Site icon InMarathi

ब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

२०१६ साली जयललिता आणि आज कलाईग्नार एम.करुणानिधी. द्रविडी अस्मितेचा शेवटचा आणि कदाचित सगळ्यात भक्कम बुरुज आज काळाच्या पडद्याआड गेला. करूणानिधींच्या मृत्युवर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया आल्या अर्थात आपल्या महाराष्ट्रातील लोकांना फारशी कल्पना नसणारच ह्याआधी जयललिता गेल्या होत्या तेंव्हा अशाच प्रतिक्रिया आल्या होत्या.

तामिळी लोक त्यांच्या नेत्यांना देव का मानतात ह्या आधी द्रविड अस्मिता काय आहे हे जाणुन घेतलं तर कदाचित हा तामिळी वेडेपणा हा वेडेपणा वाटणार नाही.

द्रविड अस्मिता म्हणा किंवा द्रविडनार कळघम ही कदाचित भारतातील सगळ्यात यशस्वी झालेली बंडखोर चळवळ असेल.

यशस्वी ह्यासाठी की कुठल्याही बंडखोर चळवळीला ५० वर्ष लोकशाही व्यवस्थेत राहुन सत्तेत विराजमान होता आलेलं नाही. अगदी खलिस्तान समर्थक असो वा माओवादी समर्थक चळवळी असो कुणालाही जे जमलं नाही ते द्रविड चळवळीला जमलं.

अर्थात ह्या चळवळीने आपल्याला अनेक प्रेतं, रक्ताचे पाट तर दिलेच पण आपण आपला पंतप्रधान देखील गमावला हे विसरून चालणार नाही.

 

timesnownews.com

९२ वर्षांची परंपरा असलेली द्रविड चळवळ आज ९३ वर्षांच्या करूणानिधींच्या जाण्याने कुठवर आली आहे हे बघितलं तर ह्या चळवळीची फलश्रुती कळु शकेल.

ब्राह्मण वर्चस्ववादाला विरोध म्हणून सुरु झालेली द्रविड चळवळ ही तशी फार जुनी पार १९२५ सालची, मुख्य उद्देश हा ब्राह्मण वर्चस्ववाद संपविणं, द्रविड अस्मितेला पुनरुज्जीवित करणं आणि आर्य आणि आर्यांच्या सगळ्या संकल्पना मग त्या भाषिक, धार्मिक, कार्मिक कुठल्याही असो त्या नाकारणं हा द्रविड अस्मितेचा पाया होता.

ह्या अस्मितेचा परमोच्च कट्टर बिंदु हे पेरियार असतील तर तितकाच मवाळ बिंदु हे एमजीआर आणि करुणानिधी होते.

आता ह्यावरून कल्पना करा की पेरियार (पेरियार देखील १९१९ ते १९२५ काँग्रेसमध्ये होते पण त्यांनी काँग्रेस पक्षातील ब्राह्मण वर्चस्ववाद ह्यावर टीका करत सोडली) किती जहाल असतील. त्यांची भाषणं वाचलीत तर कल्पना येईल.

द्रविड लोकांनी ब्राह्मण वर्चस्वातुन आलेल्या बहुतेक परंपरा तर नाकारल्याच अगदी शव दहनाची परंपरा नाकारत त्यांनी शव पुरण्याची परंपरा सुरु केली. मंदिरांमधून संस्कृत श्लोक, श्रुती, आरत्या, सुभाषिते ह्या काढून त्या जागी तमिळ श्लोक आले, आरत्या आल्या, सुभाषिते आली. ह्या सगळ्यात तामिळ भाषाप्रभु करुणानिधी ह्यांचा मोठा वाटा होता.

 

moneycontrol.com

मद्रासच्या इतिहासात खऱ्या अर्थाने द्रविड अस्मितेत पहिल्यांदा प्राण फुंकला तो इरोड वेंकटप्पा (ई.ए) रामासमी अर्थात पेरियार ह्यांनी. १९४४ साली त्यांनी सगळ्या द्रविड नेत्यांना एका झेंड्याखाली आणलं तो होता द्रविडार कळघम (DK) चा झेंडा आणि त्यांची घोषणा होती ती वेगळ्या द्रविडनाडुची.

तत्कालीन मद्रास constituency त्यांना भारतापासून वेगळी हवी होती ज्यात संपूर्ण दक्षिण भारत आणि उत्तर श्रीलंकेचा भाग (जाफना पर्यंत) समाविष्ट होता.

पेरियार हे जरी ह्या चळवळीचे अध्वर्यू असले तरी त्यांचा द्राविडी अस्मितेला निवडणुकीत उतरविण्याला ठाम विरोध होता.

त्यांचा युक्तिवाद हा होता की चळवळीने जर राजकीय रूप धारण केलं तर त्याला वैयक्तिक महत्वाकांक्षा येतील आणि मग सत्तेसाठी विचार आणि चळवळीशी तडजोड करावी लागेल ज्यामुळे मुख्य उद्दिष्टाला बाधा येईल.

आणि त्याच विरुद्ध १९४९ साली अण्णादुराई ह्यांनी DK च्या बाहेर पडून नवीन राजकीय पक्ष स्थापन केला द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) अण्णादुराई ह्यांच्याबरोबर पाठीशी खंबीरपणे उभा होता त्यांचा सगळ्यात विश्वासु आणि प्रतिभावान सवंगडी तामिळ चित्रपटसृष्टीचा कलाईग्नार मुथुवेल्ली करुणानिधी.

करूणानिधींचं तामिळ भाषेवर प्रभुत्व होतं, त्यांची पुस्तकं, नाटकं त्यांनी लिहिलेले चित्रपट, त्याच्या कथा, पटकथा ह्यांनी द्रविड अस्मितेला चित्रपटांमधुन लोकांसमोर मांडायला हातभार लावला.

पराशक्ती सारख्या ब्राह्मण वर्चस्ववादाच्या विरुद्ध केलेल्या टीकात्मक जहाल चित्रपटानंतर तर करुणानिधी द्रविड चळवळीचे पोस्टर बॉय झाले. त्याचा प्रभाव देखील दिसला आणि तब्बल २० वर्षांच्या संघर्षानंतर काँग्रेसला पराभुत करत प्रथमच १९६७ साली तामिळनाडूत पहिलं गैर काँग्रेसी सरकार अस्तित्वात आलं आणि मुख्यमंत्री झाले करूणानिधींचे गुरू अण्णादुराई.

 

indiablooms.com

अण्णादुराईंच्या निधनानंतर १९६९ मात्र करूणानिधींनी सत्तेची सूत्र हातात घेतली त्यानंतर जो द्रविडी तमाशा तामिळनाडू मध्ये रंगला तो आज तब्बल ४९ वर्ष अविरत पणे सुरु आहे.

अर्थातच कलाकार बदलत होते पण जे कोण होते ते करुणानिधी नावाच्या व्यक्तीचे साथीदार किंवा त्याचे शिष्य तरी होते करूणानिधींनी शहरी तामिळनाडूत बस्तान बसविलं, आज जे IT हब चेन्नई आपल्याला दिसतंय त्याची मुहूर्तमेढ रोवली ती करुणानिधी ह्यांनी.

तामिळ अस्मिता भाषा ह्याबाबत ते जितके आग्रही होते तितके एका गोष्टीसाठी आग्रही होते ते विरोधकांना संपविण्यात.

ह्याच कारणामुळे द्रविड चळवळ भरकटली आणि त्याचं रूपांतर द्वेष आणि बर्बरतेत झालं.

करूणानिधींनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि अण्णाद्रमुकचे संस्थापक एम.जी.रामचंद्रन ह्यांना संपविण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. पण करूणानिधींचं दुर्दैव हेच की ज्या एमजीआरना त्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत ओळख दिली त्या एमजीआर ना करूणानिधींना एमजीआरच्या हयातीत कधीच पराभुत करता आलं नाही.

आणि एमजीआर नंतर त्याच एमजीआरची शिष्या जयललिता ह्यांच्या साडीला भर विधानसभेत करूणानिधींच्या समक्ष त्यांच्याच आमदाराने हात घातल्यावर सुद्धा ते गप्पच राहिले.

एमजीआर असो वा जयललिता ह्यांनी करूणानिधींना पार फरफटत जेलमध्ये घातलं हरप्रकारे संपविण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर सुद्धा प्रत्येकवेळी हा नेता एखाद्या फिनिक्स पक्षासारखा राजकारणात परत आला.

करूणानिधींची खरी शोकांतिका हीच आहे की ज्या द्रविड चळवळीला त्यांनी सर्वस्व अर्पण केलं त्याच चळवळीशी नंतर निव्वळ व्यक्तिगत स्वार्थापायी त्यांनी प्रतारणा केली.

त्यांचं त्यांच्या राज्यप्रति आणि त्यांच्या चळवळी प्रति योगदान नक्कीच आहे पण आज त्यांच्यानंतर द्रविड चळवळ इतिहास जमा का होतेय?? अर्थातच दुसरा करुणानिधी न तयार झाल्यामुळे आणि त्याला कारणीभूत होती त्यांचीच अनिर्बंध महत्वाकांक्षा!!

एमजीआर, वायको, विजयकांत कितीतरी उमदे नेते फुटले काहींनी करूणानिधीं पुढे जबरदस्त आव्हान उभं केलं तर काही फुटले ते कायमचे संपण्यासाठीच, पण करूणानिधींची महात्वाकांक्षेची भूक काही संपली नाही. काय असावी ती महत्वाकांक्षा??

त्यांच्या मनात कुठेतरी ईलम खुणावत होतं का?? कुणास ठावुक पण त्यांनी तसं जाहीरपणे कधीच बोलुन दाखवलं नाही.

 

globintel.com

द्रविडी अस्मिता पर्यायाने तामिळी जनता आज पुन्हा एकदा कुणीतरी अवतारी नेत्याकडे आस लावुन बसली आहे. स्टालिन, कनिमोळी, डी. राजा, अळगिरी हे कधीच ते अवतारपुरुष होऊ शकत नाही कारण त्यांच्यात तितकं सामर्थ्यच नाहीय.

मग जयललिता आणि करुणानिधी नंतर आता कोण अवतारपुरुष येणार आणि द्रविड अस्मितेला पुनरुज्जीवित करणार?

तितक्या ताकदीचा एकच व्यक्ती आज तामिळनाडूत आहे तो म्हणजे रजनीकांत.

तामिळ जनता राजकारणावर आणि सिनेसृष्टीवर देवावर श्रद्धा ठेवतात तितकी श्रद्धा ठेवून प्रेम करते त्यामुळे थलाईवार रजनी द्रविडी अस्मितेचा तारणहार होतो का आणि येणाऱ्या एकवर्षात रजनी काय भूमिका घेतो ह्यावर द्रविडी अस्मितेचं भविष्य आहे अन्यथा करुणानिधी आणि जयललिता ह्यांच्या अपरोक्ष मोटभाईंची खेळी द्रविडी अस्मितेला कायमची संपवू शकते.

व्यक्तिशः मला ती संपण्यापेक्षा रजनीसारख्या व्यक्तीच्या हाती त्याची सूत्र गेलेली पाहायला कधीही आवडेल.

कारण इतर कुणाही राष्ट्रविघातक स्थानिक नेत्याच्या कह्यात जाण्यापेक्षा ती रजनीच्या हाती जाणं तामिळनाडूच्या आणि पर्यायाने भारताच्या दृष्टीने अधिक हितकारक ठरेल.

तुर्तास करुणानिधी कसेही असले तरी ह्या भाषाप्रभु कलाईग्नारचं भारतीय राजकीय इतिहासातील अस्तित्व,योगदान त्यांची ती कडवी भाषिक अस्मिता नक्कीच अमान्य करता येणार नाही.

त्यांच्यातल्या त्या भाषाप्रभुला सलाम. मरिना बीचवर एमजीआर,जयललिता ह्यांच्या दफन जागे शेजारी करुणानिधीना दफन केलं तर ९२ वर्षांच्या द्रविड चळवळीचं वर्तुळ पूर्ण होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version