रात्री दरवाज्यावर थाप मारणारी भुताटकी बाई आपल्या सर्वांच्या समोर येतीये, लवकरच
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
बायको माहेरी गेलीये आणि तो घरात एकटाच आहे. मस्त पार्टी करण्याचा मूड आहे. तयारी ही जय्यत केलेली आहे.. फक्त सोडा आणायचा राहिला म्हणून अचानक रात्री बाहेर पडावं लागतं. का कोण जाणे पण रस्त्यावरचे पथदिवे आजच जरा मरायलाच टेकलेत.
खरं तर दुकान जवळच आहे. रात्रीच गिऱ्हाईक नसल्याने बंदच होणारे तितक्यातच तो पोचतो आणि –
दुकानदार नाही म्हणत असताना, त्याला परत शटर उघडायला लावून कसं बसं सोड्याची बाटली मिळवतो.
चला.. आता बेत भारी होणार ह्या खुशीत तो निघलाय…
तर पथदिवे अचानक पूर्ण बंदच होतात आणि रस्त्यावरची कुत्री विचित्र आवाजात रडायला लागतात..
त्या आवाजात भर म्हणून की काय, एकच हेड लाईट चालणारी गंजकी जुनाट अगदी भंगार कार बाजूला येऊन कर्रर्रर्रर्र ब्रेक दाबून थांबते. आतून एक रावडी राठोड छाप माणूस खर्ज्यात पत्ता विचारतो. कोणीतरी म्हातारडी एकटीच राहते म्हणे ह्याच भागात. तिचाच पत्ता.
तो सॉरी म्हणून वाटेला लागतो. खर्रर्रर्र खुर्रर करत, कचकचत ती कार निघून जाते. एकाच दिव्याचा प्रकाश लांब पर्यंत दिसतो आणि मग ती कार नाहीशी होते.

घराचा रस्ता फार लांब नाहीये बरं. पण आज अंमळ जास्तीच वेळ लागतोय. थंड गार वारा सुटतो आणि पानांची सळसळ होतेय. चंद्र ढगात गायब झालाय.
वातावरण छान आहे की भीतीदायक आहे हे कळे पर्यंत आपल्याला कोणीतरी सोबत देतंय असं त्याला वाटून जातं आणि मग भरते छातीत धडकी..!
तो भराभर चालायला लागतो आणि त्याच्या सोबतीचं ‘माणूस’ पण वेग वाढवतं. दोघांची शर्यत लागते जणू.
कसं बसं पळत पळत घरापाशी पोचल्यावर जरा कुठे बरं वाटतंय तर किल्लीच सापडत नाही. अरे देवा येताना घरात राहिली काय? लॅच तोडावी लागेल काय? का खिडकीतून आता जाऊ?
नेमके बाजूचे आज्जी आजोबा आठ पंधरा दिवसांसाठी गावाला गेलेत. आता कसं करायचं?
एक ना दोन हजार प्रश्न डोक्यात..! मोबाईल ची बॅटरी लावून शोधावं तर तो पण साथ देत नाही. आज चार्जिंग लो आहे.
गार गार वतावरणातही घामाच्या धारा लागल्यात हं.. आणि नशिबाने खिशात किल्ली सापडते. हुश्श..!
दार उघडे पर्यंत जीवात जीव नाही. दार लावताना बाहेर लांब एक सावली दिसते आणि भीमरूपी चे शब्दच आठवत नाहीत. त्यातच बॅटरी मरायला आलेल्या मोबाईलची रिंग वाजते. ‘बायको कॉलिंग’..! तिच्याशी बोलल्यावर त्याला बरं वाटतं.

थोडा वेळ जातो. तो मस्त तयारीला लागतो आणि दरवाज्यावर पडते थाप.. मधुर आवाजात बायको म्हणते,
“अहो, दार उघडा ना पटकन. मी आलेय.”
त्याला विश्वासच बसत नाही. तो दार उघडतो आणि ‘सरप्राईज’.. ती मगासची सोबतीण, ती सावली बनून येणारी.. साक्षात समोर…
आता त्याच्या हृदयाची धड धड इतकी जोरात ऐकू येतेय जणू काय हृदय शरीराबाहेर येऊन धडधडतंय.. आता पुढे..??
पुढे काय? दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात बातमी. माणसाच्या मृत्यूची. एक ना दोन.. त्या गावात असेच गूढ मृत्यू होत राहतात. गावातून जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे असेच मृत्यू.. गूढ मृत्यू..!
वाऱ्यासारखी खबर पसरते सगळी कडे..
‘त्या’ सोबतीणीला नावं मिळतात.. प्रत्येक गावात वेगळं नाव.. मोठे मोठे तांत्रिक मांत्रिक सल्ले देतात.. गावागावातली म्हातारी मंडळी उतारे सांगतात.
दारावर स्वस्तिक काढा, बाहेर दिवा लावा, कुंकू हळद दक्षिण दिशेला टाका आणि भिंती तिच्यासाठीच्या संदेशांनी भरतात.
अनंत उपाय होतात.. हळू हळू गावाचे रूटीन परत चालू होते. गावकरी थट्टा मस्करीत एकमेकांना एकाच्या दोन करून कथा सांगतात..
पुढची पाच दहा वर्षे तरी कथांना तोटा नसतो.. काही शास्त्रज्ञ शोध काढतात, डिटेक्टिव्ह माग काढतात.. काही बाही त्यावर लिहिलंही जातं आणि मग सगळं बासनात जातं.

अचानक काही वर्षांनी ‘स्त्री’ सारखे सिनेमाचे पोस्टर येते आणि मग परत उजाळा मिळतो ह्या जुन्या आठवणींना. ‘स्त्री कल आना’ ह्यावर लाल रक्ताचा डाग किंवा हवेत उडणारी स्त्रीची वस्त्र ल्यालेली सावली.
ट्रेलर पाहून थरकाप उडेल असेच वर्णन.
थोडं मजेशीर वळण देण्यात आलं असलं तरी विषयाचं ‘हॉरर’पण किंवा दहशत कमी होत नाही.
९० च्या दशकात ही कथा जन्माला आली होती. आताचं बेंगळुरू हे तेव्हा इतकं पुढारलेलं नव्हतं. त्याच्या कोण्या गावात अशीच एक ‘स्त्री’ यायला लागली.
गावात रात्रीची फिरून सावज शोधायची. कोणाला जाऊन हाका मारायची. साध्या हाका नाहीत तर घरातल्यांच्याच ओळखीचा आवाज.
कोणी हाक मारल्यावर ओ दिलीच किंवा मागे वळून पाहिले तर मात्र सगळे संपायचे.
लोकांची कामं धामं बाजूला राहिली. सगळी कडे एकाच चर्चा ही ‘स्त्री’ कशी निघून जाईल.. कोणी रात्रीचं बाहेर पडत नसे की कोणाच्या हाकेला ओ देत नसे.
उतारे झाले, तांत्रिक मांत्रिक झाले.. सगळ्यांनी त्या स्त्री ला ‘नाले बा’ (उद्या ये) असे कानडीत सांगितले आणि वेळ पुढे सरकली.. ह्या घटनेची कथा झाली.
अजूनही त्या प्रांतात १ एप्रिल ला ‘नाले बा’ म्हणून ओळखला जातो.
फक्त बेंगलोर च नाही तर भारताच्या बऱ्याच गावागावात अश्या कहाण्या जन्माला आल्या. कुठे ‘हाकामारी’ तर कुठे ‘टकली बाई’ किती किती नावांनी ती प्रसिद्ध झाली.
आता आपला विश्वास बसेल किंवा नाही पण ९० च्या काळात एकंच थैमान घातलं होतं ह्या ‘स्त्री’ने.
आता त्यावर सिनेमा ही येऊ घातलाय. घट्ट मन असलेल्यानी पहावा. जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल.
पुन्हा काही वर्षांनी अशी बाई येईल किंवा नाही माहीत नाही, पुन्हा हाकारे होतील किंवा नाही होणार पण ‘स्त्री’च्या कथा चवीने सांगितल्या जाणार आणि ऐकल्या जाणार.. तर मंडळी ‘जागते रहो, ‘स्त्री’ को कल आने के लिये कहो’..
===
टीप: हा लेख पूर्णपणे मनोरंजनपर आहे. इनमराठी.कॉम कोणत्याही अंधश्रध्दांचं समर्थन/प्रचार करत नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.