पोलिसाच्या पाठीवर, लाथ मारलेल्या बुटाचा ठसा असलेला तो फोटो “खराच”…!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या मराठा क्रांती आंदोलनाला समाजकंटकांद्वारे दिलं गेलेलं हिंसक वळण सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे. काल आंदोलन स्थगित करण्याची घोषणा झाली आणि उभ्या महाराष्ट्राने – शासन, प्रशासन, जनता, सर्वांनीच – निश्वास सोडला.
अर्थात, मराठा बांधवांच्या मागण्यांना योग्य उत्तर मिळालं नाही तर पुढे काय होईल हे सांगता येत नाहीच. तूर्तास तरी महाराष्ट्र पूर्वपदावर आला आहे.
ह्या दरम्यात सोशलमिडीयावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता. एका पाठमोऱ्या गणवेशधारी पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाचा ठसा असलेला हा फोटो आणि त्यासोबत असलेलं भावूक कॅप्शन अनेकांच्या हृदयाला भिडलं होतं.
परंतु थोड्याच वेळात ती पोस्ट खोटी आहे, इग्जहीफ डेटा तपासल्यास तो फोटो १७ ऑगस्ट २०१७ रोजीचा असून, मराठा आंदोलनास बदनाम करण्याच्या हेतूने आता शेअर होत आहे अश्या आशयाच्या पोस्ट्स पसरू लागल्या.
त्यामुळे सदर फोटोबद्दल एकूणच संभ्रम निर्माण झाला होता.
परंतु आता, स्पष्ट माहिती समोर आली आहे – ज्यानुसार – सदर फोटो खरा व अत्ताचाच असून, हा प्रसंग खरंच एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुदरला आहे.
पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम राजपूत ह्यांनी स्वतः लिहिलेली पोस्ट अशी :
===
पोलिस भरतीसाठी दरवर्षी अंदाजे १०० जागेसाठी १०,००० उमेदवार या गुणोत्तराने इच्छुक अर्ज करत असतात म्हणजे तुम्हाला नोकरी मिळवायची असल्यास ९९०० जणांना शारीरिक, बौद्धिक पातळीवर मागे टाकून, स्वतःला त्यांच्यापेक्षा सरस सिद्ध करावं लागतं तेव्हा एक तरुण पोलीस बनतो.
पोलीस बनण्यामागे फक्त पगार मिळवणे हा उद्देश मुळीच नसतो कारण रस्त्यावर भाजी विकणारा पण रोज पोलिसांपेक्षा जास्त पैसे कमावतो.
असा अंगात सळसळणारं रक्त असलेला तो तरुण मनात अभिमान, सम्मान, धाडस घेऊन अंगावर पोलिसांची वर्दी घालतो आणि उरलेले ९९०० जण आपल्याकडून हे शक्य नाही म्हणून परत जातात. त्यापैकी जे थोडक्यात हुकलेले असतात ते परत प्रयत्न करतात किंवा ज्यांना आपल्या घराची चाड असते ते कुठेतरी खाजगीत नोकरी करून आपलं घर चालवतात.
उरतात सगळ्यात खालचे ज्यांना काहीच शक्य नसतं ते आपल्या गावाकडच्या एखाद्या राजकारण्याच्या हाताखाली पक्षाचा झेंडा घेऊन जय जय म्हणत मागे फिरत असतात.
मग एखाद्या पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या मोर्च्यामध्ये, आंदोलनामध्ये, एखाद्या दंगलीमध्ये या पोलिसात निवड झालेल्या त्या कर्तबगार तरुणाची आणि त्या काहीच न जमल्यामुळे राजकारण्यांचे तळवे चाटणाऱ्या गाळ गर्दीची आमने-सामने होते आणि इथून पोलिसांची मानसिकता बिघडायला सुरुवात होते.
मोठ्या संख्येत असणारी गाळ गर्दी विनाकारण पोलिसांच्या अंगावर धावून येते, त्यांना शिव्या घालते, मुस्काडीत देते, त्यांची वर्दी ओढून त्यांना लाथा बुक्या घालते आणि तो त्या गर्दीतला सर्वात कर्तबगार तरुण पोलीस गुमान हे सगळं सहन करत असतो.
असेच प्रकार कालच्या मोर्चातपण घडले.
हिंगोली येथे नेमणुकीस असणारे माझे मित्र पोलीस उपनिरीक्षक चेरले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना काल जमावाकडून दगडफेक आणि मारहाण झाली. त्याबद्दल फार मार्मिक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नक्की वाचा
धन्यवाद मित्रांनो .
मि अापला आभारि आहे आज.
मि आज सकाळी ६ वाजलेपासून रात्री १० वाजेपर्यंत रोडवर आपल्यासाठी उभा होतो.
तसा माझा काल एकादशीचा उपवास होता आणि आज सकाळी ६ पासून ते रात्री १० पर्यंत मी रस्त्यावर उभा होतो त्यात संपूर्ण बंद असल्यामुळे हॉटेले बंद होते किराणा दुकानही बंद होते त्यामुळे मला आजही कडकडीत उपवास झाला. पण मला दुःख त्याचा नाही.
मी आज कुणासाठी रोड वर उभा होतो.
आंदोलन करणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांच्या अंगावर कोणी गाडी घालू नये कट मारू नये त्यांना त्रास होऊ नये म्हणून तसेच आंदोलकांनी अडवलेल्या गाड्यांनाही त्रास होऊ नये त्यांच्या गाड्या फुटू नये त्यांना लवकर घरी जाता यावं ते कुठे अडकू नये म्हणून,
येणारि अॅम्ब्युलन्स, मुलांच्या परीक्षा, मुलांच्या शाळा, जाणारा भाजीपाला, अत्यावश्यक सुविधा यांना वेळेवर पोहोचवण्यासाठी मी उभा होतो .
तसा मी नेहमीच उभा असतो तुमच्यासाठी
तसा आमाला पगारही खूप मोठा आहे
आज तर चक्क दुपारून आमच्या साहेबानि आम्हाला पावसात बंदोबस्त करायलावला अर्थात ते हि सोबत होतेच.
आमच्या कामाबद्दल कधी कोनि आम्हाला शाबासकी देत नाही. दुःख यांचही नाही.
आज आम्ही आपल्यासाठी रोडवर उभे होतो तुमच्याच सोयीसाठी सुविधेसाठी आणि याची जाणीव ही तुम्हाला होती किंवा असेल म्हणूनच तुम्हाि मला आज शाबासकी दिली
तुम्ही आज माझी पाठ थोपटली
पण दुःख मात्र एवढ्याच गोष्टीचा आहे की तुम्ही पायाने पाठीवर शाबासकी देण्यापेक्षा हाताने दिली असती तर खूप छान वाटल असत.
तरी असो पुन्हा मि उद्या तुमच्या सेवेसाठी रोडवर उभा असेल.
👮♂आपलाच महाराष्ट्र पोलीस 👮♂
आता यापुढे या पोलिसांकडून जनतेला चांगली वागणूक मिळावी अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. जय हिंद !!
-: विक्रम प्रतापसिंग रजपूत :-
===
ह्या पोस्टवर देखील बराच गदारोळ झाला, आरोप-प्रत्यारोप झाले.
परंतु आज, सत्य समोर आणणारे खुलासे पुन्हा, स्वतः सब इन्स्पेक्टर राजपूत ह्यांनी दुसऱ्या पोस्टद्वारे केले आहेत.
===
पोलिसाला ड्रेसवर त्याच्या कमरेत लाथ मारल्याच्या मी टाकलेल्या पोस्टवरून बरंच वादंग माजलं होतं. पोस्ट चुकीची आहे, खात्री केल्याशिवाय पोस्ट टाकू नका, पोलिसच अश्या बेजबाबदारपणे पोस्ट टाकू लागले तर कसं व्हायचं? हा फोटो एक वर्षांपूर्वीचा आहे, नाहक बदनामी करू नका, काही अतिहुशार लोकांनी तर हे गुजरात पोलीस असल्याचं म्हंटलं होतं.
बऱ्याच न्यूज पेजेसनी पण याला बळी पडून सदरचा फोटो खोटा असल्याची बातमी दिली. त्यामुळे गैरसमज अजूनच वाढला.
ज्या फौजदारसाहेबांवर सदरचा प्रसंग ओढवला त्यांनी स्वतः माझ्या पोस्टवर येऊन कमेंट करून घडलेल्या घटनेचा खुलासा केला तरी त्यावर काहीजणांना त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. बऱ्याच जणांनी मला टार्गेट करून जाब विचारले.
मी शक्यतोवर सर्वांना उत्तर देण्याचा पण प्रयत्न केला.
पण आज हिंगोली लोकमत मध्ये त्या घटनेची शहनिशा करून योग्य खुलासा केलेली बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे शंकेचं ढग दूर होऊन चित्र अगदी स्पष्ट झाले आहे.
माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कि ज्यांनी मला माझ्या त्या पोस्ट वरून मी विशिष्ट समाजद्वेष्टा असल्याचा मनात गैरसमज करून घेतला आणि पसरवला त्यांनी एकदा थोडासा वेळ काढून माझी संपूर्ण प्रोफाइल चेक करावी तुमचा गैरसमज तात्काळ दूर होऊन जाईल.
आम्ही पोलीस कोणत्याही जातीचे धर्माचे नसतो. आमचा धर्म, आमची जात सगळं फक्त पोलीस असतं.
प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. प्रत्येक समाजाला त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी एक नेता लाभलेला आहे. प्रत्येक जात, प्रत्येक धर्म हा आपल्या हक्कासाठी व आपल्या वर झालेल्या अन्यायासाठी लढतो आहे.
पण आमच्या पोलीस जातीला ना तर मते मांडण्याचा अधिकार, ना लढायचा अधिकार, ना आमची बाजू मांडणारा कोणी नेता.
कित्येकदा पोलिसांवर झालेल्या अन्यायाविषयी, मारहाणीविषयी स्वतः पोलीस बोलायला घाबरतात. कुठेतरी वाच्यता केली आणि त्याचा परिणाम म्हणून नोकरीवर गदा आली तर काय करायचं या चिंतेत रोज मिळणाऱ्या ८०० रुपयाला गाठ घालत तो पोलीस मुकाट्याने सगळं सहन करत असतो. पोलिसांना त्यांची नोकरी करण्यापेक्षा वाचवण्याची जास्त चिंता असते.
आम्हा पोलिसांना फक्त कृती जमते. लिखाण करणे, भाषणे करणे हा आमचा पिंड नव्हे. त्यामुळे माझ्या कालच्या किंवा आजच्या लिहिलेल्या पोस्टमध्ये एखादा शब्द चुकीचा लिहिला गेला असेल तर त्या विशिष्ट शब्दासाठी (संपूर्ण पोस्टसाठी नव्हे) मी माफी मागतो.
पण मित्रांनो जेव्हा जेव्हा पोलिसांवर अन्याय होईल, मग तो अन्याय करणारा माझा सख्खा भाऊ असला, तरी तेव्हा तेव्हा त्याविरुद्ध मी माझ्या कुवतीप्रमाणे लिहिणार. पोलीस खात्यात असलो तरी लिहिणार. पोलीस खात्याच्या बाहेर असलो तरी लिहिणार. आणि लिहिल्यामुळे पोलीस खात्याच्या बाहेर गेलो तरीही लिहिणार…!
मित्रांनो पोलिसाला कमकुवत कराल तर सर्वानाश ओढवून घ्याल.
जय हिंद !!
हिंगोली लोकमत लिंक : http://epaperlokmat.in/sub-editions/Hello%20Hingoli/-1/1#Article/LOK_HHNG_20180726_1_11/undefined
(मी माझ्या पोस्ट मध्ये सहसा कुणाला टॅग करत नाही पण काल माझ्यावर विश्वास ठेऊन जे लोक माझ्या समर्थनार्थ उभे राहिले त्यांना मी या पोस्ट मध्ये टॅग करत आहे 🙏🏻)
-: विक्रम प्रतापसिंग रजपूत :-
===
इतकंच नाही – ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत हा प्रसंग घडला – त्यांतील एकाची माहिती देखील पुढे आली आहे.
सदर फोटोत समोर उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव तानाजी चेर्ले असून, ते पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. त्यांनी विक्रम राजपूत ह्यांच्या पोस्टवर केलेल्या कमेंटचा स्क्रोनशॉट पुढे देत आहोत :
सदर प्रकाराविषयी स्थानिक पोलिसांनी नोंदवलेल्या फिर्यादीत देखील चेर्ले ह्यांना झालेल्या दुखापतीचा उल्लेख आहे.
ती फिर्याद पुढे देत आहोत :
सदर फिर्यादीत, शेवटच्या पानावर, चेर्ले साहेबांना झालेल्या दुखापतीचा स्पष्ट उल्लेख आहे.
===
थोडक्यात, हा दुःखद, विमनस्क करणारा प्रसंग खरंच घडला आहे.
अत्यंत शांततापूर्वक आणि खरंतर सर्वच प्रकारच्या आदोलनांसाठी आदर्श ठरू शकतील असे पन्नासहून अधिक मोर्चे काढणाऱ्या मराठा बांधवांना देखील सदर घटनेबद्दल वाईट वाटत असणारच. काही समाजकंटकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होऊ नये, इतकंच ह्या निमित्ताने म्हणावंसं वाटतं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.