Site icon InMarathi

चीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…!

shivaji-china inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचे आद्यदैवत आहे. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे हे “छत्रपती शिवाजीराजे भोसले” एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा होते.

त्यांची उंची भलेही कमी होती… पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात

शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपण

असे अनेक उच्च कोटीचे गुण होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जे आज प्रत्येकाला प्रेरणा देणारे ठरताहेत.

 

 

शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला. महाराजांनी मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.

त्यावेळी आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य अतिशय बलाढ्य होते पण महाराष्ट्रात त्यांचे शासन हे स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर अवलंबून होते.

हे सरदार/किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्यांच्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

त्यामुळे आजही शिवाजी महाराजांना सर्वात उत्कृष्ट शासनकर्ता म्हणून बघितले जाते.

त्यांची ही महती केवळ महाराष्ट्रापुरती नसून भारतभर एव्हाना जगभर पसरलेली बघायला मिळते.

 

 

आज महाराजांच्या ह्याच महतीची आणखी एक कहाणी आपण ऐकणार आहोत.

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते ‘अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारका’चे उद्घाटन करण्यात आले.

एवढंच नाही तर तवांग ते बुम्ला या २२ किमी मार्गाला ‘छत्रपती शिवाजी मार्ग’ असे नावही देण्यात आले. तवांगमधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे.

म्हणजेच राजे आपल्या करड्या नजरेतुन शत्रुकडे लक्ष ठेऊन आहेत असे समजते.

कर्नल संभाजी पाटील निवृत्तीनंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला

“जय हिंद सर, दोरजी खांडु बोल रहा हुँ सर…”

कर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला तो अरुणाचल प्रदेश आणि तिथला सकाळी सूर्याच्या किरणांनी सोनेरी होणारा हिमालय.

कर्नल संभाजी पाटील हे १९८३-८४ मध्ये २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटचे कमांडर म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी तवांग ते बुम्ला हा रस्ता तयार करण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली होती.

 

हे ही वाचा – बिझनेसमन किंवा नोकरदार: छ. शिवाजी महाराजांचे हे १५ गुण अंगी नक्की बाळगा

हा रस्ता म्हणजे भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे. संरक्षणदृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुप मोठे आहे. सीमेवरील सैनिकांना जलद रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता.

मराठा लाईट इंफंट्रीच्या २००० जवानांनी उणे ३०℃ तापमानात काम करुन केवळ पाच महिन्यात हा बावीस किमीचा मार्ग तयार करुन दाखवला होता.

समुद्र सपाटी पासुन तब्बल १२४०० फुट उंचीवर असणारा अरुणाचल प्रदेशातील हा अतिशय दुर्गम असा भाग आहे. अशा भागात काम करणे खुप अवघड असते.

रस्ता बांधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे आवश्यक होते.

या सगळ्या कामात कर्नल संभाजी पाटलांची ओळख दोरजी खांडु या तवांग भागातील एका उत्साही युवा नेतृत्वासोबत झाली.

पुढे त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली.

दोरजी खांडु नित्यनेमाने मराठा लाईट इंफंट्री युनिटला भेट देत असत, तसेच युनिटला काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत.

या काळातच त्यांना मराठा लाईट इंफंट्रीच्या बेळगाव येथील मुख्यालयात खास प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

दोरजी खांडु व मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांमध्ये एक अतिशय चांगले नाते निर्माण झाले होते.

हेच खांडु नंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

 

 

 

मराठा लाईट इंफंट्री युनिटने बांधलेला हा २२ किलोमीटरचा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव आणि २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांचे देशासाठी दिलेले खुप मोठे योगदान होते.

हा रस्ता केवळ कर्नल संभाजी पाटील व दोरजी खांडु यांच्या मैत्रीचेच प्रतिक नाही, तर पश्चिमेकडील मराठी आणि अतिपुर्वेकडील अरुणाचली नागरिकांच्या मैत्रीचेही ते प्रतिक आहे.

दोरजी खांडु यांनी या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर स्थानिक अरुणाचली बांधवांच्या वतीने २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते. इंफंट्रीच्या सर्व जवानांचा त्यात गौरव करण्यात आला.

त्यावेळी त्यांनी काही रोख रक्कम बक्षीस म्हणुन २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटसाठी देऊ केली. परंतु इंफंट्रीच्या सर्व जवानांनी ती रक्कम साभार परत केली आणि अरुणाचली बांधवांना विनंती केली की,

“हा रस्ता महाराष्ट्र-अरुणाचल मधील बांधवांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. या रस्त्याला तमाम महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे.

तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दोन स्मारके उभी करावीत.

त्यातले एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरे या रस्त्यातील एखाद्या महत्वाच्या ठिकाणी असावे.”

 

 

दोरजी खांडु आणि स्थानिक अरुणाचली बांधवांनी कसलाही वेळ न लावता तात्काळ ही मागणी मान्य केली. मराठा लाईट इंफंट्रीने निर्माण केलेला तवांग-बुम्ला रस्ता आज छत्रपती शिवाजी मार्ग या नावाने ओळखला जातो.

पुढे दोन महिन्यातच अरुणाचल बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अर्धाकृती स्मारक तवांग-बुम्ला रस्त्यावरील एका महत्वाच्या जागी उभारले. तसेच तवांग येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा ही उभा केला.

शिवछत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसोबत दोरजी खांडु यांना मराठा लाईट इंफंट्रीचे स्फुर्तीगीत खड्या आवाजात गाताना बघुन अनेकजणांना आश्चर्य वाटले.

मर्द आम्ही मराठे खरे, शत्रुला भरे कापरे ।
देश रक्षाया, धर्म ताराया,
कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।।

वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो ।
मराठा कधी न संगरातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटे ।
सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।।१।।

व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती ।
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पुर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी ।
घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी, मृत्यु अम्हा पुढे घाबरे ।।२।।

भारता आम्ही तुलाच देव मानतो,
हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो ।
राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ।
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे ।।३।।

बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की …जय !

अशा विजयाच्या घोषणांनी तवांग-बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमुन गेला.

===

हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version