आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
गेल्या काही वर्षांपासून “असहिष्णुता” या एका शब्दाभोवती भारतातल्या सर्व चर्चा फिरत आहेत.
सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारच्या नेत्यांनी, पक्षाने अनेकदा असहिष्णुता जोपासणाऱ्या तत्वांना थारा दिला असा आरोपही वेळोवेळी होत असतो.
पण असहिष्णुतेचा भारतातला इतिहास हा काही फक्त अलीकडच्या काळातला नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका कवीला तुरुंगात डांबण्यात आल्याचा इतिहास या वैचारिक चर्चेत भाग घेणाऱ्या खूप कमी लोकांना माहीत असतो.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका कवीला तुरुंगात डांबलं होतं.
आणि त्यामागे कारण इतकंच होतं ही त्या कवीने सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या विरोधात कविता लिहिली होती.
पंतप्रधानांनी तुरुंगात डांबलेला हा का कवी कोण? पाहूयात..
कोई हम-दम न रहा कोई सहारा न रहा
हम किसी के न रहे कोई हमारा न रहा।
शाम तन्हाई की है आएगी मंज़िल कैसे
जो मुझे राह दिखा दे वही तारा न रहा।
ऐ नज़ारो न हँसो मिल न सकूँगा तुम से
तुम मेरे हो न सके मैं भी तुम्हारा न रहा।
क्या बताऊँ मैं कहाँ यूँही चला जाता हूँ
जो मुझे फिर से बुला ले वो इशारा न रहा।
असं आपल्या काव्यातून मांडणारा एक शायर होता. त्यानी कित्येक चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पण तो स्वतः मात्र आपल्या गाण्यांना नौटंकी म्हणत असे.
राजकारण आणि राजकारण्यांशी ३६ चा आकडा असल्याने त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं.
पण लेकिन, मार्क्सच्या विचारांचा वाचक असलेला तो, प्रस्थापित शासनकर्त्यांसमोर झुकला नाही. हा शायर होता मजरुह सुल्तानपुरी. मजरूह म्हणजे जखमी.
अशा मनावर खोलवर झालेल्या जखमांमुळे त्यांच्या लेखणीतून जे शब्द उमटले ते अजरामर झाले.
मजरुह सुल्तानपुरी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ मध्ये झाला. ते एक भारतीय उर्दू शायर होते.
ते हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गीतकार होते आणि प्रगतीशील आंदोलनातील उर्दूमधील सर्वांत मोठ्या शायरांपैकी एक होते.
२०व्या शतकातील उर्दू साहित्य जगतातील नामवंत काव्य रचनाकारांमध्ये त्यांची गणना होत असे.
कालांतराने ते बॉलीवुडमध्ये गीतकार म्हणून नावारूपास आले. त्यांनी आपल्या काव्यातून देश, समाज आणि साहित्याला नवीन दिशा देण्याचे काम केले.
विश्वविद्यालय अनुदान आयोगातर्फे सुल्तानपुर जिल्ह्यातील गणपत सहाय्य कॉलेजमध्ये “मजरुह सुल्तानपुरी यांच्या गझलच्या आरशातून” या नावाने मजरूह सुल्तानपुरी यांच्यावर राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या प्रमुख विश्वविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या सेमिनारमध्ये भाग घेतला होता.
मजरुह यांनी उर्दू भाषेला एक नवीन उंची प्राप्त करून दिली होती.
मजरूह यांचा जन्म सुल्तानपुर मधला. त्यामुळे त्यांच्या शायरीत या प्रदेशातील भाषेची झलक पाहायला मिळते.
त्यांच्या सुप्रसिद्ध काव्यामधील ‘मै अकेला ही चला था, जानिबे मंजिल मगर लोग पास आते गये और कारवां बनता गया’ ही रचना प्रसिद्ध आहे.
मजरुह यांच्या श्वासश्वासात होती गझल
मजरूह सुल्तानपुरी यांनी बाबू जी धीरे चलना पासून ते आज में ऊपर…आसमाँ नीचे अशी अनेक गाणी लिहिली.
चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे, या दोस्ती चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना पाहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.
पण त्यांनी कधीच स्वतःची संगीतबद्ध गाणी ऐकली नाहीत. निर्माता झाल्यावर ते अनेक चित्रपटांसाठी सहकार्य करायला जात.
तुमसा नहीं देखा, पिया तू अब तो आजा, यादों की बारात, हम किसींसे कम नहीं, जो जीता वोही सिकंदर, अकेले हम अकेले तुम या मजरूह यांच्या काही सर्वात जास्त लक्षात राहिलेल्या रचना.
मजरूह असे शायर होते जे स्वतःच्या गझलांमध्ये जगले. त्यांनी नौशादपासून अनू मलिक, जतिन-ललित, ए आर रहमान आणि लेस्ली लेविस इतक्या सगळ्यांबरोबर काम केले होते.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले मजरुह हे पहिलेच गीतकार होते.
असा हा माणूस एके काळी नेहरूंवरती शेर लिहून थेट जेलमध्ये पोचला होता. ही गोष्ट भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची आहे. गावोगावी स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल जल्लोषाचे वातावरण होते.
स्वतः मजरूह सुल्तानपुरी यांनी इसवीसन १९४७ मध्ये प्रगतीशील लेखकांबरोबर स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर खूप मोठी बांबूची लेखणी तयार करून मिरवणूक काढली होती.
कारण त्यांच्या मते, स्वतंत्र देशामध्ये लेखणीचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक होते.
शोषितांचा कळवळा असणाऱ्या मजरूह यांना या स्वतंत्र देशात समानतेच्या अधिकारासाठी चळवळ हवी असे वाटत होते.
एक दिवस कामगारांच्या एका सभेत मजरूह सुल्तानपुरी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर एक शेर ऐकवला.
नेहरू आणि खादीच्या विरोधात लिहिल्या गेलेल्या या गाण्याने त्या काळातील शासनकर्त्यांना अत्यंत क्रोधित केले.
मोरारजी देसाई (मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर) यांनी मजरुह यांना ऑर्थर रोड जेलमध्ये टाकले आणि त्यांनी लिहिलेल्या गाण्यासाठी त्यांना माफी मागायला सांगितली.
पण त्यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आणि दोन वर्षें कारागृहात राहण्याची शिक्षा मान्य केली.
कारागृहात असताना सुद्धा या कलाकाराची कीर्ती सर्वदूर पोहोचली होती.
सुल्तानपुरीची गाणी, शेर देशातील हरेक मुलाच्या, तरुणाच्या तोंडावर होते. त्याच्या या प्रसिद्धीमुळे शासनकर्त्यांना अखेर मजरूह यांना कैदेतून मुक्त करावंच लागलं.
ते शेवटपर्यंत चित्रपटांशी जोडलेले होते. २४ मे २००० रोजी न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते ८० वर्षांचे होते.
तर ही होती पिडितांची कैफियत मांडणाऱ्या एका काव्य रचनाकाराचा शासनकर्त्यांविरोधातील बंडाचा एक किस्सा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.