध्वज स्वराज्याचा सदैव फडकत राहो…!
शिवकालीन इतिहास ह्याच स्वराज्याच्या ध्वजासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्यां शूरांची कहाणी सांगतो.. मराठ्यांनी शत्रूशी लढताना तेव्हाही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि आजही मराठा रेजिमेंटचे वीर जवान भारतीय सैन्यातर्फे शौर्याची शर्थ करताना दिसतील.
आपल्या भारतीय सैन्यात एक विभाग आहे, जिथे महाराष्ट्रातील लढवय्ये भरती होतात. त्या विभागाचं नाव आहे ‘मराठा लाईट इंफॅन्टरी.
जसे बाकीचे रेजिमेंट असतात पंजाब, गोरखा, बिहार वगैरे तशीच मराठा रेजिमेंट.
मराठा लाईट इंफॅन्टरीची स्थापना १७६८ साली झाली. ‘बोल शिवाजी महाराज की जय, हर हर हर महादेव..!’ अशी आरोळी ठोकून शत्रूंना रणांगणात धूळ चारणारी अशी ही खूप जुनी रेजिमेंट आहे.
ह्या रेजिमेंट चे प्रेरणास्थान अर्थातच मराठा साम्राज्याचे दैवत छत्रपति शिवाजी महाराज आहेत. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून इटली विरुद्ध लढताना, मराठा रेजिमेंट हारायला आली होती.
अशातच कॅप्टन बुमगार्ट नावाच्या रेजिमेंटच्या प्रतिनिधी ने सगळ्या हरायला आलेल्या सैनिकांना शिवाजी महाराजांची आठवण करून देत नवीन प्रेरणा दिली आणि असे हारायला आलेले युद्ध मराठा रेजिमेंटनी जिंकले..!
इतकेच नाही तर अजूनही कित्येक लढायांमध्ये मराठा रेजिमेंट अग्रेसर राहिली आहे. मग ती दुसऱ्या विश्वायुद्धतील कामगिरी असो किंवा १९६१ साली पोर्तुगीजांकडून दिव दमण आणि गोवा हाशील करण्याची लढाई असो.
शिवाजी महाराजांचे मावळे आजही पराक्रमाची परिसीमा गाठून अजूनही शत्रूला नेस्तनाबूत करत असतात.
भारताला शत्रूंची काहीच कमी नाही. LOC वर म्हणजेच भारताच्या सीमारेषांवर जवानांना कायमच तैनात राहावे लागते.
पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर कडा पहारा ठेवावा लागतो. काश्मीर प्रश्न, नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद्यांची घुसखोरी अशा अनेक देशांतर्गत लढायांना ही जवानांना तोंड द्यावे लागते.
घरदार, आई वडील, बायको मुले मागे सोडून देशरक्षण हे आद्य कर्तव्य मानून, दिवस-रात्र, उन्हा-पावसात, थंडी-वाऱ्यात सतत डोळ्यात तेल घालून हे जवान आपल्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असतात.
अशाच लढवय्या मराठा रेजिमेंट मधील अलीकडच्या काळातील काही शूर शहीद जवानांबद्दल जाणून घेऊयात.
कर्नल संतोष महाडिक :
सातारा जिल्ह्यात सर्वसाधारण घरात जन्मलेले आणि लहान पणापासूनच भारतीय सैन्यात जाण्याची स्वप्न पाहणारे कर्नल संतोष महाडिक.
१७ नोव्हेम्बर २०१५ रोजी जम्मू काश्मीर मधील कुपवाडा भागात दहशतवाद्यांचा बंदुकीने जोरदार सामना करताना कर्नल महाडिक हुतात्मा झाले.
उत्कृष्ट खेळपटू असलेले कर्नल महाडिक शत्रूसमोर लढताना कायम सहकाऱ्यांच्या पुढे असायचे. बायको आणि २ मुले मागे सोडून संतोष शत्रूला नामोहरम करून वीरगतीला प्राप्त झाले.
मेजर प्रफुल्ल मोहरकर:
भंडारा जिल्ह्यातले मेजर प्रफुल्ल मोहरकर जम्मू काश्मीर च्या पाकिस्तानी सीमारेषेवर लढताना धारातीर्थी पडले.
पाकिस्तानी सैन्यातील काही सैनिकांनी घुसखोरी केल्याने त्यांना उत्तर देताना त्यांचे काही सैनिक मारूनच मेजर मोहरकरांनी युद्धभूमीवर दम सोडला.
त्यांच्या पश्चात त्यांचे वडील आणि बायको गावी राहिले.
नाईक संदीप जाधव:
लहानग्यांच्या जन्मदिनी वडिलांचे शेवटचे कार्य करावे लागणे म्हणजे किती हिम्मत असावी लागेल…
ह्याच लहानग्यांचे वडील म्हणजे जवान संदीप जाधव जम्मू काश्मिरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना शहीद झाले…
आणि ह्या वीर सैनिकांच्या मुलाला त्याच्या वाढदिवसालाच जड अंतःकरणाने आणि साश्रु नयनाने आपल्या पित्याचे क्रियाकर्म पार पाडावे लागले.
शिपाई दीपक घाडगे:
सातारा जिल्ह्यात अत्यंत गरीब घरातील असलेले दीपक घाडगे, आपल्या कुटुंबाला कधीतरी चांगले दिवस दाखवू हे स्वप्न उराशी बाळगून सैन्यात दाखल झाले.
वयाची जेमतेम २७ वर्षे पूर्ण केलेले शिपाई दीपक घाडगे हे पाकिस्तानी सैन्याने पूंछ सेक्टर मध्ये केलेल्या गोळीबारात वीरगतीला प्राप्त झाले.
जवान शुभम मुस्तापुरे:
दोन दिवसात घरी सुट्टीला येतोय असं सांगून त्याच २ दिवसात वीरगतीला प्राप्त झालेले जवान शुभम मुस्तपूरेना परभणी वासी कधीही विसरू शकणार नाहीत.
पाकिस्तानने शास्त्रसंधी तोडून भारतीय सैन्यावर अचानक गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्याला प्रतिउत्तर देताना अवघे २० वर्षीय शुभम मुस्तापुरे जखमी झाले आणि पुन्हा उठू शकले नाहीत.
त्यांना त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या आईवडिलांना साश्रु नयनांनी निरोप द्यावा लागला.
मेजर कौस्तुभ राणे:
लहाणपणाचे स्वप्न खरे करून भारतीय सैन्यात कौस्तुभ राणे दाखल झाले. मेजर कौस्तुभ राणे ही उपाधी लेऊन ते भारतीय सीमांना सुरक्षित करण्यात कायम पुढे राहिले.
अशातच बंदीपोराच्या (जम्मू आणि काश्मीर) सीमेलगत शिरलेल्या आतंकवाद्यांना कंठस्नान घालताना वीर मरण स्वीकारून तिरंग्याची सेवा करत त्याच तिरंग्यात लपेटून घरी आले.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि अडीच वर्षांचा लहानगा मुलगा आहेत. युद्धमैदानात शौर्य गाजवलेल्या ह्या वीरजवानाला शासकीय इतमामांत निरोप दिला गेला.
अर्थात, ही आपल्या समोर असणारी काही मोजकीच उदाहरणं.
असे अनेक आहेत. वरील यादीत काहींचा उल्लेख झाला नाहीये, पण म्हणून त्यांना आपण विसरलो असं होत नाही. जो पर्यंत भारत देश असेल तो पर्यंत ह्या शिवबांच्या मावळ्यांचं अस्तित्व आणि आठवण टिकवून असणार आहे.
ह्या वीरपुत्रांनी भारतमातेसाठी केलेल्या सेवेमुळे आणि बलिदान मुळे आपण भारतवासीय देशात सुरळीत जीवन जगू शकतोय. ज्या परिस्थितीत ते राहतात, जेवतात किंवा लढतात ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
स्वतःच्या घरात परिस्थिती काहीही असो पण देशाला माझी पहिली गरज आहे इतिकर्तव्यापोटी जणू भरल्या ताटावरून उठून ते त्यांचे यज्ञ कर्म करतात.
अशा अनंत सैनिकांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची फेड आपण कधीच करू शकणार नाही. पण त्यांना स्मरून त्यांच्या साठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी कायम प्रार्थना करू शकतो…!
Lets keep our brave hearts in our prayers always..!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.