आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय सेना हा भारताचा तो कणा आहे ज्याच्या भरवश्यावर आपला भारत देश हा ताठ मानेने ह्या जगासमोर उभा आहे.
आपल्या सीमांची रक्षा करणारे हे भारतीय सेनेचे जवान आपल्या जीवाची परवा न करता अविरतपणे देशासाठी झटत असतात.
एवढचं काय तर आपल्या कुटुंबीयांना दुय्यम ठेवत आपल्या मातृभूमीला आपल्या देशाला ते पहिलं स्थान देतात. त्यांचा केवळ एकच हेतू असतो तो म्हणजे देशाच्या शत्रूंपासून देशाचे रक्षण करणे.
भारतीय सेनेचे हे जवान नेहमी कर्तव्याची जाण ठेवत दिवसरात्र आपल्या देशाची देशाच्या नागरिकांची रक्षा करत असतात.
देशावर कुठलेही परकीय संकट आले की हे जवान त्यांच्यासमोर एक मजबूत भिंती प्रमाणे उभे राहतात.
ज्यांच्या शौर्याची कहाणी आपल्याला भारताच्या प्रत्येक घरात ऐकायला मिळते, एवढंच काय तर शत्रू देश देखील ज्यांच्या शौर्याचे गुणगान करतात असे आपल्या भारतीय सेनेतील जवान खरंच खूप शूर आहेत.
त्यांच्यामध्ये एवढी उर्जा कुठनं येत असेल की समोर मरण दिसताना देखील त्यांना जराही भीती वाटत नाही!
गोळी लागलेली असताना जखमी असताना देखील त्यांच्यात अशी कुठली उर्जा संचारत असेल की त्या अवस्थेतही ते शत्रूशी दोन हात करतात. हे प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतात.
त्यांचा पराक्रम आणि शौर्य बघून प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबाबत आदर आणि देशाप्रती देशभक्ती निर्माण होते.
आपली भारतीय सेना जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना आहे. सध्या आपल्या देशात १३ लाख सक्रिय सैनिक आहेत.
हे सर्व सैनिक वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये विभागलेले आहेत. आणि त्या सर्व रेजिमेंटची आपली वेगवेगळी एक ओळख आणि विशेषता आहे. त्यापैकीच एक म्हणजे त्यांची ब्रीदवाक्ये.
आपण सर्व हे जाणतोच की “हर हर महादेव”, “जय भवानी जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय …” ह्या घोषणा मराठा इनफंट्रीतील घोषणा आहेत.
प्रत्येक मराठी सैनिकाला ह्या घोषणा कोणत्याही परिस्थितीत लढण्याचं बळ देतात.
आज आपण बघणार आहोत अश्याच काही इतर घोषणा, ज्या आपल्याला माहिती नसतील – पण विविध सैनिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
१. भारतीय सेना : Service Before Self
अर्थ : स्वतःच्या आधी सेवा. म्हणजेच तुम्ही तुमच्या देशाची मातृभूमीची रक्षा करायला किंवा सेवा करायला उभे आहात ते सर्वात पहिलं आणि महत्वाचं कर्तव्य आहे!
२. सैन्य हवाई संरक्षण : आकाशे शत्रून् जहि
अर्थ : आकाशातच शत्रूला मारून टाका .
३. भारतीय हवाई दल : नभस्पर्शं दीप्तम्
अर्थ : आकाशाला स्पर्श करा. हे ब्रीदवाक्य आहे आपल्या वायुसेनेचं, आकाशात उंच उडणारी फायटर जेट्स आणि ते जीवावर उदार होऊन उडवणारे पायलट यांच मनोबल वाढवण्यासाठी हे वाक्य आहे!
त्यांनी गगनात आणखीन उंच भरारी घेऊन, शत्रूला नेस्तनाबूत करून आपल्या देशाचे नाव आकाशात सुद्धा मोठे करावे हीच त्यामागची इच्छा!
४. भारतीय नौदल : शन्नो वरुण:
अर्थ : समुद्र देवतेचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहावा
५. तोफखाना विभाग पलटण : सर्वत्र इज्जत-ओ-इकबाल
अर्थ : सर्वत्र गर्व आणि आदराने
६. रक्षक ब्रिगेड : पहला हमेशा पहला
अर्थ : स्थिती कशीही असली तर आम्ही सर्वात पहिले तैनात राहू
७. मद्रास रेजिमेंट : स्वधर्मे निधनं श्रेय:
अर्थ : सेवा करताना जीव गमावणे अभिमानाची गोष्ट आहे.
८. गोरखा रेजिमेंट : कायर हुनु भन्दा मर्नु राम्रो
अर्थ : भित्राप्रमाणे जगण्यापेक्षा आदराने मरणे चांगले
९. राजपुताना रायफल्स : वीर भोग्य वसुंधरा
अर्थ : जो वीर आहे तोच ह्या धरतीवर राज्य करेल
१०. शीख रेजिमेंट : निश्चै कर अपनी जीत करों
अर्थ : दृढ संकल्पाने मी जिंकणार
११. डोगरा रेजिमेंट : कर्तव्यम अन्वात्मा
अर्थ : मरण्याआधी कर्तव्य
१२. जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री : बलिदानम वीर लक्षणम
अर्थ : त्याग हे वीरांचे लक्षण आहे.
ही होती भारतीय सैन्यातील काही महत्वाच्या शाखांची ब्रीदवाक्ये.
सैन्यात अजून अनेक शाखा आहेत, त्यांचीही अशीच प्रेरणादायी ब्रीदवाक्ये आहेत. शत्रूशी दोन हात करताना ही ब्रीदवाक्ये सैनिकांना कायम स्फूर्ती देत असतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.