Site icon InMarathi

मराठा आरक्षण मोर्चा : राज ठाकरेंचा सरकारला “इशारा” व जनतेला “आवाहन”

raj-thackeray-file-inmarathi

news18.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मराठा क्रांती मोर्चावरून जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या हिताचं राजकारण साधण्याचा पावित्रा घेतलेला असताना, राज ठाकरेंनी मात्र अगदी वेगळा, विचारात पाडणारा पवित्रा घेतला आहे.

काकासाहेब शिंदेंच्या आत्महत्येच्या संदर्भात राज ठाकरेंनी हळुवार भाष्य केलं आहे. आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून राज ठाकरेंनी मराठा तरुणांना भावूक आवाहन केलं आहे. ठाकरेंनी जनतेला आठवण करून दिली आहे की “प्रत्येकाच्या घरी वाट पाहणारे” आपले प्रियजन आहेत.

 

 

राज ठाकरे हे ही म्हणाले आहेत की

“एकाही ‘मराठी’, मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला ‘मराठी’ म्हणून ते परवडणारे नाही.”

राज ठाकरेंनी आरोप केलाय की “महाराष्ट्र फक्त लुटायचं केंद्र म्हणून बघणार्यांकडून” आपल्यावर संकट आहे.

“महाराष्ट्रातील माझ्या भावा-बहिणींना आवाहन आणि सरकारला इशारा” अश्या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली ही पोस्ट कालपासून सोशल मीडियावर गाजत आहे, शेअर होत आहे.

एका राज ठाकरे समर्थकाने त्यावर केलेली कमेंट पुरेशी बोलकी आहे – हा समर्थक म्हणतो –

===

So proud to be your follower.

तुम्हाला एक गंमत सांगतो साहेब, हे भाजपचे सायबरयोद्धे आहेत ना ते काय चावटपणा करतात बघा. वय वर्ष १६ १७ १८ असलेली मुले जी पहिल्यांदा २०१९ ला मतदान करणार त्यांना सांगितलं जातं की मतदान करा पण मोदींनाच. राजकीय दहशतवाद आहे हा… विकसनशील बुद्धेमत्तेच्या लोकांच्या मनावर बिंबवायचं देस खतरे मै है मोदींना मत द्या… सेम टू सेम इस्लामिक स्टेट… भटके हुये नौजवान घडवण्याची पूर्ण तयारी जोमात सुरू केली आहे.

आपल्या प्रस्तुत लेखात तरुणाई हि अश्याच प्रकारच्या ब्रेन ड्रेनला बळी पडलेली आहे.

 

 

===

तुम्हाला राज ठाकरे आवडतात की नाही – हा प्रश्न दुय्यम आहे. शांतपणे विचार केलात, राजकीय आक्रमक वक्तव्याचा भाग बाजूला ठेवलात तर सदर पोस्टमधील मुद्दे नक्कीच विचारात घेण्यासारखे वाटतील.

राज ठाकरेंची पोस्ट :

===

महाराष्ट्रातील माझ्या भावा-बहिणींना आवाहन आणि सरकारला इशारा

मराठा मूक-क्रांती मोर्चाचं ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केलं होतं. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असंही म्हटलं होतं.

काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं.

अर्थात असं असलं तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे

एकाही ‘मराठी’, मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये.

आपल्याला ‘मराठी’ म्हणून ते परवडणारे नाही.

 

 

एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही.

सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत.

वास्तविक “मराठा समाज” म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले.

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून.

जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून.

आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं:

“आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तो परप्रांतीयांची इच्छा”.

त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.

 

 

ह्याचवेळी सरकारला एक इशारा.

सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी.

आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे. तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय?

– ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात.

 

नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची.

दुसरं असं की सरकारला “शांतता आणि सुव्यवस्था” सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत.

आता पुन्हा काही आश्वासनं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचं कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये.

जय महाराष्ट्र! जय शिवराय!

महाराष्ट्राच्या भल्यासाठी सदैव आपल्यासोबत,

| राज ठाकरे

 

 

आशा आहे मराठा – मराठेतर, सर्वच मराठी बांधव राज ठाकरेंच्या आवाहनाचा विचार करेल.

आणि सरकारदेखील मराठा आरक्षणाच्या विषयावर राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर गांभीर्याने वचार करून सर्वांच्या हिताचा तोडगा काढेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version