Site icon InMarathi

‘नेहरूवाद नावाचे मिथक!’ : रामचंद्र गुहांचा लेख – नेहरूंच्या ‘बनवलेल्या’ प्रतिमेमागील सत्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : विवेक जाधवर

===

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या बुद्धिजीवींनी नेहरूंच्या आठवणींचे जेवढे कढ काढले असतील तेवढे त्याआधी क्वचितच काढले गेले असतील. यातून भाजपची सत्ता येण्यापूर्वी नेहरूंच्या विचारसरणीबद्दल बुद्धिजीवींमध्ये सहमती होती, असा निष्कर्ष सर्वसामान्यांच्या मनात आकार घेऊ लागतो.

यासंदर्भात रामचंद्र गुहांचा साधनाच्या अंकातील ‘नेहरूवाद नावाचे मिथक!’ नावाचा लेख महत्त्वाचा आहे.

गुहांच्या मते ‘नेहरूप्रणीत विचारसरणीचे वैचारिक ऐक्य’ १९५० ते १९६० या नेहरू विचारधारेच्या उत्कर्षकाळातदेखील नव्हते. जनसंघ व कम्युनिस्ट पक्ष नेहरूंचे पारंपरिक टीकाकार होतेच परंतु त्यांचे खरे विरोधक काँग्रेसमध्येच होते. सी. राजगोपालचारी (राजाजी) खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक व प्रो-अमेरिकन होते.

 

indianexpress.com

आर. के. नारायण आणि मास्ती व्यंकटेश अय्यंगार यांसारखे प्रसिद्ध साहित्यिक राजगोपालचारींचे समर्थक होते. तर जयप्रकाश नारायण यांना नेहरूंचे आर्थिक धोरण पसंत नव्हते. त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आवश्यक वाटत होते. राज्यशास्त्राचे अनेक अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ जयप्रकाश नारायण यांच्या मांडणीकडे आकर्षित झाले होते.

राममनोहर लोहियांच्या मते नेहरूंच्या अभिजन वृत्तीमुळे सर्वसामान्यांपासून ते दुरावलेले होते.

त्याकाळात अनेक लेखक व अभ्यासक स्वत:ला ‘लोहियावादी’ म्हणवत असत. डीडी कोसंबीसारखे मार्क्सवादी इतिहासकारही नेहरूंचे कठोर टीकाकार होते. थोडक्यात, नेहरूंच्या या टीकाकारांचा प्रस्थापित बुद्धिवंतांमध्ये मोठा दबदबा होता. केंद्रात व बहुतेक राज्यांत काँग्रेसची सरकारे असतानाही ‘नेहरूप्रणीत विचारधारणेवर मतैक्य’ हा प्रकार कधीच अस्तित्वात नव्हता.

१९७० व ८० च्या दशकात नेहरू व त्यांच्या विचाराच्या वारशाला अधिकच आव्हान मिळाले. जगदीश भगवती आणि टी. एन. श्रीनिवासन यांसारखे मुक्तव्यापाराचे समर्थक अर्थशास्त्रज्ञ आपल्या सहव्यावसायिकांमध्ये अधिक प्रतिष्ठित बनले.

 

post.jagran.com

या काळात कलकत्त्याच्या सांस्कृतिक वातावरणात नेहरूंबद्दलची तुच्छता व नावड भरून राहिली होती. ‘सेंटर फॉर द स्टडीज ऑफ सोशल सायन्सेस’ मधील पार्थ चटर्जी यांनी नेहरूंवर टीका करणारे पुस्तक लिहले होते. त्यात त्यांनी नेहरूंना ‘लटपटत्या पायांचा (Weak Kneed) सुधारक’ असे दूषण देऊन त्यांनी फक्त एक मूक क्रांती घडवून आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले. असे म्हटले होते.

समाजशास्त्रज्ञ आशिष नंदींच्या मते नेहरू हे सर्वसामान्य माणसाची संस्कृती आणि परंपरा यामध्ये फारसा रस नसलेले ‘उर्मट अभिजनवादी’ होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनावरील दृढ विश्वासामुळे, नेहरूंचे या देशातील शेती, स्थानिक वैद्यक आणि कारागिरी यांचे पोषण करणाऱ्या समृद्ध परंपरांकडे दुर्लक्ष झाले असे नंदींचे म्हणणे होते. तसेच प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ टी. एन. मदान यांच्यामते नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेपेक्षा गांधीजींची धर्मनिरपेक्षतेची कल्पना अधिक चांगली होती.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version