आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
संजय दत्तचा बायोपिक म्हणजेच संजू प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता या चित्रपटाने तुफान गर्दी जमवली. ६ दिवसात या चित्रपटाने तब्बल १८६.४१ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा सहज पार करेल असं संजय दत्तच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तिरेखा रणबीर कपूरने साकारली आहे. त्याच्या अभिनयाची प्रशंसा सर्वच स्तरातून होत आहे.
रसिक आणि समीक्षकांनीही रणबीरच्या अभिनयाला दाद दिली आहे. राजकुमार हिराणीने बनवलेला हा पहिलाच बायोपिक आहे आणि चित्रपटाला मिळणार्या प्रसिसादाला पाहून हिराणीचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
१९९३ च्या बॉम्बस्फोटात हत्यार बाळगल्याप्रकरणी संजय दत्त दोषी सिद्ध झाला होता. त्यामुळे संजू चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडला होता. एका गुन्हेगारावर चित्रपट काढून हिराणी गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहे अशी टिकेची झोड त्याच्यावर उठली होती.
सर्वसामान्य जनतेकडून ही प्रतिक्रीया येत असताना योगेश सोमण सारख्या मराठी कलावंतांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करुन संजू चित्रपट पाहू नये असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे संजय दत्तच्या चाहत्यांनी मात्र त्याची बाजू उचलून धरली.
झालं गेलं गंगेला मिळालं अशाप्रकारे त्यांनी संजय दत्तची बाजू मांडली.
संजयने जो गुन्हा केला त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे आणि त्यामुळे आता त्याला नवे आयुष्य जगण्याची संधी मिळालीच पाहिजे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. याआधीही दाऊद, माया डोळस, मन्या सुर्वे अशा अनेक गुन्हेगारांवर बायोपिक येऊन गेले आहेत.
हा सर्व वाद गाजत असताना संजू चित्रपटाने मात्र १८६.४१ कोटींचा गल्ला जमवला. आता तर संजय दत्तचे आणखी १४ चित्रपट येऊ घातले आहेत.
काही लोकांना जरी संजय दत्त आवडत नसला तरी त्याच्या चाहत्यांमध्ये तो भलताच प्रसिद्ध आहे आणि यामुळेच तो बॉलिवूडचा एक अत्यंत व्यस्त अभिनेता आहे. संजय दत्तने १९८१ मध्ये रॉकी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आगमन केले.
त्यानंतर तो बर्याचदा वादाच्या भोवर्यात सापडला. १९९३ च्या बॉम्बस्फोटनंतर तर त्याचे करिअर संपले असेच अनेकांना वाटत होते.
पण त्या धक्क्यातूनही तो सावरला व एका पाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे त्याने दिले.
२०१८, २०१९ आणि २०२० पर्यंत संजय दत्त बिजी आहे. त्याचे तब्बल १४ सिनेमे येऊ घातलेत. चला तर पाहूया कोणकोणत्या सिनेमात कोणत्या भूमिकेत संजय दत्त गाजणार आहे.
१. साहेब बिवी ऑर गॅंगस्टर ३
संजय दत्त लवकरच साहेब बिवी ऑर गॅंगस्टरच्या तिसर्या भागात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशू धुलिया करत आहे. संजय दत्तसोबत जिमी शेरगील, माही गिल सुद्धा या चित्रपटात झळकतील. याच वर्षी म्हणजे २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
२. तोरबाज
तोरबाज हा ऍक्सन थ्रिलर चित्रपट असून २०१८ मध्येच प्रदर्शित होणात आहे. अफगाणीस्थानातील चाईल्ड सुसाईड बॉम्बरवर आधारित ही कथा असणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मलिकने केले असून पुनीत सिंह, राजू छड्डा, राहूल मित्र आणि गिरीश मलिकने मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार पाकीस्थानी क्रिकेटर रमीझ राजा सुद्धा या चित्रपटात काम करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये संजय दत्त सोबत नरगिस फाक्री आणि राहूल देव झळकणार आहेत.
३. ११.
मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त जॉन अब्राहिम सोबत ११ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे.
हा चित्रपट ऍक्शन थ्रिलर असून अनुभ सिन्हाने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
४. मलंग
मलंग हा रोमॅंटिक थ्रिलर आहे. संजय दत्त यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार आणि संदिप सिंह यांनी टी सीरीज अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली असून आरंभ सिंह या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आरंभ करतोय.
५. मॅक्रो भाऊ
मॅक्रो भाऊचे दिग्दर्शन शेली चोप्राने केले आहे. हा एक क्राईम थ्रिलर/ड्रामा आहे. चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्राने केली आहे.
हा चित्रपट २०१८ ला प्रदर्शित होईल. यामध्ये संजय दत्तची हटके भूमिका असेल.
६. दि गुड महाराजा
पुढच्या वर्षी संजय दत्त ओमुंग कुमारच्या दि दुड महाराजामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट महाराजा जाम साहेब दिग्विजयदिंहजी रणजितसिंहजी यांच्या चरित्रावर आधारित आहे, ज्यांनी ब्रिटिश नवानगर या रियासतीवर राज्य केले.
चित्रपटा विषयी इतर माहिती अजूनही मिळू शकलेली नाही.
७. हसमुख पिघल गया
अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हा एक बिग बजेट बॉलिवूड चित्रपट असून सेहल शाहने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच भावेश मंदालिया, गौरव शुक्ला आणि अमर टिपणिसने लेखन केले आहे.
मान्यता दत्त आणि संजय दत्त यांनी चित्रपताची निर्मिती केली आहे.
८. सडक २
१९९१ मध्ये गाजलेला सडक या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. संजय दत्त सोबत यामध्ये पूजा भट प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिने या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली आहे. पुन्हा एकदा महेश भट दिग्दर्शन करणार आहे.
हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
९. पानीपत
आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा ऐतिहासिक विषयाला हात घालत आहेत. त्यांचा पानीपत हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
यामध्ये संजय दत्त कोणती भूमिका साकारणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
१०. शिद्दत
शिद्दत हा रोमॅंटिक थ्रिलर असून वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, आलिया भट आणि सोनाक्षी सिन्ह्हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. संजय दत्त या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.
याआधी संजय दत्त या चित्रपटात श्रीदेवी सोबत झळकणार होता. पण श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूमुळे आता तिची जागा माधूरी दिक्षितने घेतली आहे. संजय दत्त यात बापाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट २०१८ ला प्रदर्शित होईल.
११. हाऊसफुल ४
हाऊसफुल या विनोदी चित्रपटाचा हा ४ था भाग आहे. यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बोमण इराणी प्रमुख भूमिकेत दिसतील.
सुत्रांच्या माहितीनुसार संजय दत्त आणि जॉन इब्राहिम सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान करणार असून साजिद नाडियादवाला चित्रपटाचा निर्माता आहे.
हा चित्रपट २०१९ ला दिवाळीत प्रदर्शित होईल.
१२. मुन्नाभाई ३
विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिराणी या जोडगोळीचे दोन्ही मुन्नाभाई प्रचंड गाजले. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक संदेश असा या चित्रपटांचा विषय होता.
आता ही जोडी मुन्नाभाई ३ घेऊन लवकरच येत आहे. अर्थात यामध्ये प्रमुख भूमिकेत संजय दत्त आणि अर्शद वार्सी असणार आहेत.
हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित होईल.
१३. शमशेरा
रण्बीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त लवकरच समशेरा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट २०१९ किंवा २०२० ला प्रदर्शित होईल.
यश राज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि करण मल्होत्राने दिग्दर्शन केले आहे. रणबीर शमशेराच्या म्हणजेच दरोखोराच्या भूमिकेत असणार आहे. संजय दत्त चित्रपटाचा खलनायक आहे.
रणबीरने नुकतीच संजू चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारली असली तरी दोघे पहिल्यांदाच एका चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
१४. ब्लॉकबस्टर
संजय दत्त मल्टीस्टारर “ब्लॉकबस्टर” या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. अजय अरोरा आणि लवली अरोरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा विनोदी सिनेमा आहे. स्वतः संजय दत्तला विनोदी चित्रपट करायला आवडतात.
सध्या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
१५. प्रस्थानम
प्रस्थानम हा चित्रपट २०१० साली आलेल्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये संजय दत्त प्रमुख भूमिकेत आहे, तसेच त्यानेच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
१ जून पासून चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे. विशेष म्हणजे १ जून नरगिसचा म्हणजेच संजय दत्तच्या आईचा जन्मदिन आहे. या चित्रपटात मनिषा कोईराला संजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
स्वरा भास्कर, अली फाझल सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.