आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नेहरू हे काळाच्या पुढचे पंतप्रधान होते.
त्या मानाने स्वातंत्र्यानंतर गरीबी आणि मागासलेल्या देशाचे पंतप्रधान म्हणून कारभार पाहताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चिकित्सा होणार हे ओघाने आलेच.
नेहरूंचे घराचे वातावरण, केम्ब्रिज ला घेतलेले उच्चाशिक्षण, ब्रिटीश राहणीमानाचा त्यांच्यावरील प्रभाव, उंची चिरूट ओढण्या सारख्या त्यांच्या सवयी, त्यांच्या मैत्रिणी हा भारतीय राजकारणातील चर्चेचा विषय राहिला आहे.
नेहरूंच्या व्यक्तीमत्वाचं गारुड अनेक जणांना होतं त्यामुळे त्यांच्या भोवती अनेक स्त्री- पुरुषांचा गराडा कायम पडलेला असे. यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती नेहरू आणि एडविना यांच्या नात्यांची.
एडविना ही भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांची पत्नी होती.
तिच्यामध्ये आणि नेहरुंमध्ये प्रेमाचा आणि मैत्रीचा नाजूक बंध होता. त्यांनी तो जपला. विशेष म्हणजे या मैत्रीला एडविना हिच्या नवऱ्याची हरकत नव्हती.
त्याने तिचे नेहरुसोबत असलेले मैत्रीचे, प्रेमाचे संबंध मान्य केले होते. या विषयाबाबत कॉंग्रेस कायम सिलेक्टिव्ह मौन बाळगत आलेला आहे.
लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हॉईसरॉय म्हणून नेमणूक झाली होती.
त्यावेळी भारत- पाकिस्तान प्रश्न ऐरणीवर होता. या प्रश्नाची सोडवणूक करायची कशी याचा तिढा भारतीय कॉंग्रेस, इतर राजकीय पक्ष आणि दिग्गज नेते सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
एडविना त्याचवेळी आपल्या पतीबरोबर भारतात दाखल झाली.
वृत्तीने अत्यंत बंडखोर, चिडखोर असणारी एडविना नेहरूंच्या संपर्कात आली आणि त्यांच्यामधील प्रेमपूर्ण मैत्रीची सुरुवात झाली.
अर्थात नेहरू आणि एडविना यांच्या नात्याला इंग्लंड मधील लोक कसे बघतात ते माहीत नाही परंतु भारतात मात्र ह्या संबंधांना अनेक लोकांनी, विशेष करून नेहरूंच्या विरोधकांनी अनैतिक संबंधाचे स्वरूप दिले होते.
नेहरू-एडविना यांच्या नात्यांची बदनामी देखील भरपूर झाली होती.
भारतासारख्या देशात एका विवाहित स्त्रीने आणि एका विवाहित पुरुषाने एकमेकांसोबत मैत्रीचे संबंध ठेवावेत ही गोष्ट समाजाला पटण्यासारखी नव्हतीच. अर्थात नेहरूंच्या आणि एडविनाच्या जवळ असणारे लोक मात्र हे सर्व आरोप फेटाळतात.
नेहरू आणि एडविना यांच्या नात्याला प्रेमाची, मैत्रीची, आध्यात्मिकतेची झालर होती हे त्यांना जवळून बघणारे लोक सांगतात.
नेहरू आणि एडविना यांच्यावर पुस्तके सुद्धा आली आहेत. त्याच्यामध्ये ही लोकांनी अनैतिक ठरवलेल्या या नात्याचे वेगळे पदर सुद्धा होते हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
नेहरू आणि एडविना यांच्या नात्यामधील खास गोष्ट म्हणजे त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे. या पत्रांचा संग्रह देखील पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेला आहे.
१९५२ साली एडविना हिने तिला नेहरू यांनी लिहिलेल्या सगळ्या पत्रांचा संग्रह आपल्या नवऱ्याकडे दिलेला होता.
ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा मेंदू मध्ये रक्तस्त्राव झाल्याने एडविना ला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करण्यात आलेले होते.
पत्रे नवऱ्याच्या हातात देताना ती म्हणाली होती,
“माझ्यासाठी ही पत्रे म्हणजे ऐतिहासिक ठेवा आहेत. तुला त्याच्यामध्ये जवाहरच्या हरएका पैलूची माहिती मिळू शकेल,
काही पत्रे म्हणजे माहितीचा साठा आहेत तर काही फक्त प्रेम पत्रे पण यातून तुला कदाचित माझ्या आणि जवाहर मधल्या आध्यात्मिक नात्याचा अर्थ उलगडण्यास मदत होवू शकेल!”
नेहरू आणि एडविनाचे संबंध दिल्लीमध्ये मात्र कुणाला फारसे पसंत पडले नव्हते.
त्यावेळी कॉंग्रेस विरोधी गटाने
“रामाचं हृदय फोडलं तर सीता दिसेल आणि नेहरूंचं हृदय फोडून पाहिलं तर आत लेडी माउंटबॅटन दिसेल”
अशा स्वरूपाचे नारे देणं सुरु केलं होतं.
नेहरूंनी अशा शेऱ्यांची कधीही पर्वा केली नाही ही गोष्ट तितकीच खरी. त्यांनी आपले एडविना बरोबरचे नाते तोडले ही नाही आणि लपविले ही नाही.
नेहरूंचं एडविना वरचं प्रेम ती भारत सोडून निघून गेल्यावर ही संपलं नव्हतं.
जगभरात नेहरू जिथे जिथे जातील तिथल्या गोष्टी ते एडविना साठी पाठवून द्यायचे.
एडविनाचा १९६० साली तिच्या राहत्या घरी मृत्यु झाला. मृत्युच्या वेळी तिच्या उशाला फक्त नेहरूंनी तिला लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा तिने ठेवला होता.
यावरून तिच्या आणि नेहरूंच्या मध्ये असलेल्या गाढ प्रेमाची कल्पना यावी!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.