' तिच्याशिवाय मोदींचा कोणताही विदेश दौरा पूर्ण होत नाही! कोण आहे ती? वाचा.. – InMarathi

तिच्याशिवाय मोदींचा कोणताही विदेश दौरा पूर्ण होत नाही! कोण आहे ती? वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत दुसऱ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर एका महिलेचा फोटो काही महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. ही महिला नक्की कोण आहे आणि तिचा मोदींशी काय संबंध आहे हा प्रश्न अनेकांना पडलाय.

तर सांगायची गोष्टं अशी की ही महिला केवळ पीएम मोदी यांच्याबरोबरच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी, कॅनडाच्या पीएम जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत सुद्धा कित्येक वेळेस दिसली आहे.

त्यामुळे ही कोणी सर्वसाधारण महिला असूच शकत नाही.

खरंतर आजवर ही महिला चर्चेत आली नव्हती. पण मोदींसोबत त्यांचा फोटो व्हायरल झाल्यावर सगळ्यांनी तिच्याबद्दल प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. तर या महिलेचे नाव गुरदीप कौर चावला असे असून त्या मोदींसाठी दुभाषाचे (इंटरप्रिटर) काम करीत आहेत.

 

Gurdeep-Kaur-Chawla-Interpreter-inmarathi04
naidunia.jagran.com

जेव्हा नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यांवर असतात, तेव्हा दरवेळेस ही महिला त्यांच्यासोबत असते. तिथे मोदीजी हिंदीत भाषण देत असतील तर त्या ते भाषण इंग्रजीत भाषांतरित करून उपस्थित विदेशी मंत्र्यांसमोर ठेवतात.

केवळ त्यांच्यामुळे विदेशी मंत्री पीएम मोदी यांचे भाषण समजून घेऊ शकतात. त्या गेल्या २८ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.

 

Gurdeep-Kaur-Chawla-Interpreter-inmarathi02
indialanguageservices.com

१९९० साली, वयाच्या २१ व्या वर्षी गुरदीप कौर यांची संसद भवनात दुभाषाच्या पदाकरिता निवड झाली होती. मात्र लग्नानंतर १९९६ साली त्यांनी ही नोकरी सोडली आणि आपल्या नवऱ्याबरोबर त्यांनी अमेरिकेला स्थलांतर केले. त्यानंतर गुरदीप कौर अमेरिकन ट्रान्सलेटर असोसिएशनच्या मेंबर होत्या.

गेली २७ वर्षे या क्षेत्रात काम करणाऱ्या गुरदीप कौर यांच्या आयुष्याला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा २०१० मध्ये गुरदीप कौर तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याबरोबर दुभाषी म्हणून भारतात आल्या.

ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी होती. गुरदीप कौर इंटरप्रिटेशन आणि ट्रान्सलेशन इतक्याच राष्ट्रसंघातील गोष्टी आणि वरच्या दर्जाच्या न्यायालयीन भाषांच्या अनुवादामध्ये तरबेज आहेत.

 

Gurdeep-Kaur-Chawla-Interpreter-inmarathi01
indialanguageservices.com

गुरदीप २०१४ साली मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोदींच्या कार्यक्रमात सुद्धा सामील झाल्या होत्या आणि त्यांनी दुभाषाचे काम केले होते. तिथून त्या मोदींसोबत डीसी वॉशिंगटनला गेल्या जिथे त्यांनी मोदी आणि ओबामा यांच्यात दुभाषाचे काम केले.

गुरदीप यांची भाषांतराची पद्धत आणि भाषेची जाण उत्तम आहे. व्याकरणदृष्ट्या तर त्या उत्तम आहेतच शिवाय त्यांचा आवाज देखील खूप चांगला आहे.

त्यांनी आत्तापर्यंत यू.एस. स्टेट डिपार्टमेंट, ज्यूडिशियल कौन्सिल ऑफ कॅलिफॉर्निया, फेडरल कोर्ट, मिलिट्री कोर्ट, लीगल इमीग्रेशन आणि इन्शुरन्स केसेसमध्ये काम केले आहे. त्यांनी कैक प्रकारची मॅनुअल्स, मेडिकल पासून आर्मी पर्यंतची डॉक्यूमेंट्स, मार्केटिंग, लॉ, एंटरटेनमेंट, ऍस्ट्रोलॉजी, टेक्नोलॉजी यांसारख्या प्रत्येक क्षेत्रातील कागदपत्रे भाषांतरित करण्याचे काम केले आहे.

 

Gurdeep-Kaur-Chawla-Interpreter-inmarathi03
abpasmita.abplive.in

गुरदीप या कामामध्ये इतक्या तरबेज आहेत की त्या भाषणावर नजरही न टाकता अत्यंत अचूक भाषांतर करतात. त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी यूएन मधील पहिल्या वेळेच्या अनुभवाची आठवण सांगितली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आदल्या रात्री त्या केवळ दोन तास झोपल्या होत्या.

त्यानंतर ९ वाजल्यापासून त्यांनी भाषण अनुवादित करायला सुरुवात केली होती. ते क्षण त्यांच्यासाठी मौल्यवान होते.

कारण त्यांचे भाषांतर हे आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर दाखविण्यात येत होते. त्यामुळे त्यांना पूर्णपणे एकाग्रतेने ते काम करायचे होते. शिवाय कार्यक्रम लाइव्ह असल्याने त्यांना मध्ये ब्रेकही घेता आला नव्हता.

आणखी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की

“जगातील मोठमोठ्या व्यक्तींबरोबर राहून मला खूप काही शिकायला मिळाले, विशेषकरून काम करण्याची आणि यशस्वी व्हायची पद्धत मला शिकायला मिळाली. त्या म्हणतात, आपल्या कामाला आपला देव मानायला शिका. हेच यशाचे गमक आहे.”

तर ही आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत सोशल मीडियावर काही महिन्यांपासून व्हायरल होत असलेल्या महिलेची, गुरदीप कौर चावला यांची खरी ओळख.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?