आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लड येथे दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात एका कसोटी सामन्यात संघाची परिस्थिती जेमतेम असताना संयमाने फलंदाजी करत शतकी खेळी केली. विराटची उत्कृष्ठ फलंदाजी आणि गोलंदाजांचं तोडीस तोड प्रदर्शन होऊनसुद्धा भारतीय संघ तो सामना जिंकू शकला नाही.
मग नेमकी कुठे कमी राहतेय? विराटच्या एकट्याच्या फलंदाजीतील सतत्याच्या जोरावर परदेशात होणारे कसोटी सामने जिंकणं भारताला शक्य आहे?
या सगळ्या प्रश्नांवर ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण..
इनमराठीच्या वाचकांसाठी..
===
जबॅस्टन कसोटीच्या पराभवाचं वर्णन कसं करता येईल?
मला वाटतं, ‘हिंदुस्थान हरला, कोहली जिंकला.’
नियतीने योग्य न्याय केला नाही. निदान कोहलीसाठी हा सामना हिंदुस्थानच्या पदरात टाकायला हवा होता. कोहलीने रूटला धावचीत केलं, तिथून सामन्याने बिहारच्या नितीशकुमारपेक्षा जास्त वेळ ‘पाठिंबा द्यायचा पक्ष’ बदलला. कोहलीने नंतर ‘विराट’ शतक ठोकलं.
अश्विन-इशांतने पुन्हा एकदा आशेच्या सूर्याला लवकर उगवायला साकडं घातलं. कोहलीने पुन्हा एकदा धावांचा गोवर्धन आपल्या बॅटवर पेलायचा प्रयत्न केला.
पण शेवटी तो माणूस आहे, देव नाही. कधी तरी त्याची चूक होणार होती, ती झाली.
कोहली-पंडय़ा असेपर्यंत नियतीचे हृदय हिंदुस्थानसाठी धडधडतंय असं वाटलं. त्यानंतर एका क्षणी ती नियती कठोर झाली आणि आशेचा सूर्य अस्ताला गेला.
पण एकटा कोहली काय करणार? आणि किती करणार? त्याने दोन्ही बाजूंनी फलंदाजी करण्याची सोय अजून आयसीसीने केलेली नाही. ती केली असती तर कोहलीने ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली असती.
कोहली सोडून आपली फलंदाजी फक्त हिंदुस्थानात उच्च दर्जाची वाटते. हिंदुस्थानबाहेर तंत्र आणि टेंपरामेंटच्या त्रुटी जाणवायला लागतात.
मुरली विजयकडे तंत्र आहे, पण त्याच्या फलंदाजीत सातत्य नाही.
धवनला गब्बरसिंग म्हणतात. जेव्हा खेळपट्टी पाटा असते, चेंडू हलत नाही, फार उसळत नाही तेव्हा तो गब्बर असतो. गब्बरची क्रूरता त्याच्या बॅटिंगमध्ये दिसते, पण चेंडू हलला, उसळी घ्यायला लागला की तो गब्बर जाऊ देत, सांबा पण नसतो.
राहुलला उत्तम संधी मिळाली होती. सुनील गावसकर त्याच्या प्रचंड अनुभवातून सांगतो की, टेंपरामेंट हे तंत्र, फटके यापेक्षा महत्त्वाचं. राहुलकडे दर्जा आहे, पण कुठल्या परिस्थितीत खेळ कसा ऍडजेस्ट करायचा हे त्याला शिकायचंय.
त्याने विराटच्या दोन्ही खेळींचा अभ्यास करावा.
रहाणे हरवलाय. हा आपल्याला ठाऊक असलेला रहाणे नाही. हा तोतया आहे. त्याचा आत्मविश्वास त्याला सोडून गेलाय. अपयशाचं ओझं घेऊन तो फलंदाजीला जातो असं वाटतं. त्यामुळे त्याचं फुटवर्क नेहमीसारखं नसतं. त्याची फटक्यांसाठीच्या चेंडूची निवड चुकते. कोहलीप्रमाणे मानसिक निग्रह त्याला दाखवावा लागेल.
कोहलीने धावांचं अख्खं ओझं उचललं. एक बॅग खांद्यावर होती, एक डोक्यावर, एक पाठीवर, दोन हातात. इतरांनी मिळून फक्त ‘पिशव्या’ उचलल्या.
मग कसं जिंकणार? क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे आपण विसरलोय का?
त्यामुळे गोलंदाजांची चांगली कामगिरी मातीमोल ठरली.
सामी दुखापतीतून उठलाय. घरच्या वादळातून कसाबसा सावरलाय, पण त्याने चांगले स्पेल टाकले.
इशांत शर्माचा तो स्फोटक स्पेल जवळजवळ मॅच आपल्या बाजूने फिरवून गेला होता. त्याचा त्या स्पेलमधला टप्पा, दिशा आणि स्विंग तिन्ही गोष्टी परफेक्ट होत्या, पण असे स्पेल तो वारंवार का टाकत नाही?
पण सगळय़ात महत्त्वाची होती अश्विनची गोलंदाजी. ‘परक्या’ खेळपट्टय़ांवर तो मॅचविनर नाही हा त्याच्यावरचा डाग तो पुसण्याचा प्रयत्न करतोय. अतिविविधता नाही. चेंडूच्या वेगात योग्य बदल आणि अचूक दिशा यावर त्याने नव्या चेंडूवरही इंग्लिश फलंदाजांना नाचवलं. पण तरीही मॅच विराट कोहलीची होती.
1952 साली लॉर्डस्वर विनू मंकडने एक अर्धशतक, एक शतक आणि पाच बळी घेतले होते. त्याला विनू मंकडची मॅच म्हणतात.
एजबॅस्टन कसोटी ही त्या धर्तीवर विराट कोहलीची कसोटी आहे.
दोघांमध्ये एक साम्य आहे. दोन्ही परफॉर्मन्सला यशाचं कुंकू लागलं नाही.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.