भारतातील इंटरनेटचा स्पीड इतका कमी असण्यामागचं कारण अगदीच स्वाभाविक आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
स्मार्टफोन आणि इंटरनेट ही आता सर्वसामान्यांची मूलभूत गरज बनू लागली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाला काय लागतं असं विचारलं तर स्मार्टफोन आणि त्या जोडीला इंटरनेट असं उत्तर मिळण्याचीच शक्यता अधिक.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरशिवाय आमच्या तरुणाईलाच नाही तर सर्वांनाच सुनं सुनं वाटायला लागलंय.
देशातील एकूण स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या पाहिल्यास याचे प्रत्यंतर निश्चित येते.
एकीकडे इंटरनेटचा सरासरी वेग दिवसेंदिवस वाढत असताना त्याचे दर झपाट्याने कमी होत आहेत.
त्यामुळे अगदी सामान्य माणसालाही वेगवान इंटरनेटचा वापर अत्यल्प मोबदल्यात घेता येणे शक्य झाले आहे. मोबाइलमधील ‘४ जी’ नेटवर्कने मोबाइल इंटरनेट सेवा वरच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे.
पण इतके असूनही इंटरनेट वेगाच्या बाबतीत भारत अजूनही खूप पिछाडीवर आहे.
आपल्या देशातील इंटरनेट स्पीडची तुलना आपण जागतिक इंटरनेट स्पीडशी केली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या इंटरनेटचा वेग हा जगातील अग्रणी देशांपेक्षा एक तृतीयांशने कमी आहे.
इंटरनेट वेगाच्या बाबतीत आपण आपले शेजारी देश श्रीलंका आणि पाकिस्तानपेक्षा सुद्धा मागे आहोत.
ब्रिटनची इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ‘ओपन सिग्नल’ च्या म्हणण्यानुसार, भारताच्या शेजारी देशांचा (पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार) 4G डेटा स्पीड भारताच्या तुलनेत दुप्पट आहे.
हे देश विकसित बाजारपेठांच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत भले आपल्यापेक्षा मागे असतील तरी इंटरनेट स्पीडच्या बाबतीत मात्र जगातील अव्वल देशांच्या निकट आहेत.
नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे ६२.६६ एमबीपीएस आहे.
यानंतर नेदरलँड्सचा इंटरनेट स्पीड ५३.०१ एमबीपीएस असून आईसलँडचा इंटरनेट स्पीड ५२.७८ एमबीपीएस आहे.
जर जगातील विकसित देशांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांना मिळणारा वेग पहिला तर अमेरिका, यूके आणि जपानमध्ये भारताच्या तुलनेत खूप चांगला इंटरनेट स्पीड मिळतो.
इंटरनेट वापरकर्त्यांना जगात मिळणारा वेग :
महत्त्वाचे देश:
– जपान : २५.३९ एमबीपीएस
– यूके : २३.११ एमबीपीएस
– अमेरिका : १६.३१ एमबीपीएस
भारताचे शेजारी देश:
– म्यानमार : १५.५६ एमबीपीएस
– श्रीलंका : १३.९५ एमबीपीएस
– पाकिस्तान: १३.५६ एमबीपीएस
– भारत – ६.१ एमबीपीएस
बफरिंगची समस्या भारतात नित्याची आहे:
आज आपल्या देशात इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्या 4G च्या पुढे जाऊन 5G नेटवर्क आणण्याच्या गोष्टी करत आहेत. घरात वापरण्यात येणाऱ्या ब्रॉडबँडसाठी फायबर-बेस्ड कंपन्या भविष्यात १०० एमबीपीएस चा वेग देण्याचा दावा करीत आहेत.
भारतातील अनेक ब्रॉडबॅण्ड कंपन्या सध्या देखील १०० एमबीपीएस किंवा २०० एमबीपीएस इतक्या इंटरनेट वेगाचे ‘प्लॅन’ विकतात.
मात्र, प्रत्यक्षात या इंटरनेटचा सरासरी वेग १२ ते १५ एमबीपीएस इतका असतो.
आजही भारतात इंटरनेट वापरकर्त्यांसाठी बफरिंगची समस्या नित्याची आहे. जगातील इतर देशांमध्ये इंटरनेट यूजर्ससाठी बफरिंगची समस्या जवळपास नसल्यातच जमा आहे.
मात्र आपल्या देशात मोबाइल वापरकर्त्यांना 4G नेटवर्क वापरून सुद्धा अनेकदा इंटरनेट बफरिंगच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
भारतात 4G लाँग टर्म इव्हॉल्यूशन इंटरनेटचा वेगदेखील आज ६.१ एमबीपीएस आहे.
आपल्या देशात मिळणाऱ्या इंटरनेट स्पीडची तुलना जागतिक इंटरनेटच्या वेगाशी केली तर कित्येक देश आपल्या पुढे आहेत. आपला इंटरनेटचा वेग जागतिक इंटरनेटच्या वेगाच्या एक तृतीयांश आहे.
वैश्विक स्तरावर मोबाइल डेटाच्या वेगाची सरासरी १७ एमबीपीएस आहे.
अमेरिकेच्या इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओक्ला (Ookla) ने जगातील १२४ देशांची सूची तयार केली आहे.
ब्रॉडबॅण्ड इंटरनेट वेगाच्या बाबतीत भारताचा जगात ६७ वा क्रमांक लागतो. तर, मोबाइल इंटरनेट वेगाच्या यादीत भारताचा १०९ वा क्रमांक लागतो. भारत या क्रमवारीत जवळजवळ शेवटच्या काही क्रमांकात आहे.
ओक्लाने हा निष्कर्ष जगभरात अस्तित्त्वात असलेल्या 2G, 3G और 4G या नेटवर्क्सचा अभ्यास करून काढला आहे.
भारतात फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रॉडबॅण्डचा डाउनलोडिंगचा सरासरी वेग २०.७२ एमबीपीएस इतका होता तर मोबाइल इंटरनेटमध्ये डाउनलोडिंगचा सरासरी वेग अवघा ९.०१ एमबीपीएस इतका होता, जो जागतिक सरासरी (२३.५४ एमबीपीएस) वेगापेक्षा कितीतरी कमी आहे.
भारतात इंटरनेटचा वेग कमी असण्याची प्रमुख कारणे:
भारतातील इंटरनेटचा स्पीड कमी असण्याचे मुख्य कारण स्मार्टफोनच्या क्षेत्रात येणारी ही महाक्रांती आहे. भारतात दर महिन्याला कित्येक लाख लोकं नव्याने इंटरनेटशी जोडली जातात.
यामुळे इंटरनेटचा वेग कायम राखण्यासाठी दबाव वाढतो.
देशात इंटरनेटचा स्पीड कमी असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या देशाची घनता जास्त आहे. ही वाढती लोकसंख्या देखील इंटरनेटचा वेग कमी करते.
त्यामुळे 4G आणि‘ब्रॉडबॅण्ड’ सुविधेमुळे भारतीयांना जरी पूर्वीपेक्षा वेगवान इंटरनेटचा अनुभव घेता येत असला, अगदी काही सेकंदांत एखादी फाइल डाउनलोड होत असल्याचं समाधान मिळत असलं तरी हरखून जायची गरज नाही. कारण भारतातील इंटरनेटचा वेग जगभराच्या तुलनेत खूपच कमी आहे.
आणि महत्वाचं म्हणजे – हा स्पीड कमी असण्यास एकप्रकारे आपणच जबाबदार आहोत…! आपलीच वाढती लोकसंख्या ह्या वाढत्या मागणीचं कारण आहे…! ही वाढती मागणी ताण वाढवत नेते, परिणामस्वरूप इंटरनेटचा स्पीड कमी मिळतो…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.