' या मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रतिबंधक” फतवा! – InMarathi

या मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रतिबंधक” फतवा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने त्यांना ‘द ग्रेट मराठा’ असे म्हटले जाई. पानिपतच्या  तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

सालबाईचा तह हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.

 

mahadaji-shinde-inmarathi
hinduhistory.com

सालबाईच्या तहातील करारात एकूण सतरा कलमे होती. यातील शिंद्यांना फायदेशीर ठरलेली कलमे पुढीलप्रमाणे:

• ब्रिटिशांनी ग्वाल्हेरचा किल्ला आणि  यमुनेच्या पश्चिमेकडील जिंकलेला शिंद्यांचा सर्व प्रदेश त्यांना परत केला.

• शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच  देण्यात आले.

मुघल साम्राज्याचा राजा, शाह आलम द्वितीय याला प्रसिद्ध मिलिटरी जनरल महादजी शिंदे या मराठ्यांनी संरक्षण दिले होते. हे उत्तरेकडे सिंदीया म्हणून ओळखले जात. महादजी शिंदे यांच्या दबावाखाली त्यांनी संपूर्ण मुघल साम्राज्यात गोहत्याप्रतिबंधक फर्मान काढले होते.
अर्थात ही प्रातिनिधिक कृती होती कारण तोपर्यंत मुघल साम्राज्य औरंगजेबाच्या अधिपत्याखाली आले होते.

 

Shahalam-inmarathi
en.wikipedia.org

महादजी शिंदेच्या विनंती वरून मोगल बादशहा शहा आलमने गाय – बैल यांच्या कत्तलीस मनाई करण्यासाठी काढलेले फर्मान.

===

मु. दि. भा. २. प्रु. ४३२

दि. ४ सप्टेंबर १७८९

समस्त राज्य प्रबंधक खिलाफतचे (खिलाफत – ईश्वरी राज्य ) कार्यकर्ते तसेच बादशहांच्या कृपेस पात्र असे अमीर व परगणा निहायचे शासक व प्रांतो प्रांतीचे कारभारी व जबाबदार अधिकारी या सर्वास कळविण्यास येते की, बादशहाच्या कारभारात व मालिकगिरीत ( मालिकगिरी – राज्यात ) स्वामीची आज्ञा म्हणून या मुबारिक ( मुबारिक – विजयी ) फर्मानाचे पालन अवश्य करण्यात यावे आणि सर्वांनी स्पष्ट ध्यानात बाळगावे की, पशुसुद्धा विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निरुपयोगी होत असे समजू नये.

यातही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत. कारण मनुष्य पशु या दोघांचेही जीवन यांच्या पैदासीवर अवलंबून असून, गाय व बैल यांच्या शिवाय शेतीचे काम बिलकुल साध्य होणार नाही. मेहनती शिवाय खेती नाही, आणि मेहनतीस तर बैलाचे साह्य आवश्य पाहिजे.

यास्तव जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अवश्य जरूर आहे. आणि गाईवरच मनुष्यांचे व पशूचे जीवन अवलंबून आहे. यास्तव आमचे प्रिय पुत्र महाराजाधिराज सिंधिया बहादूर यांनी आमचेकडे विनंती केली. त्यावरून आम्ही आपल्या उदार अंतःकरणाने व हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्या भूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गो – हत्तेचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहो.

या आमच्या फर्मानाचा अंमल इतउत्तर राज्यातील समस्त अधिकाऱ्यांनी सावधगिरीने प्रयत्नपूर्वक करून ही आज्ञा पाळीत जावी की, जेणे करून कोणते नगर, कसबा, गाव यात गोहत्तेचे नावसुद्धा दिसू नये. इतक्या उपर जर कोणी इसम या आज्ञेच्या विरुद्ध वागून गोवधाच्या पापात लिप्त होईल तर तो बादशाहाच्या कोपास पात्र होऊन दंड पावेल.

===

संदर्भ ग्रंथ :-

मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय :- संपादक :- प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक 

===

भारतातील मुस्लीम राज्यकर्ते हे अनेकदा गोहत्या आणि तत्सम हिंदूंच्या धार्मिक भावनांच्या बाबतीत तडजोडीची भूमिका घेताना दिसून येत, यामागचे महत्वाचे कारण हे, की भारतात राज्य करताना हिंदू सरदार, नोकरचाकर हाताशी बाळगणे आणि त्यांची मर्जी राखणे बादशाहाला अपरिहार्य असे. गोहत्येला खुली सूट दिल्यानंतर हिंदू सरदार नाराज होत. ही नाराजी बादशाहाला परवडणारी नसे.

 

mughal-cow-inmarathi
en.wikipedia.org

सोबत दुर्लक्षून चालणार नाही अशी गोष्ट म्हणजे, बादशाहने राज्य करण्यासाठी वेळोवेळी घेतलेल्या या धोरणांना मौलवी लोकांनी नेहमी विरोध केला. नाईलाज म्हणूनही गोहत्याबंदीची फर्माने काढणे त्यांना इस्लामविरोधी वाटत होते.

===

चे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?