' आपल्या मुलांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून वेळीच अडवा – हा लेख जरूर वाचाच – InMarathi

आपल्या मुलांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून वेळीच अडवा – हा लेख जरूर वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका – वसुधा देशपांडे

===

मुलं गुन्हेगारी मार्गाकडे का बरं वळत असतील? गुन्हेगारी मानसिकता तयार होण्याची कारणे काय असावीत? मानसिकता विकसित होणे, तयार होणे ही क्रिया खूप क्लिष्ट असते.

लहान मुलं जेव्हा गुन्हेगारीकडे वळतात तेव्हा त्या अनुषंगाने मुलांची मानसिकता अभ्यासणे आवश्यक वाटते.

मानसिकता म्हणजे विचार करण्याची ठराविक पद्धत. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्याच्यावर आपल्या श्रद्धा-अंधश्रद्धा, मूल्य, अनुभव, शिक्षण, समाज ह्यांचा पगडा असतो.

विचार करण्याची ही पद्धत अर्थात आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक असतो. कारण, ह्या पद्धतीवर आपले विचार, भावना आणि वागणं अवलंबून असतं.

कोणत्याही दृष्टिकोनाचे हे तीन महत्वाचे घटक असतात. ह्या दृष्टीकोनाच्या आधारावरच आपण परिस्थितीशी लढा देऊ शकतो किंवा जुळवून घेऊ शकतो किंवा पळही काढू शकतो.

 

juvenile-marathipizza

 

मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना, त्याच्यावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.

१.पालकत्वाचा प्रकार :

पालकत्वाचा प्रकार आणि गुन्हेगारी मानसिकता ह्या विषयावर बराच अभ्यास झालेला आहे. पालकत्व आणि गुन्हेगारी ह्यांचा जवळचा संबंध असतो, हे सिद्ध झाले आहे.

(Glueck, 1962; Gold, 1963; Hirschi, 1969). Hoeve आणि त्याचे सहाय्यक (२००९) ह्यांनी केलेल्या संशोधनानुसार पालकत्वाचा प्रकार आणि गुन्हेगारी मानसिकता ह्यांचा संबंध असतो हे सिद्ध झाले आहे.

पालकांचं मुलांशी वागणं ठरतं ते दोन बाबींवर. १)सुरक्षित वातावरण व प्रेम (safety & security) आणि २) नियम.

ह्या दोन बाबींवर मुलांकडे पाहण्याची तसेच आयुष्याकडे पाहण्याची पालकांची मानसिकता, मुलांची मानसिकता घडवत असते.

आता पहा, पालकांना असे वाटते कि मुलांनी अजिबात चुकायला नको, perfect असायला हवं. चुकणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने गुन्हा असतो. म्हणूनच चुकीला कडक शिक्षा केली जाते.

तेव्हा मुलांची मानसिकता तशीच तयार होऊ लागते. मुलं विचार करू लागतात, ‘मी अजिबातच चुकायला नको.’ मग छोट्या छोट्या चुकांसाठी त्यांना अपराधी वाटू लागतं.

स्वत:ला दोष देण्याची वृत्ती वाढू लागते. मुलांसाठी नियम असतात पण प्रेमाची ऊब मात्र नसते. safety कदाचित असेलही पण security मात्र नसते. security म्हणजे आपण सेफ असणार आहोत हा विश्वास.

 

parenting inmarathi
the indian express

 

हेच – उलट – जेव्हा आई-वडील ठरवून टाकतात ही, “त्याला त्रास व्हायला नको”. मग ते त्याच्यासाठी सगळं करून ठेवतात. त्याला जरासं कुठे लागलं, खरचटलं तरी त्याची खूप काळजी घेतात.

दु:खाची झळ त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही तेव्हा मुलांना सगळं जग सोपं वाटू लागतं. मेहनत करणे, वाट पाहणे, थोडासा त्रास सहन करणे ह्याची मानसिकता तयारच होत नाही.

प्रेमाची ऊब असते पण नियम मात्र नसतात. कंट्रोल नसतो.

ह्याऐवजी जेव्हा आई-वडिलांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. मुलांकडून कसल्याच अपेक्षा नसतात. मुलांना कुठे कंट्रोल केले जात नाही. आणि मायेची उबही मिळत नाही.

मुलाकडे पाहण्यासाठी आई-बाबांना वेळ नसतो. मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा मुलं वयापेक्षा लवकर मोठी होतात. त्यांच्यालेखी भावनेला जागा नसते.

इतरांपासून तुटलेली, एकाकी होत जातात. सैरभैर होतात कसं वागायचं हेच त्यांना कळत नाही. शिक्षा आणि बक्षीस हि दोन शस्त्र असतात. मुलांना मुल्य शिकविण्यासाठी ती वापरली जाऊ शकतात.

 

indian kid criminal inmarathi
lexpress

 

आणि जेव्हा पालकांचं मुलांकडे लक्ष असतं. प्रेम असतं. लवचिक नियमही असतात. मुलांचा स्वीकार केला जातो. त्यांच्या सद्गुणांच कौतुक होतं. त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाते.

त्यांचं मत विचारात घेतलं जातं. तेव्हा मुलं आई-वडिलांशी आणि जगाशीही जुळली जातात. मग स्वत:ला तसेच जगाला स्वीकारण्याची, परिस्थिती हाताळण्याची मानसिकता तयार होत जाते.

एक जबाबदार व्यक्ती तयार होऊ लागते. घरातून मिळणारं सुरक्षित वातावरण एका चांगल्या व्यक्तिमत्वाची सुरुवात असते.

मानसिकता तयार होण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे मुलांच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण होणे.

ज्याठिकाणी त्या पूर्ण होतात त्या ठिकाणी मुलांची ओढ जास्त असते. मग त्या गोष्टीबाबत, व्यक्तीबाबत आपोआपच सकारात्मक मानसिकता तयार होते.

म्हणजे, जर प्राथमिक गरजा घरांत पूर्ण होत नसतील तर मुलं त्या जिथे पूर्ण होतात त्या ठिकाणी वळतात. आता जेव्हा मुलांना घरातून चांगलं वातावरण सोडा, त्यांना घरचाच अभाव असतो.

 

indian parenting inmarathi

 

आई-वडील असतील तर ते त्यांना सांभाळण्यासाठी योग्य नसतात. फक्त neglectfulच नाही तर ते toxic parents ह्यावर्गात मोडतात. Toxic parents म्हणजे असे आई-वडील ज्यांच्यापासून मुलांना धोका असतो.

म्हणजे, ते अत्याचार करणारे असू शकतात किंवा मानसिक रित्या आजारी असू शकतात, गुन्हेगार असू शकतात, व्यसनी असू शकतात.

अशा ठिकाणी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण होणे कठीण असते तसेच त्यांना प्रेम आणि नियम दोन्हीही मिळणे शक्य नसते. मिळाले तरी सातत्याने नसते ह्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊ लागतो.

२. अनुभव –

लहान मुलांची मानसिकता जेव्हा तयार होते तेव्हा त्यांना समाजाकडून आलेले सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव फार महत्वाची भूमिका बजावतात.

एखाद्या गोष्टीबद्दलचे सकारात्मक अनुभव सकारात्मक मानसिकता तयार करतात तर नकारात्मक अनुभव नकारात्मक मानसिकता तयार करतात.

म्हणूनच जेव्हा मुलं सुरक्षित वातावरणात वाढतात, त्यांच्या हसण्या-बोलण्याचं कौतुक होतं, त्यांच्या रडण्याला, हाकेला तत्परतेने प्रतिसाद मिळतो तेव्हा जगाबद्दल, स्वत:बद्दल सकारात्मक मानसिकता तयार होते.

ह्याउलट वातावरणातून आलेले नकारात्मक अनुभव आईवडिलांच्या प्रेमाचा अभाव, दुर्लक्षित ठेवणे, मानसिक, शारीरिक अथवा लैंगिक अत्याचार, मुलांच्या मनात नकारात्मक मानसिकता तयार करू शकतात.

मुलांना जेव्हा जन्मल्यापासून सतत असुरक्षित वातावरण, प्रेमाचा अभाव ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते तेव्हा जगाबद्दल राग, भीती मनात घर करू लागते.

 

indian guy sad inmarathi
times of india

 

३. शिक्षण –

शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तके, शालेय शिक्षण नव्हे. तो खूपच संकुचित अर्थ झाला. ह्या ठिकाणी शिक्षण म्हणजे सारासार विचार करण्याच, निर्णय घेण्याचं शिक्षण.

मुलं अनुकरणातून आणि अनुभवातून शिकत असतात. शिक्षा आणि बक्षीस हि दोन्ही पालकांच्या आणि शिक्षकांच्या हातातली शस्त्र असतात.

जेव्हा चुकीच्या वागण्याबद्दल शिक्षा आणि योग्य वागण्याबद्दल कौतुक होते. तेव्हा मुलं कसं वागायचं हे ठरवू शकतात. जेव्हा ह्याचा अभाव असतो तेव्हा कसं वागायचं तेच कळत नाही.

 

parents-with-child-marathipizza

 

मुलांमध्ये भावनेवर ताबा ठेवणे हा प्रकार नसतो पण भावना मात्र असतात. भावनेच्या आहारी जाऊन वागलं कि, विचार मागे पडतो.

म्हणजे मग विचार असतो तो फक्त आत्ता मला काय वाटतंय, एवढाच. मग त्याच प्रकारे वागलं जातं.

मग हि मुलं व्यसनाधीन होऊ शकतात. नैराश्य, चिंता अशा आजारांना बळी पडू शकतात. भावनांवर नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीकडे वळू शकतात!

स्वत: अत्याचाराला सामोरे गेल्यामुळे, तसंच वागायचं असतं असा विचार करून आपल्यापेक्षा ताकदीने कमी असणाऱ्यांवर अत्याचार करू शकतात.

मुलं कोवळी असतात. ओल्या मातीची असतात. हे असचं जगायचं असतं हे त्यांना काहीच न कळायच्या वयापासुन कळलेलं असतं.
~ वपु काळे | ऐक सखे

 

va pu kale inmarathi

 

मुलांची मानसिकता जशी अनुभवातून आकाराला येते तशीच अनुकरणातूनही आकार घेते.

जेव्हा आई-वडिलांची एखाद्या गोष्टीबाबत सकारात्मक मानसिकता असते तेव्हा मुलंही तशीच मानसिकता आत्मसात करतात!

तसेच जेव्हा आई किंवा वडील व्यसनाधीन, गुन्हेगारी वृत्तीचे, जगाकडे नकारात्मक दृष्टीने पाहणारे असतात तेव्हा त्याचा परिणामही मुलांच्या मानसिकतेवर होऊ शकतो.

मुलं मानसिकता अनुकरणातून आत्मसात करतात.

मानसिकतेवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे शिकवली जाणारी मूल्य आणि प्रत्यक्षातली वागणूक ह्यांत तफावत असणे. म्हणजे, मुलांना शिकवलं जातं की, खोटे कधी बोलू नये.

पण प्रत्यक्षात मुलांना असं जाणवतं कि मोठ्यांकडून खोटं बोललं जातंय. मग अशावेळी, मुलं खोटं बोललं तरी चालत हे शिकतात.

ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. अगदी, थोडक्यात सांगायचं झालं तर मुलांची मानसिकता ही त्यांच्या पालकांच्या मानसिकतेतून, आजूबाजूच्या वातावरणातून, शिक्षणातून तयार होत असते.

मुलं व्यसनाधीनतेकडे जाण्याचे, गुन्हेगारी मार्ग निवडण्याचे कारण ह्याच्यामध्ये दडलेले दिसून येते.

 

alcoholic inmarathi
new indian express

 

जमेची बाजू अशी की, मानसिकता बदलता येऊ शकते.

मानसिकता बदलण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे स्वीकार. मुलाला स्वीकारणे आणि बदलण्याची संधी देणे ही एक चांगली सुरुवात ठरू शकते.

 

स्वीकाराबरोबर आवश्यक असतो तो म्हणजे प्रतिसाद. मुलाला मदतीची गरज कुठे आहे हे ओळखणे ह्या ठिकाणी आवश्यक ठरते. त्याच्या मनात साचलेल्या गोष्टींना वाट करून देणे हे शक्य होते ते प्रतिसादामुळे.

अनुभूती म्हणजे, तू जे सहन केलेस ते मला कळले किंवा मी तुझे विचार समजू शकते/शकतो, असा विश्वास.

आई-वडील, पालक, शिक्षक ह्यांच्याकडून जेव्हा अनुभूतीची जाणीव होते, तेव्हा खरंतर मानसिकता बदलण्याची लढाई आपण अर्धी जिंकलेली असते. ती संवादाची एक महत्त्वाची पायरी आहे.

ह्यानंतर महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे शिक्षण.

आपण आधी पाहिल्याप्रमाणे मानसिकता तयार होण्यामध्ये शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. सारासार विचार करण्याचे शिक्षण मुलांना देणे ही एक अवघड क्रिया असली तरी अशक्य गोष्ट नक्कीच नाही.

ह्यासाठी एक रोल मॉडेल आपल्या वागण्यातून उभं करणं आवश्यक असतं.

मुलांना समजून घेणारी, त्यांच्याशी एकरूप होणारी व्यक्ती जेव्हा मुलांच्या सहवासात असते तेव्हा मुलं त्या व्यक्तीचे अनुकरण करू लागतात आणि आपोआप शिकतात.

त्यासाठी आपल्याला सुद्धा मुलांमध्ये आपल्याला कोणते बदल अपेक्षित आहेत ह्याची जाणीव असावी लागते.

 

child-psychology-marathipizza

 

मानसिकता बदलताना शिक्षा आणि बक्षीसांचा वापर करणे नेहमीच फायद्याचे ठरते. आता शिक्षा म्हणजे मारणे, कोबडा बनविणे, वर्गाबाहेर काढणे, उपाशी ठेवणे असा संकुचित अर्थ घेऊन चालणार नाही.

तर आवडलेल्या एखाद्या गोष्टीपासून तात्पुरते लांब राहणे , अबोला हे सुद्धा शिक्षेचेच रूप आहे. तेच बक्षिसाचे. केलेल्या कामाबद्दल, मेहनतीबद्दल प्रशंसा, दखल घेणे. ह्या गोष्टी मानसिकता बदलण्यासाठी वापरता येऊ शकतात.

मुलांची मानसिकता बदलताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे त्यांना कोणतेही विशेषण नं देणे.

म्हणजे अमका रागीट आहे, तमका प्रेमळ आहे, तो फार वात्रट आहे, हुशार आहे इ. अशी विशेषणं ही मानसिकतेचा भाग बनतात आणि मुलं तशीच वागू लागतात.

त्याऐवजी जर आपण त्यांच्या वागण्याविषयी बोललो म्हणजे, तू जरा जास्त रागावला होतास तर नंतर ते वागणं बदलायला स्कोप मिळतो.

ह्या सगळ्या गोष्टी बोलताना सोप्या वाटत असल्या तरी त्या खूप क्लिष्ट असतात. त्यासाठी वेळ लागतो. पेशन्स लागतो.

कित्येकदा, काही वेगळ्याच अडचणी समोर असतात तेव्हा अशावेळी शिक्षकांनी, पालकांनी स्वत:ची मानसिकता सकारात्मक ठेवणं गरजेचं असतं.

मुलं ही राष्ट्राची संपत्ती असते.

जेव्हा काही कारणांनी मुलांना घरातून चांगलं वातावरण, मायेची ऊब, शिक्षण मिळत नाही किंवा बदलण्याची संधीही दिली जात नाही तेव्हा ती देणं, त्यांची सकारात्मक मानसिकता तयार करणं, त्यांचा विकास साधणे हे समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे.

त्यांची आयुष्याबद्दलची सकारात्मक मानसिकता त्यांना पुढे घेऊन जाऊ शकते आणि पर्यायाने आपल्यालाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?