आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
प्रादेशिक भाषेतल्या माध्यमांनी त्या त्या भाषेतल्या लोकांच्या भावविश्वावर प्रभाव टाकला आहे. भारतात आज आठशे पेक्षा जास्त दूरदर्शन चानेल्स चालू आहेत. या माध्यमातून दाखवले जाणारे चित्रपट, मालिका घराघरात मोठ्या प्रमाणावर पहिल्या जातात.
तेलगु भाषेत असलेल्या “सन टीव्ही” या वाहिनीला तर भारतात सगळ्यात जास्त प्रेक्षकांची संख्या असल्याचा मान मिळालाय!
हा मान फक्त प्रादेशिक वाहिन्यांत नाही, तर भारतात दाखवल्या जाणाऱ्या सर्व वाहिन्यांना मागे टाकून या वाहिनीला मिळाला आहे.
यावरून प्रादेशिक वाहिन्यांची लोकप्रियता भारतात किती आहे ते दिसून येते.
मराठीत सर्वात जास्त पहिली जाणारी वाहिनी म्हणजे झी मराठी! त्याखालोखाल कलर्स मराठी, स्टार प्रवाह इत्यादी वाहिन्यांचा नंबर लागतो. पण झी मराठीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका हा आज घराघरात आकर्षणाचा विषय आहे.
संध्याकाळी सातच्या नंतर एकामागोमाग एक या मालिका प्रक्षेपित केल्या जातात आणि हातातली कामे सोडून अत्यंत रस घेऊन त्या पाहिल्याही जातात.
इतर मराठी वाहिन्यांवरही दाखवल्या जाणाऱ्या मालिका तितक्याच आवडीने पाहिल्या जातात. इतक्या की एखाद्या दिवशी मालिका पहायची राहून गेली तर दुसर्या दिवशी त्याचं पुनर्प्रक्षेपण कधी लागेल याची आतुरतेने वाट पाहिली जाते.
या सर्व मराठी मालिकांचे ठरलेले विषय आहेत. त्या विषयांच्या पलीकडे त्या सहसा जाताना दिसत नाहीत.
सर्व मालिकेत कॉमन असणारा विषय म्हणजे लग्न, लग्नानंतरचे किंवा लग्नाच्या आधीचे संबंध इत्यादी.
या एका विषयाच्या भोवती मालिकांचे कथानक फिरत राहते. त्यात या मालिकांमध्ये दाखवली जाणारी पात्रे, जागा, त्यांची राहण्याची ठिकाणे याचाही एक ठराविक बाज आहे. आणि विरोधाभास असा, की हा बाज प्रेक्षकांच्या राहणीमानापेक्षा वेगळा, त्याच्याशी संबंध नसणारा आहे.
मध्यम-उच्चमध्यमवर्ग हा मराठी वाहिन्यांचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग, पण मालिकांत दाखवली जाणारी चकाचक दुनिया आणि या मध्यमवर्गीय प्रेक्षकाचे रोजचे जीवन याचा कुठे ताळमेळ लागताना दिसत नाही.
हा झाला एक भाग, दुसरं म्हणजे लग्न आणि नातेसंबंध वगळता दुसरे विषय माणसाच्या आयुष्यात असतात याची कल्पना या मालिकांच्या लेखकांना असल्याचे दिसत नाही.
लग्न झालेल्या एका मुलीचे/मुलाचे बाहेरचे संबंध, किंवा त्यांच्या दोघांत इतर कारणांवरून चालणारा वाद इत्यादी..
थोडक्यात, “कुटुंब” आणि “लग्नसंस्था” या दोन विषयांवर गोलगोल फिरत राहणारे कथानक, त्यांच्यातले तेच तेच वाद, याव्यतिरीक्त सामान्य माणसाच्या भावविश्वाला, त्याच्या रोजच्या जगण्यातल्या विषयांना हात घालेल अशी मालिका शंभरातून एखादीच म्हटलं तरी चालेल!
कलर्स मराठीवर चालू असलेली “राधा प्रेमरंगी रंगली”, झी वरील “तुझं माझं ब्रेकअप”, “लागीरं झालं जी” या मालिकांनीही कमी-अधिक फरकाने हाच ट्रेंड पुढे चालवलेला दिसून येईल.
झी मराठीच्या “तुला पाहते रे” या येऊ घातलेल्या मालिकेत सुद्धा हाच विषय पण थोड्या वेगळ्या दृष्टीने हाताळला जाईल असा अंदाज आहे.
ट्रेलरमध्ये सुबोध चाळीशीतला आणि त्याची बायको अगदी विशीतली तरुण मुलगी दाखवण्यात आली आहे. खऱ्या जगात अशी किती लग्ने होत असतील?
या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या कथेचा आणि सामान्य माणसातील जगण्यातील गोष्टींचा किती संबंध असेल?
असं असतानाही हे वास्तव नाकारून चालणार नाही की या मालिका आवडीनं पहिल्या जातात. मराठी प्रेक्षक त्यांना डोक्यावर घेतात. “माझ्या नवऱ्याची बायको” या सध्या चालू असलेल्या मालिकेची लोकप्रियता पाहिली तर हे कुणालाही अमान्य होणार नाही.
या लोकप्रियतेलाही कारण आहे. ते म्हणजे –
या मालिका मध्यमवर्गीय महिलांना “टार्गेट अॉडीयंस” च्या भूमिकेत ठेवून बनवल्या जात असतात. त्याचं कथानक या इप्सित प्रेक्षकवर्गाला आवडेल अशा पद्धतीने गुंफण्यात आलेलं असतं.
त्यांच्या मनाला भावेल अशी त्याची रचना केलेली असते. यामागे एक “ट्राइड अंड ट्रस्टेड” मानसशास्त्र आहे. ज्या गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यापेक्षा वेगळ्या, आर्थिकदृष्ट्या वरच्या पातळीच्या असतात त्या जास्त आवडीने पहिल्या जातात.
हेच मानसशास्त्र जाहिरातींच्या बाबतीतही अत्यंत प्रभावीपणे वापरले जाते. आपण जे आहोत त्यापेक्षा आपण जे पाहतोय ते काकणभर जास्त आहे हा कम्फर्ट ती गोष्ट पाहत राहण्यासाठी प्रोत्साहित करत असतो.
ही झाली परिस्थिती. मालिका या पद्धतीने दाखवल्या जातात आणि पहिल्या जातात ही वस्तुस्थिती. “याला पर्याय काय?” हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.
प्रेक्षकांची आहे ती अभिरुची पूर्णपणे वापरून घेण्याचे धोरण या मालिकांचे असते यात वाद नाही. पण ती अभिरुची उंचावण्याचा प्रयत्न क्वचित एखादी मालिका वगळता झाल्याचे दिसत नाही.
नकारात्मक गोष्टी, मालमत्तेचे वाद, गृहकलह, नात्यांतील वाद वगळून रोजच्या जगण्याला हात घालतील असे विषय प्रभावीपणे हाताळता येतील.
ठरलेला टार्गेट क्राउड असला तरी सर्व वयाच्या प्रेक्षकांना आपलं वाटेल असं कथानक, त्याची वास्तवाला स्पर्श करणारी मांडणी करता येईल. ही “कल्चर” आपल्याकडे नव्हती अशातला भाग नाही.
दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात “मालगुडी डेज”, “बुनियाद” यासारख्या कितीतरी मालिका येऊन गेल्या. अस्सल भारतीय जनजीवनाचं चित्रण या मालिकांत झालं आणि प्रेक्षकांनीही त्या तितक्याच आवडीने पाहिल्या.
चांगला कंटेंट भारतात पहिलाच जात नाही ही गोष्ट खरी नाही. तो पाहिला जातो, आणि लोकप्रियही होतो. पण तो बनवला जात नाही ही खरी समस्या आहे. मराठी प्रादेशिक वाहिन्यांनी अशा मालिका बनवण्याला प्राधान्य देणे हाच यावरचा उपाय आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.