Site icon InMarathi

अभिनयापेक्षा कातडीच्या रंगाला महत्त्व देणारे बॉलिवूड, वाचा नवाजुद्दीनचे कडवट अनुभव

navazuddin-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – ऍड. अंजली झरकर

===

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या टॅलेंट बद्दल कुणालाही शंका नाही. अत्यंत तळागाळाच्या परिस्थितीमधून पुढे आलेला गुणी अभिनेता म्हणून आज त्यांची ओळख आहे. पीपली लाईव्ह पासून नजरेत आलेल्या या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्याचे रोल हे पठडी मधल्या कॅरेक्टरपेक्षा वेगळे असतात.

“बजरंगी भाईजान” मधला त्याचा पत्रकार चांद नवाब आठवा. जर तो नसता तर फिल्म कशी आणि किती रंगली असती?

 

 

चांद नवाबच्या हजरजबाबी कॅरेक्टरने चित्रपटात नवीन रंग भरले आणि सलमान खानला नवाजुद्दिन सोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

रईसमध्ये शाहरुख खान समोर नवाजने अशीच तगडी स्पर्धा उभी केली होती. तर तलाशमध्ये त्याचा रोल छोटा असूनही आमीर खानच्या समोर तो ठळकपणे उठून दिसला होता.

अर्थात अभिनय हा एक भाग झाला पण नवाजला मुख्य अभिनेत्याची जागा कदाचित कधीच मिळू शकणार नाही हे कटू सत्य आहे.

याचं कारण आहे बॉलीवूडमध्ये चालणारा वर्णभेद.

अभिनेता किंवा अभिनेत्री कामाच्या बाबतीत कितीही प्रामाणिक, चांगली, उत्तम असेल तरी काळा रंग आणि सर्वसामान्य रूप बॉलीवूडला खपत नाही.

 

 

नवाजुद्दिनचा “बाबूमोशाय बंदुकबाज” नावाचा चित्रपट येऊन गेला. त्या संदर्भात या चित्रपटाचा कास्टिंग डिरेक्टर संजय चौहानने मीडिया समोर इंटरव्ह्यू देताना नवाज बद्दलची त्यांची मते सांगितली. नवाजसमोर जास्त सुंदर आणि गोरे चेहरे कास्ट करता येत नाही कारण नवाज दिसायला अत्यंत सामान्य आहे आणि त्याचा रंगही जास्त उठावदार नाही अशी टिप्पणी चौहानने केली.

या चित्रपटात बिदिता बाग नावाच्या अभिनेत्रीला नवाजची हिरोईन म्हणून कास्ट करण्यात आले आहे. तिला कास्ट केले गेले कारण ती नवाज समोर जास्त गोरी किंवा देखणी वाटत नाही असंही स्पष्टीकरण चौहानने दिलं.

चौहानचा हा बाईट आल्यावर नवाजने आपल्या ट्वीटर वरून त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

“मी दिसायला काळा आणि देखणा नसल्यामुळे मला सुंदर आणि गोऱ्या लोकांबरोबर काम करण्यास प्राधान्य दिले जात नाही याची आठवण करून दिल्याबद्दल आभार. मी या गोष्टींच्या आता पलीकडे गेलो आहे. मी याकडे कधीही लक्ष दिले नाही”

असे मार्मिक प्रत्युत्तर नवाजने दिले.

 

हे ही वाचा – या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

धनुषची “रांझना” द्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री होवून बराच काळ लोटलाय. त्यानंतर त्याचं नाव फारसं कुठं ऐकू आलं नाही किंवा दिसलं नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे त्याची अॅक्टींग खराब आहे म्हणून नाही. कारण बॉलीवूडला काळ्या रंगाचं फार जास्त वावडं आहे म्हणून सुद्धा.

श्रीदेवीला आठवा. तिचे कुठलेही जुने फोटो पाहा. सावळा चेहरा, बसकं नाक, जाड ओठ, कुरळे केस अशा द्राविडीयन सौंदर्याचा ती उत्तम नमुना होती.

ज्या दक्षिणेत तिचा जन्म झाला होता तिथले सौंदर्याचे परिमाण हे उत्तर भारतात प्रचलित असलेल्या गोरी त्वचा, कमनीय बांधा या मापदंडापेक्षा मैलो दूर होते.

जेव्हा दक्षिणेतून भानुरेखा गणेशन, रेखा हे नाव घेऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी हिंदीत आली तेव्हाही तिच्या काळ्या रंगाचा लोकांनी कमालीचा तिरस्कार केला होता. हीच गोष्ट श्रीदेवीची सुद्धा झाली होती.

 

 

दक्षिणेत कमल हसन आणि रजनीकांत या दादा लोकांबरोबर लेडी सुपरस्टार म्हणून तिच्या सशक्त अभिनयाच्या जोरावर जे बिरूद तिने कमावलं होतं, त्याची बॉलीवूडला तरी काहीच किंमत नव्हती.

ती बॉलीवूडला हव्या असलेल्या सौंदर्यांच्या मापदंडामध्ये बसणार नव्हती. तिला बदलावं लागलं.

शरीरावर आणि चेहऱ्यावर सुऱ्या फिरवून घेवून तिला त्या मापदंडामध्ये स्वत:ला बसवावं लागलं. जो नट किंवा नटी गोरी, सुंदर, देखणी असेल तरच त्यांना लोक पडद्यावर स्वीकारतात आणि अशाच याच लोकांनी बॉलीवूड भरलेलं आहे.

 

 

जर एखादा धनुष किंवा नवाजुद्दीन सिद्दिकी अशा गोऱ्या देखण्या स्टार्स लोकांना टक्कर देत असेल, स्वत:च्या अभिनयाने मात देत असेल तर त्याला त्याच्या काळ्या रंगावर किंवा सामान्य व्यक्तीमत्वावर जाहीर भाष्य करून त्यांची लायकी दाखवण्यासाठी बॉलीवूड सदैव एका पायावर तयार राहते. किमान तीच बॉलीवूडची खासियत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version