आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“आमच्याकडे अंधश्रद्धा अजिबात मानत नाहीत” असा म्हणणाऱ्यांना, ते घराबाहेर निघताना, “काय हो कुठे निघालात?” किंवा “आज काम काही होत नाही तुमचं” असं म्हणून बघितलंय का कधी?
तोंडावर नसली तरी पाठीमागून ‘नाट लावली कामाला’ असं म्हणत केलेली धुसफूस जाणवेल पहा कशी..!
कसं आहे ना, आपण कितीही अंधश्रद्धा मानत नाही म्हणालो तरी कळत नकळत आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या प्रकारची ‘सुपरस्टीशन्स’ मानतच असतो.
भारत खूप पूर्वी पासून अंधश्रद्धेचं माहेरघर आहे.
अघोरी अंधश्रध्दांपासून ते हलक्या फुलक्या अंधश्रद्धांपर्यंत अशी आपापल्या बुद्धी प्रमाणे प्रत्येकाची मजल असते. शहरी भागात किंवा सुशिक्षित माणसात अघोरी अंधश्रद्धा हद्दपार झाल्या असल्या तरी गावागावात अजूनही निर्मूलनाचं कार्य चालूच आहे.
मांजर आडवी गेली तर पाच पावलं मागे चाला. पाल चुकचुकली तर करा काम स्थगित करा. उतरवून टाकलेल्या लिंबावर चुकून पाय पडला तर दिवस भर काहीही सुचत नाही काहींना.
त्यातून चुकून जर काही वाईट घडलंच तर ते लिंबावर पाय दिल्यामुळेच असा घोषा असतो. मनाविरुद्ध काही घडलं तर लगेच आज अमक्या ढमक्याचं तोंड पाहिलं होतं ना म्हणूनच झालं असेल असे निकाल लावून आपण मोकळे होतो.
उजवा तळहात खाजणे, उजवी पापणी फडफडणे, घड्याळ बंद पडणे, आरसा फुटणे किंवा पहाटेचे भयंकर स्वप्न पडणे.
अशा छोट्या मोठ्या अंधश्रद्धेचे आपण सगळेच बळी ठरत असतो. ह्यातून सुटण्यासाठी बरेच मार्गही अवलंबतो. कधी कधी ते सोप्पे असतात पण कधी कधी ते स्वतःला किंवा समाजाला हानिकारकही असतात. स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून काही जण दुसऱ्यांचा विचारही करत नाहीत.
वाईटाचं काय पण काही चांगलं झालं किंवा व्हावं असं वाटत असेल तरीही ‘पॉझिटीव्ह’ प्रकारात मोडणाऱ्या अंधश्रद्धा आहेतच की..
आपला आवडता संघ जिंकावा म्हणून खास कपडे घालून खेळ बघणं असो किंवा परीक्षेला जाताना वापरला जाणारा ‘लकी’ पेन असो.
वस्तू , रंग, आकडा किंवा स्थळ ह्यातलं काहीना काही कोणाला तरी खूप लकी असतं. ‘अमुक तमुक मला खूपच लकी आहे हं’ च्या नावाखाली काय काय केलं जातं.
अगदी प्रतिष्ठित खेळाडू सुद्धा आपली लकी बॅट आणि लकी जर्सी घेतल्याशिवाय मैदानात उतरत नाहीत. प्रथितयश माणसं देखील काहीना काही अंधश्रद्धा जोपासताना दिसतात.
फक्त भारतातीलच लोक आहेत का अंधश्रद्धाळू? नाहीच मुळी..! इतर प्रगत राष्ट्रांमध्येही ‘सुपरस्टीशन्स’ पाळली जातात.
अमेरिकेसारख्या देशातही खूप काही घडत असतं. जसं त्यांच्या कडे १३ हा आकडा अशुभ म्हणतात म्हणून ऊंच ऊंच १०० मजली इमारती असल्या तरी १३ वा मजला वाळीत टाकलेला असतो.
१३व्या मजल्यावर कोणाला राहायचं नसतं. १३ नंबरचा फ्लॅट नको असतो. म्हणून त्याला १२ब किंवा १४अ वगैरे नाव देतात.
लिफ्टच्या आकड्यांमध्ये ही १३ हा आकडा टाळतात. त्याला M असं नाव देतात कारण इंग्रजी बाराखडीतील १३ वं अक्षर म्हणजे M येतं ना..! सरळ सरळ १३ असं नको लिहायला म्हणून हा उजव्या हाताने मानेला वळसा घालून खाल्लेला घास.
इटली आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये १७ हा आकडा अशुभ आहे. त्याचीही १३ सारखीच गत असते. काळी मांजर परदेशातील त्या गोऱ्यांचे ही नशीब बिघडवू शकते म्हणे.
कोणी शिंकल्यावर ‘गॉड ब्लेस यु’ म्हणायची पद्धत आहेच. कारण काय? तर शिंक येताना नेमक्या त्या काही सुपर मायक्रो सेकंदात हृदय जरा बंद असताना यमराज येऊन प्राणच घेऊन जातील की काय ही शक्यता टाळण्यासाठी… ब्लेस यु..!
पण हे असे अंधविश्वास आपल्यापर्यंत येतातच का आणि कुठून?
मानसशास्त्र म्हणते, जेव्हा जेव्हा आयुष्यातील कठीण प्रसंगातून माणसं जात असतात तेव्हा त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी अघटित अशक्य असं काहीतरी घडावं अशी अपेक्षा असते.
कशावर तरी श्रद्धा ठेवली तर एक मानसिक बळ मिळतं किंवा आधार मिळाल्यासारखं वाटतं.
आपलं नशीब किती चांगलं किंवा किती खराब आहे आणि ते बदलावं म्हणून काय काय करू शकतो आशा शक्यतांच्या मागे लागून माणूस अजूनच अंधविश्वासू व्हायला लागतो. जितका माणूस दुःखाच्या गर्तेत तितका तो अंधविश्वासू होऊ शकतो.
काही वाईट झाल्यास नशिबाला बोल लावणे किंवा काही चांगलं झाल्यास ‘अमुक तमुक’ केल्याचा परिणाम असं मानल्यामुळे ती एक सवयच होऊन बसते. दर वेळी ‘लकी’ कसं बनता येईल ह्याच्या नवीन क्लृप्त्या एकेक पिढी काढत राहते.
त्या क्लृप्त्या बाय चान्स ‘ट्राईड अँड टेस्टेड’ असल्यास त्यावर दुसऱ्यांचा ही पटकन विश्वास बसू शकतो आणि तिथे अंधश्रद्धा वाढीसच लागते. जसे दृष्ट लागू नये म्हणून मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढली जाते.
तोटा काहीच नाही पण झाला तर फायदाच होईल अशा काळजी वजा प्रेमाखातर.
अकारण स्वतःच्या किंवा आपल्याच नातलगांच्या आयुष्याची चिंता असणे किंवा मनात कुठला किन्तु असल्यामुळे देखील विषाची परिक्षा नको म्हणून कित्येक गोष्टी केल्या जातात.
त्यातील काही शास्त्राला (सायन्स) धरून असतील किंवा गम्मत म्हणून असतील तर ठीक आहे पण मुख्य परत्वे त्या अंधश्रद्धेखालीच केल्या जातात.
ह्या सगळ्या विश्वासाच्या मागे आपले पूर्वज, काही मिथ्या विचारधारा, समाज, सत्ताधारी, काही स्वार्थी अति विद्वान माणसं किंवा आपली चुकीची मतं ही असू शकतात..
बऱ्याचदा ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ ह्या उक्ती प्रमाणे छोटंसं कारणही पुरतं अंधविश्वास वाढीस लागायला.
काही चांगले घडलं तर ते आपल्याच कष्टाचं चीझ असू शकतं किंवा आपण कुठे कमी पडलो तर आपल्या नशिबी अपयश येऊ शकतं. पण मानसशास्त्र सांगत की माणसांना कशाला तरी दोष किंवा श्रेय देणं जास्ती सोयीस्कर वाटतं.
खरं तर घडलेल्या गोष्टीतून धडा घेणं, आपल्या अपयशाची जबाबदारी आपण घेणं, आणि अजून प्रयत्न करणं हे सुयश मिळवण्याचे पक्के मार्ग आहेत.
पण नैराश्याच्या गर्तेत जाऊन माणसं काही ‘मिरॅकल’ होईल म्हणूनच वाट पाहत राहतात आणि नकळत अंधश्रद्धेच्या खोल खोल दरीत वहावत जातात. खरा मंत्र तर असाच आहे की जितके जास्त प्रयत्न तितकं जास्त यश आणि तितकेच आपण जास्त लकी..!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.