आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सुट्ट्यांच्या दिवसात कुठेतरी दूर फिरायला जाणे, निसर्गाचे वेगवेगळे पैलू पाहणे सर्वांनाच आवडते. त्यामुळे आता पर्यटनाकडे लोकांचा ओढा वाढत चालला आहे.
पण कधी कधी असेदेखील होते की आपण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतो आणि तो काही कारणांमुळे रद्द करावा लागतो.
पण जर ह्यावेळी तुम्ही तुमचा प्लॅन रद्द केला असेल तर कदाचित ती पर्यटन स्थळे तुम्हाला नंतर बघायला मिळणार नाहीत.
भारतात काही अशी पर्यटन स्थळे आहेत जी कदाचित पुढल्या वर्षीपर्यंत नामशेष होऊन जातील आणि ह्यानंतर आपण त्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकणार नाही…
१. राखीगढी, हरयाणा :
राखीगढी हे ठिकाण हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. तसे इथे पर्यटनस्थळ म्हणून कुठलेही नैसर्गिक सौंदर्य नाही.
पण ज्या लोकांना इतिहासात स्वारस्य आहे त्यांच्यासाठी हे गाव एक महत्वपूर्ण ठिकाण आहे. हे गाव जगातील सर्वात जुनी संस्कृती, सिंधु संस्कृतीच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते.
खराब व्यवस्थापन, अतिक्रमण, दरोडा आणि दुर्लक्षिततेमुळे आज हे ऐतिहासिक ठिकाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आता ह्या ठिकाणाची गणना आशियातील १० धोक्यात असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये केली जाते.
२. सुंदरबन, पश्चिम बंगाल :
सुंदरबन हे त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय सुंदर आहे. ह्याची सुंदरता शब्दात सांगण्या पलीकडची आहे, ती तुम्ही स्वतः बघून येथील नैसर्गिक सुंदरतेचे साक्षी होऊ शकता.
हे ठिकाण रॉयल बेंगाल टायगर ह्यांचे घर आहे. तसेच येथे अनेक असे जीव-जंतू आढळतात जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
लवकरच ह्या जिवांच हे सुंदर घर ओसाड होणार आहे, आणि ह्याचं कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग, पूर आहे.
३. लक्षद्वीप कोरल रीफ :
लक्षद्वीप बेट हे भारतातील सर्वात भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
येथील समुद्री जीवन हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथील समुद्रात आढळणारे रॉक हे कदाचितच आणखी कुठे बघायला मिळत असेल.
पण येथील हे सौंदर्य देखील आता काहीच काळासाठी आहे, कारण तेथील वाढणारे प्रदूषण, खाणकाम, ग्लोबल वार्मिंग ह्यामुळे समुद्राचा स्तर वाढला आहे.
लवकरच हे ठिकाण देखील नामशेष होण्याची शक्यता आहे.
४. जैसलमेर किल्ला, राजस्थान :
जैसलमेर येथील किल्ले हे तर जगप्रसिद्ध आहेत. हजारो वर्षांचा इतिहास येथील किल्ल्यांच्या प्रत्येक भिंतीवरून दिसून येतो.
एवढ्या वर्षांत कित्येक नैसर्गिक आपत्ती, कित्येक लढाया बघितल्या ह्या किल्ल्यांनी. तरी देखील त्यांची एक वीटही सरकली नाही. साम्राज्ये बनत गेली, राजा होत गेले पण सर्वांची ग्वाही देणारे हे किल्ले आजही त्याच सन्मानाने उभे आहेत.
पण आधुनिकीकरणाच्या विळख्यातून हे मजबूत किल्ले देखील सुटू शकले नाही. आता हे किल्ले आतून कमकुवत होत चालले आहेत.
ह्यामुळे येथील ४६९ किल्ल्यांपैकी ८७ किल्ले आतापर्यंत कोसळून नामशेष झाले आहेत.
५. चिकतन किल्ला, कारिगल :
कारगिल येथील चिकतन किल्ला हा एकेकाळी तेथील समुदायाची एकता आणि ताकदीचे प्रतिनिधित्व करत होता. पण आज ह्याला बघायला कोणी नाही.
आज ह्या पहाडात हा किल्ला एकटा उभा आहे. १६ व्या शतकात बनलेल्या हा किल्ल्याने २१ व्या शतकापर्यंत अनेक नैसर्गिक आणि राजनीतिक परिस्थितींना तोंड दिले आहे.
२०व्या शतकात ह्या किल्ल्याचा उपयोग हा रुग्णालयाच्या स्वरुपात देखील करण्यात आला. पण आता हा किल्ला तेवढा मजबूत राहिलेला नाही. ह्याची बारावी भिंत अनेक ठिकाणांहून कोसळत चालली आहे.
६. वलुर तलाव, जम्मु-कश्मीर :
भारतातील सर्वात मोठ्या गाळाच्या पाण्याचा स्त्रोत असलेला जम्मू-काश्मीरमधील वलूर तलाव हे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.
जेव्हापासून येथे वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले तेव्हापासून येथील येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पण आता हळूहळू हा तलाव होत चालला आहे.
७. हेमिस राष्ट्रीय उद्यान, लडाख :
लडाख येथे खूप उंचीवर असलेले हे स्नो लेपर्ड्सचे घर आहे. भारतात हे एकमेक असे ठिकाण आहे जिथे हा प्राणी आढळतो. हे ठिकाण इतरही काही सस्तन प्राण्यांसाठी अतिशय चांगले आहे.
पण बदलत्या वातावरणामुळे हे ठिकाण धोक्यात येण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या बाबतीत भारताचे धोरण हे नेहमीच उदासीन राहिले आहे.
आपली प्राचीन वारसा, सभ्यता यांच्याबाबत असलेली पोकळ अस्मिताचं आणि ते जतन करण्याचा, त्यांचे संवर्धन करण्याबाबत शून्य प्रयत्न हे इथल्या लोकांचे आणि पर्यायाने सरकारचेही नेहमीचे धोरण आहे.
काळजाच्या कुपीत जपून ठेवाव्यात अशा या जागा, अगदी राखीगढीपासून ते लक्षद्वीपपर्यंत!
सगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र आहे.
या पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या पिढीला या अद्भुत सौंदर्याला मुकावे लागेल हे मात्र खरे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.