आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
२००८ सालापासून IPL सुरु झाली आणि तेव्हापासून क्रिकेट विश्वच बदलून गेलं. वेगवेगळ्या शहरांतील टीम्सला खेळताना बघणे खरंच मनोरंजक असते. भारतात IPLची लोकप्रियता एवढी जास्त आहे की, ह्यादरम्यान अनेक चित्रपट देखील रिलीज केली जात नाही. तसेच ह्या खेळाने अनेक नवीन खेळाडूंची प्रतिभा समोर आणण्यास मदत झाली आहे.
ह्यामुळे भारताच्या क्रिकेट टीममध्ये खेळू न शकणाऱ्या त्या खेळाडूंना देखील आपला खेळ दाखवता येतो आणि त्यांच्या क्रिकेट करिअरला चालना मिळते.
तसेच भारतानेही IPLच्या माध्यमातून क्रिकेट जगतात एक वेगळेच स्थान मिळविले आहे. IPL ने आज अनेक अष्टपैलू खेळाडू आपल्यासमोर आणले आहेत.
ह्यावर प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक श्री द्वारकानाथ संझगिरी सरांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सुंदर निरीक्षण नोंदवलं आहे. ते इनमराठीच्या वाचकांसाठी पुढे देत आहोत.
===
काय जमाना बदललाय पाहा!
एकेकाळी हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये गेला की, इंग्लिश गोलंदाज ‘बकरे निर्यात झाले’ म्हणून आनंदोत्सव करत. इंग्लिश फलंदाजांना विक्रमांचे डोहाळे लागत आणि आता टी-20 ची मालिका भारताने जिंकल्यावर त्याचे चेहरे ‘आयसीयू’च्या बाहेर बसलेल्या पेशंटच्या नातेवाईकांसारखे झाले आहेत.
हे नुसतं हरणं नाहीए. हा चारीमुंड्या, सॉरी अकरा मुंड्या चित होण्याचा प्रकार आहे. चला, या दौऱ्याची प्रस्तावना तरी उत्तम लिहून झाली. टी-20 च्या ‘शिता’वरून पुढच्या कसोटीच्या मालिकेच्या ‘भाता’ची परीक्षा करता येणार नाही, पण या भारतीय संघाचे पंख कबुतराचे नाहीत; ते कदाचित गरूडाचे ठरू शकतील अशी शंकेची पाल इंग्लिश संघाच्या मनात चुकचुकली असेल.
पहिल्या टी-20 सामना भारताने लीलया जिंकला. तेव्हा दोन परफॉर्मन्स असामान्य ठरले. एक के. एल. राहुलचं शतक, दुसरी कुलदीप यादवची फिरकी गोलंदाजी. राहुलने फलंदाजीतल्या भारतीय कलाकुसरीचा लाजवाब नजराणा पेश केला. तंत्राचा अपमान न करता कलेची मोहर खेळीवर कशी उमटवावी याचं अप्रतिम प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. तेही इतक्या सहजपणे की, फलंदाजी ही कुणीही आत्मसात करावी अशी कला वाटावी.
कुलदीप यादवची गोलंदाजी पाहताना असं वाटलं की, इंग्लिश संघ लॅटिन भाषेचा अभ्यास करून आलाय आणि त्यांच्यासमोर संस्कृतचा पेपर आलाय. इंग्लंडमध्ये चायनामन गोलंदाज नाही. त्यामुळे त्यांना कुलदीप काय टाकतोय ते उमगत नव्हतं.
बरं, आजकालचे फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळताना गोलंदाजांच्या हाताकडे पाहात नाहीत. मग अशा वेळी ‘ढूंढो ढूंढो रे साजना’ सुरू होतं.
आमचा वासू परांजपे नेहमी म्हणतो,
‘‘आज सुभाष गुप्ते खेळत असता तर त्याने आजच्या फलंदाजांना दिवसातून दोनदा क्लिन बोल्ड काढलं असतं’’
– ते पटतं.
गोलंदाजांच्या हाताकडे पाहून ‘अरे, टेलिग्राम आला रे’’ ओरडायचे फलंदाजांचे दिवस आता इतिहासजमा झालेत आणि टप्प्यावरून खेळायचं तर तुमची गुणवत्ता, रिफ्लेक्सेस आणि चेंडू कुठे पडणार याची समज सर गारफिल्ड सोबर्स किंवा विव्ह रिचर्डसची हवी.
टप्पा, फ्लाईट, दिशा, गुगलीचा विचार केला तर कुलदीपचा तो स्पेल मन गुंगवून टाकणारा होता. जो रूटसारख्या दर्जेदार फलंदाजाची विकेट हा त्यात मानाचा तुरा होता. धुक्यात हरवलेली वाट शोधत तो पुढे आल्यासारखा वाटला.
कुलदीपने चायनामनपेक्षा गुगली जास्त टाकली. ते चेंडू इंग्लिश फलंदाजांना ओळखता आले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ चेंडूत ५ बळी म्हणजे पोरखेळ नाहीए. तेसुद्धा अशा संघाचे की ज्यांनी ऑस्ट्रेलियाला टी-20 आणि वनडेत उद्ध्वस्त केलं होतं.
इंग्लंडच्या डॉक्टरपुढे प्लेग किंवा देवीचा पेशंट आला तर तो जसा गोंधळून जाईल तसे इंग्लिश फलंदाज गोंधळले.
दुसऱ्या सामन्यात त्यांनी उपाय शोधला, पण त्यात आत्मविश्वासापेक्षा कोंडलेल्या मांजराच्या उडीसारखं साहस जास्त होतं.
दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीच्या बाऊन्सने भारतीय संघाच्या वरच्या फळीची परीक्षा पाहिली, पण मग धोनी असा खेळला की, त्याच्या फलंदाजीच्या जुन्या आठवणी जाग्या व्हाव्यात.
पण पुढे अनेकदा आपल्याला अशा खेळपट्ट्यांंवर खेळावं लागलं तर आश्चर्य वाटू नये.
इसापची कोल्हा करकोच्याची कथा लक्षात ठेवावी. आपण करकोचाच्या देशात आहोत.
पण ब्रिस्टॉलचा विजय जास्त भावला.
एक तर आपण दोन नवखे वेगवान गोलंदाज घेऊन खेळलो. संघात कुलदीप यादव नव्हता. खेळपट्टी अशी होती की, त्यावर विमानं उतरली असती. आणि इंग्लंडने धडाकेबाज सुरुवात केली होती. खरं तर धडकी भरवणारी असं म्हणायला हवं, पण त्यानंतर हार्दिक पंड्याने ज्या पद्धतीने विकेट्स घेतल्या त्याचं नुसतं ‘कमाल केली’ वगैरे वर्णन पुचाट ठरेल.
त्याने मॅच एकशेऐंशी कोनात फिरवली. टी-20 तही विकेट्स काढणं हा धावा रोखण्यापेक्षा जालिम उपाय आहे.
त्यामुळे जेव्हा गाडी टॉप गियरवर पळवायची असते तेव्हा इंग्लंडला तिसऱ्या गियरवरही गाडी नेताच आली नाही. २४० वर थांबायची अपेक्षा असलेल्या गाडीचं पेट्रोल दोनशेच्या आत संपलं.
पंड्यातला बदल लक्षणीय आहे.
पहिल्या षटकात त्याने इतका मार खाल्ला की त्याचे वळ पुढच्या षटकावर उमटतील असं वाटलं, पण त्याच्या गोलंदाजीचा टप्पा आणि दिशेतला बदल असा होता की वळांनी पाठ बदलली. ते इंग्लिश फलंदाजीच्या पाठीवर दिसले.
त्यानंतर पाठलाग असा झाला की, नियतीने जणू रोहित शर्माला सांगितलंय ‘‘तू शतक ठोकणार.’’ पराभवाचा नुसता विचारही त्याच्या बॅटला शिवला नाही. त्याचा मखमली स्पर्श त्याच्या चौकारात दिसला.
पण षटकार मारतानाही टायमिंग असं होतं की, त्याच्या हातात बॅटसारखे दिसणारं पिस आहे असं वाटावं.
हार्दिक पंड्यानेही आपण अस्सल अष्टपैलू खेळाडू आहे याची ग्वाही दिली.
पण पांढऱ्या शुभ्र धोतराला काळी काठ असावी तशी या विजयाला काळी काठ आहे सोडलेल्या उंच झेलांची! इंग्लिश संघ फक्त तिथेच जास्त चांगला वाटला.
प्रस्तावना रंजक झाली की पुढे पुस्तक वाचावंसं वाटतं. खरंच उत्कंठा वाढलीए.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.