Site icon InMarathi

ह्या आफ्रिकन जमातीतील मुले ऑलम्पिकमध्ये भारताकडून खेळतील.. पण त्याचं वास्तव दुखःद आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या भारतामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशांच्या लोकांमध्ये आणि दूर आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या आफ्रिकन लोकांमध्ये इतिहासाचा पुरातन दुवा आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात म. गांधी यांनी आफ्रिके मध्ये त्यांच्या वकिलीची सुरुवात केली होती इतकाच इतिहास आज सर्वसामान्य इतिहास माहीत असणारा भारतीय माणूस सांगू शकतो.

मात्र याही पेक्षा भारत आणि आफ्रिका यांचे नाते जास्त जुने आहे.

भारतात २०,००० पेक्षा जास्त लोक असणारी इंडो-आफ्रिकन जमात राहते. ज्याचं साम्य तर आफ्रिकेत राहणाऱ्या स्थानिक काळ्या लोकांबरोबर आहे मात्र त्यांचा पेहराव, चालीरीती, भाषा मात्र भारतीय आहेत.

होय तुम्ही वाचताय ते सत्य आहे!

भारतात सिद्दी या नावाने इंडो आफ्रिकन ट्राईब किंवा ज्याला आपण कम्युनिटी म्हणू शकतो अशी जमात राहते. ज्यांची पाळेमुळे तर आफ्रिकेतील आहेत. ज्यांचे पूर्वज भारतात आफ्रिकेतून आले होते.

 

dnaindia.com

सिद्दी जमात आज प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात मध्ये बॉर्डर वरच्या काही भागात आढळते. यातील बहुसंख्य लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. उरलेले लोक ख्रिश्चन झालेले आहेत.

आफ्रिकन दिसणारी माणसे जेव्हा स्थानिक भाषा बोलायला लागतात किंवा साडी सारखा भारतीय पेहराव घालून तुमच्या समोर येतात तेव्हा त्यांच्याकडे बघून आपल्याला बुचकळ्यात पडल्यासारखे होते.

हे लोक इथे कसे आणि कधीपासून आले या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मग आपसूकच इतिहासाची पाने चाळली जातात.

 

india.com

इतिहास जरा चाळून पाहिला तर या लोकांचे पूर्वज आफ्रिकेतील बांटू जमातीचे लोक आहेत असे उपलब्ध कागदपत्रे आणि काही ऐतिहासिक दस्तावेज पाहून समजते.

यांचे पूर्वज भारतात आले ते गुलाम म्हणून. भारतावर आक्रमण करणाऱ्या तुर्की, मुघल आणि युरोपियन लोकांनी यांना गुलाम म्हणून स्वत:च्या सेवेसाठी भारतात आणले होते.

याची सुरुवात आहे साधारणपणे ६-७ व्या शतकातील. या लोकांना त्या काळी हबशी या नावाने ओळखले जात असे. त्या काळापासूनच हे लोक कायम गुलाम म्हणून वागवले गेले.

 

pinterest.com

१९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी जेव्हा गुलामगिरीची प्रथा नष्ट होत गेली तसतसे हे हबशी संख्येने कमी दिसू लागले.

अनेक लोक आपल्या ठिकाणी परतून गेले, खूप जण याच मातीत मेले आणि ज्यांना परत जाण्याची इच्छा नव्हती ते लोकांपासून दूर राहू लागले. त्यांनी जंगलाचा आश्रय घेतला. नदीच्या कडेला जंगलाच्या आश्रयाने शेती करायला सुरुवात केली.

आजही यांच्यातील लोक गावाच्या संस्कृती मध्ये फारसे मिसळलेले नाहीत. याचं कारण त्यांना इच्छा नाही असे नाही, पण त्यांना आजूबाजूच्या लोकांनी वाळीत टाकले आहे.

आपले म्हणून त्यांना स्वीकारलेले नाही हे देखील आहे.

तसं पाहायला गेलं तर हे लोक दिसताना आफ्रिकन दिसतात पण ते तसे आपल्या मातीत पूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांचे कपडे, भाषा ही पूर्णपणे स्थानिक बनली आहे.

आजही त्यांच्याबरोबर बाकीचे लोक रोटीबेटी व्यवहार करत नाहीत त्यामुळे त्यांच्यात आपापसातच लग्ने होतात. आजही या लोकांना तसे बाहेरचे म्हणूनच पाहिले जाते.

 

101india.com

यांना अजूनही आपल्या देशाने आपले म्हणून स्वीकारले आहेत का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल.

हे लोक आजही राज्यांपेक्षा त्याच्या बॉर्डरवर असलेल्या जंगलाच्या जवळ वाड्या वस्त्या करून राहतात. यांची मुले आफ्रिकन वंशाची असल्यामुळे ताकद आणि चपळपणा याच्यामध्ये अव्वल आहेत.

याच कारणासाठी १९८० मध्ये सिद्दी जमातीला भारतामध्ये सामावून घेण्यासाठी सरकारी पातळीवर पहिल्यांदा प्रयत्न झाले होते.

भारताच्या स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडिया या संस्थेने या जमातीच्या मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून घडवण्यासाठी पहिल्यांदा पावले उचलली होती.

या जमातीचे अनेक लोक गरीब आहेत. ते निरक्षर आहेत. निरक्षर असल्यामुळे त्यांना नोकऱ्या नाहीत.

 

bbc.com

स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने जी मुले खेळात प्राविण्य दाखवू शकत होती त्यांना पुढे आणण्यासाठी प्रकल्प सुरु केला गेला.

त्यासाठी सिद्दी जमातीची भारताला ओळख व्हावी म्हणून स्पेशल एरिया गेम प्रोजेक्ट सिद्दी ज्या परिसरात राहत होते तिथे बनवले गेले. पण दुर्दैवाने काही वर्षात हा प्रोजेक्ट लाल फिती मध्ये अडकवून गुंडाळला गेला.

यामध्ये सहभागी असलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या गावकुसाबाहेरच्या वस्त्यांमध्ये परत पाठवले गेले.

भारत सध्या २०२४ च्या ऑलिम्पिक साठी जे खेळाडू तयार करत आहे त्यामध्ये या सिद्दी जमातीच्या मुलांचा समावेश आहे अशी बातमी आहे.

ही बातमी खरी ठरेल अशी आपण आशा करूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version