' छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना – InMarathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – निखिल लोणजे

===

गागाभट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर केला हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच. त्यावेळी निश्चलपुरी गोसावी नावाचे साधू आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

नंतर ते तीर्थक्षेत्र पाहत फिरत असतांना कोकणात कुडाळेश्वर येथे गेले असता त्यांची आणि गोविंद नावाच्या विद्वानाची भेट झाली. दोघेही काशीत एकमेकांना भेटले होते, त्यामुळे ते एकमेकांस ओळखत होते.

निश्चलपुरींनी त्यांना शिवराज्याभिषेकाबद्दल सांगितले आणि म्हणाले की मी महाराजांजवळ असतो. ह्या संवादात निश्चलपुरींनी महाराजांचा उल्लेख “महादेवाचा अवतार” म्हणून केलेला आहे.

 

 

गोविंद हे राज्याभिषेकास उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारणा केली कि राज्याभिषेक कसा झाला हे आपण मला सांगावे. त्यावर निश्चलपुरी म्हणाले की –

गागाभट्ट नाशिक येथे आले असता महाराजांनी त्यांना बोलावून घेतले. ज्यादिवशी महाराजांना गायत्री मंत्रोपदेश झाला त्याच्या आदल्या दिवशी उल्कापात झाला मात्र तो मी अर्थात निश्चलपुरींनी हनुमंत मंत्रानी थांबवला!

राज्याभिषेकादरम्यान सुवर्णतुलेनंतर एका मोठ्या अपघातात एक लाकूड पडले, ते लाकूड गागाभट्टांच्या नाकाला लागले. राजपुरोहित बाळंभट्टांच्या मस्तकावरदेखील लाकडी स्तंभावरील एक कमळ गळून पडले.

स्थानिक देवतांचे पूजन आणि बलिदान न केल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या असे निश्चलपुरी आपल्या ग्रंथात सांगतात. ह्या ग्रंथाचे नाव आहे “श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू”! हा एक संस्कृत पद्यात्मक ग्रंथ आहे.

ह्या ग्रंथातल्या एका श्लोकावरून असे वाटते कि, जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराज जेव्हा सुटून महाराष्ट्रात आले तेव्हा या ग्रंथाचं लेखन झालेलं असावं. ह्या ग्रंथाची सध्या एकच प्रत उपलब्ध आहे, ती कोलकाता येथे Royal Asiatic Society येथे आपल्याला बघायला मिळते.

 

RAC-inmarathi
britannica.com

 

गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकात दोष घडल्यामुळे पुढे काय काय अनिष्ट गोष्टी घडतील ह्याचा उल्लेख देखील आपल्याला या ग्रंथात बघायला मिळतो. आणि राज्याभिषेकानंतर खरंच तसं आढळून आले.

काही दिवसातच राजमाता जिजाबाई मरण पावल्या.

 

jijabai_shivaji_inmarathi
4to40.com

 

प्रतापगडावरील घोड्यांची एक पागा जळाली. हे ठोकताळे आल्यानंतर महाराजांनी पुराणोक्त पद्धतीने म्हणजे तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याचे मान्य केले आणि जपास काही साधू लोकांना बसवले.

निश्चलपुरींनी महाराजांना सांगितल्याप्रमाणे पंधराव्या दिवशी महाराजांना शत्रू हस्तगत झाला. ई.स.१६७४, २४ सप्टेंबर रोजी म्हणजे ललितापंचमीच्या दिवशी हा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला.

सिंहासनाचे सिंह, महाद्वार, सिंहासन अशा अनेक स्थानिक देवतांना बलिदान दिल्याचा उल्लेख आढळतो.

महाराजांनी निश्चलपुरींकडून मंत्रोपदेश घेतल्याचे सातव्या शाखेत लिहून आलेले आहे. एकूणच हा ग्रंथ मोठा चमत्कारिक आहे. १८ मार्च १६७४ रोजी महाराजांची जी पत्नी रायगडावर वारली तिचे नाव काशीबाई होते हे आपल्याला प्रथमच समजते.

३० मे १६७४ रोजी महाराजांनी नवीन लग्न केले नसून पूर्वीच्याच स्त्रियांशी पुन्हा समंत्रक विवाह केल्याचे आपल्याला ह्या ग्रंथातून समजते.

 

rajyabhishek-inmarathi

 

गागाभट्टांनी केलेला राज्याभिषेक हा वेदोक्त पद्धतीचा होता हे आपल्याला ह्या ग्रंथावरून कळते. ह्या ग्रंथात दुसऱ्या राज्याभिषेकाबद्दल काय माहिती आलीये ती आपण आता सविस्तर पाहूया –

ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाला अभिवादन केलेले आहे.

त्यानंतर शिव – पार्वती यांचादेखील आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. शिवभार्या काशीबाई ह्या गागाभट्टांच्या आगमनानंतरच वारल्या होत्या. शिवाय प्रतापराव गुजर हे नेसरीच्या लढाईत मारले गेले होते.

अशा वेळी भार्गवक्षेत्री भार्गवास प्रसन्न करण्यासाठी बरेच द्रव्य खर्च करून महाराज रायगडावर परत आले. मग राज्याभिषेकाच्या अनुसंधानाने महाराजांनी गोदान आणि द्रव्यदान केले.

राज्याभिषेकाच्यावेळी गडावरच्या शिरकाई भवानीची पूजा झालेली नव्हती, कोकणचा भार्गवराम याचीही पूजा बांधण्यात आली नव्हती.

सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्र विद्येचा आश्रय घेण्यात आला नव्हता, गडाच्या महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या देवतांचे पूजन झाले नाही.

सिंहासनरोहणाच्या वेळी चालत असतांना संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले.

शिवाजी महाराजांजवळील कट्यार म्यानबद्ध नाही असेही त्यांना आढळून आले. राज्याभिषेकानंतरच्या मिरवणुकीसाठीच्या रथात महाराज चढत असतांना रथाचा आस वाकला म्हणून महाराजांनी गजारूढ होऊन म्हणजे हत्तीवर स्वर होऊन मिरवणूक पूर्ण केली.

धनुष्याची प्रत्यंचा ओढत असताना महाराजांच्या बोटातली अंगठी गळून पडली, एकंदरीतच हे सगळे “अपशकुन” झाल्यावर निश्चलपुरी महाराजांना येऊन भेटले आणि सांगितले की,

“हे राजा!, राज्याभिषेकाच्या नंतर तेराव्या, बाविसाव्व्या, पंचावन्नाव्या आणि पासष्ठाव्या दिवशी अशुभ घटना घडतील.

महाराजांनी प्रथम ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण तेराव्या दिवशी राजमाता जिजाऊ इहलोक सोडून गेल्या, बाविसाव्व्या दिवशी रायगडावर एक हत्ती निधन पावला.

हे आणि असले अजून काही प्रकार घडल्यावर महाराजांनी निश्चलपुरींना बोलावून घेतले आणि सांगितले आपल्या बोलण्याचा पडताळा मला आला आहे आपण मला तांत्रिक विधीने मला अभिषेक करावा.”

 

maharaja-on-elephant

 

महाराजांची विनंती ऐकून निश्चलपुरींनी राज्याभिषेकावेळी काय काय केले हे ग्रंथात नमूद करून ठेवलेय ते पुढीलप्रमाणे-

“मी मंत्र म्हणणारे साधू निवडले. ते लाल आसनांवर लाल वस्त्र परिधान करून मंत्र पठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरु झाले. अश्विन शु.पंचमीला मी शिवाजी राजाला अभिषेक केला. राजांनी त्यादिवशी सकाळी कुंभपूजा केली.

सिंहासनापाशी त्यादिवशी समंत्रक भूमी शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. शिवाजी राजा खुद्द हातात तलवार घेऊन सिंहासनापाशी गेला.

अनेक देवतांची त्याने शांती केली. सिंहासनाच्या आठही सिंहांस त्याने बळी दिले.

आठ सिंहांच्या पाठीवर महाराजांचे आसन होते. त्यावर निश्चलपुरींनी यंत्र ठेवले.

एका रत्नखचित आसनावर निश्चलपुरींनी रौप्याचे आसन ठेवले. आसनांभोवतीच्या आठ कलशांवर चंद्रकिरणांच्या धारा ओघळत होत्या. त्या अष्टकलशांत पाच पानांचे तुरे ठेवले होते. कलशांना पाच लाल रेशमी वस्त्र गुंडाळलेली होती.

पडदे लावून शोभा आणली होती, धूप दरवळत होता, दिवे तेवत होते, त्यानंतर मस्तकावर अभिषेकाची धारा सुरु झाली. यावेळी सामवेदातील मंत्रगायन सुरु होते.”

हा इतिहास खूपच अज्ञात आहे.

परंतु ही घटना समकालीन साधनात आलेली असल्यामुळे ती इतिहास म्हणून आपल्याला ठाऊक असणे अनिवार्य आहे.

याबद्दल ज्येष्ठ इतिहासकार सरदेसाई म्हणतात,

“जिजाबाईंच्या मृत्यूनंतर विरोधीपक्षाच्या समजुतीसाठी महाराजांनी एक छोटा राज्याभिषेक निश्चलपुरींकडून करवून घेतला.”

ह्या लेखात आलेल्या घटना कुणाला प्रतिगामी किंवा अंधश्रद्धा वाटणं काही आश्चर्याची बाब नाही. पण, वर उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास म्हणून तिचा अभ्यास करावा.

त्याची वैज्ञानिकता – अवैज्ञानिकता तपासणं हा ह्या लेखाचा हेतू नाही!

 

Shivaji-Rajyabhishek-marathipizza01
godwallpaper.in

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?