' जुने बाप, नवे बाप : कठोरतेच्या सामाजिक बंधनातून मुक्त होणारं “बाप”पण! – InMarathi

जुने बाप, नवे बाप : कठोरतेच्या सामाजिक बंधनातून मुक्त होणारं “बाप”पण!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ह्या फादर्स डे च्या दिवशी सोशलमिडीयावर आपापल्या बाबा, पप्पा, डॅडींना मोकळेपणाने शुभेच्छा देणारे शेकडो हजारो तरुण-तरुणी दिसले. आणि दर वर्षी जाणवणारी गोष्ट अधिकच ठळकपणे जाणवून गेली. आपल्या वडिलांना शुभेच्छा देणारे, त्या नात्याची आठवण व्यक्त करणारे अनेक पुरुष आता स्वतः बाप झालेले आहेत.

त्यांनी आपल्या वडिलांबरोबर असलेल्या नात्याची उजळणी करताना, वर्तमानात त्यांची स्वतःची आपल्या लहानग्या मुला-मुलीबरोबर असलेल्या नात्याची दाखवलेली छटा ठळकपणे वेगळी भासते.

ह्या बाप असण्यात झालेले बदल सुखावह वाटताहेत.

बापाचं बाप पण जरा मोकळा श्वास घेऊ लागलंय आजकाल. एकविसाव्या शतकात घडून आलेल्या सट्ल बदलांपैकी मला सर्वात जास्त आवडणारा बदल हा आहे. बापाची जुन्या, “कठोर” बापपणातून मुक्ती.

आता बाप हळवा असलेला चालतो. त्याने भावना व्यक्त केलेल्या चालतात. डोळ्यावाटे कधी वाहू दिल्या तरी त्यात वावगं नसतं. फार मोठी क्रांती आहे ही.

माझ्या हॉस्टेलजीवनात एकदा बाबा माझ्या होस्टेलवर आले. मी तिथे कसा रहातोय, कसं adjust करतोय हे पाहून चिडले. मी घरी कधी तक्रार केली नव्हती म्हणून त्यांना कल्पनाच नव्हती. बाबांनी संबंधितांना तक्रार केली. दिवसभर वणवण केली. उपयोग झाला नाही.

रात्री परतीची गाडी होती, त्यामुळे बाबाना परतावं लागलं. बाबांची दिवसभरची धावपळ बघून मलाच अपराध्यासारखं वाटत होतं. हॉस्टेलवाले माझ्या बापाला दाद देत नाहीयेत म्हणून संताप होत होता. पण बोलू शकत नव्हतो. बाबा बसमध्ये बसले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं.

बाबा खाली उतरले, डोक्यावरून हात फिरवून निघून गेले. दोघांनाही एकमेकांची तगमग कळत होती, पण समहाऊ व्यक्त नाही झाली.

दुसऱ्या दिवशी रात्री आईचा फोन –

अरे नेमकं झालं काय तिकडे? ह्यांना मी आजपर्यंत एवढं बेचैन कधीच नाही पाहिलं! दिवसभर चलबिचल दिसताहेत…!

त्या दिवशी कित्येक मैल दूर असलेले बाबा एकदम जवळ आले माझ्या.

जसजसा मोठा झालो, कॉलेजात गेलो तसतसे बाबा आपोआप मित्राच्या रोलमध्ये आले. पण त्या मैत्रीतही हळवेपण फारच कमी, मैत्रीपूर्ण खेळकर-खोडकरपणाच अधिक आहे. एकमेकांची मस्करी करतो आम्ही. पण भावनावेगाने एकमेकांना मिठी मारली जात नाही.

 

shakti amitabh bachchan dilip kumar inmarathi

 

आणि हे कधी “खटकलं”देखील नाही अजिबात. हा फॅक्टर कधी जाणवलाच नाही. कारण त्यावाचून कधीच अडलं नाही. आम्हाला बाळ झालं आणि मग हळूहळू “बाप”पण उमगायला लागलं.

बाबांमधला बाप आणि माझ्यातला बाप – फरक उलगडायला लागला.

माहेरी बाळंत झालेली बायको २४ तास आपल्या लेकराबरोबर असते. आपल्याला ८-१५ दिवसाला दिसतो जिगरचा तुकडा. आता व्हिडीओ कॉल आणि फोटो शेअरिंगने ताकावर तहान भागवून होते. पण बाळ रात्री लवकर झोपत नाही, रडत असतं हे कळाल्यावर जीवाची होणारी घालमेल व्हिडीओ कॉलने कशी कमी होणार?

एका रात्री असाच पडून होतो. बाळ रडत असेल का कल्पना करत होतो. झटक्यात मोबाईल रेकॉर्डिंग सुरु केलं आणि बर्फीतलं “सावली सी रात हो” रेकॉर्ड केलं. बायकोला पाठवून दिलं. अर्धवट समाधानाने झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी बायकोचा फोन…गाणं सुरु केल्याकेल्या चिरंजीव शांत झाले…काही सेकंदात झोपी गेले…

दिवसभर हवेत होतो मी. बाळाला माझा आवाज कळला होता. भसाड्या आवाजातलं गाणं गोड वाटलं होतं.

ह्या भावना व्यक्त करता येणं, त्यांचा प्रतिसाद अनुभवणं एका बापासाठी विलक्षण आहे. कोणत्याच शब्दांत, काव्य-साहित्यात व्यक्त होणं अशक्य आहे.

 

father son relationship
isha.sadhguru.org

जुन्या बापांनी सर्व कर्तव्यं कसोशीने पार पाडली. “वडील”पणातील भावनांचा आस्वाद तेवढा घेतला नसावा. सोसायटीने लादलेल्या कणखरपणाच्या ओझ्याखाली किती भावना दडपून टाकल्या असतील कल्पना करवत नाही.

आम्हाला हे असं व्यक्त करता येतंय, हे मोठंच नशीब आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?