“मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – चिन्मय भावे
चिन्मय मुक्त पत्रकार व डिझाईन रीसर्चर आहे. एनडीटीव्ही, सोनी, स्टार स्पोर्ट्स अशा वाहिन्यांसाठी चिन्मयने काम केले असून आयआयटी मुंबई येथील IDC स्कूल ऑफ डिझाईन मधून व्हिजुअल डिझाईनचे प्रशिक्षण घेतले आहे. चिन्मय chinmaye.com वर ब्लॉग करतो.
===
मित्रहो, मी चिन्मय अनिरुद्ध भावे
म्हणजे जन्माने कोकणस्थ ब्राम्हण. पण ही माझी ओळख नाही.
मी प्रथम भारतीय आहे आणि मग मराठी, हिंदू, पत्रकार, डिझायनर अशा वेगवेगळ्या ओळखी माझ्या अस्तित्व संकल्पनेशी जोडलेल्या आहेत.
मी जातिभेद मानत नाही. याचा अर्थ “माणसाची योग्यता त्याचा जन्म कोणत्या जातीत झाला यावर अजिबात ठरवता कामा नये” असे माझे स्पष्ट मत आहे. जातीची उतरंडही मला मान्य नाही.
देव आहे की नाही मला ठाऊक नाही आणि शोध घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण हिंदू असल्याचा मला रास्त अभिमान वाटतो.
कारण आम्हा अश्रद्ध लोकांना सामावून घेणे बऱ्याच धर्मांना झेपणारे नसते, हा खुलेपणा हिंदू धर्मात आहे. कर्मयोगासारखा साधा, सोपा, पण न्याय्य सिद्धांत आहे.
जातिभेद मात्र हिंदू धर्माला असलेला कलंक आहे आणि हा कलंक प्रयत्नपूर्वक मिटवला पाहिजे असं मला वाटतं.
हल्ली प्रत्येक सामाजिक गट हा आरक्षण मागू लागला आहे. आर्थिक आधारावर आरक्षण असावं असंही एक मत आहे. पण जेव्हा सवर्ण, सांस्कृतिक दृष्टीने संपन्न समाज आरक्षण मागतात तेव्हा वाटतं की काय हे दुर्दैव. आपला विवेक कुठं गेला आहे!
===
हे ही वाचा – भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत दहा आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या…
===
माझ्यामते ब्राम्हणांना किंवा कोणत्याही सवर्ण जातीला आरक्षण देणे योग्य नाही.
या समाजातील गरीब मुलांना मात्र “पैसे नाहीत” म्हणून संधी नाकारल्या जाता कामा नयेत. त्यासाठी प्रत्येक समाजाने शिष्यवृत्ती आणि शिक्षण फंड निर्माण करणे हा उपाय आहे. आरक्षण मागणे नव्हे.
“ओपन” मधील मुलींना आता समांतर आरक्षण म्हणून सरकारी नोकरीत आरक्षण आहेच आणि त्याला नॉन क्रिमी लेयर असण्याची अट आहे.
म्हणजे एका अर्थाने गरीब सवर्ण मुलींना कोटा उपलब्ध आहेच हे लक्षात घ्या.
आता जर तुम्ही ओपन मधील क्रिमी लेयर मधील “मुलगा” असाल तर तुम्हाला कोणतेच आरक्षण मिळत नाही, आणि ते मिळावे यासाठी कोणतेही सबळ सामाजिक कारण नाही.
आरक्षण हा एक वादाचा मुद्दा असतो! आणि त्याबद्दल सर्वांची मते असतात आणि ती अगदी टोकाचीच असतात.
ज्यांना ते मिळालेले असते त्यांना ते सर्व सामाजिक प्रश्नांवर जालीम इलाज आहे असा ग्रह असतो. जे ओपन वाले असतात त्यांचे म्हणणे असते की जात-पात नकोच ना?
मग पाहिजे कशाला जात आणि पाहिजे कशाला आरक्षण?!
अर्थात मते फुकट मिळतात आणि ती आजूबाजूला जे दिसते किंवा आपले जे काही वैयक्तिक अनुभव असतात त्यातून बनत असतात. त्यासाठी अभ्यास करावा लागत नाही. एखाद्या विषयाचे अनेक कंगोरे असतात, ते तपासायची तसदी घ्यावी लागत नाही.
आणि त्यामध्ये हरकत ही काहीच नाही.
पण जेव्हा आपण एखाद्या नीतीचा उहापोह करतो तेव्हा हे करणे (अभ्यास, मनन, चिंतन) महत्वाचे असते.
“आरक्षण नकोच” आणि “आहे ते सर्व ठीक आहे” या दोन्ही टोकाच्या आणि स्वार्थी भूमिका आहेत. शिवाय “आम्हाला पण आरक्षण हवे आहे” असे म्हणणारा एक गट आता विविध जात-धर्म-समाजांच्या राजकीय कंपूगिरीचे हत्यार झाला आहे ते वेगळेच!
मी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आरक्षणाचा समर्थक आहे. पण ब्राम्हण समाजाने त्याची मागणी करावी हे मला अतार्किक, अभिनिवेशी आणि प्रतिक्रियावादी वाटते.
माझ्या या मतावर अनेकदा दुटप्पीपणाचा आरोप केला जातो कारण मी SC ST आरक्षणाचा समर्थक असून ब्राम्हण आरक्षणाचा विरोधक आहे.
पण आपल्याकडे शिक्षणाचा वारसा आहे. घरोघरी शिक्षणाचे, नोकरीचे वातावरण आहे. जात-पात आणि आरक्षण या विषयांची एकदा सरमिसळ झाली की तर्क बाजूला राहतो.
स्वार्थ आणि अस्मिता तुमची मते निश्चित करू लागतात. आरक्षण म्हणजे काय हे आधी मुळात समजून घेतले पाहिजे.
जात-पात नको हा अगदी आदर्श विचार झाला. याबद्दल डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी आणि अनेक समाजशास्त्रज्ञ यांनी विविध मते मांडली आहेत.
अनेकांचे (गांधीजी धरून) म्हणणे असे की विविध उप-जाती एकत्र करून केवळ चार वर्णांत हिंदू समाजाची रचना करुया.
बाबासाहेब म्हणतात की दलित आणि मागास समाजाला पुढे आणणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षण आणि इतर ऐहिक प्रगती महत्त्वाची आहे.
===
हे ही वाचा – “कुठवर रडाल ब्राह्मणांनो?”
===
कर्मठ लोकांचे म्हणणे असते की हा फरक ईश्वराने केलेला आहे आणि जात तशीच राहणार.
डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये त्यांच्या caste and races in India या पुस्तकात सांगतात की उप-जातींना एकत्र करून मोठे वर्ग तयार केल्याने समाजात तेढ अजून वाढेल आणि ६-७ मोठे अतिरेकी विचारांचे झुंड आपण तयार करू आणि ही जातीय भक्ती, देश-भक्ती पेक्षा प्रबळ होईल.
आज महाराष्ट्रात ज्या प्रकारची कटुता विविध जात-आधारित संस्था आणि नेते पसरवत आहेत हे पाहता त्यांची भीती सार्थ आहे हे दिसते.
जात आपल्याला जन्माने मिळत असते त्यात आपले कर्तृत्व काय? मग त्याचा अभिमान कसला बाळगायचा हा प्रश्न मला पडतो.
आरक्षण जातीवर कशाला गरिबांना द्या अशीही एक हाकाटी असते. त्यातही दम नाही. आरक्षण ही सामाजिक प्रगतीची गरज म्हणून आले, दलिताच्या घरी पैसे आले म्हणजे शिक्षणाचे वातावरण, संस्कार आले असे नाही.
शिवाय गरिबांना सरकार फी सवलत, सबसिडी असे अनेक आधार देतच आहेत. ते चुकीचे लोक उपभोगतात असे ओरडणारे सवर्ण मध्यमवर्गीय गॅस सबसिडी तर सोडणार नाहीत पण याना महागड्या इंग्रजी international शाळा परवडतात.
सणवार, वाढदिवस, बाहेर खाणे यासाठी पैसे असतात हे दिसत नाही.
शिवाय जिथे खोटे उत्पन्न प्रमाणपत्र सहज मिळते तिथे असे आरक्षण लागू करणे खूप जिकीरीचे आहे.
अनेक लोक आरक्षणाने मेरीट-गुण मारले जातात असा तर्क करतात – त्यात फारसा दम नाही.
मी ओपन वाला आहे आणि मला IIT मुंबईच्या मास्टर ऑफ डिझाईनला खूप स्पर्धात्मक असलेल्या परीक्षेतून प्रवेश मिळाला. सोबत जे आरक्षित वर्गाचे विद्यार्थी होते ते हुशारही होते आणि मेहनतीही.
ज्या परीक्षेत आपण १०,००० अर्जदारांतून ५० जणांची निवड करतो तिथे आरक्षणावर आलेल्या मुलात आणि ओपनच्या मुलात बुद्धीच्या दृष्टीने काहीच फरक दिसत नाही. तीच परीक्षा पुन्हा घेतली तर rank बदलू शकतील.
मला स्वतःला २०११ मध्ये ३६० वे स्थान होते आणि २०१२ मध्ये ६१ वे स्थान मिळाले. म्हणजे “एका वर्षात मी हुशार झालो”, असे नसून त्या दिवशी मी परीक्षा चांगली दिली इतकेच!
आणि या बाबतीत एखाद्या वंचिताला काही पायऱ्यांची शिडी मिळाली तर आपल्याला जळण्याची गरज नाही. मला प्रवेश मिळायला एक वर्ष जास्त लागले इतकेच!
माझ्यासोबत एक झारखंडच्या आदिवासी भागातून आलेला विद्यार्थी होता. त्याला प्रवेश तर आरक्षणाच्या माध्यमातून मिळाला – पण गुणांक, नोकरी यासाठी तर मेहनत, गुण आणि काम सर्व असावे लागते.
आज तो एका अमेरिकन कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करतो. तिथे तर काम पाहून नोकरी मिळते जात पाहून नाही. जी संधी त्याला सुदूर आदिवासी भागात मिळाली नसती ती आरक्षणाने दिली आणि तो सक्षम-स्वयंभू होऊन पुढे गेला.
आज आपल्या समाजातील लोकांनी हे क्षेत्र निवडावे म्हणून तो प्रयत्न करतो. ज्युनिअर क्लासमध्ये त्या जिल्ह्यातले अजून पाचजण आहेत.
हेच गडचिरोलीतील मराठी आदिवासी मुलांनीही करून दाखवले आहे आणि मराठवाड्यातील दलित समाजातून आलेली मुलेही करत आहेत.
या आरक्षणातून फक्त त्याचा फायदा झाला का? नाही?
त्याच्या येण्याने आमची संस्था परिपूर्ण झाली आणि तिचे शिक्षण खरोखर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला मदत झाली.
अजून एक सीनियर होता तो बिहारमधील दलित समाजातून आला आणि आज काही कोटी टर्नओव्हर असलेली कंपनी चालवतो आहे. नोकऱ्या देतो आहे मागास आणि सवर्ण दोघांनाही.
माझ्या कोकणस्थ-ब्राम्हण समाजातील उच्चभ्रू आणि यशस्वी लोक इतकेही करत नाहीत आपल्या लोकांसाठी. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे भीक मागावी लागत नाही जर आपल्या समाजाबद्दल खरोखर चाड आणि आपुलकी असेल तर.
आज माझ्या जातीतले किती लोक अमेरिकेत आहेत. डॉलर्स मध्ये कमावत आहेत. किती शिष्यवृत्त्या तयार केल्या यांनी?
जात-संमेलनात दहावी-बारावीत ८०% टक्के मिळाले म्हणून फुटकळ रक्कम बक्षीस दिले जाते त्याची उदाहरणे नका देऊ. एक तर हे दान सत्पात्री नाही आणि त्याने कोणाचे आयुष्य बदलत नाही.
अमेरिकेतील कोणतेही उच्च दर्जाचे विद्यापीठ पहा. तिथे तुम्हाला मेक्सिको, घाना, केनिया, बांगलादेश, श्रीलंका अशा छोट्या देशांच्या यशस्वी लोकांनी आपल्या मुलांसाठी तयार केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या शिष्यवृत्त्या सापडतील.
या खासगी दानातून आहेत. मराठी/ किंवा ब्राम्हण अशा किती full funding शिष्यवृत्त्या आहेत? मला तरी सापडलेली नाही.
प्रामाणिकपणे विचार करा. सरकारकडे किती नोकऱ्या आहेत? आरक्षण मिळाले तरी समाजातील बरेचसे लोक वंचितच राहणार आहेत.
खासगी क्षेत्रात, उद्योजकतेच्या बाबतीत आरक्षण नाही. तिथं पुरुषार्थाला कोणी मर्यादा घातली आहे?
आपण प्रज्ञावंत मुलांसाठी निधी जमा करू शकतोच आणि तो अधिकार आहेच. असा निधी किंवा आरक्षण सरकारकडे मागावा इतके आपण वंचित नाही. तो हक्क अस्पृश्यतेने नाडलेले दलित आणि दुर्गम भागातील आदिवासी लोक यांचा आहे.
आणि तो हक्क संवैधानिक जबाबदारी आहे. उपकार नव्हे.
आणि अजून एक.
थोरले बाजीराव पेशवे यांच्याबद्दल आदर आणि अभिमान आहेच. पण ते जन्माने ब्राम्हण होते म्हणून हा आदर नसून त्यांच्या पराक्रमाबद्दल हा आदर आहे.
असाच आदर आम्हाला छत्रपती शिवराय, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले अशा सर्वांबद्दल आहे.
महापुरुषांना जातीत वाटून घेण्याचा बिनडोकपणा कोणी करू नये ही सुद्धा एक विनंती.
===
हे ही वाचा – भारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.