आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखिका : प्राजक्ता काणेगावकर
===
माझा प्लॅस्टिक बंदीला ठाम पाठिंबा आहे.
यात मी कुठल्याही राजकीय पक्षाचे त्याच्या निर्णयाचे समर्थन करत नाहीये. राजकारण हा माझ्या अत्यंत नावडीचा विषय आहे आणि मी त्यात पडतही नाही.
प्लॅस्टिक बंदी जाहीर व्हायच्या आधीपासून मी सातत्याने प्लॅस्टिकच्या वापरला पर्याय शोधत आहे. प्लॅस्टिक हा खरोखर अतोनात गंभीर प्रश्न आहे.
प्लॅस्टिक म्हणले की मला तंबूत शिरणाऱ्या उंटाची गोष्ट आठवते. शेपटीला थंडी वाजते म्हणून फक्त शेपटी तंबूत सरकवणारा उंट शेवटी मालकालाच तंबू बाहेर ढकलतो.
याप्रमाणे प्लॅस्टिक अनिवार्य झाले आहे. आज आपणच तंबूच्या बाहेर उभे आहोत प्लॅस्टिकमुळे.
मागच्या काही महिन्यात मी काही बदल केले, पर्याय शोधले ते शेअर करतेय. यात माझा मोठेपणा सांगणे हा उद्देश नसून मला जे पर्याय मिळाले ते सांगणे हा आहे.
कदाचित मी जे करतेय त्यापेक्षा तुमच्याकडे चांगला पर्याय असू शकतो. अशा देवाणघेवाणीतून आपण सगळे एकमेकांना मदत करू शकतो म्हणून हा प्रयत्न.
१. माझा छोटासा लाडूचा व्यवसाय आहे. बुंदीचे लाडू सोडून मी सगळ्या लाडवांच्या ऑर्डर्स घेते.
मध्यंतरी काही दुकानातही मी लाडू ठेवत असे. त्याचे पॅकिंग करताना सुरुवातीचा एक लॉट मी प्लॅस्टिकच्या चौकोनी ट्रे मध्ये पॅक करून दिला. मला काही केल्या ते मान्य नव्हते आणि पटत त्याहून नव्हते.
एक पॅकेट दोनशे ग्रॅमचे असते लाडूचे. नग सहा लाडू. मध्यम आकाराचे. दुसऱ्या वेळी सुपारीच्या द्रोणात पॅकिंग केले. बरोब्बर सहा लाडू मावले त्यात.
वरून कव्हर करताना शासनमान्य मायक्रॉनची प्लॅस्टिकची पिशवी वापरली. यातही जे दुकानात जातात त्या लाडवांना प्लॅस्टिकचे आवरण अनिवार्य असते म्हणून.
माझ्याकडे जेव्हा डायरेक्ट ऑर्डर येते तेव्हा मी वजन करून लाडू डब्यात भरून ठेवते. ऑर्डर पोचवायची असेल तर मी डबा घेऊन जाते आणि कस्टमरच्या घरी डब्यात भरून घ्या म्हणून सांगते.
कस्टमर जर माझ्या घरून लाडू नेणार असेल तर मी येताना लाडू मावतील असा डबा घेऊन या म्हणून सांगते.
अजून तरी कुठल्या कस्टमरने माझ्याशी वाद घातला नाहीये. माझा बिझनेस फारच छोट्या स्केलवर आहे म्हणून मला जमते असा युक्तिवाद होऊ शकतो. माझा उलट सवाल आहे-
माझा बिझनेस छोटा असताना, माझ्याकडे फारसे रिसोर्सेस नसताना मला पर्याय सापडू शकतात. तर तुमचा बिझनेस मोठा असेल तर तुम्हाला तर किती आणखी वेगवेगळे पर्याय सापडू शकतील याचा विचार करा.
२. माझ्या घरातला प्लॅस्टिकचा कचरा केरात टाकण्याचे प्रमाण निम्म्याहूनही खाली आले आहे आधीपेक्षा.
माझ्याकडे एक मोठी किराणा सामानाची पिशवी आहे. त्या पिशवीत मी एकदा बघू तरी किती कचरा होतो प्लॅस्टिकचा म्हणून प्लॅस्टिक त्यात गोळा केले. पंधरा दिवसात ती पिशवी वहायला लागली.
त्या पिशवीत पॅकिंग म्हणून आलेले प्लॅस्टिक, दुधाच्या पिशव्या, बबल रॅप्स, कॅरीबॅग्स असा भरणा आहे. आता ती पिशवी मी दर महिन्याला प्लॅस्टिक रिसायकलिंग सेंटर मध्ये नेऊन देणार आहे.
माझ्याकडून केरात प्लॅस्टिक अजिबात जाणार नाही याची मी अजूनच पुरेपूर काळजी घेणार आहे.
ओला कचरा जिरवायचे टेक्निक मला अजून तितके जमत नाहीये. पण बहुतेक एखादा महिना अजून. माझ्या घरातला कचरा मी घरातच जिरवू शकेन याची मला खात्री आहे.
३. माझ्या स्वयंपाकघरातला प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर हा जवळपास निम्म्याने कमी झाला आहे.
जसे पैसे येतील तसे मी घरातले प्लॅस्टिकचे डबे आणि भांडी बदलतेय. नोकरी नाहीये सध्या म्हणून नाहीतर एक आठवड्यात संपूर्ण किचनमधले जे काही प्लॅस्टिक आहे ते बदलले असते मी.
सुरुवात तर झाली आहे. टार्गेट ठेवून जास्तीत जास्त पुढच्या तीन महिन्यात माझे स्वयंपाकघर प्लॅस्टिक मुक्त होईल.
४. स्टायरोफोम आणि डिस्पोजेबल प्लॅस्टिक मी आधीही वापरत नव्हतेच आता तर प्रश्नच नाही.
बाहेर जाताना कापडी पिशवी डिफॉल्ट गाडीत किंवा पर्स मध्ये असते. पाण्याची बाटली मेटलची घेतली आहे. आता कप्पेवाली भाजीची पिशवी घेणार आहे म्हणजे एकच पिशवी घेऊन जाता येईल.
दोन महिन्यापूर्वी मी लहान मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या पंधरा-वीस पिशव्या शिवून घेतल्या. फ्रिजमध्ये पूजेची फुले, दूर्वा पासून पालेभाज्या, मिरची कोथिंबीर पर्यंत सगळे कागदात गुंडाळून त्या पिशव्यांमधून ठेवते. छान राहते भाजी.
अगदीच वापरायची वेळ आली प्लॅस्टिक तर हाय मायक्रॉनच्या झिपलॉकच्या पुन्हा वापरता येणाऱ्या पिशव्या वापरते.
तीन आठवड्यांपूर्वी मी किराणा सामान भरले. एक मोठी कॅबिनेट सुटकेस नेली मी १० किलोची. त्यात १२ किलो पर्यंत सगळ्या छोट्या वस्तू बसल्या.
त्या छोट्या वस्तूंच्या पॅकिंगचे प्लॅस्टिक पुन्हा माझ्या मोठ्या प्लॅस्टिक साठवणीच्या पिशवीत गेले. ट्रॉली बॅग असल्याने उचलायला पण लागली नाही.
धान्य भरायला माझ्याकडच्या दणकट कापडी पिशव्या नेल्या. एकच कमी पडली पिशवी त्यामुळे रवा मला प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून घ्यावा लागला. (पुढच्या वेळी चार पाच पिशव्या जास्तीच्या घेऊन जाईन)
५. पुण्यातील काही प्लॅस्टिक रिसायकलिंग सेंटरच्या लिंक पुढीलप्रमाणे आहेत
https://www.thebetterindia.com/60328/pune-plastic-waste-poly-fuel-environment/
हे पॉली फ्युएल करतात प्लॅस्टिक पासून
https://indianexpress.com/article/cities/pune/a-team-that-collects-your-plastic-waste/
ही इंडियन एक्सप्रेस मधली बातमी आहे. यात पण अशा संस्थांची माहिती आहे.
स्वच्छ संस्था तर कमाल आहे. इतक्या निष्ठेने त्यांचे ओला कचरा, सुका कचरा आणि रिसायकलिंग इत्यादी मध्ये काम चालते की आपण थक्क होतो.
कालको हे इ-वेस्ट रिसायकलिंग मध्ये आहेत. मोबाईल कीबोर्डस, कॉम्पुटर वेस्ट इत्यादी. ते एल इ डी बल्ब वगैरे पण रिसायकल करतात.
http://rudraenvsolution.com/index.html
हे पण पॉली फ्युएल करतात. Dr Medha Tadpatrikar – 020 25448900/97373053235
ऊर्जा फाउंडेशन डोंबिवली – 09820807362
मीनल ठाणे – 09967540339
आपले नदी नाले, झरे आणि पर्यायाने समुद्रात वाहून जाणारे प्लॅस्टिक हे किती घातक आहे हे नव्याने सांगायला नकोय. सागर मित्र शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करतात आणि प्लॅस्टिक या विद्यार्थ्यांमार्फत गोळा करतात.
यातल्या जवळपास सगळ्या संस्था या दुधाच्या पिशव्यांपासून खायच्या पदार्थांचे रॅपर्स ते सोफ्या पर्यंत सगळे प्लॅस्टिक रिसायकल करतात. दर पंधरा दिवसांनी त्यांचे लोक तुमच्याकडे येऊन प्लॅस्टिक घेऊन जातात.
सोसायटीमध्ये सगळ्यांनी एकत्र प्लॅस्टिक दिले तर जवळपास शंभर किलो पर्यंत प्लॅस्टिक उचलतात ते. मोठ्या सोसायट्यांमधून हे जमणे सहज शक्य आहे.
वारज्यात श्रीराम सोसायटीने हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवलेला आहे. प्लॅस्टिक मुक्त सोसायटी आहे ती. अशा बऱ्याच असतील आणि पुण्यात. आमच्या ईशान नगरीतही हे सुरु होईल थोड्या दिवसात.
प्लॅस्टिक बंदी आज नाही सांगितलेली. तीन महिने आधी कल्पना देण्यात आली होती. कुठले प्लॅस्टिक चालते आणि कुठले नाही याची कुणी यादी देण्यासाठी आपण का थांबले पाहिजे ते मला कळले नाही.
इंडस्ट्रियल प्लॅस्टिक आपण वापरत नाही. घरात येणारे वेस्ट प्लॅस्टिक आपल्याला माहित असते. ते कमीत कमी येऊ देणे आणि आलेल्या प्लॅस्टिकचे वर्गीकरण करणे फार अवघड नसावे.
बहुतेक आपल्याकडे घरात येणारे प्लॅस्टिक हे डिसपोजेबलच असते. मग त्यासाठी यादी येण्याची कशाला वाट पाहायला पाहिजे?
कालपासून प्लॅस्टिक बंदी, त्यावरचा असलेला दंड, ऐश्वर्या-माधुरी-श्रीदेवी यांच्या प्लॅस्टिक सर्जरी, तांदळाच्या डब्यात ठेवलेल्या नोटा, गादीखालच्या पिशव्या, चिरीमिरी देऊन प्लॅस्टिक बंदीच्या स्वयंसेवकांकडून स्वतःला सोडवून घेणे, दुसऱ्याला गुन्ह्यात अडकवण्यासाठी हॅण्डलला कॅरीबॅग लावणे वगैरे दर्जाहीन विनोद आणि खुसपटे वाचून मला शेवटी असे वाटायला लागले की मी फेसबुकपासून लांब होते तेच बरं होते.
मला वाटले की तीन महिने आधी डिक्लेअर केलेली प्लॅस्टिक बंदी प्रत्यक्षात आल्यावर किमान लोक मी काय काय केले प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी ते शेअर करतील, काहीतरी नवीन उपाय सुचवतील.
पण असे काहीच वाचायला मिळाले नाही. इतक्या गंभीर प्रश्नावर काहीतरी उपाय चालू आहे त्याला आपण आपल्या परीने पूर्ण सहकार्य करायचे सोडून हे काय चालवले आहे?
सगळा प्लॅस्टिकचा कचरा एकदम नष्ट होणार नाहीये. पण त्यासाठी किमान पहिले पाऊल तरी उचलले गेलंय.
हा तुमच्या आमच्या आयुष्याशी डायरेक्ट संबंध असलेला प्रश्न आहे. सगळे मिळून वाट शोधून तो सोडवायचा का कुणीतरी तो माझ्यासाठी सोडवेल अशी अपेक्षा करत राहायचे?
मला हे झेपलेच नाहीये. पर्याय शोधले की मिळतात. हे मी स्वानुभवाने सांगतेय. कुणी पर्याय देण्यासाठी वाट का बघायची? या इतक्या महत्वाच्या प्रश्नात राजकीय शिव्यागाळी, भक्त-अभक्त हे मुद्दे कसे येऊ शकतात?
हे फार फार आधीच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे होते. किमान कायद्याने होतंय त्याला आपण सहकार्य तरी करू शकतो? का तिथेही कीस पाडत राहायचे?
जरा एक पाऊल मागे येऊन आपण थोडे विचार करूया का सगळे यावर?
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.