' जेव्हा खुद्द राजपुत कच खात होते, तेव्हा “या राजाने” मुघलांना धूळ चारली.. – InMarathi

जेव्हा खुद्द राजपुत कच खात होते, तेव्हा “या राजाने” मुघलांना धूळ चारली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

ज्यावेळी सारा भारत मुघल फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडला होता त्यावेळी त्यांचा मुकाबला करून स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची हिम्मत भारतात ज्या हिम्मतवान राजांनी केली त्यात अग्रेसर होते आपल्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यांच्या मराठा साम्राज्याची दहशत दिल्लीत औरंगझेबाने देखील घेतलेली होती आणि दुसरे होते पंजाब प्रांतातील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीतसिंग.

 

ranjit-singh-inmarathi
thefamouspeople.com

महाराजा रणजितसिंग यांचे नाव आज इतिहासात राजा शिवछत्रपतीं इतकेच आदराने घेतले जाते. तरीही त्यांच्या जीवनचरित्राबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंजाबएतर लोकांना फारशी माहीत नाही.

रणजितसिंग यांचा जन्म १३ नोव्हेंबर १७८० ला संधावालिया घराण्यात महाराजा सुकरचाकीया आणि राणी राज कौर यांच्या पोटी आत्ता पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला प्रांतात झाला.

रणजितसिंग यांना लहानपणी झालेल्या गोवर मध्ये आपल्या डाव्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती. रणजितसिंग यांनी गुरुग्रंथसाहिब सोडले तर आयुष्यात दुसरे कुठले पुस्तकं माहीत होते न त्यांनी कसले लिहिण्या वाचण्याचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या जन्माच्या वेळी काळ कठीण होता.

भारतावर सतत परकीय आक्रमणे चालू होती त्यामुळे सरदार घराण्यातील मुलांनी जे शिकायला हवे अशा घोडेस्वारी, तलवारबाजी, युद्धकौशल्याच्या सगळ्या गोष्टी ते शिकले आणि आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर स्वत:च्या “मिसाल” नावाच्या जहागिरीचा कारभार पाहू लागले. वयाच्या १७ व्या वर्षी ते एक स्वतंत्र शासक म्हणून उदयाला आले होते.

 

Ranjit-singh-inmarathi01
commons.wikimedia.org

रणजितसिंग यांच्या आयुष्यात एक मोठी संधी लवकरच चालून आली जेव्हा अफगाणिस्तान चा शासक जमानशाह लाहोर प्रांतावर चाल करून आला. त्यावेळी त्याचा मुकाबला करण्याची संधी रणजितसिंग यांना मिळाली पण जमानशाहला आपल्या पाठीमागे आपल्या सावत्र भावाने काबुल मध्ये फितुरी केली आहे ही बातमी समजल्यामुळे युद्ध अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.

रणजितसिंग बरोबर शांतीचा तह करून तो माघारी जाण्यास निघाला. त्यावेळी झेलम नदी पार करताना त्याच्या तोफा आणि बाकी रसद रणजितसिंग यांनी सुरक्षित दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचण्यास मदत केली.

यावर प्रसन्न झालेल्या जमान शाह ने त्यांना लाहोर वर राज्य करण्याची परवानगी देवून टाकली. रणजितसिंग यांनी ७ जुलै १७९९ ला लाहोर वर आपला अधिकार प्रस्थापित केला.

याच्यानंतर पंजाब प्रांतातील अनेक जहागिरी आणि छोट्या छोट्या संस्थानावर रणजितसिंग यांनी स्वत:चा अधिकार प्रस्थापित केला. त्यात महत्वाचे अमृतसर हे एक ठाणे होते. अमृतसर वर कब्जा केल्याने पंजाब ची धार्मिक आणि आर्थिक राजधानी च रणजितसिंग यांच्या हातात आली होती.

 

Ranjit-singh-inmarathi02
sikh24.com

रणजितसिंग यांची घोडदौड आणि विजयाचा सिलसिला कायम राहिला जेव्हा त्यांनी गुजरात जिंकून सिंध प्रांतातील सतलज पर्यंत धडक मारली. तोपर्यंत सतलज ओलांडून आक्रमक भारतात येत असत पण भारतातील कोणीही शासक सतलज ओलांडून पलीकडे गेला नव्हता. महाराजा रणजितसिंग यांनी ते कर्तृत्व देखील करून दाखवले.

१८०७ मध्ये त्यांनी सतलज पार केले. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना ही महत्वाची शहरे देखील याच काळात जिंकून घेतली. रणजितसिंग यांची ही विजयपताका बाकीच्या लहान शीख संस्थानिकांना पाहवेना.

त्यांच्याबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली आणि म्हणूनच सतलज पार करून तेथील गावे जिंकल्यानंतर तिथल्या स्थानिक शीख संस्थानिकांनी रणजितसिंग विरुद्ध इंग्रजांकडे मदत मागितली. त्यानुसार इंग्रजांनी रणजितसिंग यांच्याकडे संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.

 

Ranjit-singh-inmarathi03
biographyhindi.com

महाराजाला हा प्रस्ताव अर्थात मान्य नव्हता मात्र इंग्रजांचा दबाव वाढत चालल्याने २५ एप्रिल १८०९ ची कुप्रसिद्ध “ अमृतसर संधी” झाली पण जरी संधी झाली तरी रणजितसिंग यांचा विजय वारू रोखण्यास त्यावेळी कोणीही समर्थ नव्हते. १८०९ साली जेव्हा “कांगडा” प्रांतावर अमरसिंह थापा या शीख संस्थानिकाने हल्ला केला तेव्हा तेथील शासक संसारचंद्र याने रणजितसिंग याची मदत घेतली.

परिणामस्वरूप कांगडा शत्रूमुक्त झाला आणि त्यावर रणजितसिंग याचं वर्चस्व देखील प्रस्थापित झालं.

सतत शत्त्रू चे हल्ले सहन करण्यापेक्षा अनेक शीख संस्थानिकानी महाराजा रणजीतसिंग यांच्या आश्रयाला जाण्याचे ठरवले त्यामुळे कांगडा प्रमाणे च पंजाब प्रांतातील “कटक” आणि “मुल्तान” ची गादी रणजितसिंग यांनी आपल्या कब्जाखाली आणली होती.

रणजितसिंग यांच्या कारकीर्दी मधील सगळ्यात दैदिप्यमान विजय मनाला जातो तो म्हणजे काश्मीर वरचा विजय.

त्यावेळी काश्मीर वर अफगाण शासक जब्बार खान राज्य कारभार पाहत होता. रणजितसिंग यांनी जब्बार खान याचं परिपत्य करण्यासाठी विशाल सेना काश्मीर ला पाठवून दिली ज्याचा मुकाबला जब्बार खान करू शकला नाही आणि काश्मीर त्यावेळी महाराजा रणजितसिंग यांच्या अधिकाराखाली आला.

 

Ranjit-singh-inmarathi04
ananthk.net

काश्मीरनंतर च्या विजयाने शीख सैनिकांचे मनोबल प्रचंड उंचावले होते त्यामुळे काश्मीर नंतर रणजितसिंग यांच्या सैन्याने पेशावर आणि लडाख ला देखील धडक मारली आणि ती शहरे काबीज करून घेतली.

महाराजा रणजितसिंग यांचा मृत्यू १८३९ मध्ये झाला. उण्यापुऱ्या ५९ वर्षाच्या आयुष्यात उत्तर भारताचा विशाल भूभाग गुजरात, पंजाब, काश्मीर, सिंध, पेशावर, लडाख पर्यंत चा भाग हा महाराजा रणजितसिंग यांनी स्वत:च्या एकछत्री अंमलाखाली आणला होता.

असा कारनामा करणारा महाराजा रणजितसिंग १९ व्या शतकातील एकमेव हिंदू शासक आहे. त्यांचा उल्लेख शीख संप्रदायात अत्यंत आदरपूर्वक घेतला जातो. अनेक शीख असे मानतात की शीख संप्रदाय आणि शीख साम्राज्याची शौर्यगाथा महाराजा रणजितसिंग यांच्या नावाशिवाय अधुरी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?