' “लोकशाही” चांगली की वाईट? – समजून घ्या महान “तत्ववेत्ता” सॉक्रेटिस काय म्हणतो – InMarathi

“लोकशाही” चांगली की वाईट? – समजून घ्या महान “तत्ववेत्ता” सॉक्रेटिस काय म्हणतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

churchil statement on democracy inmarathi

 

लोकशाहीचा आणि लोकशाही मूल्यांचा आपण खूप आदर करतो. प्रत्येक लोकशाही प्रेमींसाठी ज्या अथेन्समध्ये लोकशाहीचा उगम झाला तेथे लोकशाही कशी होती हे जाणून घेणं मनोरंजक आणि अत्यंत महत्त्वाचं देखील ठरतं. कारण तिथल्याच समकालीन तत्त्ववेत्त्यांनी तिच्यावर टीका केलीये.

अथेन्स हे तिथल्या महान तत्वज्ञानासाठी प्रसिद्धच आहे…! म्हणूनच ह्याच तत्त्वज्ञानाने लोकशाहीवर केलेली टीका आपण नक्कीच अभ्यासायला हवी.

ग्रीक तत्वज्ञानाचे पितामह, प्लेटो, त्यांच्या सुप्रसिद्ध “The Republic” पुस्तकाच्या सहाव्या भागात सॉक्रेटिस आणि त्याचा सहकारी यांच्यात झालेल्या एका संवादाचं वर्णन करतात.

एडमेंटस नावाच्या सहकार्याला सॉक्रेटिस विचारतो –

जर तुला समुद्री मार्गाने प्रवास करायचाय तर तू तुझ्या जहाजाचा कॅप्टन म्हणून कुणाला नेमशील? ज्याला सागरी प्रवासाचा अनुभव आहे, ज्याने शिक्षण घेतलंय, ज्याला सर्व नियम माहित आहेत अशा व्यक्तीला? कि घोळक्यातून कुणालाही जहाज चालवायला उभा करशील?

नंतर जहाजाची तुलना सॉक्रेटिस समाजाशी करतो आणि म्हणतो की,

“कुठल्याही प्रौढ माणसाने” देशाचा राज्यकर्ता निवडावा हा निकष आपण लावणं योग्य आहे का?

 

socratese inmarathi

 

इथे सॉक्रेटिसचं म्हणणं असं आहे की, मतदान करणं हे एक “कौशल्य” आहे. ते एक “स्किल” आहे. आणि कुठलंही “स्किल” हे लोकांना शिकवलं गेलं पाहिजे.

लोकांना शिक्षित नं करता त्यांना मतदान करू देणं हे अत्यंत घातक आहे!

सॉक्रेटिसने ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय.

ख्रिस्तपूर्व ३९९ साली, एका तत्ववेत्त्याला “अथेन्समधील तरुणांची माथी भडकावण्याच्या” आरोपाखाली कोठडीत डांबण्यात आलं होतं. त्याच्या खटल्याचा निकाल लावण्यासाठी ५०० जणांची ज्युरी बोलावण्यात आली (ज्युरी पद्धत आज भारतात नाही परंतु अमेरिकेसोबतच अनेक राष्ट्रांमध्ये आजही ती खूप प्रभावीपणे सुरु आहे).

आता ह्या प्रकरणात ज्युरी बोलावण्यात आलीये ह्याचा अर्थ निकाल हा कुणाच्याही प्रभावाखाली न लागता त्या तत्ववेत्त्याच्या बाजूने लागायला हवा! पण तसे न होता त्याला मृत्यदंड झाला.

सॉक्रेटिसच्या म्हणण्यानुसार इथे लोकांचं शिक्षण झालं असतं (म्हणजेच जर लोक जागरूक असते – ) तर ही tragedy टाळता आली असती!

इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. बहुतेक “लोकशाही विरोधक” म्हणजे प्रस्थापितांची तळी उचलणारे असतात असा सार्वत्रिक समज आहे. अश्या लोकांना “एलिटिस्ट” म्हणतात. परंतु सॉक्रेटिस हा एलिटिस्ट नव्हता.

“सर्वांनी मतदान करावे” हीच त्याची देखील इच्छा होती. पण ज्या लोकांनी एखाद्या मुद्ययावर खोलात जाऊन विचार केलाय त्यांनाच तो अधिकार असायला हवा असं त्याला वाटत होतं. सॉक्रेटिसला “बुद्धीवादी लोकशाही” अपेक्षित होती.

त्याच्या अपेक्षेप्रमाणे ग्रीसमध्ये लोकशाही न येता “डेमोगॉगरी” आली. सॉक्रेटिसला ठाऊक होतं की एखाद्या समस्येचं सहज समाधान शोधणारे देशातले नागरिक कुणालाही मत देऊन मोकळे होतात. लोकांच्या ह्या वृत्तीमुळे अनेक असे राज्यकर्ते अथेन्समध्ये होऊन गेले ज्यामुळे अथेन्सने वेगवेगळ्या प्रांतांवर अनेक अनावश्यक हल्ले (सिसिलीसकट) केले.

हा मुद्दा समजावून देण्यासाठी सॉक्रेटिस म्हणतो –

जर लोकांनी एखाद्या डॉक्टरवर असा आळ घेतला की, हा माणूस आम्हाला कडू पदार्थ प्यायला देतो, जादूटोणा करतो, ज्यामुळे आम्हाला घाम फुटतो, बरेच पदार्थ खाण्यावर बंदी घालतो, आम्हाला आमचे आवडीचे पदार्थ खाऊ देत नाही.

तर – डॉक्टर ह्या आरोपाचं खंडण फार प्रभावीपणे करण्यास असमर्थ ठरेल. कारण तो जर म्हणाला की तुम्हाला होणारा थोडासा त्रास फक्त तुम्हाला बरे करण्यासाठी आहे तर ते सहजासहजी कुणाला पटणार नाही.

म्हणून लोक मिठाईवाला आणि डॉक्टर यांमध्ये मिठाईवाल्यालाच निवडून देतील…!

अथेन्समधील लोकशाही ही प्रत्यक्ष लोकशाही जरी असली तरी संपूर्ण जनतेच्या फक्त वीस टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. त्यातही “फक्त अठरा वर्षांपुढील गोरे पुरुष” हेच मतदान करू शकत होते.

 

athens democracy format inmarathi
centroriformastato.it

आज जरी अथेनिअन लोकशाही नसली तरी समस्या सारखीच आहे. लोक जागरूक नाहीत, साक्षर आहेत.

पण “सुशिक्षित” व “सुसंस्कृत” नाहीत.

ज्या लोकांना नेत्यांमधील आवश्यक गुणांबद्दल ज्ञान असते ते खरा नेता आणि खोटा नेता यातला फरक ओळखू शकतात. सॉक्रेटिसचं म्हणणं आज भारतातही लागू पडतं.

GST नक्की कुठल्या गोष्टींवर आहे आणि कुठल्या गोष्टींवर नाही, पेट्रोल आणि डिझेलचे भाव, मोदींचे परदेश दौरे इत्यादी मुद्द्यांवरील जनतेचे “ज्ञान” तसेच नेत्यांचे धर्म आणि विज्ञान यांवरील वक्तव्ये हे सॉक्रेटिसला बरोबर ठरवतात.

असं म्हटलं गेलंय की – “लोकशाहीविरुद्ध सर्वात उत्तम प्रतिवाद म्हणजे तिथल्या सर्वसामान्य मतदात्यांशी पाच मिनिटांसाठी केलेला संवाद.”

 

indian voters inmarathi
indiatoday.in

 

सॉक्रेटिसच्या मते त्यावेळच्या ग्रीसमध्ये शिक्षण ह्याचा अर्थ व्याकरण, तर्कविज्ञान, गणित, भूमिती, संगीत, खगोलशास्त्र, वक्तृत्व यांचं ज्ञान होय. भारतासाठी आपण विचार केला तर कुठल्या ज्ञानशाखांचं ज्ञान आवश्यक ठरेल हा एक वेगळा सखोल अभ्यासण्याजोगा विषय ठरेल!

पण कमीत कमी लोकांनी प्रत्येक मुद्द्याबद्दल जागरूक राहून, त्याचा सखोल अभ्यास करून लोकप्रतिनिधी निवडायला सुरुवात केली तर “योग्य” नेतेच निवडून येतील हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?