घायल : धगधगत्या अंगाराची २८ वर्षे
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
ऐंशीच्या दशकात अन्यायाला वाचा फोडणारी तरुणाई पडद्यावर हळू हळू दिसू लागली होती. ‘अर्धसत्य’ मधला अनंत वेलणकरही याच काळातला, एका अर्थी त्याने या अन्यायाच्या विरुद्ध उभे रहायचा पाया रोवला. त्याबाबतीत राहुल रवैलचा ‘अर्जुन’ सुद्धा एक माईलस्टोन होता, असे म्हटले तर अतिरेक होणार नाही.
पुढे, एन. चंद्राने ‘अंकुश’ आणि ‘तेजाब’मध्ये आणि रामुने ‘शिवा’तही हा वारसा पुढे चालवला.
याच दशकात सनी देओलने फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं बस्तान बऱ्यापैकी बसवलं होतं. ‘बेताब’ या रोमँटिक फिल्मने करियर सुरू केल्यानंतर ‘सनी’, ‘सोहनी मेहवाल’ या काहीश्या त्याच पाठडीतल्या मूवीज केल्या, पण काहीतरी मिसिंग होतं, हे नक्की. शेवटी देओल खानदानचं रक्त ते, किती दिवस शांत राहणार होतं. अखेर सनीचा ‘अर्जुन’ आला आणि तो खऱ्या अर्थाने त्याच्या कॅटेगरीच्या भूमिकेत दिसला.
शांत, संयमी आणि केवळ डोळ्यांनी बोलणारा सनी लोकांना आवडला.
हा सनी, आरडाओरड, बेफाम मारामारी, डायलॉगबाजी वगैरे यायच्या आधीचा होता. यातही जबरदस्त डायलॉग्स होते, पण त्याहीपेक्षा त्याचे डोळे जास्त बोलत होते. पुढेही ‘डकैत’, ‘यतीम’, ‘त्रिदेव’मध्ये रागीट सनीची झलक दिसली, पण घायलच्या अजय मेहराने त्याला खरी ओळख मिळवून दिली.
ऐंशीच्या मध्यात ‘शराबी’ आणि ‘आखरी रास्ता’ने तारलेल्या अमिताभ बच्चनला दशकाच्या शेवटी बऱ्याच फ्लॉपचा सामना करावा लागला. मुकुल आनंदच्या चित्रपटांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबतचे त्याचे चित्रपट जादू दाखवू शकले नव्हते.
त्याची अँग्री यंग मॅन ही खुर्ची रिकामीच राहते की काय अशी शंका येत असतानाच, ‘घायल’च्या अजय मेहराने त्याच्या दणदणीत आवाजाने ती कसर भरून काढली. तीही अशी की नव्वदच्या दशकात बालपण गेलेल्या प्रत्येकाच्या कानात तो आवाज अजूनही घुमत आहे.
या प्रवासात महत्वाचे योगदान देणाऱ्या दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची कारकीर्दही चित्रपटाप्रमाणेच रंजक आहे.
सुरुवातीला आपल्या दिग्दर्शक पित्याच्या (पी. एल. संतोषी) सोबत काम केल्यानंतर, संतोषी काही काळ विधु विनोद चोप्रासोबत काम करू लागले, पण प्रोडक्शनच्या कामात मन रमत नसल्याने आणि त्यांची स्वप्ने वेगळी असल्याने त्यांनी विधुला याची स्पष्ट कबुली देऊन, काम सोडण्याची परवानगी मागितली.
विधुला, अर्थातच याचे कौतुक वाटले आणि ‘तू पुढे जाऊन नक्कीच यशस्वी होशील’ अशी पाठीवर कौतुकाची थापही दिली.
त्यानंतर, घायलचे काम सुरू करण्यापूर्वी काही वर्षे राजकुमार संतोषी गोविंद निहलानी यांना सहाय्यक म्हणून काम पाहू लागले. इथे त्यांना दिग्दर्शनाच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याची छाप त्यांच्या पुढच्या अनेक चित्रपटातही ठळक दिसते.
संतोषी आजही अभिमानाने गोविंद निहलानी यांना आपले गुरु मानतात. अर्धसत्यच्या वेळी निहलानी यांनी अनेक लोकांच्या आक्षेपाची पर्वा न करता ओम पुरीला प्रमुख भूमिकेत कास्ट केले होते आणि पुढे इतिहास घडला.
निहलानी यांचे या प्रकारचे कंविक्शन आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचा आत्मविश्वास पुढे संतोषी यांनीही आत्मसात केला.
घायलची कथा संतोषी यांनी कमल हसनला नजरेसमोर ठेऊन लिहिली होती. पुढे मिथुन चक्रवर्थी आणि संजय दत्त बद्दलही विचार झाला, पण कधी तारखा तर कधी निर्माते उपलब्ध न होऊ शकल्याने हा रोल सनी देओलकडे चालून आला.
धर्मेंद्रने हा चित्रपट विजयता फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्याचे ठरवले आणि त्याच इतिहासाची पुढे पुनुरावृत्ती झाली. आता विचार केला तर अजय मेहरा या भूमिकेत सनीशिवाय अन्य कुणाची कल्पनादेखील करवत नाही.
घायलची कथा अगदीच नवीन किंवा वेगळी होती असे नाही, पण अजय मेहरा मात्र नेहमीपेक्षा वेगळा होता. हसत खेळत आपल्या कुटुंबासोबत राहणारा, भाऊ आणि वहिनी यांना माता-पितासमान मानणारा, अजातशत्रू अजय आपल्या हरवलेल्या भावाचा शोध घेत घेत एका दुष्टचक्रात अडकत जातो.
भ्रष्ट पोलीस आणि बलवंत रायने विकत घेतलेला कायदा यांचे उंबरे घासूनही जेव्हा हाती शून्य राहते, शिवाय भावाच्या खुनाचाही आरोप त्याच्यावरच येतो, तेव्हा सुडाने पेटलेला अजय सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घ्यायचे ठरवून, २४ तासात बलवंत रायला संपवण्याचे अलटीमेटम देतो.
घायलची हायलाईट सनी देओलचा दमदार अभिनय असला तरी इतर अनेक सपोर्टींग कलाकारांच्या तितक्याच महत्वाच्या योगदानाला दुर्लक्षित करता येणार नाही.
अमरीश पुरीने उभा केलेला भ्रष्ट व्यावसायिक आणि स्मगलर बलवंत राय, हाही चित्रपटाचा एक अविभाज्य घटक. घायलच्या आधी पुरीसाहेबांचं याआधीच, मोगॅम्बो हे अजरामर पात्र साकारून झालं होतं, त्यानंतर त्यांनी बलवंत रायच्या भूमिकेलाही चार चाँद लावले.
निहलानी स्कुलचा अजून एक सहकारी ओम पुरी याचा एसीपी जो डिसुझा हा रोलही तितकाच ताकदीचा आणि महत्वपूर्ण. सुरुवातीला अजयला गुन्हेगार समजणारा डिसुझा जेव्हा परिस्थिती समजून घेतो तेव्हा सटतोडपणे कमिशनरला-
‘अपराधी अजय नही, हम हैं, और हमारा ये सडा हुवा सिस्टम’
डिसुझाचा अजून एक डायलॉग या सडलेल्या सिस्टीमवर नेमके बोट ठेवतो –
‘अजय नतिजा हैं, कानून से जुडे हम जैसे नपुंसक लोगों का’
कायदाच्या मर्यादेत राहून बलवंत रायला शिक्षा व्हावी आणि अजय यातून सुटावा, यासाठी तो मनापासून प्रयत्न करत असतो.
सनीला बलवंत रायपर्यंत पोहचायला मदत करणारी वर्षा (मिनाक्षी शेषाद्री) शिवाय राज बब्बर आणि मौसमी चटर्जी यांचे रोल्स तर महत्वपूर्ण होतेच पण याशिवायही अनेक छोटे छोटे रोल्स अधिक ठळकपणे कहानी पुढे नेण्यास मदत करतात.
उदाहरणार्थ
अनु कपूरने साकारलेला बेरकी तरीही राज बब्बरचा विश्वासू आणि प्रामाणिक मित्र, शफी इनामदारने साकारलेला आणि बलवंत रायला विकला गेलेला मतलबी अंकल बॅरिस्टर गुप्ता, सनीला जेलमधून पळून जाण्यास मदत करणारे सुदेश बेरी आणि इतर दोन सहकारी, बलवंत रायचा सेक्रेटरी मोहिले, टिपिकल भ्रष्ट पोलीस ऑफिसर शर्मा, प्रामाणिक पण परिस्थितीपुढे हात टेकलेला पोलीस कमिशनर कुलभूषण खरबंदा…
हे सर्वच कॅरेक्टर्स आपापल्या बाजू चोख बजावतात. त्यामुळे पडद्यावर एकंदर जबरदस्त इम्पॅक्ट जाणवतो.
सनी देओल आणि त्याचे एकापेक्षा एक जबरदस्त डायलॉग्स हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होते. इन्स्पेक्टर शर्माशी पहिल्या भेटीत, शर्माने एका युवकाला मारल्यानंतर ‘इस चोट को अपने दिलो दिमागपर कायम रखना’ हे शांततेत त्याला सांगण्यापासून ते ‘बहोत पछताओगे इन्स्पेक्टर, अगर तुमने मुझे जिंदा छोड दिया’ या चेतावणी पर्यंतची एकूणेक डायलॉगबाजी म्हणजे अंगावर काटा उभी करणारी पर्वणीच.
बॅकग्राऊंड म्युझिक ही चित्रपटेची एक खूप मोठी जमेची बाजू आहे.
घायलची थीम नेहमीच नॉस्टॅलजीक करते. एक्शन / चेस सिक्वेन्सेसच्या वेळी वाजणारे ग्रिटी बॅकग्राऊंड म्युझिकदेखील असेच. एका सीनमध्ये अमरीश पुरी पियानोवर वाजवतो ते म्युझिक आणि सोबत त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, कमालीचे इंटेन्स आणि भयावह वाटतात.
पहिला चित्रपट असल्याने, संतोषी यांना घायल अत्यंत प्रिय आहे. तशी पूर्ण फिल्म, डायलॉग्स आवडते असूनही, सनी जेलमधून पळून आल्यानंतर त्याच्या उध्वस्त घराला भेट देतो, तो सीन त्यांचा सर्वात आवडता आहे.
चित्रपटात इतर सीन्सला आरडाओरड करणाऱ्या सनीने इथे फक्त एक्सप्रेशन्सने काम केलंय, त्यात बॅकग्राऊंड म्युझिक आणि एडिटिंग यामुळे हा सीन, चित्रपटातील एक पिक इमोशनल मोमेंट ठरतो.
२००० सालानंतर चित्रपटात संहितेच्या आणि विषयाच्या बाबतीत झालेला अमूलाग्र बदल गृहीत धरता, नव्वदच्या दशकाला तुलनेने नेहमीच थोडे कमी लेखले जाते, पण ज्या अनेक दिग्दर्शकाने सातत्याने चांगले चित्रपट देत हे दशक अविस्मरणीय बनवले त्यात राजकुमार संतोषी हे नाव अग्रस्थानी येते.
संतोषीच्या लेखनातून अवतरलेला ‘घायल’चा अजय मेहरा हा खऱ्या अर्थाने नव्वदच्या दशकातील अँग्री यंग मॅनच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. परिस्थितीने पोळलेला, पोलीस आणि कायद्यावरचा विश्वास उडालेला आणि नाईलाजाने सर्व सूत्रे हातात घ्यायला मजबूर झालेला तरुण, अश्या चित्रपटांच्या यादीत ‘घायल’ खूप वरच्या स्थानावर आहे आणि सदैव राहिल.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.