आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
बॉलीवूडला युद्धपटाची वानवा आहे. आपल्याकडे युद्ध पट फारसे बनत नाहीत. कारण सरळ असते जितके प्रेमाचे चित्रपट चालतात तितके युद्धपट चालत नाहीत. त्यासाठीचा खर्च आणि बजेट देखील मोठे लागते.पडद्यावर युद्ध पट भव्य दिव्य दिसण्यासाठी भरपूर कल्पकता, मेहनत यांची तयारी लागते. ती आपल्याकडे नसते.
अनेकवेळा युद्धपट येतात पण त्याचा आणि खऱ्या आर्मीच्या जीवनाचा संबंध नसतो. याउलट हॉलीवुडचे क्लासिक युद्धपट जर पाहिले तर ते बॉलीवूडच्या कितीतरी मैल पुढे निघून गेलेले वाटतात.
कुठलाही युद्धपट तयार करताना त्याचा विषय, त्यांची मांडणी, सैनिकांच्या हेअर कट पासून त्यांचे कपडे, त्यांचा गणवेश, त्यांची हत्त्यारे, त्यांची देहबोली, भाषा या अत्यंत सूक्ष्मातीसूक्ष्म बाबींवर विचार केला जातो.
कित्येक वेळा असं झालंय जेव्हा युद्धपट निर्माण करायचा म्हणून हॉलीवुड च्या दिग्दर्शकाने सैन्यातील खऱ्याखुऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या चित्रपटाच्या मार्गदर्शनासाठी पाचारण केलेले आहे. त्यांच्या कडून बारीक सारीक बाबी समजावून घेतलेल्या आहेत.
आर्मीची शिस्त अंगात भिनावी यासाठी अभिनेत्यांना कठोर मेहनत घ्यायला लावली आहे. याउलट बॉलीवूड मध्ये युद्धपट करताना अशी शिस्त दिसत नाही. खूप सगळ्या गोष्टींचे डीटेलिंग घेणे राहून जाते.
आर्मीच्या अधिकाऱ्या सारखे फिट आणि चपळ दिसावे यासाठी क्वचित कुणी बॉलीवूडचा हिरो कठोर मेहनत घेतो आणि त्याला तसे सांगणे हे देखील दिग्दर्शकाला शक्य होत नाही.
आपल्याकडे सुपरस्टार जो करेल ती पूर्व दिशा असा हेका असल्यामुळे अभिनेत्याला कोणीही जावून तू अशा पद्धतीने स्वत:ला लष्करी अधिकाऱ्याचा रोल करण्यासाठी तयार झाले पाहिजे असे सांगत नाही.
जब तक है जान चित्रपटात शाहरुख खानने ज्या पद्धतीने आर्मी अधिकाऱ्याचा रोल निभावला होता त्याला अनेक जणांनी नापसंती दर्शवली होती.
आर्मी ऑफिसर हे दाढी ठेवत नाही. त्यांचे केस बारीक कापलेले असतात आणि संपूर्ण चेहरा क्लीन शेव्ह्न असतो.
कुठलाही अधिकारी आपल्या बरोबर सेफ्टी गियर असल्याशिवाय बाहेर पडत नाहीत पण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दिग्दर्शक/अभिनेत्याचे लक्ष जात नाही.
आपले आर्मी अधिकारी जर पाहिले तर त्यांची शिस्त अत्यंत कडक राहते.
भारतीय लष्कर आपल्या अधिकाऱ्यांवर भरपूर पैसे खर्च करते. आपल्याकडे आर्मीचे प्रशिक्षण देणाऱ्या उत्तमोत्तम संस्था आहेत. त्या संस्थांमधून खडतर ट्रेनिंग घेवून बाहेर पडल्यानंतर लष्कारामध्ये अधिकारी होण्याची संधी मिळते.
जेव्हा असे अधिकारी फ्रंट वर लढतात त्यावळी त्यांच्यासमोर अत्यंत वेगळी परिस्थिती असते. खूप वेळा ज्या पद्धतीने फिल्मी स्टाईलने अभिनेते आर्मी ऑफिसर ची वेशभूषा, केशभूषा करतात त्यात गर्व किंवा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांची कीव येण्याजोग्या गोष्टी जास्त असतात.
ज्या पद्धतीने आपल्याकडच्या चित्रपटामध्ये आर्मी ऑफिसर आणि नायिकेचे प्रेम प्रकरण दाखवले जाते. उदा. मेजरसाब हा चित्रपट अनेकांना आठवत असेल.
कुठलाही सैन्याचा अधिकारी आपल्या हाताखालच्या तरुण अधिकाऱ्याला प्रेम प्रकरण करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही हे आर्मीच्या शिस्तीच्या आणि नियमांच्या विरुद्ध आहे. तरीही मेजरसाब सारखे चित्रपट तद्दन मनोरंजन म्हणून एका अर्थी आर्मी ची टर उडवल्या सारखे वाटत राहतात.
ज्यावेळी कुठलाही सैनिक आघाडीवर लढताना मारतो त्यावेळी त्याच्यासमोर ची परिस्थिती वेगळी असते. कुणीही हौस म्हणून मरायला किंवा लढायला जात नसतो.
सैनिक स्वत:च्या देशासाठी लढत असतो.
चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे भारत माता की जय ओरडत शत्रूला सामोरे जाणे,
धाडधाड बंदुकीतून गोळ्या सुटल्या तरी त्या छातीवर झेलल्यानंतर स्लो मोशन मध्ये शिस्तीत खाली पडणे,
युद्धाच्या फ्रंट वर लढत असताना सुद्धा चेहऱ्यावरचा मेक अप न हलणे,
काही जखमा न दिसणे…ही आपल्याकडच्या चित्रपटात दिसणारी नित्याची उदाहरणे आहेत.
प्रत्यक्षात आघाडीवर सेकंदाच्या फरकाने माणसे मरत राहतात. मरताना त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान किंवा हास्य येत नाही.
याउलट त्यांचा चेहरा शॉक लागल्यासारखा दिसतो कारण कुठल्या क्षणी मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली हे त्यानाही समजत नाही. आपल्याकडे सैनिकांच्या मृत्युचे चित्रपटात फार चुकीच्या पद्धतीने उदात्तीकरण दाखवले जाते. खरा खुरा आर्मी ला मानवंदना देणारा भव्य युद्धपट आपल्याकडे तयार होईल तो सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस असेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.